व्यंगचित्रकलेचे अनेक प्रकार असतात. राजकीय व्यंगचित्रं, पॉकेट कार्टून्स, सामाजिक विषयावरील हास्यचित्रे, कॉमिक्स, शब्दविरहित चित्रे, अर्कचित्रे इत्यादी. यातला शब्दविरहित हास्य चित्रे हा प्रकार महाराष्ट्रात, देशात लोकप्रिय केला, गाजवला तो शि. द. फडणीस यांनी. सतत ऐंशी वर्षे हास्यचित्रे रेखाटणे म्हणजे सोपं काम नव्हे. या वर्षीच्या ‘हंस’ दिवाळी अंक २०२५चे मुखपृष्ठ हा शंभर वर्षांचा चिरतरुण कलाकार रेखाटणार आहे.
रोजच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग घेऊन शि. द. यांनी त्यावर शब्द न वापरता रेषांमधून भाष्य केलं. पु. ल. देशपांडे यांनी रोजच्या जीवनातील कटकटींना विनोदाची झालर देऊन त्या कटकटींमधून आनंद कसा घ्यावा हे भाषेतून शिकवलं. तेच काम शि. द. फडणीस यांनी भाषा न वापरता रेषेतून केलं. असंख्य दिवाळी अंकाची सप्तरंगी मुखपृष्ठे, पुस्तकांची मुखपृष्ठे, गणित विषयासारखी क्लिष्ट पुस्तके त्यांनी चित्रांतून सोपी केली. हास्यचित्रातून गणित, विज्ञानाबद्दल गोडी निर्माण केली. त्यांनी मॅनेजमेंटसारखा कठीण विषयही आपल्या सुबक चित्रातून सोपा केला. त्यांची चित्रे मोजक्या, नेमक्या रेषांची, फाफटपसारा नसलेली असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातला नीटनेटकेपणा, सौम्यपणा, स्वभावातला गोडवा आणि जेवढ्यास तेवढं बोलणं हे त्यांच्या चित्रांतून उतरलं आहे. त्यामुळे जेवढ्यास तेवढ्या रेषा त्यांच्या मोहक चित्रांतून आलेल्या आहेत. अंतर्यामी असतं ते बाहेर दिसतं. कला हा प्रकारच कलाकाराचं अंतरंग उलगडून दाखवतो. ‘मोहिनी’ दिवाळी अंकावर महाराष्ट्रातील पहिले हास्यचित्र रेखाटण्याचा त्यांचा विक्रम आहे. पण कुठेही त्याचा गाजावाजा न करता हा कलाकार वयाच्या शंभरीतही त्याच उमेदीने, उत्साहाने काम करत आहे.
सुतारकाम, वैद्यकीय व्यवसाय, गवंडी, जादूगार, गारुडी, विणकाम, शिवणकाम, शिल्पकला, न्युत्य अशा असंख्य कलांना शि. द. यांनी स्पर्श केलाय.
साप्ताहिक ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत आणि सल्लागार संपादक वसंत सोपारकर यांनी ‘मार्मिक’च्या एका वर्धापनदिनाला नेहमीपेक्षा वेगळ्या व्यंगचित्रकाराकडून ‘मार्मिक’चे मुखपृष्ठ करून घ्यावे अशी जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यावेळी सुदेश म्हात्रे यांच्या सहकार्याने शि. द. यांच्याशी पुण्याला संपर्क करून मुखपृष्ठ करून घेण्यात आलं. साधारण २५ वर्षांपूर्वी थोर व्यंगचित्रकार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांना मार्मिक मैफिल या कार्यक्रमात ‘मार्मिक जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात आला होता. त्यावेळी मला शि. द. फडणीस यांची जाहीर मुलाखत घेण्याची संधी प्रबोधन प्रकाशनाने दिली होती. या मनस्वी कलाकाराला शतकपूर्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
(दुर्मिळ छायाचित्रे संजय मिस्त्री यांच्या संग्रहातून)