किरण माने
‘आपल्याकडं ‘मीडिया हाईप’ नावाचा एक लै फसवा प्रकार आहे मित्रमैत्रिणींनो. एखाद्याचा खोटा गाजावाजा करायचा, त्याच्याविषयी खोट्या, रचित बातम्या व्हायरल करायच्या. बेडूक फुगवून बैल करावा तसं त्याला लायकीपेक्षा मोठ्ठा करून दाखवायचा… यातूनच हल्लीचे अनेक नेते अचानक हवेतून उगवावे तसे उगवले. कलाकारांच्या बाबतीतही तेच आहे. एखादं चॅनल सांगणार, ‘हा महाराष्ट्राचा सुपरस्टार’, ‘तो महाराष्ट्राचा फेवरेट’… खरं सांगायचं तर महाराष्ट्रातल्या गावखेड्यात त्यांचा फोटो दाखवला तर लोकांना नावही सांगता येत नाही. त्यांच्या सिनेमाची सातआठ तिकीटंही मुश्किलीनं खपतात. पण हाईप करून तुमच्या डोक्यावर त्यांची माणसं लादली जातात!
याच्या उलटंही चालतं. त्यांना सोयीच्या नसलेल्या व्यक्तींची प्रतिमा चुकीची दाखवायची. ते खूप भयानक आहे. वंदनीय राजमाता जिजाऊंचं चारित्र्यहनन होईल अशी अत्यंत किळसवाणी खोटी गोष्ट मुद्दाम पसरवायची. गांधींसारख्या महात्त्म्यावर सतत चिखलफेक करत रहायची. त्यांच्याही मातेविषयी अत्यंत घृणास्पद बोलायचं, त्याला प्रसिद्धी द्यायची. शहीद भगतसिंगांच्या फाशीपासून ते फाळणीपर्यंत प्रत्येक गोष्टींत उगाचंच ओढूनताणून आणायचं आणि त्यांना दोषी ठरवायचं. शाहू महाराजांपासून नेहरूंपर्यंत अनेकांविषयी अशा भाकड गोष्टी फिरवायच्या जेणेकरून त्यांची प्रतिमा बरोबर उलटी दिसेल. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल हिणकस टिप्पण्या करायच्या. त्यांचं खरं कार्य झाकोळायचा प्रयत्न करायचा.
उद्देश एकच… जी व्यक्ती अत्यंत उन्नत, उदात्त, महान आहे, ती त्यापेक्षा बरोबर उलट अवनत, हीन, लहान दिसावी… आणि जो माणूस भुक्कड, पोकळ, उथळ आहे तो उगाचंच प्रतिभावान, बुद्धिमान, लोकप्रिय आहे असा आभास व्हावा!
अशा दोन्ही पद्धतीची मीडिया हाईप करणारी एकाच कारस्थानी विचारधारेची पिलावळ आहे… ती आपल्या देशासाठी प्रचंड घातक आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विचारधारेत नाव घ्यावा असा एकही महान राजा नाही, संत नाही, नेता नाही, समाजभान असलेला कलाकार नाही. याची त्यांच्या मनात असलेली जळजळ आपल्याला पदोपदी जाणवते!
अशा जळजळीतूनच त्यांनी आपल्या तुकोबारायाची प्रतिमाही खूप खराब केली. वास्तवापेक्षा उलट आणि चुकीची दाखवली. आपल्या वाघासारख्या तुकोबारायाचा त्यांनी अक्षरश: भित्रा ससा करून दाखवला. त्यांच्या अशा मुद्दाम, जाणूनबुजून चुकीच्या निर्माण करण्यात आलेल्या अनेक प्रतिमांमधली एक म्हणजे, ‘तुकोबाराया हे व्यवहारशून्य संत होते.’ वर्चस्ववादाविरोधात, मनुवादाविरोधात, विषमतेविरोधात जबरदस्त, भव्यदिव्य बंड करणारे आणि त्यात यशस्वी झालेले तुकोबा हे निव्वळ चमत्कारांमुळे मोठे झाले… त्यांच्या लोकप्रियतेचा त्यांच्या प्रतिभेशी आणि व्यवहारचातुर्याशी काहीही संबंध नव्हता असं त्यांना भासवायचं होतं. त्यांचे अनेक उपदेश सर्वसामान्य बहुजनांना अर्थकारण आणि संसाराच्या उत्कर्षासाठी, सुखी जीवनासाठी उपयोगी पडत होते हे लपवून फक्त देवभोळेपणामुळे लोक त्यांच्या मागे होते असं दाखवून या बहुआयामी महामानवाचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व मनुवाद्यांना झाकोळून टाकायचं होतं!
सतत तुकोबांना व्यवहार जमला नाही. धंद्यात अपयशी झाले. विठ्ठलानं साक्षात्कार दिला म्हणून गहाणखाती बुडवून शेतकर्यांची कर्जे माफ केली आणि देशोधडीला लागले. बायकापोरं रस्त्यावर आली, अन्नाला महाग झाली तरी ते विठ्ठलविठ्ठल करत टाळ कुटत बसले… अशा कथा तुमच्या माथी मारून तुकोबांची आपल्या मनातली छबी अंतर्बाह्य बदलून टाकली गेली.
