मोरारजी देसाई हे बाळासाहेबांचं खास गिर्हाईक. का नसावं? एक नंबरचा दांभिक माणूस आणि महाराष्ट्रद्वेष्टा, मराठीद्वेष्टा राजकारणी. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील नागरिकांवर गोळीबार करणारा नराधम हाच. आणीबाणीनंतर हे महत्त्वाकांक्षी गृहस्थ जनता पक्ष नावाच्या कडबोळ्याचे नेते बनले आणि पंतप्रधानपदावर जाण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी पूर्ण करून घेतली. जनता पक्षाने इंदिरा गांधींचा पराभव करून सत्ता ताब्यात घेतली, पण ती जनहितासाठी राबवणं त्यांना शक्य झालं नाही. भोळे समाजवादी, बेरकी काँग्रेसवाले आणि बनेल जनसंघी यांची ही त्या काळातली युती. तिच्याविरोधात लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला, तेव्हा अराजकाला निमंत्रण देणारे प्रसंग घडू लागले. त्या बेबंदशाहीला आळा घालण्यासाठी कायदा करण्याची गरज या गृहस्थांनी व्यक्त केल्याबरोब्बर बाळासाहेबांनी हे तुमचेच पिल्लू आहे, हे मोरारजींच्या निदर्शनाला आणून दिलेले आहे… मोरारजींना बोचकारणारे ते बिबट्याचं पिल्लूही दाखवून दिलं आहे… हे सगळंच स्क्रिप्ट जणू आता नव्याने घडत असल्याप्रमाणे आसपास काय काय सुरू आहे, ते आठवलं ना हे चित्र पाहिल्यावर. बिबट्याचं पिल्लू जन्माला घातलं तर ते सगळ्यांनाच बोचकारतं, एवढं लक्षात ठेवायला हवं कोणत्याही काळातल्या सत्ताधार्यांनी.