अजून मणिपूरला जायला वेळ न झालेले आपले पंतप्रधान घाना, काँगो वगैरे चिरकुट देशांमध्ये जाऊन तिथले सन्मान स्वीकारत कसे फिरत असतात? ही ११ वर्षं सुरू असलेली वर्ल्ड टूर हेच त्यांचं दिवसाचे १८ तास काम करणं आहे का?
– विनय दीक्षित, रत्नागिरी
जाऊदेत ना ‘ते’ जिथे कुठे जातायत तिथे. नाही तरी इथे राहून ‘ते’ काय करतात? असं ‘त्यांचे’ आलोचक बोलतात. जेव्हा ‘ते’ भिक्षा मागून खायचे (असं ते स्वतःच म्हणतात) तेव्हा ‘ते’ मोठ्या मोठ्या देशात फिरायचे (असं आलोचक म्हणतात.) मग आता एवढ्या मोठ्या पदावर बसल्यावर ‘त्यांनी’ चिरकुट देशसुद्धा फिरू नये? विरोधक स्वत: मानसन्मान देत नाहीत, मग चिरकुट देश मानसन्मान देत असतील तर तो ‘त्यांनी’ स्वीकारायचा नाही? आता प्रश्न राहिला मणिपूरचा, तर विरोधकांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट ‘ते’ करत नाहीत, तर ही गोष्ट ‘ते’ का करतील? जर विरोधक बोलले नसते तर ‘ते’ मणिपूरला गेलेही असते… कदाचित. एकीकडे ‘ते’ काम करत नाहीत बोलायचं आणि दुसरीकडे ‘त्यांनी’ रिटायर व्हावं असंही बोलायचं. ‘ते’ तरी काय करतील बिचारे.
काहीही झालं तरी महाराष्ट्रावर तीन भाषा (म्हणजे हिंदी ही तिसरी भाषा) लादणार म्हणजे लादणारच, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या इच्छेविरुद्ध का करत असतील?
– समीर पोंक्षे, विलेपार्ले
त्यांची इच्छा नसेल असं करण्याची, पण दुसर्या कोणाच्या इच्छेसाठी, ते स्वतःच्या इच्छेविरुद्ध असं करत असतील. कधी कधी दुसर्याच्या इच्छेनुसार वागताना, स्वत:च्या आणि इतरांच्या इच्छेविरुद्ध वागावं लागतं. आता ते असं कोणाच्या इच्छेप्रमाणे करतायत, हा प्रश्न एखाद्या शेंबड्या मुलाला विचारा. कारण आम्ही उत्तर दिले तर ‘हे उत्तर काय शेंबडं पोरगही देईल’ असं तुम्हीच म्हणाल…
विधानभवनाच्या परिसरात कुस्तीचा आखाडा, बॉक्सिंग रिंग, ज्युदोच्या गाद्या वगैरे ठेवल्या तर सगळ्या नेत्यांच्या, आमदारांच्या कार्यकर्त्यांना समाजकार्य करणे सोपे जाईल की थेट सुरा, जंबिया, बंदुका वगैरे ठेवाव्यात? तुमची शिफारस काय?
– गजानन लिमये, कोथरुड, पुणे
अहो एवढंच काय? तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रं सुद्धा ठेवा… पण या सगळ्यांमध्ये एकमेकांचे कपडे फाडण्यात जी असते, ती मजा नाही… थोडं पॉझिटिव्हली बघा, आधी शब्दांनी एकमेकांचे कपडे फेडले जायचे, आता प्रत्यक्षात कपडे फाडले जातायत, बघणार्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले जातायत.. हे तुम्हाला बघवत नाही का? आमची शिफारस तर अशी आहे, की कोणी कितीही मोठा व्हीआयपी असो, त्यांच्याबरोबर येणार्यांनाही फ्री पासेस अजिबात देऊ नये.
तुम्ही ७५ वर्षांचे झाल्यानंतर काय करणार? रंगभूमीची सेवा करतच राहणार की नव्या पिढीला संधी देण्यासाठी झोला उठा के हिमालयात निघून जाणार?
– करुणा पांडे, बीड
आम्ही ७५ वर्षांचे झाल्यानंतर चहा विकणार… यापुढे आहे का काही प्रश्न??
एकदा तोंडाला रंग लागला की अभिनयाचं वेड सुटता सुटत नाही, असं म्हणतात… आपल्या राजकारण्यांना इतकं खुर्चीचं वेड कुठे काय लावल्यामुळे जडत असेल?
– आरिफ अन्सारी, पोलादपूर
राजकारण्यांनी कुठे काय लावलंय, हे बघण्यासाठी त्या सगळ्यांना चड्डी-बनियनवर आणावं लागेल. की त्यांना चड्डी-बनियानवर आणण्यासाठीच तुमचा हा खटाटोप आहे? पण एवढं करण्याची गरज नाही. चड्डी-बनियानवरील फोटोच्या अभूतपूर्व यशानंतर आता अंतर्वस्त्रांवरचेही फोटो प्रसिद्ध होतील. त्याला यश लाभल्यावर, अंतर्वस्त्रही नसतानाचे फोटो प्रसिद्ध होतील. मग त्या फोटोंत निवांत निरखून बघा… राजकारण्यांना कुठे काय लावल्यामुळे खुर्चीचं वेड जडलंय ते. फोटो कसे झूम करून बघता येतात, म्हणून फोटोची वाट बघायची. आम्हालाही मान्य आहे की त्यांनी सोडली म्हणून आपण सोडू नये… पण गुपचूप फोटो काढून ते प्रसिद्ध करणार्यांचा ‘मकसद’ यशस्वी होवो न होवो…