बाळासाहेबांच्या धारदार कुंचल्यातून उतरलेले हे चित्र आहे १९६३ सालातले. महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळव, धरणांचे पाणी पळव, सीमाभागाचे लचके तोड, अशा माध्यमांमधून महाराष्ट्राला खच्ची करण्याचे उद्योग तेव्हाही सुरू होते. महाराष्ट्राचा वृक्ष मोठा होऊ नये, यासाठी दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावर कुर्हाडी पडत होत्या. फांद्या छाटून झाल्या आणि आता अगदी मुळावर आलात, असा त्रागा व्यक्त करणारा मराठी माणूस या मुखपृष्ठचित्रात दिसतो. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या, मराठी माणसांचा सहभाग असलेल्या मातृसंघटनेतून जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीने मात्र कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण सार्थ करायचं ठरवलं आहे. उद्योगधंदे, पाणी, भूभाग पळवण्याच्या फंदात न पडता मराठी माणसाचं मराठीपणच हिरावून घ्यायचं, त्याला मागासबुद्धी गोबरपट्ट्याच्या दावणीला बांधायचं, असा चंगच केंद्राने बांधलेला आहे आणि बेईमानी करून सत्तेत बसलेले त्यांचे कळसूत्री बाहुले गुजरातचे गुलाम बनून खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुळावर म्हणजे मराठीपणावरच हिंदीसक्तीचा घाव घालायला निघाले आहेत.