पहिल्या महायुद्धाच्या आधी युरोपातल्या देशांची नेपथ्यरचना काय होती आणि तिथली साम्राज्यं कशी युद्धाची ठिणगी पडण्याची वाट पाहात होती, हे आपण गेल्या भागात पाहिलं.
यात जास्तीत जास्त फुरफूर करणारा देश होता जर्मनी. जर्मनीची रणनीती अशी होती, पश्चिमेला फ्रान्स आणि तटस्थ देशांवर आक्रमण करून त्यांना हरवायचं. तोवर पूर्वेला रशियाशी लढाई तेवत ठेवायची, पण निर्णायक करायची नाही, प्रसंगी माघार घेत राहायचं. पश्चिम युरोपचं युद्ध संपल्यावर उसंत मिळेल, सैन्य तिथून काढून घ्यायचं आणि रशियाच्या आघाडीवर न्यायचं आणि रशियाचा पराभव करायचा. ब्रिटन आणि अमेरिका हे घटक जर्मनीनं परिक्षेत प्रश्न ऑप्शनला ठेवावेत तसे बाजूला ठेवले होते. अमेरिका युद्धात पडायला उत्सुक नव्हती, ब्रिटन सावध होतं, स्वतःची ताकद किती होती याचा अंदाज घेत होतं. फ्रान्स या परंपरागत शत्रूशी मैत्री करायचं ब्रिटननं ठरवलं होतं.
२८ जून १९१४.
ऑस्ट्रियाचा युवराज फ्रेंझ फर्डिनंड बोस्नियाच्या दौर्यावर होता.
सारायेवो शहरात उघड्या कारमधून डौलानं मिरवत चालला होता. त्यानं असं करू नये, त्याच्या जिवाला धोका आहे असं गुप्तचरांनी त्याला सांगितलं होतं. काही दिवस आधी याच शहरात असाच मिरवणुकीनं जात असताना त्याच्या कारवर बाँब टाकण्यात आला होता. बाँब टाकणार्याचा नेम चुकला. बाँब काही अंतरावर पडल्यानं युवराजाचा जीव वाचला होता. आपण नीडर आहोत, असंतुष्टांना आपण भीक घालत नाही असं फर्डिनंडला दाखवायचं होतं. पण यावेळी नशीबाची साथ मिळाली नाही, फर्डिनंड ठार झाला.
बोस्निया हा स्लाव वंशाच्या लोकांचा प्रदेश. या प्रसंगाच्या आधी आठ वर्षं ऑस्ट्रियानं तो विभाग गिळला होता. बोस्नियाच्या स्लाव लोकांना ऑस्ट्रियात जायचं नव्हतं, जबरदस्ती केल्याचा राग त्यांना होता. पण खून मात्र केला तो सर्बिया या शेजारच्या देशातल्या माणसानं. कारण सर्बिया हाही स्लाव प्रदेश होता. बोस्निया आणि सर्बिया या दोघांचीही इच्छा होती की त्यांचा एक स्वतंत्र देश व्हावा. पण ऑस्ट्रिया हे मोठं साम्राज्य त्या दोन्ही प्रदेशांना गिळण्याची इच्छा बाळगून होतं. सर्बियात ब्लॅक हँड नावाची एक भूमिगत संघटना होती. या देशीवादी संघटनेनंच हा खून घडवला होता. सर्बियन लष्करानं ही संघटना तयार केली होती, पोसली होती. हिंसा, दहशतवादाच्या घटना आखण्यात आणि पार पाडण्यात सर्बियन लष्कर मदत करत असे, माणसं आणि प्रशिक्षण देत असे. पैसे व दारूगोळा सर्बियाचं सरकार पुरवत असे.
