‘आमचा बाप आन् आम्ही’ हे डॉ. नरेंद्र जाधव यांचं बहुचर्चित आणि प्रचंड लोकप्रिय आत्मकथन. आंबेडकरी विचारांच्या त्यांच्या वडिलांची ही कथा. अत्यंत प्रेरणादायी. त्यामुळेच अनेक पिढ्यांचे वाचक ती वाचत असतात. अर्थात, डॉ. जाधव यांच्या ऐहिक उत्कर्षाचा एकंदर प्रवास पाहिल्यावर त्यांच्या वडिलांना आता नेमकं काय वाटलं असतं ते सांगणं अवघड आहे. आपल्या अर्थशास्त्रज्ञ मुलाला महाराष्ट्रावर काहीही करून हिंदी भाषा लादण्यासाठी भाषातज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं गेलं आहे आणि त्यानेही तारतम्य बाजूला ठेवून ही कामगिरी (खरंतर याला चपखल शब्द वेगळा आहे) स्वीकारली आहे, हे पाहून त्यांना धन्यता निश्चित वाटली नसती.
असो. इथे ‘आमचा बाप आन् आम्ही’ हा विषय नसून ‘त्यांचा बाप आन् ते’ असा विषय आहे. हे बापबेटे कोण आहेत? महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मलबार हिलच्या उच्चभ्रू वस्तीत एक बंगला आहे. त्या बंगल्यावर एक बाप बसला आहे आणि त्याची मुले राज्यभर धुमाकूळ घालत आहेत. एकाहून एक नमुनेदार पोरं आहेत ही. कोणी जेवणातली डाळ आंबली आहे म्हणून नेसत्या वस्त्रांनिशी खाली उतरून कँटीनच्या कर्मचार्याला बॉक्सिंगचे पंच मारतो. दुसरा वांड मुलगा नोटांनी भरलेली बॅग समोर ठेवून सिगरेट फुंकत आपल्या मोठेपणाच्या गमजा सांगतो. एक मिचमिचं टिल्लू पोर जिथे जाईल तिथे जहर ओकतं. काही पोरं कुठल्या तरी हॉटेलात नको नको ती मौजमजा करतात. ती बाहेर आली तर सगळ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ येईल, हे त्यांनाही माहिती असतं आणि बापालाही माहिती असतं. एक पोर, ज्याच्या नखापाशी उभं राहण्याची लायकी नाही, इतक्या मोठ्या माणसावर रोज सकाळ दुपार संध्याकाळ भुंकत फिरतं. कोणी त्याच्या कंबरड्यात शाब्दिक लाथ घातली की त्याचे टवाळ सवंगडी कुठेही जाऊन कुणाच्याही समोर राडे करतात. ते पोलिसांनाही घाबरत नाहीत.
यांच्यातली काही पोरं बिनधास्तपणे सांगतात, आमची राजवट आहे, आम्ही काय वाट्टेल ते करू, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, कारण आमचा बाप तिकडे त्या बंगल्यावर बसलेला आहे. तो आहे आणि त्याचा आशीर्वाद आहे, तोवर आम्हाला कोणाचंही भय नाही. बाकीची दांडगट पोरं हे बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. जे जगजाहीर आहे, ते सांगायचं कशाला? उगाच बापाला अडचणीत आणायचं कशाला?
