भूतकाळातील दुःखद घटनांचे अवजड ओझे घेऊन भविष्याची चढाई होत नसते. पण अशा घटनांतून सवंग भावनिक राजकारण करणे, ध्रुवीकरण करणे आणि द्वेषाच्या धगीवर आपल्या राजकीय, आर्थिक पोळ्या भाजून घेणे सोपे असते. काही विचारधारांचा तोच एकमात्र जीवनाधार असतो. द्वेष संपला की आपण संपलो, हे त्यांना माहिती असते. म्हणूनच अशा जखमा भळभळत ठेवल्या जातात. त्यांच्यावरच्या खपल्या काढल्या जातात. त्या विसरूच दिल्या जात नाहीत.
– – –
काश्मीर प्रश्न हा या देशासमोरील एक जटील प्रश्न आहे आणि तो दोन दिवसांत सोडवू आणि आठ दिवसांत पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू अशा वल्गना (आपण सत्तेत नसताना आणि सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नसताना) प्रचाराच्या भाषणात करणे सोपे असते. अशा वल्गना करण्याची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मोठी खोड आहे. दाऊद इब्राहीमला फरपटत आणू, एन्रॉन अरबी समुद्रात बुडवू, वगैरे वल्गना अशाच प्रकारे केल्या गेल्या होत्या. त्यांचं जे झालं तेच काश्मीर प्रश्नाचं होणार, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही, हे आतापर्यंत भाजपाच्या लक्षात आले असेलच. कलम-३७० कोणतीही चर्चा न करता एका दिवसात रद्द करून आणि जम्मू-काश्मीरला विभाजित केंद्रशासित प्रदेश बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा प्रश्न कायमचा सोडवला आहे, असे म्हणणे आत्मवंचनेचे ठरेल (भाजपच्या नेत्यांना आणि समर्थकांना अशा आत्मवंचना अभिमानाने करण्याची सवय आहेच). मोदी सत्तेत येण्याआधी काश्मीरमध्ये घातपात होत होतेच आणि त्यांच्या कार्यकाळातही ते बंद पडले नाहीत. मोदीकाळात म्हणजे २०१४पासून आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये १०८६ प्राणघातक अतिरेकी हल्ले झाले, ज्यात ३१९ नागरिक, सुरक्षा दलाचे ५३९ जवान आणि १५०९ अतिरेकी मारले गेले आहेत, अशी माहिती दक्षिण पूर्व अशियातील सर्व अतिरेकी हल्ल्यांची नोंद ठेवणार्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट या संस्थेने दिली आहे. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यावर देशभरात एकूण ३३८१ अतिरेकी, नक्षलवादी व कट्टरपंथीयांचे हल्ले झाले, ज्यात १५९४ नागरिक, सुरक्षा दलाचे १२०६ जवान, ३४७८ अतिरेकी/नक्षलवादी आणि ८ अन्य लोक मारले गेले आहेत, अशी माहितीही या संस्थेने दिली आहे. (इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटची स्थापना पंजाबमधील अतिरेक्यांचा समूळ नाश करणारे पोलीस अधिकारी केपीएस गिल यांनी केलेली आहे व तिचे संकेतस्थळ www.satp.org असे आहे). अर्थात अतिरेकी अथवा नक्षलवादी हल्ले रोखण्यात पंतप्रधान मोदी पूर्णपणे अपयशी ठरले असे म्हणणे जसे चुकीचे ठरेल, तसे भाजपा सत्तेत आल्यानंतर पुलवामाव्यतिरिक्त एक देखील हल्ला झाला नाही, असे म्हणणेही सत्याला धरून नाही. जागतिक स्तरावर दहशतवाद घटत असताना भारतात मात्र ते हल्ले सुरूच आहेत. ३७० कलम रद्द झाल्यावर त्या कामगिरीबद्दल सत्कार घेत फिरणारे राज्यकर्ते आताही काश्मीर होरपळतेच आहे, ते सांगणार तरी कोणत्या तोंडाने? काश्मीरमध्ये आज काय सुरू आहे, तिथल्या जनतेची आज नक्की काय स्थिती आहे, तिथे निवडणुका घेऊन लोकशाही कधी