ऑस्ट्रियानं सर्बियाकडे मागणी केली की फर्डिनंडचा खुनी सर्बियानं शोधून काढावा आणि त्याला शिक्षा द्यावी. सर्बिया काही करेना. मग ऑस्ट्रियानं मागणी केली की त्यांच्या पोलिसांना सर्बियात जाऊन तपास करण्याची परवानगी मिळावी. सर्बियानं तशी परवानगी दिली नाही. एक चौकशी समिती नेमली. चौकशी समितीनं थातूर मातूर चौकशी केल्याचं नाटक केलं आणि या खुनात सर्बियाचा हात नसल्याचा निष्कर्ष जाहीर केला. सर्बिया कसं सांगेल की आपणच हा खून घडवला? कुठलाही देश असता आणि तिथं अशी घटना घडली असती तरी वेगळं घडलं नसतं.
ऑस्ट्रियानं सर्बियाला निर्वाणीचा इशारा दिला. खुन्याला शिक्षा करा नाही तर ऑस्ट्रिया सर्बियावर स्वारी करेल. ऑस्ट्रियानं लष्करी तयारी सुरू केली. युवराजाचा खून या एका घटनेपोटी लढाई करण्याची आवश्यकता नव्हती. निषेध करणं, सर्बियाच्या राजदूताला घालवून देणं या मार्गानंच सामान्यत: सरकारं जात असतात. ऑस्ट्रियानं लढाईची तयारी करणं याला काही वेगळा अर्थ होता, जो नंतर हळूहळू कळत गेला.
ऑस्ट्रियानं सैन्याची जमवाजमव सुरू केल्यावर सर्बियानंही सैन्याची लढाई तालीम सुरु केली. प्रकरण तिथं थांबलं नाही. रशियानं सर्बियाच्या राजदूताला बोलावून घेतलं आणि सर्बियाला पाठिंबा जाहीर केला. ऑस्ट्रियानं आक्रमण केलंच तर रशिया सर्बियाच्या मदतीला जाईल असं रशियानं जाहीर केलं. रशियानंही सैनिक गोळा करायला सुरुवात केली. तिकडं जर्मनीनंही रशियाची वर्तणूक योग्य नाही असं जाहीर केलं. रशियानं युद्ध सुरू केलं तर जर्मनी ऑस्ट्रियाच्या बाजूनं युद्धात पडेल असं जर्मनीनं जाहीर केलं. जर्मनीनं अशी भूमिका घेतल्यावर फ्रान्सनं रशियाची बाजू घेतली आणि युद्ध झाल्यास आपण रशियाच्या बाजूनं युद्धात पडू असं जाहीर केलं. जर्मनी आणि ऑस्ट्रिया असा एक गट. रशिया, सर्बिया, फ्रान्स असा दुसरा गट.
ब्रिटनला युद्ध होणार याचा सुगावा लागला. ब्रिटननं मध्यस्थाची भूमिका घेऊन मुत्सद्देगिरीनं प्रश्न सोडवावा, युद्ध करू नये अशी भूमिका घेतली. पण जर्मनीच्या विरोधात आपल्यालाही लढाईत उतरावं लागणार याची कल्पना ब्रिटनला आली होती. ब्रिटननंही गुपचूप तयारी सुरू केली.
– – –
जुलै १९१४. ऑस्ट्रियानं सर्बियाला निर्वाणीचा खलिता पाठवला, मागण्या केल्या. सर्बियानं मागण्या मान्य केल्या नाहीत. सर्बियानं युद्धाची तयारी सुरू केली.
ऑस्ट्रियानं सर्बियाच्या विरोधात युद्ध पुकारलं. रशिया ऑस्ट्रियाच्या विरोधात उभा राहिला. जर्मनी रशियाच्या विरोधात उभा ठाकला. दोघांनीही आपापल्या सेना युद्धासाठी सज्ज केल्या.
जर्मनीची रणनीती अशी होती, पूर्वेला रशिया आणि पश्चिमेला फ्रान्स अशा दोन आघाड्या उघडायच्या. रशियाच्या आघाडीवर युद्ध धीमेपणानं चालेल, त्या काळात बेल्जियममधून जर्मन सैन्य घुसवायचं आणि फ्रेंच सेनेला चहूबाजूनी वेढा घालून प्रâान्सचा पाडाव करायचा. हा उद्योग पटकन पार पाडायचा, युद्ध तिथंच संपल्यात जमा असेल. नंतर रशियाच्या आघाडीवर लक्ष द्यायचं, रशिया संपवायचा. म्हणजे झाला युरोपवर ताबा.
