• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

विधानभवनाच्या आखाड्यात महाराष्ट्राची प्रतिष्ठा चीतपट!

- प्रशांत कदम (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 24, 2025
in कारण राजकारण
0

लोकप्रतिनिधींना संसदरत्न वगैरे पुरस्कार देण्याची पद्धत बंद करून आता कॅन्टीन केसरी, सभागृह श्री असे पुरस्कार देण्याची वेळ महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला इथले आमदार अक्षरश: आखाडा समजायला लागले आहेत. विधिमंडळाच्या संपूर्ण अधिवेशनात काय दिसलं तर एक आमदार लुंगी बनियानवर मारहाण करतायत तर दुसरीकडे इशारा करून आपल्या गुंड कार्यकर्त्यांना अगदी सभागृहाच्या प्रवेशद्वाराचा मारहाणीला प्रोत्साहन देतायत. विधिमंडळाच्या प्रांगणातच थेट मारामारीचा हा प्रकार संपूर्ण देशभरात चर्चिला गेला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची लाज निघाली. मारहाणीचा हा प्रकार घडल्यानंतर जे तातडीचे उपाय गांभीर्याने व्हायला हवे होते तेही झालेले दिसले नाहीत. या सगळ्या प्रकारात सरकार निगरगट्टपणे सत्ताधारी आमदाराच्या पाठिशीच असल्याचं दिसतं आहे.
गोपीनाथ पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे किती लाडके आमदार आहेत हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. हे संपूर्ण प्रकरण मारहाणीपर्यंत कसं आलं याचीही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. पडळकर आणि जितेंद्र आव्हाड हे काही बांधाला बांध असलेले आमदार नाहीत. किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय जनता पक्ष हे काही तसे एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले पक्ष नाहीत. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे किती उत्तम संबंध आहेत हे जगजाहीर आहे. पण तरी आव्हाड आणि पडळकर यांच्यात हा विखार का दिसला?… कारण भाजपमध्ये पडळकरांना सातत्यानं शरद पवारांना टार्गेट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय. महाराष्ट्राला लागलेला कोरोना इथपासून ते कॉकटेल कुटुंब अशी अत्यंत वादग्रस्त आणि गलिच्छ पातळीवरची विधानं त्यांनी यापूर्वी केली आहेत. जितेंद्र आव्हाड हे पवारांचे एकनिष्ठ आमदार आहेत. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला मानत असतानाच रस्त्यावरची भाषाही ठाऊक असलेले नेते आहेत. आव्हाड विधानभवनाच्या लॉबीतून जात असताना पडळकरांना उद्देशून मंगळसूत्र चोराचा… अशी आरोळी देत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. याला कारण काय झालं होतं, तर गेटवर त्यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते. आणि आव्हाडांकडे बघून त्यांनी अर्बन नक्षलवादी, गाझापट्टीचे समर्थक असलेले लोक इथे आहेत अशी टिपण्णी त्यांनी केल्याची चर्चा होती. त्यावर आव्हाडांची ती प्रतिक्रिया आली. नंतर गेटवर दुसर्‍या दिवशी ज्यावेळी आव्हाड हे मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांच्यासोबत बोलत उभे होते, त्यावेळी त्यांच्यासमोरच पडळकरांची गाडी थांबते, तिथे दरवाजाचा धक्का लागला म्हणून आव्हाड आणि नितीन देशमुख बोलतात. त्यावर पडळकरांची शिवीगाळ, मग नितीन देशमुखचंही तसंच उत्तर हा सगळा प्रकार घडतो. या दोन प्रकारांनंतर मग तिसर्‍या दिवशी विधिमंडळाच्या अगदी लॉबीमध्येच हाणामारीचा प्रकार घडतो.
या हाणामारीच्या प्रकरणातली सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे ही मारहाण घडली त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर तिथे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना खुणावल्याने कार्यकर्ते नितीन देशमुखवर धावून गेले, हे देखील दिसते आहे. म्हणजे लोकशाहीचे मंदिर असलेल्या सभागृहातही आपण मारहाण करू शकतो हा आत्मविश्वास या गुंड कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना आहे. आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही, शेजारी विधानभवनाचे सुरक्षारक्षक उपस्थित असताना त्यांच्यासमोर त्यांनी हे करून दाखवलं.
पडळकरांच्या चार पाच कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे. पण त्यातल्या केवळ एकालाच पोलिसांनी अटक केली आहे. बाकीच्यांचा काही दोष यात नव्हता. त्यांचा एक कार्यकर्ता पकडला गेलाय, तर आपला पण एकच नग दिसला पाहिजे, हीच यापाठीमागची रणनीती दिसतेय. पडळकरांचा जो मुख्य कार्यकर्ता पकडला गेलाय तो मकोकाचा आरोपी आहे. अशा आरोपीला इतक्या सहजपणे विधानभवनाच्या प्रवेशाचा पास कसा काय मिळू शकतो, हाही प्रश्न आहे. त्यादिवशी विधिमंडळातल्या पत्रकार कक्षात जी चर्चा सुरू होती त्यानुसार हा पासही अधिकृत नव्हता, पडळकरांनीच अनधिकृतपणे त्यांचा प्रवेश सुकर केल्याची माहिती होती. सगळ्यात आधी तर या सगळ्या कार्यकर्त्यांचे प्रवेश पास काय काय होते, कुणाच्या शिफारशीने होते हे समोर यायला हवं. त्यातून विधिमंडळातल्या प्रवेशातलं रॅकेटही समोर येईल, हा वेगळाच भाग.
