‘आयपीएल’मधील बॅटचाचणीमुळे सर्वच फलंदाज तणावात वावरू लागलेत. चौथ्या पंचांकडे बॅट सोपवताना गोलंदाजाला सामोरे जाण्यापेक्षा अधिक दडपण फलंदाजांवर येतंय. सध्या चर्चेत असलेल्या या बॅटचाचणीला सामोरं जाताना गाजलेल्या फलंदाजांनी मांडलेल्या काव्यात्मक प्रतिक्रिया..
– – –
सध्या ‘आयपीएल’च्या व्यासपीठाकडे इकडे तिकडे चोहीकडे ना ऑरेंज कॅप, ना पर्पल कॅप, ना ‘थाला’ कधी थांबणार? ना रोहितला सूर गवसणार? याची चर्चा- चर्चा फक्त बॅटच्याच रंगतायत. क्रिकेट म्हणजे बॅट आणि बॉलचं युद्ध. ‘आयपीएल’च्या व्यासपीठावर सहसा फटकेबाजी करणार्या बॅट्समननीच अधिक वर्चस्व सिद्ध करीत लोकप्रियतेची शिखरं गाठलीत. पण, ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामात सुनील नारायण, आनरिख नॉर्किए, रयान पराग यांच्यासारख्या काही खेळाडूंना बॅटचाचणीत अपयशी ठरल्याचा फटका बसला आणि अख्ख क्रिकेटजगत हादरून गेलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि क्रिकेटचे नियमकर्ते मेरिलीबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) यांच्या कार्यप्रणालीवर आधारितच ‘आयपीएल’ होतेय. बॅट, बॉल, यष्टी, सीमारेषा सर्व आकारमान ठरलेलं. मग अचानक हे काय पाहायला मिळतंय? फलंदाज मैदानावर प्रवेश करण्यापूर्वी चौथे पंच एका आयताकृती गेजमध्ये म्हणजे मापन साच्यात बॅटची चाचणी करतायत.
इतिहासात डोकावल्यास तसे काही बॅटचे अजब गजब नमुने क्रिकेटविश्वात चर्चेतही आलेत. १९८३च्या विश्वचषकात भारताची ५ बाद १७ अशी तारांबळ उडाल्यानंतर कर्णधार कपिल देवनं १७५ धावांची अजरामर वादळी खेळी साकारलेली. ती खेळी मुंगूस बॅटनं केल्याचं म्हटलं जातं. २०१०च्या ‘आयपीएल’मध्ये मॅथ्यू हेडननं मुंगूस बॅटनिशी मोठी खेळी उभारत पुन्हा चर्चा घडवली. २००३च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रिकी पाँटिंगनं १४० धावा केल्यामुळे भारताला हार पत्करावी लागली होती. पाँटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याचा तथाकथित गौप्यस्फोट नंतर करण्यात आला. परंतु त्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पण, ताज्या बॅटनाट्याबद्दल फलंदाज उघडपणे नाराजी प्रकट करीत आहेत. जाणकारांकडून मतं-मतांतरं व्यक्त केली जातायत. ‘आयपीएल’च्या क्षितिजावरील गाजलेल्या खेळाडूंचे हे अनुभव पाहूयात.
एक बॅट द्या मज आणुनि
फटकावीन मी चौकार-षटकार
भेदुनि टाकिन सीमा आरपार
दीर्घ खेळी उभारेन धारदार
अशी बॅट द्या मजलागुनी…
‘हिटमॅन’ रोहित शर्मानं सिंहगर्जना केली. मोठी खेळी उभारण्याच्या इराद्यानं मैदानावर प्रवेश करण्यापूर्वी चौथ्या पंचांनी रोहितला अडवलं. त्याला बॅट देण्याची विनंती केली. रोहितच्या कपाळावर आठ्या आल्या. पंचांनी त्याची बॅट आपल्याकडील बॅट प्रमाणभूत मापन साच्यात टाकून चाचपणी केली. ती सुरुवातीला साच्यात जाईना, तेव्हा पंचांनी तिरका कटाक्ष रोहितकडे टाकला. पण, रोहितच्या ‘‘सरजी, जरा पुन्हा नीट करा,’’ अशा विनंतीला मान देत केलेल्या चाचणीत ती बॅट त्या साच्यात गेली. पंचांनी चेहर्यावर सकारात्मक भाव आणले. रोहितनंही ‘‘हुश्श,’’ अशी दिलासापूर्ण प्रतिक्रिया देत मैदानाकडे प्रस्थान केलं.
वय जरा जास्त आहे,
दर वर्षी टीकाकारांना वाटतं
भर ‘आयपीएल’मध्ये बॅट घेऊन
फटकवावं यासाठी मन दाटतं
तरी यष्टिरक्षणाचं कर्तृत्व चालू राहतं,
बॅट मनाप्रमाणे चालत नाही
पण यंदा बॅटच्या आकारमानाशिवाय
कोणीच फारसं बोलत नाही…
महेंद्रसिंह धोनीनं आपली शोकांतिकाच जणू मांडली. चेन्नई सुपर किंग्जला यंदा म्हणावं तसं यश मिळत नाही. गुणतालिकेत तळाच्या संघांमध्ये घुसमट होतेय. कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो, हा असामान्य विश्वास असणारा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे ‘आयपीएल’मधून बाहेर पडलाय. परंतु धोनीलाही ही बॅटचाचणी फारशी पचनी पडलेली नाही. काही वर्षांपूर्वी पंचांच्या एका निर्णयाबाबत नाराजी प्रकट करण्यासाठी धोनीनं चक्क मैदानावर प्रवेश केला होता. पंचांना खडसावलंही होतं. त्यामुळे पंच मंडळी ‘एमएसडी’च्या बॅटची चाचणी कशी करावी? यासाठी चिंतामग्न आहेत. चुकून धोनी बॅटचाचणीत अपयशी ठरला, तर चेन्नईचा पिवळा महासागर कोणते रंग दाखवेल, याचा नेम नाही.
