‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या संकल्पनेचा एकेकाळी सुधीर दामले यांनी कल्पकतेने शुभारंभ केला. त्यातून आजवर शेकडो संहिता आकाराला आल्या. नवनवीन नाटककार रंगभूमीला मिळाले. बदलता काळ, बदलते प्रश्न, यातून निर्माण झालेली कोंडी हे सारं काही दोन पिढ्यांनी यातील संहितेतून अनुभवलं. या रंगप्रवाहातून अनेक संहितांना पूर्णरूप मिळालं आणि आजही मिळत आहे. अशाच एका वेगळ्या वाटेवरची विनोद रत्ना यांची छोटेखानी एकांकिका अनेकांना पसंत पडली खरी, पण नव्या पिढीचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, कविवर्य संकर्षण कर्हाडे याने नेमकी त्यातली गंमत ओळखली. त्यांना प्रसंगांतून शब्दरूप दिले आणि पूर्ण नाटकाचा जन्म झाला. ‘कुटुंब किर्रतन!’ विनोद रत्नाची कल्पना, सोबत संकर्षणचा आविष्कार. यातून दोन घटका मनोरंजन कम संदेश देणारे नाट्य अलगद बहरलं. जे कुटुंबातील नवं-जुनं, वाद-प्रतिवाद, संघर्ष-समेट, याची अनोखी सांगड घालण्याचा प्रयत्न करतेय.
सासू-सुनेची भांडणं ही काळ बदलला तरी न संपणारी आहेत. एकीकडे सासूला आपला मुलगा पूर्णपणे आपल्या ताब्यात हवाय, तर दुसरीकडे सुनेला आपला नवरा सर्वस्व आपल्याला हवाय. यात पोराची कोंडी होणं स्वाभाविकच आहे. घरात आलेली नवी सूनबाई विरुद्ध राज्यकर्ती सासूबाई यांच्यातला संघर्ष तसा नवा नाही. हे दोन पिढ्यांचे अंतर आहे. बदलत्या परिस्थितीत दोन्हीकडे दृष्टिकोन बदलला पाहिजे. एकूणच स्त्रियांच्या बहुपदरी नातेसंबंधांवर नवी दृष्टी हवी. कारण शेवटी कुटुंबाच्या केंद्रस्थानी स्त्रीच असते. तिच्यावर सारं घरकुल प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवलंबून असते. मराठी रंगभूमीवर सासू-सुनेचा संघर्ष हा बरेचदा आलाय. इथेही तोच असला तरीही यातील कथानकात हसत-खेळत हा कुटुंबप्रश्न खुबीने मिटविला आहे. नवा विचार बेधडकपणे मांडलाय.
पडदा उघडतो आणि एका कीर्तनकाराचा वाडा प्रकाशात येतो. पुंडलिक हा वयाची तिशी ओलांडलेला कीर्तनकार वयोवृद्ध आईसोबत राहतोय. त्यांचा पिढीजात कीर्तनकाराचा वारसा. तो पुंडलिक श्रद्धेने पुढे चालवित आहे. मिळेल त्या दक्षिणेवर पुंडलिक समाधानी आहे. तृप्त आहे. पुंडलिकाचे दोन वीक पॉइंट आहेत.
एक आईची सेवा आणि दुसरा म्हणजे विठ्ठलावर श्रद्धा. त्यापुढे सारं काही व्यर्थ असल्याचं तो मानतो. लग्नाचं वय उलटून चाललं असलं तरी तो त्याचा विचार करीत नाही. कारण येणारी ‘सून’ कशी असेल याचा त्याला काही भरवसा नाही. घरात आईच त्याचे सर्वस्व ठरलीय.
यांच्या वाड्यातच विठ्ठलाचे मंदिर आहे. त्याच्या दर्शनासाठी ओळखीपाळखीचे लोक येतात. एके दिवशी शिवानी या मुलीचे वडील मुलीचे स्थळ घेऊन येतात. सोबत मुलगी आहे. तिला पिक्चरचं शूटिंग बघण्यासाठी म्हणून थाप मारून आणलंय. शिवानी आणि आईची भेट होते खरी, पण मुलगी ‘आगाऊ’ असल्याचे आईचे मत बनते. पुंडलिकाचीही भेट होते. स्वभाव रोखठोक असला तरी पुंडलिक तिच्यावर भाळतो. प्रेमात पडतो आणि दोघांचं लग्नही होते. अखेर हा कीर्तनकार लग्नाच्या बेडीत अडकतो.
