घोर अपमान! घोर अपमान!! घोर अपमान!!! घोर अन्याय! घोर अन्याय!! घोर अन्याय!!! चैत्यभूमीच्या बाहेर दाणदाण पाय आपटत आपापल्या मोटारीत बसायला चाललेल्या २ नंबरी आणि ३ नंबरी उपमुख्यमंत्र्यांचे गगनभेदी आवाज उसळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनात शेकडो प्रतिध्वनींसह घुमले तेव्हा माझा मानलेला लाडका परमप्रिय मित्र पोक्याही जागच्या जागी थरारून गेला. त्याने जोरात धावत धावत त्या दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अपयश आलं. मुलाखत घेण्याची संधी हुकली असं त्याने मला सांगताच मी त्याला माझ्या भाडोत्री कारने त्या दोघांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्यामागे पिटाळला. त्याच या प्रतिक्रिया…
एकनाथ शिंदे : ठरवून चाललीयत सारी कटकारस्थानं. मला भाषण करू न देण्याचं कसलं आसुरी समाधान मिळालं या १ नंबरला? कळू द्या लोकांना कोण आमचं खच्चीकरण करतंय ते! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या लाखो भगिनी-बांधवांनी माझं पाच मिनिटांचं, काळजाला हात घालणारं भाषण ऐकलं असतं तर काय बिघडणार होतं महाराष्ट्राचं? पण नाही. मला मोठं होऊ द्यायचं नाही! सतत तृतीय नंबरचा म्हणून माझी अवहेलना करायची हे एकवेळ मी खपवून घेईन, पण माझी ठाण्याची जनता आणि महाराष्ट्रातल्या माझ्या लाखो लाडक्या भगिनी हे कधीच सहन करणार नाहीत, हे लक्षात ठेवा १ नंबर! तुम्ही राजकीय अस्पृश्यता पाळत असाल, पण मी नाही. किती मेहनत घेतली होती मी त्या पाच मिनिटांच्या भाषणावर. जवळजवळ ४० वेळा त्याची रिहर्सल करून घेतली स्वत:ची आमच्या आमदारांकडून. आयत्या वेळी तुम्ही आमचा पत्ता कापलात. यात माझं काही नुकसान नाही झालं, पण महाराष्ट्र एका संस्मरणीय भाषणाला मुकला याची हळहळ वाटते. आदल्या रात्री चोरून पाहिलेल्या त्या निमंत्रणपत्रिकेत भाषणाच्या यादीत माझं नाव होतं. आता त्या कामराने माझ्या झालेल्या या फजितीवर विडंबनगीत पाजळलं तर कोणत्या तोंडाने मी माझ्या गद्दार म्हणून हिणवल्या जाणार्या प्रिय सहकार्यांना सांगू की जा आणि तोडफोड करून या त्या कामराच्या घराची?
