लहानपणी मी माझे आजोबा, दिवंगत ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर किल्ल्यांवर भटकायचे. अजूनही भटकते. पण त्यावेळची मजा काही औरच होती. त्यावेळी अनेकदा जाणं व्हायचं, आता तितक्या वेळा जात नाही. अनेक ऋतूंमध्ये मी बर्याच किल्ल्यांवर गेलेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला गडकिल्ल्यांवर जेव्हा आपण जातो, तेव्हा पाय घसरून पडणं तर माझं नित्याचंच आहे.
एकदा आम्ही राजगडला जायला निघालो आणि निघाल्यापासून म्हणजे आमचा ट्रेक सुरू केल्यापासून वर पोहोचेपर्यंत एक क्षणही पाऊस थांबला नाही. कुठल्याही झाडाखाली उभं राहून उपयोग नव्हता. कुठल्या झोपडीत थांबूनही उपयोग नव्हता. आम्हाला तसंच भिजत भिजत वर जावं लागलं. तो अनुभव अवर्णनीय होता. सगळीकडे धुकं जसं असतं तसा पाऊस संपूर्ण आसमंतात भरलेला होता. हा विलक्षण अनुभव माझ्या आयुष्यात आला होता. माझ्या आयुष्यात मी प्रथमच पूर्ण गोल इंद्रधनुष्य मी तिथे पाहिलं. तो अनुभवही मला कधीच विसरता येणार नाही.
दुसरा सांगण्यासारखा पावसाचा अनुभव म्हणजे ‘गारवा’… माझे मित्र मिलिंद इंगळे आणि किशोर कदम यांचा अतिशय गाजलेला हा अल्बम आजही तेवढाच लोकप्रिय आहे, हे आश्चर्यच आहे. या अल्बममधली गाणी ऐकत पावसात भटकणं हा आमचा आवडता छंद आहे. मी पुण्याची… कामासाठी मुंबईला राहते. या पुणे-मुंबई प्रवासात ‘गारवा’मधली गाणी ऐकत जाणं हा एक अतिशय आनंददायी अनुभव असतो. तो अनुभव न चुकता, एखादं व्रत असल्यासारखा आम्ही पार पाडतो.
बाकी पावसाच्या जितक्या आनंददायी आठवणी आहेत तितकीच भयंकर आठवण म्हणजे २६ जुलैच्या पावसाची… केवळ नशीब म्हणून त्या पावसातून मी वाचले. मी घरातून शूटिंगसाठी बाहेर पडत होते आणि काही अंतरावर गेल्यावरच काहीतरी चमत्कारिक पाऊस पडायला सुरुवात झाली. पुढे खूप ट्रॅफिक जाम होता. माझं बाहेर काही अर्जंट काम नव्हतं. म्हणून मी ड्रायव्हरला म्हटलं, आपण परत जाऊया. विचार केला, घरी जाऊन आपण दुपारी निघू. आत्ता पाऊसही खूप आहे. अगदी नशिबाने मी गाडी परत वळवली. गाडी येऊन ती पार्क करेपर्यंत पावसाचा जो काही आवाज येत होता आणि जे काही दृष्य दिसत होतं, ते पाहून (जुहू सर्कलजवळ राहायचे मी तेव्हा) काहीतरी भयंकर होत असल्याचं मला जाणवलं. थोड्याच वेळात सहकलाकार, मित्रांचे, कुटुंबियांचे फोन यायला लागले. मोबाईल बंद पडले. माझे पती तेव्हा कोल्हापूरला होते. मुलगा पुण्याला शिकत होता. मी इथे एकटी होते. माझ्यासोबत राहणारी माझी मेड त्या दिवशी येऊ शकली नव्हती. ड्रायव्हर जवळपास छातीइतक्या पाण्यातून त्याच्या घरी पोहोचला आणि त्याने लॅण्डलाइनवरून फोन करून तो सुखरूप असल्याचं सांगितलं. बाकी कोण कुठे आहेत, कसे आहेत काहीही कळत नव्हतं. मला आठवतं माझ्या बिल्डिंगमध्ये फक्त माझी लॅण्डलाइन चालू होती. त्यामुळे शेजारी पाजारी माझ्याकडे येऊन फोन करत होते.
आयुष्यात तसा प्रसंग पुन्हा कधी घडू नये असं मला अगदी मनापासून वाटतं. त्यानंतरही अनेक बातम्या येत होत्या. माणसं गायब झाली. कित्येकांना जीव गमवावा लागला. मोटारी पाण्याखाली गेल्या होत्या. आता मी राहून राहून देवाचे आभार मानते. त्यावेळी मला परत येण्याची बुद्धी झाली नसती तर मीही त्यांच्यातली एक झाले असते. कित्येक लोक झाडावर चढून बसले होते. बरेचजण सेटवरच अडकले होते. अशावेळी मुंबईकरांचं स्पिरिट काय असतं ते मला त्या दिवशी कळलं.
तरीही पाऊस मला कधीही, कायमच हवाहवासा वाटतो. कारण मला मुळात निसर्गात रमायला खूप आवडतं. पावसाळ्यात निसर्ग जसा कात टाकल्यासारखा बदलतो, त्याचं ते रूप मी मनापासून एन्जॉय करते. मला वाटतं डोंगरावर मनसोक्त फिरणार्या प्रत्येक माणसाला पाऊस आवडतोच आवडतो. त्या अगणित आणि हिरव्यागार सृष्टीला नवचैतन्य आल्यासारखं वाटतं. मी पुण्याची असले तरी मुंबईकरही आहे.
पुण्यात थोडासा पाऊस पडला तरी छान गारवा पसरतो. मुंबईचा पाऊस वेगळा, पुण्याचा पाऊस वेगळा, पण या दोन्ही पावसाचा अनुभव घेण्याची संधी मला मिळते.
– मृणाल कुलकर्णी
ज्येष्ठ अभिनेत्री