सकाळी नाना जागे झाले तर घरात पाणीच पाणी. त्यांना वाटलं बाथरूमचा नळ उघडा राहिला की काय! त्यांचं लक्ष छताकडे गेलं. छताला अर्धवर्तुळाकार भोक पडलेलं पाहून नाना हादरलेच. त्यांची पत्नी झाडूने घरात तुंबलेलं पाणी बाहेर गॅलरीत लोटत होती आणि नानांच्या तोंडातून चाळ कमिटीवर शिव्यांचा वर्षाव सुरू होता. मग चाळ कमिटीच्या पदाधिकार्यांसह सगळे चाळकरी पंढरीच्या वारीला जावे तसे वरच्या मजल्याची वाट धरू लागले.
—-
पावसाळा सुरू झाला की बेडकांची डराव डराव सुरू होते. तशीच टमाट्याच्या चाळीतील काही रहिवाशांचीही होते. चाळ कमिटीने गच्चीवर सिमेंटने कितीही डागडुजी करून घेतली तरी वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती दरवर्षी होते म्हणजे होतेच. काही खोल्यांमध्ये तर छतातून गळणारं पाणी साठवण्यासाठी मोठे टोप, बालद्या, पिंपं ही बचाव सामग्री सज्ज असते. त्याशिवाय पावसाचं पाणी भिंतीत झिरपून अगदी तळमजल्यापर्यंतच्या भिंतीही एखाद्या ओलेतीसारख्या ओलेत्या होतात. हा आणखी एक ताप. चाळ कमिटीने गच्चीवर डांबर घालण्यापासून सिमेंट प्लॅस्टरिंगपर्यंत सर्व आधुनिक उपाय पावसाळ्यापूर्वी करून घेतले तरी दरवर्षी नव्याने ही समस्या उभी राहतेच.
यावर्षी तर चाळीतल्या काही वात्रट पोरट्यांनी गच्चीवर सिमेंट काँक्रीट केल्यावरही त्यांना गॅलरीत क्रिकेट खेळू न देणार्या खवड्या नानांच्या बाहेरच्या खोलीच्या वर ते घरात नसताना रात्री गच्चीत चांगलं अर्ध्या फुटाचं भोक पाडून त्यावर छोटे प्लायवूड टाकून ठेवलं. रात्री नाना आणि त्यांचे कुटुंब बाहेरून जेवून आल्यावर आतल्या खोलीत झोपी गेल्यानंतर तुफान पाऊस पडला. ढगांचा गडगडाट इतका होता की वीज पडते की काय असं वाटून चाळकरी जीव मुठीत घेऊन झोपले होते.
सकाळी नाना जागे झाले तर घरात पाणीच पाणी. त्यांना वाटलं बाथरूमचा नळ उघडा राहिला की काय! पाऊस तर थांबला होता. त्यांचं लक्ष छताकडे गेलं. छताला अर्धवर्तुळाकार भोक पडलेलं पाहून नाना हादरलेच. त्यांची पत्नी झाडूने घरात तुंबलेलं पाणी बाहेर गॅलरीत लोटत होती आणि नानांच्या तोंडातून चाळ कमिटीवर शिव्यांचा वर्षाव सुरू होता. सकाळी सकाळी नानांची मोठ्या आवाजातील सरबत्ती ऐकून चाळ कमिटीच्या पदाधिकार्यांसह सगळे चाळकरी पंढरीच्या वारीला जावे तसे वरच्या मजल्याची वाट धरू लागले. चाळ कमिटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्याबरोबर आणखीही चाळकरी नानांच्या खोलीत घुसले. पाहतात तो खोलीच्या छताला मोठं भोक पडलेलं. त्यातून सूर्याचा प्रकाश खोलीत पडलेला. तेवढ्यात शेजारचा पम्या म्हणाला, त्या भोकातून सूर्यसुद्धा दिसतो. तेवढ्यात पेडणेकर मामांनी मनातली शंका बोलून दाखवली.
– एका रात्रीत एवढो मोठो होल पडलो तरी कसो?
ते ऐकल्यावर नाना भडकले. म्हणाले, हो मी माणसं पाठवली होती त्यासाठी. धबधब्याचा आनंद घ्यायचा होता ना घरात बसून.
– नाना, तुम्ही असे भडकू नका. अहो पाऊसच एवढा प्रचंड पडला की एखादी वीज चाटून गेली असेल अलगद तिथे. त्यामुळे भोक पडू शकतं. रात्री विजांचा कडकडाट ऐकत होता ना तुम्ही. मी चाळ कमिटीचा सेक्रेटरी म्हणून गेल्या तीस वर्षांच्या अनुभवावरून सांगतो. पण तुम्ही रात्री ताबडतोब मला फोन करून का नाही सांगितलं? आम्ही ताबडतोब विटा रचून ते भोक सिमेंटने बुजवून टाकलं असतं. किमान एवढं पाणी तरी साचलं नसतं घरात. नंतर आम्हाला शिव्या देण्यापेक्षा वेळीच तक्रार केली असती तर ही वेळ आली नसती.
– नाही सेक्रेटरी महाशय. कोणीतरी मुद्दामच हे भोक पाडलंय आणि तुम्ही सांगता वीज चाटून गेली असेल म्हणून? असे चाटण्यासारखं काय आहे आमच्या घरात? हे बघा, याचा काय तो सोक्षमोक्ष लावा नाहीतर पोलीस कम्प्लेंट करावी लागेल.