ऑगस्ट १९१४. युद्ध सुरू झालं. जर्मनीनं पूर्वेकडे रशियाविरोधात आणि पश्चिमेकडे व्हाया बेल्जियम फ्रान्सच्या विरोधात आघाडी उघडली.
सप्टेंबर १९१४. जर्मन फौजा बेल्जियम पार करून फ्रान्समधे घुसल्या. फ्रेंच सेनेनं खंदकांचा आश्रय घेऊन प्रतिकार सुरू केला. युद्ध चेंगट झालं.
ऑक्टोबर १९१४. जपाननं चीनमधल्या जर्मन वसाहतींवर हल्ला चढवला.
नोव्हेंबर १९१४. ब्रिटननं ऑटोमन साम्राज्याशी लढाई सुरू केली.
जानेवारी १९१५. जर्मनीत अन्नटंचाई. रेशनिंग सुरू.
एप्रिल १९१५. पश्चिम आघाडीवर (फ्रान्स इत्यादी) युद्ध सुरूच. जर्मनीनं क्लोरीन वायू सोडून शत्रूसैनिक मारले. ब्रिटीश व दोस्त फौजांनी दार्दानेल समुद्रात ऑटोमन सैन्यावर हल्ला केला, ऑटोमन राजधानी काबीज करण्यासाठी.
मे १९१५. जर्मन पाणबुड्यांनी अमेरिकेचं लुसिटानिया हे जहाज आयर्लंडच्या समुद्रात बुडवलं.
जुलै १९१५. ब्रिटिशांनी दक्षिण आप्रिâकेतली जर्मनीची वसाहत जिंकली.
सप्टेंबर १९१५. दोस्त देशांच्या फौजांनी सीरियावर चढाई केली.
फेब्रुवारी १९१६. व्हेर्डुमची लढाई, फ्रान्सला फटका. ३ लाख सैनिक मारले गेले.
एप्रिल १९१६. मादाम मेरी क्युरी यांनी फ्रेंच अँब्युलन्समधे एक्सरे मशीन बसवली. आयरिश स्वातंत्र्यवाद्यांनी ब्रिटीश सैन्याविरोधात लढाई सुरू केली, आयरिश स्वातंत्र्याची लढाई.
मे १९१६. जर्मनीत गांजलेल्या नागरिकांनी युद्धविरोधी निदर्शनं केली. फ्रेंच आणि ब्रिटिशांनी गुप्तपणे साईक्स-पिकॉट करार केला. त्यानुसार सीरिया आणि लेबनॉनवर फ्रान्सचा ताबा असेल; जॉर्डन, इराक आणि पॅलेस्टाईनवर ब्रिटिशांचा ताबा असेल; सौदी अरेबियाला स्वतंत्र देश दिला जाईल असं ठरलं. जर्मन आणि ब्रिटीश युद्धनौका डेन्मार्कच्या समुद्रात एकमेकींना भिडल्या.
जून १९१६. सौदींचं ऑटोमन सम्राटाविरोधात बंड. सोमची लढाई. ब्रिटिशांनी तोफा आणि रणगाड्यांसह सोम या गावाकडं कूच केली. जर्मनांनी प्रतिकार केला. एकाच दिवसात २० हजार ब्रिटीश सैनिक मारले गेले, ४० हजार जखमी झाले. नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत लढाई होत राहिली. शेवटी ब्रिटन व दोस्तांना एक प्रतीकात्मक विजय मिळाला, सहा मैलाचा प्रदेश त्यांनी काबीज केला. पण या एकाच लढाईत पाच महिन्यांत ४ लाख १९ हजार ब्रिटीश सैनिक; १ लाख ९४ हजार फ्रेंच सैनिक आणि ६ लाख ५० हजार जर्मन सैनिक मारले गेले.
मार्च १९१७. ब्रिटीश फौजांनी बगदादमध्ये प्रवेश केला. रशियन राजधानी पीटर्सबर्गमधे दंगे, राजा दुसरा निकोलस सिंहासन सोडून पळून गेला. रशियात क्रांती, लेनिनच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन.
