माझ्या पहिल्या ‘गारवा’ या अल्बमचं बीज पावसातच रोवलं गेलं. मुळात मला संगीतकार व्हायचं नव्हतं. मला खरं तर गायक व्हायचं होतं. अतुल दाते आणि किशोर कदम हे माझे मित्र होते. आम्ही तिघेही एकमेकांच्या घरी जायचो. तेव्हा किशोर काही कविता लिहायचा. माझ्याकडे आणून द्यायचा. मग मी चाल लावायला बसायचो. असं करत करत माझ्या चाली लागत गेल्या. यातली बरीचशी गाणी पावसाची होती. असं करत करत मी संगीतकार झालो. अशा ब-याच चाली लावून झाल्यावर मी संगीतकारांकडे जाऊन गायक म्हणून भेटायचो. पण काही जमत नव्हतं.
त्याच दरम्यान एका गझल गायन स्पर्धेत मला एक लाखाचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. कोलकात्यातल्या त्या स्पर्धेत ९०० जणांमधून मी पहिला आलो होतो. या पैशांचं काय करावं असा विचार सुरू होताच. म्हणून मग किशोर कदमने लिहिलेली आणि मी चाली लावलेली गाणी मी रेकॉर्ड केली. त्यात बरीचशी गाणी पावसाचीच होती. ती गाणी घेऊन मग मी म्युझिक कंपनीवाल्यांना भेटायला लागलो. पण त्यातली गाणी कुणालाच कळेनात, आवडेनात. तो ९०चा काळ होता. तेव्हा असा ट्रेण्ड नव्हता. एक विषय, एकच कवी आणि एकच गायक हा फॉरमॅटच कुणाला परिचित नव्हता. त्यामुळे तो कुणी विकत घ्यायला तयार होत नव्हतं. मी म्हटलं नुसत्या रिलीज करा. पैसे नंतर द्या. पण कॅसेट डुप्लिकेशनचा तरी खर्च येतोच. कॅसेट चालली नाही तर तो खर्च वाया जाणार होता.
त्यानंतर जवळपास तीन चार वर्षांनी ९७ साली राजश्री प्रॉडक्शनच्या राजेश बडजात्यांचा फोन आला की, आम्ही म्युझिक कंपनी सुरू करत आहोत. तुमच्याकडे काही रेडीमेड आहे का? मी हा अल्बम घेऊन त्यांच्याकडे गेलो. ते म्हटले हा मराठी अल्बम आहे. आम्हाला हिंदी हवा आहे. तू आमच्यासाठी हिंदी गाणी कंपोझ कर. तेव्हा मी ‘ये है प्रेम’ नावाचा माझा अल्बम त्यांनी रिलीज केला. मग ‘गारवा’ आला. ही गाणी आम्ही पावसात बसून केली होती.
मी किशोरला म्हटलं, तू कविता छान म्हणतोस. तर मग तू कविता म्हण, मी त्याच्यापुढे गाणे म्हणेन. असा अल्बम करूया. तसा आम्ही सात कविता आणि सात गाणी असा अल्बम केला. कॉलेजच्या मुलांनाही ‘गारवा’ अल्बम आवडला. पहिल्यांदा कुणाला तो माहीत नव्हता. पण नंतर माऊथ पब्लिसिटीने तो सर्वांना माहीत होत गेला. ऐन पावसाळ्यात २३ जुलैला आम्ही हा अल्बम रिलीज केला होता. आज २०-२२ वर्षे झाली तरी तो अजूनही प्रेमवीरांना आवडतोय. हा अल्बम ऐकून काहीजण प्रेमात पडले अशीही उदाहरणे आहेत. प्रत्येकाला ‘गारवा’मधली ही गाणी ऐकून वेगवेगळ्या आठवणी दाटतात.
दर पावसाळ्यात मला पावसाचे प्रसंग आठवत असतात. असाच एक पावसाशी संबंधित भयानक प्रसंग होता म्हैसूरचा. लग्न झाल्यावर आम्ही म्हैसूरला गेलो होतो. तिथे भव्य वृंदावन गार्डनमध्ये फिरायला संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता गेलो होतो. परत येईपर्यंत खूप अंधार झाला. कारण आम्ही खूप आतपर्यंत गेलो होतो. त्याचवेळी अचानक वेड्यासारखा पाऊस सुरू झाला. त्यावेळी साधारण सात-साडेसात वाजले होते. अंधार पडू लागला होता, पण सगळीकडे लाईट्स लावलेले होते. पाऊस अचानकच सुरू झाला. आम्ही छत्र्या घेतल्या होत्या, पण त्या आमच्या गाडीतच राहिल्या होत्या. धो धो पाऊस सुरू होता. आम्ही पूर्ण भिजलो. त्यात लाईट्स गेले. लाईट्स गेल्यावर तिकडे अक्षरश: गुडुप अंधार झाला. डोळ्यांत बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार. कारण आजूबाजूला बिल्डिंग्ज वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही अक्षरश: एकमेकांचा हात पकडून चाचपडत कसेबसे चालत होतो. भिजलो होतो त्यामुळे थंडीने कुडकुडत होतो. यामुळे काय होतंय, काय होणारंय याची भीती वाटायला लागली होती. त्याच स्थितीत कसेबसे गाडीपर्यंत पोहोचलो. कपडे पूर्ण भिजलेले.. गाडीत बसलो तर गाडीही आमच्या कपड्यांमुळे आतून भिजली. असा हा पावसाचा थरारक आणि खरोखर भीतीदायक अनुभव मला आला होता.
पाऊस खरं तर खूप रोमँटिक असतो. पण आपण मुंबईचा पाऊसही पाहिला आहे. पावसाचं रौद्ररूप काय असतं तेही आपण मुंबईच्या पावसात पाहिले आहे. पण म्हैसूरमध्ये मी पावसाचा जो अनुभव घेतला तो काही वेगळाच होता.
– मिलिंद इंगळे
पार्श्वगायक, संगीतकार