– नाना, शांत व्हा. एकतर आपली चाळ आता जीर्ण की काय म्हणतात ती होत चाललीय. परवा त्या बाबू परबाच्या घरात सिलिंगचा मोठा भाग पडला. नशीब, कोणाच्या डोक्यावर नाही पडला. गेल्या महिन्यात त्या धाऊसकरांच्या पिलरला तडे गेले. दोन महिन्यांपूर्वी कावळ्यांच्या घरात वरच्या माळ्यावरच्या पाटलांच्या खोलीतल्या बाथरूमचं पाणी गळत होते. आता आम्ही कुठे कुठे लक्ष द्यायचं?
– बाकीच्यांचं मला सांगू नका. माझ्या घराच्या सिलिंगला भोक कसं पडलं ते सांगा.
– नाना, आपण गच्चीवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवले तर!
– शीरा पडो त्या कॅमेर्यावर. त्यांच्यावरच वीज पडली तर?
– हो हो. नकोच ते. सीसीटीव्ही कॅमेरे.
– सेक्रेटरीनू, लावा हो तुम्ही कॅमेरे. यांच्या प्रायव्हसीवर गदा येते म्हणून यांना नको कॅमेरे. बसायचे वांदे होतात ना. रात्री परवा बाजूच्या सोसायटीच्या तक्रारी होत्या की रात्री तुमच्या गच्चीवरून आमच्या कंपाऊंडमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या जातात म्हणून अधून मधून.
– त्याचा बंदोबस्त करू आपण राणेसाहेब. पण सीसीटीव्ही कॅमेर्यांचा आग्रह नका करू. त्याचा खर्च नाही झेपणार आपल्या चाळ कमिटीला.
– तू गप बस. हेही त्यांना सामील.
– वाट्टेल ते बोलू नका. गच्चीवर रात्रीच नाही तर दिवसाउजेडीही काय काय प्रकार चालतात ते तळमजल्यावरच्या नांगरेकाकूंना विचारा.
– च्यामारी. गच्चीवरचं तळमजल्यावर कसं दिसतं यांना?
– कसं दिसतं म्हणजे! विज्ञान किती पुढे गेलं आहे माहीताय ना! नांगरेकाकू काहीही करू शकतात.
– तू अगदी कसा येडचाप रे शाम्या. अरे, काकूंचे स्पाय म्हणजे डिटेक्टिव्ह म्हणजे हेर प्रत्येक माळ्यावर पेरलेले आहेत. आपल्या चाळीतली काही वात्रट पोरं आहेत ना, ती काकूंना गच्चीवरच्याच नाही तर चाळीतल्या सगळ्या गुप्त बातम्या देतात, ज्या आपण चारचौघात सांगू शकत नाही.
– मग मला पण या वात्रट मुलांपासून सावध राहिले पाहिजे.
– का? तुमचं काही लफडं-बिफडं नाही ना कुणाबरोबर.
– एक लक्षात ठेव. आपण जी काही लफडी करायची ती चाळीत नाही. चाळीच्या बाहेर. चाळ हे एक कुटुंब आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आपल्या चाळीतील ज्येष्ठ नाटककार आबुराव ढमाले यांनी त्यांच्या एका नाटकात काय लिहिलंय, आपण सारे भाऊ भाऊ, एका ताटात जेऊ जेऊ, एका घरात राहू राहू… केवढा महान विचार मांडलाय त्यांनी एका पात्राच्या तोंडी चाळीबद्दल.
– त्या आबुरावाबद्दल मला सांगू नको. चांगल्या चालीचा माणूस नाही आहे तो. वय झालं तरी त्याची नजर बघ. रस्त्यावरून चालतानाही कशी भिरभिरत असते सगळीकडे. जणू होकायंत्रच बसवलंय मानेवर. कालच आपल्या पोरांनी खबर आणलीय. त्याला म्हणे केनेडी ब्रिजच्या पुलावर उगाचच भटकताना पोलिसांनी पकडला आणि बदड बदड बदडला.
– तुला कसं माहीत?
– खबर आली ना नांगरेकाकूंना त्या वात्रट पोरांकडून. त्यांनाच पैसे देऊन मालिश करायला बोलावलं होतं त्याने. बायको गेलीय गावाला आणि हा भटकतोय मन मानेल तिकडे.
– ही असली लोकं ना कलंक आहेत आपल्या चाळीला. आता एवढ्या पावसात याने कशाला जावं नको तिथे कडमडायला. वर दुसर्यांना चांगलं वागण्याचे सल्ले देणार. ते जाऊदे. त्या नानांच्या सिलिंगला पडलेल्या भोकाचं बघा.
– त्यासाठी आपण चाळ कमिटीतर्फे एका संशोधन कमिटीची स्थापना उद्याच्या मीटिंगमध्ये करूया. ही कमिटी गच्चीची पाहणी करून आठ दिवसांत अहवाल देईल. त्याआधी उद्याच तात्पुरती उपाययोजना म्हणून संपूर्ण गच्चीवर प्लॅस्टिकचं कव्हर आणि त्यावर ताडपत्री घालू. नानांना नुकसानभरपाई म्हणून चाळ कमिटी मदत फंडातून दोन हजार रुपये देऊ.
सेक्रेटरींची उपाययोजना ऐकून नांगरेकाकू मात्र वात्रट पोरांकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या.
– श्रीकांत आंब्रे
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)