या गावावरून ओवाळून टाकलेल्या पोरांच्या कर्तुती अशा की रोज उठून लोक बापाला बोल लावतात. त्याने बाप व्यथित होतो. म्हणजे व्यथित झालो आहोत, असा अभिनय करतो. ‘दोनचार टारगट पोरांपायी सगळीच पोरं मवाली आहेत, असा लोकांचा समज होतो,’ अशी खंत तो व्यक्त करतो. ही खंतही फार मानभावी आहे. कारण, आपण फार सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सुजाण परंपरेतून आलो आहोत, अशी त्याची आणि त्याच्या वैचारिक सहोदरांची समजूत आहे (त्यांच्यात असे मोठमोठे, अवघड, संस्कृतोद्भव शब्द वाक्यावाक्यात पेरण्याची पद्धत आहे, त्याने कोणत्याही निरर्थक, फोकनाड वाक्यात वजन येतं, अशी त्यांची समजूत आहे). तिला तसा काही अर्थ नाही. ही पाताळयंत्री मंडळी पूर्वापारपासून कोणत्याही घाणीत स्वत:चे हात काळे करून घेत नाहीत, ती कामं इतरांकडून करून घेतात, एवढाच त्याचा अर्थ. त्यामुळे ‘बाप असा असून लेकरं अशी कशी’ असा प्रश्न इथे संभवत नाही. त्या बापानेच समजून उमजून पोसलेली ही पिलावळ आहे. ती त्यांचं नेमून दिलेलं कामच करतायत. ती निमूटपणे केली नाहीत तर बापाचे आणि त्याच्या परिवाराचे खायचे दात बाहेर येतील आणि आपले नको तिथे लचके तोडतील, याची कल्पना या वांड पोरांना आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बापाकडे आणि त्याच्या पोरांकडे राज्याचा कारभार आहे. लोकांनी तो प्रचंड बहुमताने आपल्याकडे सोपवलेला आहे, असा त्यांचा दावा आहे. पण, ते खरं आहे का? शंका आहे. कारण, इतकं मोठं बहुमत असल्यावर नि:शंक मनाने राज्याचा कारभार हाकता येतो, राज्याच्या वाटेत जे अडथळे येत असतील, ते दूर करून राज्याला प्रगतिपथावर नेता येतं. त्यात दिल्लीतही सत्ता यांच्याच परमपित्याची. म्हणजे तिकडून अडचण नाही. याआधीचं एक सरकार दिल्लीतून सर्व प्रकारचे कोलदांडे घातले जात असताना आणि जागतिक संकट ओढवलेलं असतानाही उत्तम कामगिरी करून गेलं. त्या कर्तबगार ‘कुटुंबप्रमुखा’च्या आठवणीने लोक अजूनही हळहळतात आणि त्यांना घालवून हे टोळीप्रमुख कसे आपल्या उरावर बसले, याबद्दल आश्चर्यही व्यक्त करतात. त्यांना जे जमलं, तितकं जरी लोकहिताचं काम केलं असतं, तर यांना आपण निवडून दिलेलं नाही, याचाही लोकांना विसर पडला असता.
पण यांचं रोज काय चाललेलं आहे? कधी भाषासक्तीच्या उचापत्या, कधी नको तिथे गावगुंडगिरी, कधी कुणाला काळं फास, कधी पैशांची मस्ती दाखव, कधी सत्तेची गुर्मी, हे सगळं या राज्याची जगात शोभा करतंय, याचं भानच नाही. रोज इतकी छी:थू आणि बेअब्रू होत असताना हा नेभळट बाप कधी कोणत्या पोराचे कान उपटताना दिसत नाही, कधी कोणाच्या पाठीत शिस्तीचा बडगा बसताना दिसत नाही… अर्थात, तसं करण्याचा नैतिक अधिकार त्या बापाला असेल का? जो आपल्या हाताने पोरांना गांजाची चिलीम भरून देत असेल आणि नंतर छमछम बारमध्ये उधळायला भरभरून खोकी सोपवत असेल, तो बाप ‘माझी पोरं नालायक निघाली’ असं म्हणू शकतो का?
तर अशी ही ‘त्यांचा बाप आन् ते’ यांची टोळी.
ती महाराष्ट्राच्या उरावर बसली आहे आणि आपल्या मुळावर आली आहे.
महाराष्ट्राच्या अब्रूच्या रोज चिंधड्या उडवणार्या या नतद्रष्ट कार्ट्यांना त्यांचा बाप कधीच वठणीवर आणणार नाही… ते काम सगळ्या बापांचे मायबाप असलेल्या सार्वभौम जनतेचं आहे.
कसं करायचं ते ठरवा.