प्रस्थापित होणार, तिथे सर्वत्र इंटरनेट सेवा कधी प्रस्थापित होणार आणि मुख्य म्हणजे ज्या काश्मिरी पंडितांचं ३० वर्षांपूर्वीचं दु:ख आज अचानक खपल्या काढून भळभळवून त्यांच्याविषयी भावनिक उमाळेबाजी सुरू आहे, त्यांना त्यांच्या मायभूमीत कायम राहण्यायोग्य परिस्थिती (नुसती घरे नव्हेत) गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारने निर्माण केली आहे का, ती कधी आणि कशी तयार होणार आहे, याचे विवेचन करणार्या २०२२च्या काश्मीर फाइल्स उचकटण्याची हिंमत मोदी यांचे स्वघोषित ५६ इंची सरकार दाखवणार आहे का? की तेव्हाच्या लाजिरवाण्या हत्याकांडाच्या वेळी मूग गिळून बसलेल्या आपल्याच पक्षाविषयी संपूर्णपणे मौन बाळगणारा, हत्याकांडाची एकच बाजू शुद्ध विद्वेषी प्रचारकी पद्धतीने विकृत, भडक आणि अवास्तव पद्धतीने चित्रित करणारा चित्रपट पाहायला जा, असं सांगितलं की जबाबदारी संपते, असं पंतप्रधान मोदी यांना वाटत असावं? काश्मीरमधील पंडितांच्या पलायनाची हकीकत भाजपच्या सोयीने मांडणार्या या चित्रपटाचा मोठा राजकीय फायदा होणार असल्यामुळेच भाजपशासित राज्यांमध्ये तो टॅक्स फ्री करणे, फुकट तिकीटे वाटणे, सरकारी कर्मचार्यांना सिनेमा पाहण्यासाठी सुट्या देणे, असे उद्योग सुरू आहेत. हे केल्यावर लोकांना गुजरात फाइल्स, पुलवामा फाइल्स, लडाख फाइल्स यांचा तर विसर पडतोच पण द्वेषाचा अग्नी महागाई फाइल्स, बेरोजगारी फाइल्स, देशविक्री फाइल्स यांनाही भस्मसात करून टाकतो, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.
भारताच्या फाळणीपासून सर्वधर्मीय निष्पाप लोकांच्या कत्तलींचा भयावह रक्तरंजित इतिहास या देशाला लाभलेला आहे. जातीय, भाषिक, धार्मिक दंग्यांमध्ये, दहशतवादामध्ये कोणत्याही एका जातीजमातीचे लोक होरपळलेले नाहीत. खुद्द काश्मीरमध्येही दहशतवादी नंगानाचात पंडितांपेक्षा अधिक संख्येने शीख आणि अन्य हिंदूधर्मीय मारले गेले, मुसलमानही मारले गेले होते. हे दडपलेलं सत्य बाहेर काढणारा सिनेमा कुणी बनवला, तर मोदी आणि कंपनी त्या सिनेमाचीही इतकीच भलामण करतील का? अजिबात नाही. ते त्यांच्या राजकीय सोयीचे नाही.
पंतप्रधानांपासून हाकेच्या अंतरावर शेतकरी आंदोलन सुरू होते, पण आपण घेतलेल्या तुघलकी निर्णयाला विरोध होतोच कसा, या हुकूमशाही अहंमन्यतेने पछाडलेल्या मोदींना त्यांना भेटायला वेळ नव्हता. आंदोलनाच्या काळात मरण पावलेल्या सातशे शेतकरी आंदोलकांसाठी दोन शब्द बोलणे सोडाच, दोन अश्रू ढाळणेही त्यांना जमलं नव्हतं. ते आता ३० वर्षांपूर्वीच्या घटनांनी एकदम व्यथित वगैरे झाले आहेत. त्यांच्या पिलावळीपैकी अनेकांचे मेंदू बंद पडलेले आहेत आणि गहाण पडलेले आहेत, त्यामुळे त्यांना त्या वेळचा इतिहास कोणी सांगितलाच नव्हता हो आम्हाला, असा कांगावा करता येतो; मोदी काही त्यांच्या भक्तांइतके अनभिज्ञ असणार नाहीत. त्यांनी एकदम कानावर हात ठेवून हा इतिहास दडपण्यात आला होता, असं म्हणणं खोटंही आहे आणि विनोदीही. भविष्यात कधी ना कधी इतक्याच एकतर्फी पद्धतीने किसान आंदोलन फाइल्स, गुजरात फाइल्स, लखीमपूर खेरी फाइल्स, कैराना फाइल्स, उन्नाव फाइल्स असे सिनेमेही निघू शकतात. त्या फाइल्स दाबून ठेवण्यासाठी ही जुनी फाइल काढून नाचवणं सुरू आहे, असं चित्र दिसतं.
