सानिया मिर्झा, हार्दिक पंड्या, यजुर्वेंद्र चहल, मेरी कोम, शिखर धवन, मोहम्मद शमी ही गेल्या एखाद-दोन वर्षांतली क्रीडा क्षेत्रातल्या घटस्फोटाची प्रकरणं. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या बॅडमिंटन तार्यांचा घटस्फोट ही या मालिकेतील ताजी जोडी. संसार मोडल्याचं शल्य पचवून खंबीरपणे आयुष्याचं मार्गक्रमण करणार्या या गाजलेल्या क्रीडापटूंच्या रोचक काडीमोड कथा.
– – –
‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!’ हे कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘फक्त लढ म्हणा’ कवितेचं शेवटचं कडवं. एका उद्ध्वस्त माणसाची व्यथा मांडणारी ही कविता. परंतु या नैराश्यातही आत्मविश्वास जागवणारी आणि लढून आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देणारी. या कवितेकडे वेगळ्या पद्धतीनं पाहिल्यास ती एका घटस्फोटित व्यक्तीला मोडलेल्या संसारातून सावरण्याचं बळ देणारी आहे. आपल्या देशात संस्कृती आणि सामाजिक नैतिकता याचा आदर केला जातो. भारतात घटस्फोटांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. स्वीडन, अमेरिकेत हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असताना भारतात हे प्रमाण १.१ टक्के आहे. त्यात अलीकडच्या काळात क्रीडापटूंच्या काडीमोडांची जणू साथच आली आहे. सगळ्यात ताजी बातमी ‘फुल’राणी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्या विभक्तीची. दोघेही गाजलेले बॅडमिंटनपटू.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक हे अनुक्रमे टेनिस आणि क्रिकेटमधील दिग्गज. तेही विभक्त झाले. बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि हार्दिक पंड्या, यजुर्वेंद्र चहल आणि मोहम्मद शमी या क्रिकेटपटूंचे जोडीदार खेळाडू नसले तरी चर्चेतली माणसं होतीच ती. त्यांनीही एकमेकांपासून दूर होण्याचं ठरवलं.
सायना-कश्यप
सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप ही बॅडमिंटनमधील तारांकित जोडी. सप्तपदी घेताना साताजन्माची साथ निभावण्याची वचनं घेणार्या ह्या जोडीनं सात वर्षांतच विलग होण्याचा निर्णय घेतला. सायना १० वर्षांची असताना कश्यपची तिची पहिल्यांदा ओळख झाली. २००२पासून हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीत दोघांनी प्रशिक्षणाला प्रारंभ केला. दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. एखाद्या चित्रपटाप्रमाणेच हे प्रेमप्रकरण फुलू लागलं. २०१०च्या आशियाई क्रीडास्पर्धेत सायनाला गंभीर दुखापत झाली. या स्पर्धेतील सामने पाहायला कश्यप हजेरी लावायचा. या ‘फुल’राणीचं मन त्याचवेळी कश्यपनं जिंकलं. १४ डिसेंबर २०१८ या दिवशी दोघांचा विवाह झाला. एकीकडे जीवनाची घडी बसत असताना गोपीचंद यांच्याशी मतभेद आणि कारकीर्दीची अस्ताकडे वाटचाल अशी वादळं तिच्या आयुष्यात घोंगावली. या कठीण काळात कश्यप तिच्या सोबतीला खंबीरपणे उभा होता. पण गेल्या काही वर्षांतली सायना-कश्यप यांच्यातली दुफळी अचानक जगासमोर आली, ती १३ जुलै २०२५ या दिवशी. सायनाने समाजमाध्यमांवर घटस्फोटाची घोषणा करतानाच १४ वर्षांच्या प्रेमसंबंधांना पूर्णविराम दिला.
मेरी-ऑनलर
मणिपूरसारख्या दुर्गम भागातून नावारूपास आलेली महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम हिने खडतर लढा देऊन मोठं यश मिळवलं. तिचा आदर्श ईशान्येच्या राज्यांतच नव्हे, तर देशभर जोपासला गेला. भारताला महिला बॉक्सिंगमध्ये पहिलं पदक जिंकून देणारी ही कन्या. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमधील सहा सुवर्णपदकांसह एकंदर आठ पदकं तिच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतात. प्रियांका चोप्रानं अभिनय केलेला ‘मेरी कोम’ हा चरित्रपटसुद्धा गाजला होता. मेरीच्या यशोप्रवासात तिचा पती करूंग ओंखोलर (ऑनलर) भक्कमपणे तिच्या पाठीशी उभा राहिला. २०००मध्ये या प्रेमकथेला प्रारंभ झाला. दिल्ली विद्यापीठात ऑनलर कायद्याचं शिक्षण घेत असताना मेरीचं हरवलेलं सामान शोधून देण्याचं सत्कार्य त्यानं केलं होतं. पुढे २००५मध्ये त्यांचा विवाह झाला. मेरीची कारकीर्द घडत असताना तीन मुलं आणि एका दत्तक मुलीसह चौघांचा सांभाळ करताना
ऑनलरनं घराची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. जवळपास दोन दशकांचा हा संसार, दृष्ट लागण्याजोगा. पण मेरीच्या आग्रहाखातर ऑनलर निवडणुकीला उभा राहिला आणि अपयशी ठरला. या प्रचार अभियानासाठी दोन-तीन कोटी खर्ची घालावे लागले. इतका मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागल्यानं मेरी नाराज होती. त्यामुळे दोघांमधील संबंध बिघडत गेले. अखेरीस २० डिसेंबर २०२३ रोजी दोघं विभक्त झाली. मेरीचे एका अन्य बॉक्सिंगपटूचा पती हितेश चौधरी याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचीही बॉक्सिंग क्षेत्रात चर्चा होती. परंतु मेरीनं हे आरोप फेटाळून लावले.