आता सुरू होतो नवा अध्याय. आई-मुलामध्ये नवी शिवानी आल्याने पहिल्या रात्रीपासूनच कुरबुर सुरू होते. आई मुलाला एकेक भन्नाट टिप्स देते. त्यातून भांडणे वाढतात. वाद विकोपाला पोहचतो. रोजच्या भांडणाला कीर्तनकार पुंडलिक कंटाळतो. सासूला नातू हवा असतो. यथावकाश शिवानीला दिवस जातात. पण भांडणे काही केल्या कमी न होता ती टोकाला पोहचतात. अशा अवस्थेत आई शिवानीला घराबाहेर काढते. ती माहेरी बाबांसोबत जाते खरी, पण नवर्याशिवाय तिला राहाता येत नाही. पुंडलिकालाही जगणे मुश्कील होते. कथानक ‘एक दुजे के लिये’च्या वळणावर पोहचते. अर्थात याची मांडणी मनोरंजनात्मक प्रकारे केलीय. जी हसवून बेजार करते.
सासू-सुनेची भांडणं, त्यात मुलाचा होत असलेला कोंडमारा… या परिस्थितीत ‘आई’ एक हादरून सोडणारा निर्णय घेते, जो कथानकाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातो. तो प्रत्यक्ष रंगमंचावरील प्रयोगात अनुभवणं उत्तम नाहीतर उत्कंठा संपण्याचं भय आहे.
या नाट्यातील काही प्रसंग गंभीर विषयाला मनोरंजनाची जोड देतात. विनोदाच्या झालरीत गुंडाळून त्यांना सजवलं आहे. त्यात कीर्तनाची सुपारी देण्यासाठी आलेला श्रीमंत गाववाला. त्याला मुलाच्या वाढदिवसासाठी महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. त्याची आणि शिवानीची भेट होते. त्याच्याकडून शिवानी वारेमाप दक्षिणा उर्फ बिदागी वसूल करण्याची चतुराई दाखवते. नेमकं त्याचवेळी सासूबाईंचं मौनव्रत!
आणखी एका प्रसंगात सासू-सुना डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातात. तिथेही दोघांचे रुसवे-फुगवे आणि परस्परांवर संशयाचा गुंता. घरी आल्यावर ‘डॉक्टर काय म्हणाले?’ याचं उत्तर मिळविण्यासाठी पुंडलिकाची एकच त्रेधातिरपीट उडते! उत्तर बाजूला, पण भांडण डोईजड होते. कुटुंबातील नात्याचा गोडवा जपण्यासाठी संवादातून सुसंवादाकडे जाण्याचा तसेच चूक नसेल तरीही माफी मागण्याचा दिलदारपणा दाखविण्याचा संदेश हा कीर्तनाच्या समारोपात पुंडलिक महाराज देतात. या एकूणच कथानकाचे हे दिशादर्शन मार्गदर्शक ठरते.
नाटक, चित्रपट, मालिका यात प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या वंदना गुप्ते या ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री. यातील त्यांची भूमिका ही वेगळेपणाने परिपूर्ण आहे. ‘चारचौघी’, ‘श्री तशी सौ’, ‘रमले मी’, ‘अखेरचा सवाल’, ‘गगनभेदी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘सुंदर मी होणार’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ अशा किमान पन्नासएक दर्जेदार नाटकांशी त्यांची नाळ पक्की जुळली आहे. चांगल्या भूमिकांचा त्यांचा शोध असतो. आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याकडे त्यांचा कल. नाटकांसाठी वेळ राखून ठेवणार्या आणि नव्या पिढीशी संवाद ठेवणार्या रंगधर्मींमध्ये वंदना गुप्ते कायम अग्रभागी आहेत. यातील त्यांची ‘सासू’ची भूमिका त्यांच्या रंगप्रवासात नजरेत भरणारी ठरेल. अभिनयातील ताजेपणा दाद देण्याजोगा आहे. हक्काचे हसे वसूल केले जातात. संवादफेक प्रभावी, जी वयाला शोभून दिसणारी.
संकर्षण कर्हाडे याचे लेखन, अभिनय असलेले विनोदी नाट्य ‘नियम व अटी लागू’ आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा रंगाविष्कार, या दोन्ही प्रयोगांनी आज व्यावसायिक रंगभूमीवर चांगली बाजी मारली असतानाच या ‘किर्रतन’मुळे त्यांचा ‘हटके’ पैलू प्रकाशात आलाय. लेखन तसेच अभिनय याची क्षमता थक्क करून सोडते. संहितेतला ग्रामीण बाज, खटकेबाज संवाद, वेगवान मजबूत पकड नोंद घेण्याजोगी. नाटकाचा ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ होऊ दिलेला नाही. पुंडलिक हा कीर्तनकार देहबोलीतून, बोलीभाषेतून अस्सल वाटतो. एकीकडे आई तर दुसरीकडे बायको, या दोघींना सांभाळण्याच्या प्रयत्नातली त्याची तारेवरची कसरत चांगली झालीय. कीर्तनाचे काही तुकडे हे तत्वज्ञान उलगडून सांगतात. कीर्तनकार म्हणून अनेक लकबींमुळे त्याची व्यक्तिरेखा भुरळ पाडते. राजकीय चिमटेही टाळ्या, हशा वसूल करतात.
