आनंद वाटणारे शोधा!
प्रश्न : सोमी, सोशल मीडियावरचे चांगले लोक कुठे हरवले आहेत का? सकस काही वाचायला मिळत नाही, निर्भेळ असे कुठे हसायला येत नाही आणि आवर्जून चर्चा करावी असे काही आढळत नाही. फारच निगेटिव्हिटी जाणवते आजकाल.
उत्तर : तुमचे म्हणणे थोडे फार खरे असले तरी या सगळ्याला अपवादही आहेत. स्वत:जवळचे ज्ञान मोफत वाटणारे, निर्भेळ लेखन करून लोकांच्या चेहर्यावर आनंद आणणारे, देवापासून ते देशापर्यंत मनमोकळ्या चर्चा करणारे, कलागुणांनी आनंद वाटणारे आणि दुसर्याच्या मताचा आदर ठेवणारे असे काहीजण आजही इथे अस्तित्वात आहेत. फक्त आपण आपले आदर्श, आपले हीरो निवडायला चुकत आहोत आणि या सो कॉल्ड आदर्शांचे लिहिणे, वागणे, बोलणे यामुळे आपल्या विचारांची दिशा बदलू लागली आहे. एखाद्या महान कलाकाराच्या पोस्टवर वाटेल तशी गरळ ओकणे म्हणजे ‘चाहते संतापले’, एखाद्या समाजसेवकावर झुंडीने हल्ला करून त्याला अद्वातद्वा बोलणे याला ‘नेटिझन्सचा रोष’ आणि एखाद्या नेत्याला, अगदी स्त्रीला देखील अभद्र भाषेत बोलणे याला ‘जनतेचा आवाज’ अशी आपली व्याख्या झाली आहे. हुल्लडबाजी, कंपूबाजी आणि नासक्या शब्दांची जी पट्टी आपल्या डोळ्यावर चढली आहे, ती हटवली तर सोशल मीडियाच्या एका कोपर्यात स्वतःच्या विश्वात मग्न असणार्या आनंददायी लोकांचेही दर्शन होईल.
चार दिवस… फक्त चार दिवस अशा लोकांना फॉलो करायला, त्यांचे लेखन वाचायला, त्यांच्या कलागुणांचे व्हिडिओ पाहिला सुरुवात करा आणि तुम्ही यापूर्वी कोणत्या विखारी आणि विषारी विळख्यात अडकला होतात त्याची तुम्हाला जाणीव होईल. या आनंद वाटणार्या लोकांसोबत राहा आणि एक दिवस त्यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न बघा.
– सोमी आनंदमयी
उत्क्रांतीकडून अपक्रांतीकडे!
प्रश्न : सोमीताई, लोक मनोरंजन आणि आनंदासाठी सोशल मीडियावर येतात. मग इथे देखील ते वादविवाद का घालत बसतात?
उत्तर : इंटरनेट हा ज्ञानाचा सागर आहे. अर्थात भले बुरे असे सगळ्या प्रकारचे ज्ञान इथे उपलब्ध आहे. या ज्ञानसागरात डुबकी मारायची तर ‘मी पणा’ मागे ठेवावा लागतो. आजकाल लोकांना ‘मी पणा’शिवाय काही सुचत नाही आणि हेच वादाचे मुख्य कारण आहे. टू नो इज टू नो दॅट यू नो नथिंग. लोकांना आजकाल वाद घालण्यासाठी कारणही लागत नाही. लोक पाककलेच्या ग्रुपमध्येही भांडतात. आध्यात्माच्या एका ग्रुपात कर्ण श्रेष्ठ का अर्जुन, यावर तावातावाने वाद घालणारे लोक देखील मी पाहिले आहेत. सोशल मीडियावर आजकाल वावरताना एक गोष्ट नीट जाणवते आणि ती म्हणजे मानवाची उत्क्रांती पूर्ण झाली आहे आणि आता तो उत्क्रांतीच्या उलट्या टप्प्याकडे वळला आहे. नर ते वानर..
– सोमी डार्विन
विरंगुळ्याची व्याख्या बदला
प्रश्न : इंटरनेटवर एखाद्या गोष्टीचा आजकाल लगेच कंटाळा येऊ लागला आहे. का बरं?
उत्तर : लाडक्या भावा, हे होण्याचे मुख्य कारण म्हणजे रील्स. दर १५ सेकंदाने तुम्हाला नवे काही दिसत असते, कानावर पडत असते आणि मग तुम्हाला सगळे काही इंस्टंट हवे असते. सगळ्या गोष्टीत नावीन्य आणण्याच्या प्रयत्नात मग होत्याचे नव्हते होते. काही काही गोष्टी आहेत तशा स्वीकारायला काय हरकत आहे? उपवास हा उपवास म्हणून करायला काय हरकत आहे? आजकाल लोकांना उपवासाची इडली, उपवासाचा डोसा, उपवासाची मिसळ हवी असते. नुसती सतार ऐकायला नको असते तर सतारीचे रिमिक्स हवे असते. क्षणाक्षणाला आजच्या पिढीच्या आवडी निवडी आणि विचार बदलत असतात.
एकदाही १०-१० सेकंद पुढे न पळवता पाहिलेला शेवटचा चित्रपट किंवा मालिका आठवते का? आपल्याला मनोरंजन देखील आपल्या वेगाने हवे असते. काय दाखवत आहेत किंवा सांगता आहेत त्यापेक्षा तुम्हाला काय बघायचे आहे, तुम्हाला काय ऐकायचे आहे हे महत्त्वाचे ठरू लागले आहे. अशा वेळी तुम्हाला आवडेल तेच समोरचा दाखवायला लागतो आणि मग सतत तेच तेच बघून तुम्हाला कंटाळा यायला लागतो. एखाद्या गोष्टीचा आनंद घेणे म्हणजे काय हे एकदा नीट समजून घ्या. एखाद्या अप्रतिम पुस्तकाचे वाचन, एखाद्या सुरेख चित्रपटाचे दर्शन तुम्हाला दिवसभर कशी झिंग आणते ते अनुभवा. विरंगुळ्याची व्याख्या बदला आणि मग कंटाळा पुन्हा आयुष्यात फिरकायचाही नाही.
– सोमी द झिंग
जे १ झालं का?
प्रश्न : सोमी जे१ झाले का?
उत्तर : तू १३ देख!
– एम एच १२ सोमी
आधी मोठ्यांचे व्यसन सुटावे
प्रश्न : युवा पिढीला बरबाद करणार्या व्यसनांमध्ये सोशल मीडियाचा समावेश करावा का?
उत्तर : तो करून देखील झाला आणि त्याचे व्यसन सोडवण्याच्या नावाखाली काही लोक आपली दुकाने देखील चालवू लागली आहेत. आहात कुठे? आणि तरुण पिढीचे काय घेऊन बसला आहात. परवा एक काका पेपर वाचता वाचता बारीक अक्षरांची एक जाहिरात चक्क बोटांनी झूम करून बघायला लागले होते. आपण काय करतोय हे त्यांच्या लक्षात आले आणि स्वतःशी लाजले. शेजारी मी बसले होते, मी जमेल तसा विनोदी चेहरा करून त्यांना अजून लाजवले.
तर सांगायचा उद्देश काय, तर हे व्यसन तळागाळापर्यंत पसरलेले आहे. मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या हातात कधीकाळी खेळणारा हा मोबाइल माझ्या देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाच्या खिशात आला त्याचा आनंद मानावा, की शाळा बुडवून मोबाइलवर भाईगिरीचे व्हिडीओ बनवणारी कष्टकर्याची मुले पाहून दुःख करावे हे समजेनासे झाले आहे.
युरोपमधील अनेक पुढारलेले देश शाळा कॉलेजात मोबाइलवर बंदी आणत असताना आपण मात्र त्याच्या वापराला पूर्ण मोकळीक दिली आहे. दोन दोन मोबाइल फोन बाळगणे हे आता स्टेटस सिम्बॉल होऊ लागले आहे. कोणाच्या हातात कोणत्या कंपनीचा आणि किती महागाचा मोबाइल आहे यावरून माणसाची पारख होऊ लागली आहे. अनेक देश आता सोशल मीडियाला एक व्यसन समजून त्यावर उपाययोजना करू लागले आहेत. सोशल मीडियापासून मुक्ती मिळवून देणारी व्यसनमुक्ती केंद्र देखील परदेशात चालू झाली आहेत. आपल्याकडेही काही समाजधुरीणी त्यासाठी प्रयत्न करत आहेत. फक्त व्यसनमुक्तीची ही सुरुवात घरातल्या ज्येष्ठ पिढीपासून केली तर परिणाम अधिक चांगले आणि व्यापक मिळतील.
– धोरणी सोमी
स्वनियमन महत्त्वाचे
प्रश्न : सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी काही नियम असायला हवेत का?
उत्तर : माझ्या मनातलं बोललास दादा. असे नियम नक्की असायला हवेत आणि खरे तर ते प्रत्येकाने स्वतःसाठी स्वत: तयार करायला हवेत. सरकारनेही काही नियम राबवायला हरकत नाही. संरक्षण या विषयावर बोलण्यापूर्वी सैन्यात किंवा इतर कोणत्याही संरक्षण दलात कमीत कमी एक वर्ष नोकरी केलेली असावी. एखाद्या नव्या चित्रपटावर ज्ञान पाजळण्यापूर्वी त्या चित्रपटाच्या तिकिटाचा फोटो आवश्यक करावा. राजकारण या विषयावर बोलण्यापूर्वी गुगल न करता विधानसभा आणि विधान परिषद यातला फरक सांगण्याची सक्ती असावी. अमेरिकेने काय करायला हवे यावर ज्ञानतुषार उडवण्यापूर्वी अमेरिकेत कमी कमी आठ दिवस राहून आल्याचा पुरावा सादर करणे गरजेचे असावे. कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी त्या पोस्टशी सहमत आहे की असहमत हे ठळकपणे नमूद करण्याची सक्ती असावी. एखाद्या अभिनेत्याला अथवा अभिनेत्रीला अक्कल शिकवण्यापूर्वी आपण निदान बालनाट्यात छोटी भूमिका केली असल्याचा पुरावा आवश्यक. देशाची ध्येयधोरणे या विषयावर बोलण्यापूर्वी आपली बायको आपल्या परवानगीने आणि आपल्याला विचारून भाजीचा निर्णय घेते असे बायकोचे संमतीपत्र आणि लेखन स्त्रीला करावयाचे असल्यास नवर्याला पँट धुवायला टाक असे सांगितले की नवरा त्याच दिवशी पँट धुवायला टाकतो असे नवर्याचे संमतीपत्र आवश्यक. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या विषयावर मौलिक विचार मांडण्यापूर्वी दोन शेजार्यांकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट आवश्यक. असे काही नियम मला तरी फार आवश्यक वाटतात बघा.
– नियमबाज सोमी
भक्ती नव्हे, अंधभक्ती
प्रश्न : एखाद्या नेत्याविषयी काही विचार व्यक्त केले आणि त्याच्या समर्थकांना ते रुचले नाहीत, तर एकाचवेळी ते १००-२००च्या संख्येने लगेच हुल्लडबाजी करायला का आणि कसे हजर होतात?
उत्तर : प्रिय सखे, एकदा एखाद्याला देव मानले की मग देवाच्या चुका दाखवता येत नाहीत; भक्तांना राग येतो. भक्ती असावी पण अंधभक्ती नसावी. पण होते असे की, सगळ्या चेल्यांना आपली भक्ती ही श्रद्धा वाटत असते आणि विरोधक धर्मद्रोही. एक गमतीदार किस्सा आहे. कोणा लेखकाने लिहिले होते की, बिरबल किती चतुर, किती हजरजबाबी होता हा वेगळा विषय आहे, पण त्याच्या गोष्टीतील अकबराच्या मूर्खपणामुळे त्याची चतुराई आणि हजरजबाबी अधिक ठळक जाणवते एवढे मात्र खरे.
– अभक्त सोमी