सानिया-शोएब
मुस्लिम समाजातील जन्म, तोकड्या कपड्यातील खेळ, भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह आणि समाजमाध्यमांवर सर्वच टीकाकारांना पुरून उरणारी कामगिरी अशी ही बंडखोर टेनिसपटू म्हणजे सानिया मिर्झा. त्यांचा विवाह हा भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी धक्कादायक होता. दोन देशांमधील राजनैतिक संबंध ताणले गेले, तरीही हे नातं १५ वर्षं टिकलं. २०१८मध्ये सानियानं इझहान या मुलाला जन्म दिला. पण गेली काही वर्षं शोएबच्या प्रेमप्रकरणांमुळे सानिया चिंतेत असायची. जानेवारी २०२४मध्ये हे नातेसंबंध संपुष्टात आलं. काही महिन्यांतच शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री साना जावेदशी पुनर्विवाह केला.
चहल-धनश्री
यंदाच्या ‘आयपीएल’ला प्रारंभ होण्याआधी फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल आणि नृत्यांगना-कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची बातमी दोघांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात परस्परसहमतीनं घटस्फोटाची संयुक्त याचिका दाखल केल्यामुळे चर्चेत आली. याआधीची अडीच वर्षं स्वतंत्र राहात असल्यामुळे फेरविचार कालावधी न देता थेट घटस्फोट मंजूर करावा, अशी दोघांची मागणी होती. त्यानुसार तो मार्चमध्ये मंजूरही झाला. चहलकडून धनश्रीला पावणेपाच कोटी रुपये एकरकमी पोटगी देण्यात आली. जीवनशैली आणि अहंकारामुळे दोघांचा संसार मोडल्याचे म्हटलं जातं.
हार्दिक-नताशा
क्रिकेटपटू हार्दिक पंड्या गेल्या वर्षी अनेक कारणांनी वादाच्या भोवर्यात सापडला. त्यापैकी एक म्हणजे नताशा स्टॅनकोव्हिचशी झालेला घटस्फोट आणि रोहित शर्माकडून काढून घेतलेलं मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद. नताशानं समाजमाध्यमांवरील नावापुढील पंड्या आडनाव वगळल्यानं आणि हार्दिकसोबतचे फोटो काढून टाकल्यानं हे तुटलेले नातेसंबंध प्रकाशात आले. हार्दिकच्या स्वयंकेंद्रित व्यक्तिमत्वामुळे दोघांमधील दरी वाढत गेली. नताशानं ती कमी करण्याचे कसोशीनं प्रयत्न केले. पण तिला यश आले नाही. जुलै २०२४मध्ये न्यायालयानं दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं. मुलगा अगस्त्यचा ताबा नताशाकडे राहिला असला तरी दोघांनीही त्याला भविष्यात कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी हमी समाजमाध्यमांवर दिली आहे. या खटल्यातून नताशानं हार्दिकच्या मालमत्तेमधील ७० टक्के वाटा मिळवल्याचं काही वृत्तांत म्हटलेलं आहे. पण हार्दिकच्या मालमत्तेमधील ५० टक्के मालकी ही आधीच आईच्या नावे असल्यामुळे या प्रकरणातून नताशानं किती फायदा मिळवला, हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
शिखर-आयेशा
भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि मेलर्बनस्थित किकबॉक्सिंगपटू आयेशा मुखर्जी यांचं प्रेमप्रकरण ‘फेसबुक’वरून सुरू झाले. ते परीकथेप्रमाणेच फुललं. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या. तरीही २०१२मध्ये शिखरने कुटुंबाचा विरोध झुगारत आयेशाशी विवाह केला. तिचं पाठबळ शिखरची कारकीर्द बहरण्यासाठी उपयुक्त ठरलं. २०१४मध्ये आयेशानं झोरावर या मुलाला जन्म दिला. जनमानसात आनंदी कुटुंबाचा देखावा करणार्या या जोडीचं प्रत्यक्षातील नातं असंख्य मतभेदांमुळे पोखरलं होतं. ऑक्टोबर २०२३मध्ये शिखरनं घटस्फोटाची कबुली दिली. आयेशा ऑस्ट्रेलियातच निवासाला होती, तर शिखर बराच काळ भारतातच असायचा. पालकत्व आणि वैयक्तिक प्राधान्यक्रम या बाबतीतील दीर्घकालीन आव्हानं दोघांनाही जसजशी उलगडू लागली, तसतसा दोघांमध्ये भावनिक दुरावा निर्माण झाला. याचंच पर्यवसान घटस्फोटात झालं. ते दु:खदायी असलं तरी आयुष्याचा धडा त्यातून घेतला आहे, असं शिखरनं सांगतो.
शमी-हसीन
हसीन जहाँ हिने २०१८मध्ये मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात घरगुती हिंसाचार आणि गुन्हेगारी कटाचा आरोप करून खळबळ माजवली होती. २०१२च्या ‘आयपीएल’ हंगामात या दोघांची भेट झाली. शमी क्रिकेटपटू, तर हसीन ही चीअरलीडर. पण दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हायला वेळ लागला नाही. मग २०१४मध्ये शमी आणि हसीनचा प्रेमविवाह झाला. वर्षभरातच कन्यारत्नप्राप्ती झाल्यानंतर चार वर्षांत दोघांचे संबंध बिघडले. हसीननं शमीकडून दरमहा १० लाख रुपये पोटगीची मागणी केली, तर न्यायालयानं चार लाख रुपये पोटगी मंजूर केली. पण अनेक गुन्हेगारी मुद्द्यांचा अंतर्भाव असल्यानं हा खटला निकाली निघण्यास उशीर होत आहे.