अजितदादा : असं वाटतं, स्वत:च्याच मुस्काटात एकेक मारून घ्यावी. च्यामायला, पाच मिनिटांच्या भाषणस्वातंत्र्याची गळचेपी करताय लेकांनो? असं काय विपरीत बोलणार होतो मी त्या पाच मिनिटांत? त्या ३ नंबरसारखी मी तयारी करत नाही बसलो भाषणाची. आयत्यावेळी जे मनात येतं ते ठोकून देतो, पण वेळप्रसंग पाहून. त्या पवित्र चैत्यभूमीवर आमच्यासोबत राज्यपालांसारखी प्रतिष्ठित पदाची व्यक्ती असताना तिथे सांभाळून मुद्देसूद बोलावं लागतं एवढी अक्कल आहे मला. लिहिलेलं भाषण असतं ते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गुणगान करण्याशिवाय दुसरं काय बोलणार होतो मी त्या पाच मिनिटांत! पण फक्त आपणच रेकून, हेल काढत लोकांच्या कानठळ्या बसवणारं भाषण करू शकतो हे दाखवून द्यायची खुमखुमी असते एखाद्याला. त्याला त्यांच्या भाषेत आत्मकेंद्रितपणा की काय म्हणतात. आम्हाला तशी सवय नाही. पण वेळ काळ समजतो आम्हाला. हे महाशय कुठेही भाषणाला उभे राहिले की कायम वरच्या पट्टीत बोलणार. त्याचा विचाराशी, विद्वत्तेशी, व्यासंगाशी आणखी कशाशी काहीही संबंध नसतो. सतत भीतीच्या सावटाखाली वावरतात. कोणीही असो, दुसर्याबद्दल कायम संशय. आपली खुर्ची तर कोणी हिसकावून घेणार नाही ना याची काळजी. स्वत:ची खाती नीट सांभाळता येत नाहीत यांना नि आमच्या खुर्च्या ओढू पाहतायत. आम्ही आहोत म्हणून तुम्ही या खुर्चीवर आहात हे विसरू नका. मी फाटक्या तोंडाचा माणूस आहे. जे मनात आहे ते बोलून जातो. कधी कधी विनोद करायला जातो आणि माणसं दुखावतात, पण हा गावरानपणा पोटात एक आणि ओठात एक असा नसतो. छक्केपंजेही करतो आम्ही, पण तो राजकारणाचा भाग असतो. यांचं तसं नसतं. हे तोंडावर गोड बोलणार आणि मागून काठ्या खुपसणार. धड एक खातं सांभाळता येत नाही. त्या गृह खात्याची बघा कशी पार वाट लावून टाकलीय. त्या ३ नंबरबद्दल तर काही बोलायलाच नको. कणाच नसतो अशा माणसांना. अशी हुजरेगिरी मला नाही आवडत. तेल लावत गेलात तुम्ही!
फडणवीस : नाही, नाही, नाही. आम्हा तिघांमध्ये कसलाही गैरसमज नाही. ज्या समारंभाला माननीय राज्यपाल उपस्थित असतात तिथे सारं काही प्रोटोकॉलप्रमाणेच चालतं. निमंत्रणपत्रिका वगैरे मी बदलत नाही. हे सारं चुकून झालं. त्यातून गैरसमज झाले असतील तर मी माफी मागतो. कधी कधी अधिकारी वर्ग एखादी सरकारी निमंत्रणपत्रिका तयार करताना न सांगितलेले शब्दही तिथे घुसडतो तर काही वेळा सांगितलेले शब्दही गायब करतो. त्यातलाच हा प्रकार आहे. मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही तिघे एकजुटीने काम करतो. कसलाही भेदभाव करत नाही. तुम्ही १ नंबर, २ नंबर, ३ नंबर अशी जी आमची वर्गवारी करता ना, ती साफ चुकीची आहे. माझे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्षम आणि सक्षम आहेत. अजितदादा, एकनाथराव दिल्लीला जाऊन माननीय अमितजी शहा यांना भेटतात ते काही तिघांपैकी कुणाबद्दल तक्रार करण्यासाठी अजिबात नाही. त्यातून स्वत:च वेगळा अर्थ काढून मीडियावाले ‘खास गोटातून’, ‘खास सूत्रांकडून’ या नावाने गैरसमज करणार्या बातम्या पसरवतात, ते चुकीचं आहे. हे पत्रकार तर आमच्यातील मतभेदांच्या कपोलकल्पित कहाण्या रचून आमच्या तिघांमधील तिघावा आणखी रूंद कसा होईल याची वाट पाहात असतात. आम्ही पक्षफोडे आहोत असा आरोप केला जातो. तसं काही आम्ही केलेलं नाही. त्यांची इच्छा होती म्हणून ते आले. आमच्यात रमले. त्यांच्या जिवाचं सोनं झालं. एकनाथराव कनवाळू, ममताळू आहेत तर अजितदादा स्पष्टवक्ते आहेत. या दोघांना महाराष्ट्राच्या विकासरथाला जुंपून मला विकासाची घोडदौड करायची आहे.