सूनबाई शिवानीच्या भूमिकेत तन्वी मुंडले ही गुणी अभिनेत्री रंगभूमीला मिळाली आहे. सासूबाईंसमोर ती ताकदीने उभी राहाते. व्यावसायिकवरचं तिचं हे पहिलंच नाटक असूनही कुठेही तणाव दिसत नाही. मिळालेल्या संधीचं तिने सोनं केलंय. आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व शिवानीच्या व्यक्तिरेखेत आहे. बिनधास्त, बेधडक शिवानी ही पहिल्या प्रवेशापासून लक्षवेधी ठरते.
शिवानीचे वडील आणि गावचा पुढारी, अशा दोन भूमिकांमध्ये अमोल कुलकर्णी यांनी हजेरी लावली असून या दुहेरी भूमिकांमध्ये त्यांनी चांगले रंग भरलेत. वेगळेपणा दाखविण्याचा प्रयत्न दिसतो. नाटकातील चौघा कलाकारांचे टीमवर्क अप्रतिमच. त्यामुळे नाटकाची भट्टी मस्त जमली आहे.
नाटककार, दिग्दर्शक अमेय दक्षिणदास यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलंय. व्यावसायिकवर दिग्दर्शन करण्याचा त्यांचा हा तसा पहिलाच ‘प्रयोग’ आहे. नाटकाच्या एकूणच शैलीवर तसेच तांत्रिक बाजूंवर त्यांनी पुरेपूर लक्ष दिल्याचे जाणवते. नाटक एका उंचीवर नेण्यासाठी ज्या जागा असतात, त्या त्यांनी कौशल्याने हाताळल्या आहेत. वंदना गुप्ते आणि संकर्षण यांच्यासारख्या मुरलेल्या कलाकारांकडून त्यांनी चांगला आविष्कार करवून घेतला आहे. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आलीय.
कीर्तनकाराचा वारसा असलेला वाडा, त्यातले विठ्ठलाचे मंदिर, तुळशी वृंदावन. मागील बाजूला गोठा, स्वयंपाकघर, पुढे बेडरूम, हे सारं काही नेमकेपणाने वातावरणनिर्मिती करते. ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांच्या कल्पकतेतून नेपथ्यरचना केलीय. पडदा उघडताच नेपथ्याला टाळ्याही मिळतात. त्याची रंगसंगतीही उत्तम. पूर्वजांचे फोटो, तुळस, बैठक हे सारं काही कथानकाला अनुकूल आहे. संगीतकार अशोक पत्की यांनी कीर्तनाचा दिलेला ठेका तसेच तालसुरांनी दिलेली जोड चांगली आहे. ‘फिटे अंधाराचे जाळे’ या गाण्याचा केलेला वापरही अर्थपूर्ण ठरतो. किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना तसेच कीर्तन प्रकाशात आणणारी वेशभूषा व रंगभूषाही भूमिकांना न्याय देणारी आहे. कीर्तनकाराचा गेटअप परिपूर्ण दिसतो. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही. त्यामुळे निर्मिती दिमाखदार झालीय. निर्मात्या गौरी प्रशांत दामले या जातीने लक्ष ठेवून असल्याचे दिसले.
कीर्तनकाराच्या घरात सासूसुनेमुळे होणारी ‘किरकिर’ ही टायटलमध्ये खुबीने मांडली आहे. किरकिरी सासूबाई आणि फटाकडी सूनबाई नजरेत भरते. ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटकाचं नामकरण अर्थपूर्णच. त्याने चांगलंच बाळसं नावामागली कलाकारी नजरेत भरते. कुटुंब रंगलंय कीर्तनात! हेच खरे!!
विनोदाची मिश्कील झालर असलेले अनेक कीर्तनकार वर्षानुवर्षे कीर्तनासाठी बुक असतात असं म्हणतात. तसंच हे नाटकदेखील हाऊसफुल्ल बुकिंगच्या वाटेवरलं आहे. ज्या वेगात याचे प्रयोग सुरू आहेत त्याची आकडेवारी थक्क करून सोडणारी आहे. रामकृष्ण हरि कुटुंब किर्रतन!
कुटुंब किर्रतन
कथासूत्र : विनोद रत्ना
लेखन : संकर्षण कर्हाडे
दिग्दर्शन : अमेय दक्षिणदास
नेपथ्य : प्रदीप मुळये
प्रकाश : किशोर इंगळे
संगीत : अशोक पत्की
निर्माती : गौरी प्रशांत दामले
सूत्रधार : अजय कासुर्डे
निर्मिती : गौरी थिएटर्स आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन