• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भ-ट-ग-भ-झ-आ गँग!

- ऋषिराज शेलार (गावच्या गोष्टी)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 24, 2025
in भाष्य
0

मंगळू उर्फ मंगळ्या उर्फ टोपीछंद त्याचं नाव. फिरस्तीमुळे गावाचा ठाव नाही. त्यातून गडी नरुतात्यासारखा अट्टल कलाबाज. नरुतात्यानं चाळीस वर्षे भीक मागून उदरनिर्वाह केलेला तर मंगळ्यानं साधारण काहीएक वर्ष हातसफाई केलेली. हाताच्या जिवावर चैन आणि चैनेकरिता हातसफाई इतकाच मंगळ्याचा आणि हाताचा संबंध. त्याची उठबैस तिन्हीत्रिकाळ कमळाबाईच्या दारी. तिच्या दारातले पोरं जमवायचे आणि काकाच्या नावानं शिमगा करायचा, हा त्याचा ठरलेला उपक्रम. काका म्हणजे गावकीतलं मोठं प्रस्थ. त्यांना हंगामी ललकारणारे खूप आले नि गेले, पण काका शांत. आता काका बोलत नाहीत आणि फिरून प्रतिवाद करत नाहीत म्हणजे आपण बोलू त्याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही. असा त्याने स्वतःच समज करून घेतलेला. त्यातून तो आकारी, भकारी वचने बोलत काकाच्या मोटारीमागे पळत सुटायचा. कमळाबाईची पोरं त्यावर ख्याःख्याः करत दात काढायची.
पण त्या काळी कमळाबाईच्या घरचा कारभार ज्या माणसाच्या हाती होता, त्याला आकारी, भकारी भाषेचं वावडं होतं. त्यानं ही गल्लीबोळात फिरणारी कार्टी, गल्लीपुरती जी गाडीमागं कोकलत फिरतात, ती तिथंच ठेवली. त्यांची पायरी ओळखून त्यांना आत येऊ दिलं नाही. पण ती घरात येऊन पोरांची ताटं पुसून जायची, पोरांत बसून कधी काकाला भ लावून दावायची, इतरांना ट करून बोलायची, ती कारभार्‍याच्या गैरहजेरीत. पण त्यांची भाषा कमळाबाईच्या घरात पसरत गेली. मुळात कमळाबाईच्या घरात आधीची कुजबुज भाषा. कुणाहीबद्दल बरं बोलायचं नाही हा शिरस्ता. त्यांना मंगळ्याच्या ह्या भाषेचं विशेष कौतुक वाटू लागलं. साधारण सारीच पोरं ‘कार्टी वुइथ डिफरन्स’चा नमुना होती. त्यात डोक्यानं यथा तथा. कधीकाळीचं अभ्यासू वगैरे घराचं बिरुद उतरत गेलं होतं. त्यात नरुतात्याच्या उदयाच्या समयी अख्खं कमळाबाईचं घर पायातल्या वहाणा हातात घेऊन काका-बाबाच्या मातोश्रींच्या नावानं गलका करू लागलेलं. लोकांना हा गलका धाडसाचा वाटला आणि ही भकारी भाषा गावच्या उद्धाराची वाणी वाटू लागली. त्यानं मोहित होऊन गावकर्‍यांनी कमळाबाईच्या लेकरांच्या हाती गाव सोपवला.
आता ही सारीच लेकरं नवखी! यांना साधी टपरी चालवायचा अनुभव नाही. त्यांना गावगाडा काय हाकता येणार? त्यात कारभार आला मेवाभाऊच्या हाती. खाण्याच्या बाबतीत मेवाभाऊचा त्रिखंडात कुणी हात धरू शकत नाही, हा उभा दावा वहिनींचा. घे चारसहा पळ्या साजूक तूप नि कुस्कर पुरणपोळी. त्यामुळं मेवाभाऊचा स्वभाव सुद्धा साजूक तुपासारखा. त्याच्याकडून काही झणझणीत होईल ही अपेक्षा कुणाची नव्हती. त्यात समोर काका-बाबाची मंडळी. सगळी रासवट. रांगडी. त्यांना भिडून गावगाडा हाकायचा म्हणजे मिळमिळीत, गुळगुळीत माणसाचं कामं नाही. नाकावाटे फुत्कारून कुणी भिणार नाही. हे चाणाक्ष चतुर मेवाभाऊनं ओळखलं. त्यानं चेट्टीचा गोदा गौत दफ्तरी घेतला. त्याला भची उभी आडवी बाराखडी तोंड-पाठ होती. त्यानं खुर्चीवर बसून कागदं काळी करण्याऐवजी काळं तोंड करून काकाला भ उच्चारून दाखवावा हीच मेवाभाऊची माफक अपेक्षा होती.
काय आहे? हे भकार उच्चारण मेवाभाऊला जमलंही असतं. कदाचित त्यानं काका-बाबा व इतर मंडळी आणखी छान दचकली असती. गावच्या कारभारापासून खूप दूर पळाली असती. गावच्या लोकांनाही गावातल्या समस्यांचा, कामाचा विसर पडला असता. पण मेवाभाऊचा पडला नाजूक गाता गळा. त्या गळ्यात एखादा भ अडकला असता तर वहिनींना तो भ जास्तीचं साजूक तूप पाजून काढावा लागला असता. त्यानं कदाचित मेवाभाऊचा पारदर्शक कारभार रंगला असता. त्या धास्तीनं मेवाभाऊनं कधीही भकार उच्चारला नाही. त्यानं त्यासाठी अक्रम बदाम, हातमळकर, कारेकर, छप्पनझुरळे, बधीरराव वगैरे पार्टटाइम मंडळी लावली. पण ती मंडळी भ-झ-आ ही पॅनलची आद्याक्षरं त्याच चालीवर म्हणू लागली. लोकंही पॅनल कम कमळाबाईच्या घराला भ-झ-आ ह्याच आद्याक्षरांनी ओळखू लागली.
त्यामुळे आता रे काय करायचं, ही वेळ मेवाभाऊंवर आली. तेव्हा त्यांनी ‘मेक इन कमळाबाई’ला नाईलाजाने फाटा देऊन ‘भ-झ-आ’ उच्चारण्याचे कामं आउटसोर्स करायचं ठरवलं. त्यातून गोदा गौत, गोटायन चणे अँड सन्स, मंगळ्या उर्फ टोपीछंद, कुनवर्ते सदायत्न यांवर सोपवलं. ती बिचारी कमळाबाईच्या दारात बसून काकाच्या मोटारीला बघून वस्सकन भ-झ-आकारात किंकाळू लागली. पळीभर साजूक तुपाच्या वा चतकुर पुरणपोळीच्या आशेने. कधी कधी वहिनी दया येऊन द्यायच्या काही वा कधी मेवाभाऊ भरल्या ताटावरून चतकुर फेकून द्यायचे. पण त्यानं पोट किती भरणार? त्यात कोकलायचं दिवस-रात्र! अर्ध्या पोटी हे शक्य नाही. त्यात गोदा गौतशिवाय कुणालाही पूर्ण ताटाची सोय नाही. हे ओळखलं गोटायन चणेनं. तो आणि त्याचं लेंढार जत्रा जेवढी पोळी तेवढीच आरोळी देऊ लागले. बरं त्यांचा तो फॅमिली बिझनेस असल्यानं कोकलणार्‍या तोंडांची संख्या जास्त आणि तीच गप्प राहू लागली तर कोकलणार कोण? काका-बाबा आणि गावकर्‍यांना भ-झ-आकाराची मोडशी व्हायला नको म्हणून मेवाभाऊंनी त्यांनाही दफ्तरी मानाचं स्थान दिलं. त्याच्या लेकरांना उचलून खांद्यावर घेतलं. त्यानं गोटायन चणे दुप्पट जोमाने भ उच्चारायला लागला. मेवाभाऊच्या खांद्यावर बसून त्याची लेकरंही येणार्‍या जाणार्‍याला ग-भ-झ-आ ची भाषा ऐकवू लागली. त्यानं मेवाभाऊचं काम हलकं होऊ लागलं.