एप्रिल १९१७. अमेरिका जर्मनीच्या विरोधात युद्धात उतरली. आघाडीवर दीर्घकाळ राहावं लागणं, आबाळ, पत्करावे लागलेले पराभव इत्यादीमुळं हताश झालेल्या प्रâेंच सैनिकांचं महिनाभराचं बंड.
मे १९१७. कामाचे वाढलेले त्रास, अन्नटंचाई आणि अपुरं वेतन या कारणांसाठी ब्रिटीश कामगारांचा संप.
जून १९१७. अमेरिकन सैनिक फ्रान्समध्ये उतरले.
जुलै १९१७. ब्रिटीश राजा पाचवा जॉर्जनं आपले पूर्वज जर्मन होते ही गोष्ट नाकारली आणि स्वतःचं घराणं विंडसर घराणं असेल असं जाहीर केलं.
ऑगस्ट १९१७. जर्मन नौदलातल्या नौसैनिकांचं बंड.
नोव्हेंबर १९१७. लॉर्ड बेलफोर यांचं ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये राष्ट्रीय भूमी देणारं टिपण ब्रिटीश सरकारनं मान्य केलं.
डिसेंबर १९१७. ब्रिटीश फौजांनी जेरुसलेम जिंकलं.
मार्च १९१८. रशिया आणि जर्मनीत युद्धबंदीचा तह.
ऑक्टोबर १९१८. हंगेरी ऑस्ट्रियातून फुटून स्वतंत्र देश झाला.
नोव्हेंबर १९१८. सम्राट वैâसर विल्यम सिंहासन सोडून हॉलंडमध्ये पळाला. ऑस्ट्रियन राजा कार्ल सिंहासन सोडून इटालीत पळाला.जर्मनीनं दोस्त देशांसमोर शरणागती पत्करली.
११ नोव्हेंबर १९१८ रोजी जर्मनीनं शरणागती पत्करली. (ही घटना फ्रान्समध्ये घडली असली तरी जगात इतर ठिकाणी युद्धं रखडली होती, स्थानिक पातळीवर तह होऊन लढाया थांबत होत्या. ही प्रक्रिया नंतर १९२० सालापर्यंत रेंगाळली.)
– – –
डिसेंबर १९१८. दोस्तांच्या फौजांनी जर्मनीचा ताबा घेतला. सर्बिया, क्रोएशिया, स्लोवेनिया हे स्लाव प्रदेश ऑस्ट्रियातून फुटले, भविष्यातल्या युगोस्लाविया स्थापन झाला.
जानेवारी १९१९. पॅरिसमधे शांतता परिषद.
फेब्रुवारी १९१९. लीग ऑफ नेशन्सची घटना तयार.
जून १९१९. व्हर्साय जाहीरनामा, जर्मनीनं अटी मान्य केल्या.
ऑगस्ट १९२०. ऑटोमन साम्राज्याची पुनर्रचना ठरवणारा सेवर्स करार मंजूर.
– – –
२६ प्रमुख देशांनी आपले सैनिक रणात उतरवले. जर्मनीनं १.१ कोटी; ऑस्ट्रियानं ७८ लाख; रशियानं १.२ कोटी; ब्रिटननं ८९ लाख; फ्रान्सने ८४ लाख; अमेरिका ४४ लाख. शिवाय इतर देशांचेही सैनिक होते. असे मिळून एकूण ६.५ कोटी सैनिक लढले.
जर्मनीचा दात युरोपीय देशांवर होता, म्हणजे प्रâान्स, ब्रिटन, बेल्जियम इत्यादी. सुरुवातीला बेल्जियम, प्रâान्स, जर्मनी, रशिया, ऑस्ट्रियात लढाई झाली. नंतर ती लढाई आप्रिâकेत, चीनमध्येही पसरली. अमेरिका युद्धात उतरली आणि युद्धानं निर्णायक रूप घेतलं. लढाईच्या अंतिम टप्प्यात जर्मनीनं ब्रिटनवर हवाई हल्ले केले. रणगाडे, आर्मर्ड कार आणि वेगानं हालच्ााल करणार्या तोफखान्यावर लढाईचा भार होता. विमानांचा वापर करायला लष्करांचा विरोध होता. विमानं फक्त टेहळणीसाठी वापरली जात होती. पण युद्धाच्या शेवटच्या दिवसांत विमानांमधे मशीन गन बसवून त्यांचा वापर हवाई हल्ल्यांसाठी केला गेला, पण बाँबिंगसाठी विमानं वापरली गेली नाहीत. नौदलाचा वापर लढाईसाठी करण्यालाही लष्कराचा विरोध होता. बोटीतून युद्धसामग्रीची वाहतूक होऊ नये, सैनिकांची वाहतूक होऊ नये हे पाहाणं एवढंच नौदलाचं काम असे. जर्मन बोटी इतर देशांच्या बोटी तपासत. सैनिक, युद्धसामग्री असेल तर बोटी जप्त केल्या जात. देशांची नाकेबंदी हे बोटींचं मुख्य काम असे. जर्मनीनं युद्धाच्या शेवटच्या दिवसात पाणबुड्यांचा वापर करून इतर देशांच्या बोटी बुडवायला सुरुवात केली. अमेरिकेतून लंडनकडे आलेली एक प्रवासी बोट जर्मनीनं बुडवल्यावर अमेरिका युद्धात पडली. तिथून नौदल आणि हवाई दल यांचा लढाईत वापर सुरू झाला. जर्मनीनं ब्रिटीश आणि फ्रेंच जनतेमध्ये दहशत आणि भीती निर्माण व्हावी यासाठी लंडन, पॅरिस या शहरांवर हवाई हल्ले केले.
जर्मनीचा लष्करी विचार होता तो एकेक आघाडी जिंकत जायचं, एकेका आघाडीवर लक्ष केंद्रित करायचं. अशा रीतीनं युद्ध पटकन संपवणं ही जर्मनीची रणनीती होती. फ्रेंच सैन्यानं कडवा प्रतिकार केला. फ्रान्सनं जर्मनी आणि फ्रान्सच्या हद्दीवर एक खंदक रेषा तयार केली. खंदकात ठिय्या मांडून बसलं की रणगाडे, आर्मर्ड कार, तोफा निष्प्रभ ठरतात. शेवटी पायदळालाच खंदकापर्यंत जाऊन लढावं लागतं. फ्रेंच प्रतिकारामुळं युद्धाच्या इतिहासात एक खंदकयुद्धाचं नवं युग सुरू झालं. जर्मनीला कुठल्याही एका आघाडीवर निर्णायक यश मिळालं नाही. हज्जार आघाड्या तयार झाल्या, युद्ध रेंगाळलं.
या युद्धाच्या निमित्तानं युद्ध विचारात एक नवाच डावपेच तयार झाला. शत्रूला रक्तबंबाळ करायचं, हैराण करायचं, छळछळ करून जीव नकोसा होईल इतका त्रास द्यायचा. शेवटी शत्रू रक्तहीन करून मारायचा. दोस्त राष्ट्रांनी जर्मनीला नाना आघाड्यांवर गुंतवून ठेवलं. चीन आणि आफ्रिकेतल्या जर्मन वसाहतींवर ब्रिटन, फ्रान्स आणि जपाननं हल्ले केले.