…आता तुकोबारायाचा हा अभंग वाचा आणि मला सांगा, व्यवहाराबद्दल, वर्तनाबद्दल इतका संतुलित, अनमोल सल्ला देणारा माणूस साधासुधा असेल का?
जोडोनिया धन उत्तम वेव्हारें ।
उदास विचारें वेच करी ।।
उत्तमचि गती तो एक पावेल ।
उत्तम भोगील जीव खाणी ।।
परउपकारी नेणे परनिंदा ।
परस्त्रिया सदा बहिणी माया ।।
भूतदया गाईपशूचे पालन ।
तान्हेल्या जीवन वनामाजी ।।
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट ।
वाढवी महत्व वडिलांचे ।।
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ ।
परमपद बळ वैराग्याचे ।।
…उत्तम व्यवहार करून धन जोडावं. पैसा जरूर कमवावा, पण गैरमार्गानं नाही. कुणाला फसवून, लुबाडून नाही. अशा नैतिक मार्गानं मिळालेला पैसा खर्च करताना मात्र ‘उदार विचारें’ करावा म्हणजेच काहीशा तटस्थपणानं अलिप्ततेनं करावा.
…असं विचारी पद्धतीनं वागणारा माणूसच उत्तम गती प्राप्त करील. त्याचं कल्याण होईल. सुखाचा उत्तम उपभोग घेऊ शकेल.
…परोपकारी वृत्ती ठेवावी. गरजवंताला मदत करावी. दुसर्याची निंदा, द्वेष, मत्सर करू नये. परस्त्रीला आई-बहिणीसारखं मानावं.
…अंगी भूतदया-मानवता बाणावी. फक्त माणूसच नव्हे, तर गोठ्यातल्या गाईगुरांचंही पालन नीट, प्रेमानं करावं. तहानलेला जीव दिसला, तर त्याला पाणी पाजावं.
…आयुष्यातल्या संकटांच्या आघातांना, निंदेला, टीकेला शांत वृत्तीनं झेलावं. खचू नये. तोल जाऊ देऊ नये. अशा वागण्यामुळे आपण वाडवडिलांचा लौकिक वाढवतो.
…शेवटी तुका म्हणे, असं नैतिक, चारित्र्यसंपन्न, समाधानी, निरामय आयुष्य हेच गृहस्थाश्रमाचं फळ आहे. संसारात राहून संयत जीवन जगणं, हेच खरं वैराग्याचं बळ आहे. त्यासाठी बैरागी होण्याची गरज नाही.
…आता मला सांगा, तुकोबा संसाराला विटलेला वैतागलेला असेल का हो? भोळा, अव्यवहारी असेल? एका अर्थतज्ञ, नीतिमान, आचारविचारांनी समृद्ध अशा माणसाची मुद्दाम दिवाळखोर अशी इमेज तयार करून थोपवली लोकांवर… आणि त्या लोकांचं हे कारस्थान यशस्वी का झालं, तर आपण खोलात जाऊन तपासून बघत नाही म्हणून. तुकोबाराया हा डोळस आणि व्यवहारचतुर माणूस होता. एका अभंगात तुकोबाराया सांगतात,
धनवंता घरीं ।
करी धनचि चाकरी ।।
होय बैसल्या व्यापार ।
न लगे सांडावेचि घर ।।
रानीं वनीं द्वीपीं।
असती ती होती सोपी ।।
तुका म्हणे मोल ।
देता काही नव्हे खोल ।।
…ज्यानं प्रयत्न करून धन मिळवलेलं असतं, त्याच्या घरी धनच चाकरी करू लागतं.
…व्यापाराचं उदाहरण घेतलं, तरी हे स्पष्ट होतं. व्यापार घरबसल्या होत असतो. ग्राहक व्यापार्याकडे येत असल्यामुळे व्यापार्याला घर सोडावं लागतच नाही.
…मनुष्य रानात असो, वनात असो अथवा बेटावर असो, त्याच्याकडं धन असलं की त्याची सगळी कामं सोपी होतात.
…शेवटी तुका म्हणे, किंमत मोजली की माणसाला सर्व काही मिळतं, त्याच्या दृष्टीनं काही अवघड रहात नाही.