एकतर मेवाभाऊ स्वतःला सत्वशील, गुणवान, पुण्यवान म्हणवून घेऊ लागला. शिवाय जात्याच संस्कारी असल्याचं प्रशस्तीपत्र त्यानं नरुतात्याचं सर्टिफिकेट प्रिंट केलेल्या प्रेसमधून प्रिंट करून आणलेलं. ते बुर्सेकर, मैद्य वगैरे भाट मंडळींकडून गावभरात पोहोचतं केलेलं. वर चेहर्‍यावर दोन्ही टाइम म्हणजे सकाळ-संध्याकाळ साजूक तूपलेपन चालू केलेलं. त्यानं चेहरा अति-सोज्ज्वळ, निष्कपट वगैरे वगैरे वाटू लागलेला. त्यानं मेवाभाऊंची प्रतिमा नको तितकी उजळलेली. तिला डांबर फासण्यासाठी मेवाभाऊंनी रात्रीचे झेंगाटं करून पाहिले. नांदती घरं फोडून बघितली. पण त्यांच्या वॉशिंग मशीनच्या कमालीमुळं त्यांची प्रतिमा पहिल्या धारेच्या फिनेलइतकी शुभ्रच राहिली.
पण घरफोडीनंतर मेवाभाऊला सुखनैव सत्तेचा मेवा खाण्यासाठी लोकांचं लक्ष वळवणं अत्यावश्यक वाटू लागलं. मग काय करावं? ठेंगेश चणेला खाण्यासाठी आणि खाण्याआधी मुबलक ओकायचं शिकवलेलं. तो जठरातलं जहर ओकून ते काम करू लागला. कुनरत्न सामोरा येईल त्याला ट ऐकवू लागला. त्यानं थेट मेवाभाऊला कुणी काही बोलायचं धाडस करेनासं झालं.
पण ह्या धबडग्यात काकाला कुणी झ सुद्धा ऐकवला नाही, ही खंत मेवाभाऊला जाणवू लागली. त्यात मंगळ्या सूत्रावर विसंबून राहायला बधेना, त्याला ठोस ताट हवं होतं. मग काय? मेवाभाऊने त्याला सुद्धा दरबारी ठेऊन घेतलं आणि दुप्पट जोमानं भ उच्चारायच्या आज्ञा दिलेल्या.
त्यानं झालं काय? मंगळ्या दारात बसून अगदी कुणालाही ट लावू लागला. झ देऊ लागला. त्यानं तथाकथित महापुरुष अवघड यांना आ बोलून दाखवला. त्यांनी मंगळ्याचं सूत्र शोधून घाव घातला. त्यानं मंगळ्या विव्हळला. त्यानं रिटर्न ऐकवली जाणारी भ-कराची भाषा बोलून दाखवली आणि नुसत्या भ ने काही होत नाही म्हणून मालिश करायला चारदोन पंटर सोबत घेतली. ती संधी साधून ऐन दफ्तरीच्या तोंडी अवघडांवर सोडून बघितली. त्यांनी अवघड यांना वगळून त्यांच्या भची बाराखडी येणार्‍या मदतनीसास झोंबून बघितलं. त्यानं गहजब माजला.
दफ्तरीच्या पर्यवेक्षकाने जाब विचारल्यावर मंगळ्या चक्क ‘ट्टं तू काय बघितलं रे?’ चा प्रतिप्रश्न करू लागला. वर एकदोन जणांना पण त्याने तीच भाषा वापरली. त्यामुळं कमळाबाईच्या घरातच नाराजी पसरली. ‘अरे हा आपल्याला झ बोलतो.’ एकमेकांना बोलताना ऐकून मेवाभाऊ चिंताग्रस्त झाले. त्यांनी मंगळ्याला तातडीने दफ्तरी बोलावून घेतलं. नाराजीच्या सुरात एकच विचारलं.
‘ही भांषा आपुल्याच गृही कां?’
‘आवडलं नाही का? सो… सॉरी! माझी थेट दिल्लीगिरी! पण तुम्हाला झ आवडत नसंल तर भ बोलू. भ आवडत नसंल तर गां बोलू. गां आवडत नसंल तर आ बोलू. पण आपुन बोलू नक्की! आणि मी काय म्हणतो? मी चैन करायचो तवा लोकं मला सॉल्लिड चुरगळायचे, त्याच स्टाईलनं मी तरवार कोयती आणली तर? का रणवीर सारखी
ठो: ठो: करू? थेट चुरगळून टाकू. ह्याच दफ्तरी! च्या र्र्र्मोेे. आपली गावाकडची भाषा पडते ना? काय? तू दोनेक जि-आर देना छापून! सॉरी हां पुन्हा दिल्लीगिरी!’
मंगळ्या टोपी उडवत छंदीपणे बडबडतो. मेवाभाऊ नाराजीने ते बघत बसतो.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

फक्त लढ म्हणा!

Next Post

फक्त लढ म्हणा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.