सांगा कसं खेळायचं?
रडत-खडत की बेफाम आतिषबाजी
करत तुम्हीच ठरवा!
डोळ्यांत तेल घालून बॅटची
चाचणी कुणीतरी करतंच ना?
बॅटची लांबी, रुंदी, जाडी
फटकेबाजीसह वाढतेच ना?
पंचांना शाप देत बसायचं,
की दुवा देत हसायचं?
तुम्हीच ठरवा!
ही कैफियत मांडली, पृथ्वीतलावरील सर्वात लोकप्रिय फलंदाज विराट कोहलीनं. मैदानावर जाण्यापूर्वी त्यानं आपलं प्रेरणास्थान, बॉलिवुड सुंदरी अनुष्का शर्मा हिच्याकडे पाहिलं. मग बॅट पंचांकडे सोपवली आणि प्रेक्षकांना ‘आवाज वाढवा’ अशी सूचना विराटनं केली. विराटच्या बॅटची चाचपणी करताना चौथ्या पंचांना घाम फुटला. पण, विराट ही चाचणी उत्तीर्ण झाला. मग बॅट हाती घेत ती सरळ रेषेत आधी नेली आणि ३६० अंशांत फिरवत क्रीझकडे कूच केली.
ओळखलंत का सर मला?
मोडून पडला मुंबई इंडियन्सचा संघ,
तरी मोडला नाही कणा
बॅटची चाचणी घेऊन,
तुम्ही फक्त लढ म्हणा!
कर्णधार हार्दिक पंड्या नेहमीच्याच आत्मविश्वासानं पंचांना सामोरा गेला. मुंबई इंडियन्सला प्रारंभी झगडावं लागलं. पण, एकंदर संघ विखुरलेला वाटत असला तरी कामगिरीनं अधूनमधून विजय साकारतायत. यंदा मुंबईचा संघ बाद फेरी गाठू शकेल, हा विश्वास वाटतोय. हार्दिकनं नेमकं हेच पंचांशी झालेल्या छोटेखानी बॅटचाचणीत उलगडलं.
नेहमीच फटकेबाजीचा विचार करू नये,
कधी बॅटलाही वाव द्यावा,
आसुसलेल्या चेंडूंना
सीमेपलीकडचा भाव द्यावा
ड्रेसिंगरूमकडून पंचांच्या चाचणीकडे प्रस्थान करणार्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सबुरीचा सल्ला दिला. एव्हाना ‘आयपीएल’मध्ये द्रविड आणि सॅमसन यांच्यातील मतभेदाच्या चर्चा ऐरणीवर आहेत. पण द्रविडनं स्पष्ट शब्दांत इन्कार केलाय.
सॅमसन गेले काही महिने ऐनकेन प्रकारे नवनव्या वादात सापडतोय. आता बॅटचं शुक्लकाष्ट मागे लागू नये, एवढीच द्रविड यांची काळजी असावी.
दोन सामने विजयात गेले,
दोन सामने पराभवात गेले
हिशोब करतोय,
आता किती कारकीर्द उरलीय
शेकडो वेळा चेंडू प्रेक्षागृहात धाडले
जयजयकार झाले, पुरस्कार मिळाले
बॅटचा आकार शोधण्यात जिंदगी
बर्बाद झाली…
कोलकाता नाइट रायडर्सचा भरवशाचा अष्टपैलू सुनील नारायणला बॅटचा आकार कसा वाढला, हे अद्यापही उमगलेलं नाही. ‘आयपीएल’च्या व्यासपीठावर इतके हंगाम गाजवले. परंतु बॅटचाचणीत आपण अपयशी कसे ठरलो? या कारणास्तव त्याची झोप उडालेली आहे. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी त्याचं सांत्वन करीत पुढच्या सामन्यात धडाकेबाज खेळी साकारण्यासाठी प्रेरणादायी बोल ऐकवले.
मोहरूनी मैदानांत सार्या बॅट माझी वेगळी,
तडकावुनी तोर्यात सारी
फटकेबाजी माझी मोकळी
कोण जाणे कोठुनी ही बॅट चाचणी आली पुढे;
हा कलंकित शिक्का न लागो,
चिंताग्रस्त सगळी
लखनऊ सुपर जायंट्सचा डावखुरा फलंदाज निकोलस पूरननं आतापर्यंतच्या ‘आयपीएल’मध्ये आपली छाप पाडली आहे. ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत तो अग्रेसरही राहिलाय. त्याचा स्ट्राइक रेट प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या उरात धडकी भरवतोय. पण, बॅट चाचणीचं दडपण त्यानंही बाळगलंय.
तात्पर्य : बॅटचाचणी प्रकरण दिवसेंदिवस चिघळू लागलंय. लवकरच यासंदर्भात ठोस निर्णय किंवा नियमावली येऊ शकेल. सध्या तरी बॅटचा आकारमान अयोग्य असल्यास कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. पण येत्या काही दिवसांत आणखी काही धोरणं ठरल्यास ते दिशादर्शक ठरेल. तूर्तास,
जरा चुकीचं, जरा बरोबर बोलू काही,
चला दोस्तहो, बॅटसंदर्भात बोलू काही…