देवेंद्र फडणवीस
शिंदेशाहीचं काय करू
काहीच मला समजत नाही
कसा यांना धडा शिकवू
मुळीच मला उमजत नाही
धरलं तरीही पुन्हा चावतं
सोडलं तरीही पुन्हा पळतं
या वीरांना सावरताना
माझं सारं अवसान गळतं
असे पराक्रमी वीर यांचे
महायुतीला लावती बट्टा
बघून बघून घेईन आणि
एक दिवस देईन रट्टा
—————
संजय गायकवाड
कँटीनमधला बॉक्सिंग चॅम्पियन
म्हणून जगात होईल नाव
पराक्रमाने माझ्या दीपून
शिंदेसाहेब खातील भाव
पक्ष बलवान करण्यासाठी
वाटेल ती मी किंमत देईन
ज्यांची डाळ शिजत नाही
त्यांनासुद्धा हिंमत देईन
पक्षामधला एकेक नेता
ट्रेनिंग देऊन करीन बॉक्सर
कोणी आडवा आला तर मी
ठोशांची मग मारीन सिक्सर
—————
संजय शिरसाट
७२व्या मजल्यावरून
जेव्हा जेव्हा खाली पाहतो
कसे जमले अब्ज-कोटी
आश्चर्यात मीच न्हातो
कसे सांगू इतरांना मी
माझीच आहे स्वकमाई
समजून कोणीच घेत नाही
उगाच माझी करती धुलाई
कुठून कुठे गेलो याचा
गिरवा तुम्ही आदर्श माझा
गिनीज बुकात नाव होईल
तेव्हा कराल सत्कार माझा
—————
एकनाथ शिंदे
पक्षामधले नेते माझे
आहेत मुळी किती सोज्वळ
समजावल्यावर ऐकतात माझं
स्वभाव त्यांचा आहे प्रेमळ
माझ्यासारखेच आहेत सगळे
ते संस्कारशील आणि बेडर
का लावता त्यांच्या पाठी
गद्दारीची मोठी मोहर?
मी शाळा घेतली त्यांची
हुंदके देऊन रडले सारे
कान धरून क्षमा मागत
पायावरती पडले सारे
—————
अमित शहा
शिंदे साहेब, शिंदे साहेब
काय चाललंय तुमच्या राज्यात
खपवून मुळीच घेणार नाही
तुम्ही आहात आमच्या कब्जात
असले कसले मंत्री तुमचे
कुठून केले यांना आयात
किती पैसा किती मुजोरी
आमचा पक्ष येईल वांद्यात
जर सुधारणा नाही झाली
महायुतीतून काढू तुम्हाला
आता तुमची गरज सरलीय
का उगाच ताप आम्हाला