ऑटोमन साम्राज्यातल्या पॅलेस्टाईन, इराक, सीरिया, सिनाई इत्यादी ठिकाणी ब्रिटीश फौजांनी हल्ले केले. फ्रान्स आणि ब्रिटननं पश्चिम आघाडीवर जर्मनीची जाम दमछाक केली. ब्रिटननं जर्मनीची नाकेबंदी केली, जर्मन जनतेची उपासमार झाली, शेवटी सैनिकही संतापले, बंड करण्याची भाषा करू लागले. जर्मन जनतेचं आणि लष्कराचं मनोधैर्य ढासळलं. जर्मन पाणबुड्यांच्या हल्ल्यावर ब्रिटननं उपाय शोधला. ब्रिटीश, अमेरिकन जहाजं गट करून फिरत आणि गटाला नौदलाच्या जहाजांचं संरक्षण दिलं जाई. अमेरिका युद्धात पडण्याचा धोका जर्मन लष्करी अधिकार्यांनी नेतृत्वाच्या लक्षात आणून दिला होता. परंतु, अमेरिका युद्धात यायच्या आधी आपण ब्रिटन आणि फ्रान्सचा खातमा करू असं जर्मन लष्करी नेतृत्वाचं मत होतं. त्यांचा हिशोब चुकला. ब्रिटन फ्रान्स कोलमडलं नाही आणि अमेरिका युद्धात उतरली. त्यामुळं जर्मनीच्या शत्रुपक्षाची ताकद निमपट व्हायच्या ऐवजी चौपट झाली. जर्मनीच्या वसाहती कोलमडल्यामुळं जर्मनीला होणारा माल आणि माणसांचा पुरवठा थांबला, परंतु ब्रिटनला मात्र भारतासारख्या मोठ्या वसाहतीतून अन्न आणि सैनिक मिळत राहिले.
अनेक देश, अनेक सैन्यं एकत्र होऊन, आघाडी करून युद्ध लढवतात तेव्हा त्या विविध सैन्यांचं योग्य संयोजन आवश्यक असतं. जर्मनीला ते समजलं नाही. जर्मन नेतृत्वाचा किंवा कदाचित संस्कृतीचा एककल्लीपणा, फाजील आत्मविश्वास नडला असावा. युरोप, आशिया, आप्रिâका अशा मोठ्या विस्तारावर पसरलेल्या युद्धांत निर्नायकी होती, रणनीतीत खूप अंतर्विरोध होते, साधनसामग्रीचा नियोजित वापर करणं जर्मन आघाडीला जमलं नाही. दोस्त देशांनी ते साधलं, त्यांच्यातलं संयोजन जसजसं सुधारत गेलं तसतशी जर्मनीचा पराभव वेगानं होऊ लागला.
– – –
पहिल्या महायुद्धाच्या खटाटोपात साम्राज्यं मोडली. जर्मन, ब्रिटीश, ऑटोमन, फ्रेंच, रशियन या साम्राज्यांतले घटक देश मोकळे झाले. जगात अनेक नव्या देशांची भर पडली.
– – –
लीग ऑफ नेशन्स. राष्ट्र संघ.
युद्ध होऊ नयेत, टाळावीत, त्यासाठी मुत्सद्दी पातळीवर प्रयत्न केले जावेत असा विचार १८८०पासून मांडला जात होता. त्यात विचारवंत, सामाजिक संघटना, शांततावादी संघटना आघाडीवर होत्या. पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या आधीपासूनच ते होऊ नये, असा प्रयत्न ब्रिटन, प्रâान्स, अमेरिका या ठिकाणी झाला होता. युद्ध सुरू असतानाही ते थांबवण्याचे प्रयत्न झाले. अमेरिकेत प्रेसिडेंट टाफ्ट यांनी ब्रिटीश नेत्यांच्या सहकार्यानं शांतता प्रयत्नासाठी एखादी संघटना असावी असा विषय मांडला होता. प्रेसिडेंट विल्सन यांनी १४ मुद्द्यांची एक योजना मांडली. युद्धं होऊ नये असं म्हणताना ती का होऊ नयेत असा व्यावहारिक विचार विल्सन यांच्या योजनेत होता.
सर्व देशांना मुक्तपणे हवेत, समुद्रात, जमिनीवर वावरता आलं पाहिजे. व्यापार आणि सर्व व्यवहार मुक्तपणे करता आले पाहिजेत. प्रत्येक देशातल्या जनतेला स्वातंत्र्य आणि अधिकार असले पाहिजेत. सर्व देश समान मानले गेले पाहिजेत. शस्त्रं किमान असावीत आणि आटोक्यात असावीत. राज्याराज्यामधील भूभागाबद्दलचे विवाद न्यायालयात, लवादांत, चर्चेअंती, न्याय्य कसोट्यांवर निकालात काढले पाहिजेत. पहिलं महायुद्ध होण्याच्या आधी लुटलेले प्रदेश त्या त्या देशांना परत करावेत. इत्यादी.