काश्मिरी पंडितांच्या हत्या व विस्थापन मानवतेला काळिमा फासणार्याच होत्या, त्याचप्रमाणे देशात इतरही अनेक प्रकारच्या कत्तली घडलेल्या आहेत, त्यांच्यात सर्वधर्मीय मारले गेले आहेत, आयुष्यातून उठवले गेले आहेत. ज्याच्या एका डोळ्यातून काश्मिरी पंडितांसाठी पाणी येत असताना दुसर्या डोळ्यातून गुजरातच्या किंवा कुठल्याही दंगलपीडितासाठी पाणी येत असेल, तर तोच सच्चा भारतीय आहे.
मुळात कोणत्याही देशाने भूतकाळातील दुःखद घटना कवटाळून न बसता, त्यांच्यातून धडा शिकून त्या मागे सोडून भविष्याकडे वाटचाल करणे हे दीर्घकालीन शांतता आणि समृद्धीसाठी गरजेचे असते (याला समाजशास्त्राचे अभ्यासक ‘कलेक्टिव्ह फर्गेटफुलनेस’ म्हणून ओळखतात). भूतकाळातील दुःखद घटनांचे अवजड ओझे घेऊन भविष्याची चढाई होत नसते. पण अशा घटनांतून सवंग भावनिक राजकारण करणे, ध्रुवीकरण करणे आणि द्वेषाच्या धगीवर आपल्या राजकीय, आर्थिक पोळ्या भाजून घेणे सोपे असते. काही विचारधारांचा तोच एकमात्र जीवनाधार असतो. द्वेष संपला की आपण संपलो, हे त्यांना माहिती असते. म्हणूनच अशा जखमा भळभळत ठेवल्या जातात. त्यांच्यावरच्या खपल्या काढल्या जातात. त्या विसरूच दिल्या जात नाहीत. भूतकाळातील चांगल्या घटना व चांगली प्रतीके सोबत घेऊनच (कलेक्टिव्ह रिमेम्बरन्स) भविष्यकाळ उज्वल करता येतो. १९६४ला निधन पावलेल्या नेहरूंच्या माथ्यावर २४ वर्षांनी (आपल्या विचारधारेच्या मूक समर्थनानेच) घडलेल्या पंडितांच्या विस्थापनाचा दोष मारून आपला रक्तरंजित पदर झटकून मोकळे होण्याएवजी नेहरूंच्या धडाडीमुळे मुळात काश्मीर भारतात सामील झाले, हे मोदी आणि कंपनीने जास्त ठळकपणे लक्षात ठेवायला हवे. २०१४नंतर काश्मीर फाइल किती पुढे सरकली आणि २०२२ला काश्मीर फाइलची सद्यस्थिती काय आहे, ते पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
काश्मीरचा प्रश्न हा सर्वप्रथम भौगोलिक वर्चस्ववादाचा आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे. सध्या भारताकडे काश्मीरचा सर्वात मोठा भूभाग असल्याने आपले तिथे वर्चस्व आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन मिळवण्याच्या कोणत्याही प्रयत्नात पाकिस्तान आणि चीनसोबत लष्करी संघर्ष अटळ आहे. या भागावर भारताचे वर्चस्व प्रस्थापित होणे पाकिस्तानला परवडणार नाही आणि चिन्यांना ते मान्य होणार नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन यांच्याशी सीमा भिडलेले काश्मीर खोरे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच भारतात सामील झाले नसते तर पाकिस्तानची सीमा आजच्या हिमाचल प्रदेशाला चिकटली असती आणि पंजाब अजून मोठ्या प्रमाणावर सगळ्याच बाजूंनी पाकिस्तानी सीमेने वेढला गेला असता. पाकिस्तानशी जोडलेली सीमा आणि मुसलमानांची बहुसंख्या यांच्या निकषावर काश्मीर पाकिस्तानात सामील होण्यास काहीच अडचण नाही अशी मोहम्मद अली जीनांची अटकळ होती. त्यामुळेच पाकिस्तानला सुरुवातीला काश्मीरबाबत फाजील आत्मविश्वास बाळगून होता. पाकिस्तानवर कुरघोडी करत पंडित नेहरूंनी काश्मीर भारतात खेचून आणले आणि पाकिस्तानच्या पायाखालची वाळूच सरकली. अर्थात नेहरूंना त्यासाठी सरदार पटेलांपासून सर्वच नेत्यांचे, तुटपुंज्या सामग्रीने लढलेल्या सैन्याचे, स्थानिक जनतेचे देखील सहकार्य लाभले होते. गांधीजींनीही त्या भागात जनमत जागृत करण्यासाठी दौरे काढले होते. तत्कालीन राजकीय नेतृत्वाला भारताच्या बाजूला वळवण्यासाठी नेहरूंना तडजोडी कराव्या लागल्या. त्या आज काहीजणांना अवास्तव वाटत असल्या तरी त्याने नेहरूंच्या कामगिरीचे मोल कमी होत नाही.