ज्याला सुखी संसार करायचाय त्यानं धन मिळवायलाच हवं. पण आपला उद्योग प्रामाणिकपणे करून धन मिळवावं आणि त्याच्या आधारे आपलं जीवन सफल करावं, असंही तुकाराम महाराज सांगतात. कष्ट न करता, कुणाला गंडा घालून, कुणाला आयुष्यातून उठवून, कुणाचा वापर करून घेऊन, लुबाडून काही घेणं आणि त्या मार्गानं पैसा कमावणं तुकोबांना अजिबात मान्य नव्हतं. मालकाला फसवून झोपा काढून कामचुकार करून पगार घेण्याच्या वृत्तीलाही त्यांचा विरोध होता. म्हणूनच एका अभंगात ते म्हणतात,
चाकरीवाचून । खाणे अनुचित वेतन ।।
धणी काढोनिया निजा ।
करील ये कामाची पूजा ।।
उचितावेगळे । अभिलाषे तोंड काळे ।।
सांगे तरी तुका । पाहा लाज नाही लोकां ।।
…ज्या कामासाठी वेतन घ्यायचं, ते न करता बसून वेतन घेणं हे अनुचित होय.
…मालकाला जे काम करून घ्यायचं असतं, ते काम झाल्यानंतर तो मालक भला असेल तर काम करणार्याच्या कामाचं कौतुकच करेल.
…परंतु, जो या उचित पद्धतीपेक्षा वेगळं वागतो आणि काम न करता वेतनाची अभिलाषा करतो, त्याचं तोंड काळं होय.
…तुका एवढं जीव तोडून सांगतो तरी हे निर्लज्ज लोक ऐकत नाहीत. तुकोबाराया तळमळीनं हिताचा उपदेश करत असूनही काही लोकांवर त्यांचा परिणाम होत नव्हताच. त्यांचा जो मिळायला हवा तो प्रतिसाद मिळत नव्हताच, त्यांच्यामधे परिवर्तन होत नव्हतंच. कितीही सांगितलं तरी त्याकडे लक्ष न देणार्या या लोकांवर तुकोबा चिडायचे आणि त्यांना निलाजरे म्हणायचे.
…हाच निलाजरेपणा आजही आपण करत आहोत. तुकाराम महाराज देवभोळे नव्हते. त्यांना नीट समजून घेतलं तर आजही आपल्या जगण्याला दिशा मिळू शकते. आपला उत्कर्ष होऊ शकतो. सुखाचा संसार होऊ शकतो. आपल्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. जसे आनंदाचे प्रसंग येतात तसे खचवणारे, हतबल करणारेही क्षण येतात. अशा गोष्टींना संतुलित वृत्तीनं सामोरं जावं, हा संदेश तुकारामांनी एका अतिशय सुरेख अभंगात दिला आहे. ते म्हणतात,
कैं वाहावे जीवन । कैं पलंगीं शयन ।।
जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ।।
कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ।।
कैं बसावे वहनीं । कैं पायी अन्हवाणी ।।
कैं उत्तम प्रावर्ण । कैं वसने ती जीर्ण ।।
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणे विपत्ती ।।
कैं सज्जनाशी संग । कैं दुज नाशी योग ।।
तुका म्हणे जाण । सुख दु:ख ते समान ।।
…कधी नोकर बनून पाणी वाहून नेण्याचं काम करावं, तर कधी मालक बनून पलंगावर झोपण्याचं सुख भोगावं.
…माणसावर जशी वेळ येईल तसं त्यानं त्या वेळेला सामोरं जावं.
…कधी विविध प्रकारच्या मिष्टान्नांचं भोजन करायला मिळतं, तर कधी कोरड्या भाकरी खाण्याचा प्रसंगही अनुभवावा लागतो.
…कधी वाहनात बसून आरामशीर प्रवास करण्याची संधी मिळते, तर कधी अनवाणी पायी चालण्याची वेळ येते.
…कधी उंची वस्त्रं परिधान करायला मिळतात, तर कधी जुने, फाटके कपडे वापरावे लागतात.
…कधी सर्व प्रकारची संपत्ती लाभते, तर कधी आपत्तीचे, संकटाचे भोग भोगावे लागतात.
…कधी सज्जनांची संगत लाभते, तर कधी दुर्जनांचा सामना करावा लागतो.
…शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, सुख आणि दु:ख समान मानून जग.
…आयुष्य हे असं आहे. या प्रवासात सुखंही वाट्याला येतात आणि दुःखंही भोगावी लागतात. विवेकी माणूस सुखांच्या काळात हुरळून जात नाही, माजोरडेपणा करत नाही आणि दुःखांच्या काळात हतबल होऊन खचून जात नाही. कुठल्याही प्रसंगाला जो निधड्या छातीनं सामोरा जातो, मनाचं संतुलन ढळू देत नाही, त्याचंच आयुष्य खर्या अथा नं सुखी, समाधानी आणि कृतार्थ होतं!
…आता मला सांगा भावाबहिणींनो, तुकोबा संसाराला विटलेला, वैतागलेला असेल का? भोळा, अव्यवहारी असेल? तुकोबाराया बहुजनांच्या हजारो पिढ्यांच्या उद्धारासाठी खूप मोठ्ठा खजिना ठेवून गेलाय. व्यवहारात, संसारात, जगण्यात, वागण्यात उपयोगी पडेल असं खूप मोलाचं काहीतरी सोपवून गेलाय. ते वाचून, अंगीकारून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवायची जबाबदारी आपली आहे. वाचा आणि विचार करा.