२८ जून १९१९ रोजी राष्ट्रसंघाची घटना, राष्ट्रसंघ करार, मान्य करण्यात आला. त्यावेळी व्हर्सायमध्ये जर्मनी आणि दोस्त देश यांच्यात तहाची बोलणी चालली होती, परिषदेमध्ये तहाच्या अटी ठरत होत्या. त्याच वेळी समांतर पातळीवर राष्ट्रसंघाची घटना मान्य करण्यात आली. व्हर्साय तहाची बोलणी शेवटाकडे जात असतानाच राष्ट्रसंघाची घटनाही अंतिम स्वरूप घेत होती. १० जानेवारी १९२० रोजी राष्ट्रसंघाला मान्यता देण्यात आली आणि १६ जानेवारी राष्ट्रसंघाच्या काऊन्सीलची पहिली बैठक भरली, राष्ट्रसंघ काम करू लागला. जगात शांतता नांदावी, वाद आणि तणाव संवादाच्या वाटेनं संपवावेत, युद्ध टाळावे या उद्देशासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली. सर्व सदस्यांची असेंब्ली परिषद, निवडक संस्थापक सदस्यांचं एक कार्यकारी मंडळ (काऊन्सील); प्रत्यक्ष कारभार करणारं सचिवालय अशा रीतीनं संघाची रचना करण्यात आली. संघाचं कार्यालय जिनेवा इथे ठेवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना या दोन स्थायी संघटना संघानं निर्माण केल्या. राष्ट्रसंघाच्या कायम स्वरूपी सचिवालयात विविध विभाग होते. त्या विभागांना सल्लागार समित्या असत. प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे माहिती गोळा करून अहवाल तयार करत असे आणि संघाला सल्ला मार्गदर्शन देत असे. आरोग्य, फायनान्स, अर्थ, अल्पसंख्य, इंटलेक्चुअल प्रॉपर्टी, सामाजिक, स्त्रिया, मुलं, विविध तह, या विषयांशी संबंधित कायदे आणि तह इत्यादी विषय या विभागांमधे हाताळले जात.
संघाचे सदस्य झालेल्या ४२ देशांची पहिली परिषद १५ नोव्हेंबर १९२० रोजी भरली. हळूहळू संघाची सदस्यता वाढत जाऊन १९२४ साली सदस्यसंख्या ५५ झाली. पुढे नवे सदस्य होत गेले, काही सदस्यांनी संघ सोडला, काही सदस्यांना हाकलण्यात आलं. १९३३ साली सदस्यसंख्या ५८ शिल्लक राहिली. सदस्य असतानाच देशांनी इतर देशांवर आक्रमण केलं; उदा. रशियानं फिनलंडवर आक्रमण केलं. रशियाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं.
१९३८ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि संघाच्या बैठका थांबल्या, संघाला कोणी विचारत नव्हतं. १९४३ साली दुसर्या महायुद्धातल्या दोस्त देशांनी तेहरान परिषदेत युनायटेड नेशन्स ही एक नवी संस्था स्थापायचं ठरवलं. म्हणजे राष्ट्रसंघ गुंडाळायचं ठरवलं. त्या वेळी संघाचे ३४ सदस्य होते. १८ एप्रिल १९४६ रोजी संघाचं शेवटलं अधिवेशन भरलं आणि संघाची मालमता, वारसा, युनायटेड नेशन्सकडे सोपवायचा निर्णय झाला.
राष्ट्रसंघ यशस्वी ठरला? अनेक कामं संघातर्फे घडली, अनेक कामांचा पाया संघानं घातला. आंतरराष्ट्रीय शांतता हा विषय संघानं अधिक स्पष्ट करत नेला. पण दुसरं महायुद्ध घडलंच ना? असंही म्हणता येईल की संघानं किरकोळ कामं केली पण जगात शांतता प्रस्थापित करण्याचं संघाला जमलं नाही.
म्हणूनच तर पुन्हा एकदा नव्यानं युनायटेड नेशन्सची स्थापना झाली.