दिल्लीत असताना दहा वर्षे संसदेतल्या कामकाजाचं रिपोर्टिंग करण्याचा योग आला. पण विधानभवनातली सगळी व्यवस्था मात्र किती अनागोंदींची आहे हे जाणवतं. या विधानभवनात सतत बाजारबुणग्या, उठाठेवी कार्यकर्त्यांची गर्दी असते, हा जणू त्यांचा अड्डाच बनलेला आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी होती. सर्वपक्षीयांची मते जाणून घेऊन सभागृहाच्या सुरक्षिततेसाठी काय कडक उपाय करता येतील याची तातडीने एक एसओपी बनायला हवी होती. पण ते न करता केवळ समितीची घोषणा, पासेसवर काही निर्बंध. सगळ्यात कहर म्हणजे मकोकाचे आरोपी सभागृहात येऊन धुडगूस घालतो आणि अध्यक्ष महोदय त्याचा उल्लेख निवेदनात अभ्यागत असा करतात. मकोकाचा आरोपी असला म्हणून काय झालं, आम्ही सरकारी भाषेतली कृत्रिमता सोडणार नाही. नशीब यावरच थांबले नाहीतर अतिथीगण, श्रीमान वगैरेही लावायला कमी केलं नसतं.
या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे भाजपने पोसलेली ही नवी राजकीय संस्कृती. जे पडळकर एकेकाळी आपल्या कार्यकर्त्यांना बिरोबाची शपध देऊन भाजपला मतदान करू नका सांगत होते ते आज देवेंद्र फडणवीसांचे लाडके बनले आहेत. रासप, वंचित ते भाजप असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. शरद पवारांवर थेटपणे रोखठोकपणे काहीही कुठल्याही भाषेत बोलण्यासाठी त्यांचा खुबीने वापर भाजपने केला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत तर भाजपने त्यांना अजित पवारांविरोधात लढायला उभं केलं होतं. पवार कुटुंबाविरोधात बेभानपणे बोलणारा त्यांचा हा हुकमी एक्का होता. आताही हे जे कृत्य केलं आहे त्यात त्यांच्यावर भाजप कठोर कारवाई करणार नाही. कारण पडळकर यांचा हा अतिआत्मविश्वास वाढत जावा हीच त्यांची इच्छा आहे.
पण या सगळ्या राजकारणाच्या नादात आपण विधिमंडळाची प्रतिष्ठा इतक्या खालच्या थरावर नेऊन ठेवतो आहे याचं भान भाजपला राहिलेलं नाहीय. २३७ आमदारांचं बहुमत असलेलं हे सरकार आहे. या सरकारनं खरंतर इतक्या क्षीण झालेल्या विरोधकांशी लढण्यात आपली ताकद का घालवावी?.. त्यांनी फक्त जनतेच्या हिताच्या कामांमध्येच ही वाढीव ऊर्जा खर्च करायला हवी. पण त्याऐवजी भाजपमध्ये अजूनही पक्षप्रवेशाची हौस काही थांबलेली नाहीय. विधिमंडळाच्या मारहाणीत हे असे सगळे घटकही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.
राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे तर बोलायलाच नको. पुण्यात दर काही महिन्यांनी गुंडांच्या दहशतीची बातमी येते, बीडमधल्या आकांचे प्रताप आपण काही दिवसांपूर्वी पाहिले, एकीकडे भाजपचेच आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या घालतानाचाही प्रकार बघून झाला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर वांद्र्यात माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची हत्या होते. हे सगळं बघितल्यानंतर आता काय राहिलं होतं, तर हे सगळं आता विधिमंडळाच्या पायर्‍यांवरही होऊ शकते.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं वार्तांकन म्हणजे हा याला मंगळसूत्र चोर म्हणाला, हा याला कोंबडीचोर म्हणाला, हा याला पेंग्विन म्हणाला, अमक्या आमदाराने तमक्याकडे बघून जोरदार खुन्नस दिली, अशा सडकछाप टाइपचे होऊ लागले आहे. असल्या उथळ वागण्यानेच जर प्रसिद्धी मिळत असेल तर आमदार त्याला चटावलेलेच दिसतील. सभागृहात प्रत्यक्ष काय घडतंय, तिथे कुठले प्रश्न दुर्लक्षित आहेत यावर फारसं कुणाला काही पडलेलं नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात या प्रश्नावरच्या चर्चेत फक्त पडळकरांना सिंगल आऊट करू नका, या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका असं विधान केलं. ज्या ज्या वेळी सत्ताधार्‍यांच्या विरोधातला काही प्रकार असतो त्यावेळी बोललं की तो राजकीय रंग असतो. खरंतर कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक म्हणून त्यांनी सर्वात आधी या सगळ्या प्रकारात सगळ्या आमदारांना जरब बसेल असा संदेश द्यायला हवा होता. या प्रकरणामुळे जी भावना जनतेत पोहचलीय ती सगळे आमदार माजले आहेत अशी आहे हे मुख्यमंत्र्यांचेच शब्द आहेत. त्यामुळे हे सगळं थांबवण्याचीही जबाबदारी त्यांचीच आहे. मनात आणलं तर ते एका मिनिटांत ते हे करू शकतात. पण त्यांच्यातल्या राजकारणी प्रशासकावर मात करताना दिसतोय. त्यामुळे ते पडळकरांवरच काय त्यांच्या कार्यकर्त्यावरही काही कडक कारवाई करतील अशी शक्यता दिसत नाही.

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

महाराष्ट्रात निवडणूक-चोरीनंतर आता बिहारमध्ये व्होटबंदी!

Next Post

महाराष्ट्रात निवडणूक-चोरीनंतर आता बिहारमध्ये व्होटबंदी!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.