जम्मू आणि काश्मीर राज्यावर आणि तिथल्या स्थानिक लोकांवर सतत ७५ वर्षे अस्थिरता आणि अशांततेचा सामना करायची वेळ आली आहे. एका बाजूला निसर्गाने मुक्त हस्ते केलेली स्वर्गीय उधळण आणि त्यामुळेच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे जम्मू-काश्मीर, अक्रोड, केशर आणि सफरचंदं पिकवणारी सुपीक जमीन, सर्वोत्तम गालिचे आणि पश्मिना शाली बनवणार्या नक्षीकाम आणि कलाकुसरीचा वारसा, प्रत्येक टप्प्यावर वीज निर्माण करता येईल अशा बारमाही प्रवाही नद्या असूनही जम्मू-काश्मीर अतिमागास प्रदेश राहिला, त्याला सीमावर्ती असण्याचा शाप कारणीभूत आहे. सतत दारूगोळ्याची आग ओकणार्या या सीमा आहेत. पुण्यामुंबईत जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचा वर्षाव बघणार्यांना सततचे शेलिंग म्हणजे दारूगोळ्याचा भडिमार काय असतो याची कल्पना येणार नाही. २०२० या एकाच वर्षात या राज्यात शेलिंगच्या ५१००हून अधिक घटना घडल्या आहेत. अशा ठिकाणी कसे जीव मुठीत धरून जगावे लागत असेल, गावात शेलिंग सुरू झाल्यावर आपले आप्तेष्ट सुरक्षित आहेत का, याची माहिती मिळण्यासाठी दूरसंचार सुविधाही उपलब्ध नसण्याने काय अवस्था होत असेल, याची कल्पना आपण करू शकत नाही.
काश्मीरच्या अतिशय गुंतागुंतीच्या असलेल्या प्रश्नाच्या सोडवणुकीत अतिसाहसवाद अंगाशी येईल, याची कल्पना सर्व सत्ताधुरिणांना असतेच. त्यामुळे तोंडी बडबड काहीही केली तरी तिथे सावधगिरीने पावले उचलली जातात. एक चुकीचं पाऊल संपूर्ण देशाला युद्धाच्या खाईत लोटणारे ठरू शकते. त्यामुळे त्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर धार्मिक सलोखा टिकवून तोडगा काढण्याऐवजी तिथल्या आगीत तेल ओतून ज्यांच्या नावाने गळे काढतो आहोत, त्या पंडितांचे पुनर्वसनच धोक्यात आणण्याचे राजकीय खेळ का खेळले जात असतील? काश्मीर फाइल्स सिनेमाही पाहावा, त्याने व्यथितही व्हावे, पण त्याचबरोबर वर्तमानातली, २०२२ची काश्मीर फाइल पाहायला विसरू नका… पंडितांनी आणि संपूर्ण काश्मीर खोर्याने नंतर जे काही भोगले आहे, तेही पाहायला हवे ना!
स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील एक कथा फार उद्बोधक आहे.
नवरात्रीतील अष्टमीला कुमारीपूजेचे एक विशेष महत्व असते. रामकृष्ण परमहंसांनी दक्षिणेश्वर काली मंदिरात या पूजेला फार मोठे स्वरूप दिले होते. त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंदानी ही परंपरा त्यानंतर पाळली होती. स्वामी विवेकानंद हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि पर्यायाने देशनिर्माणासाठी काश्मीर ते कन्याकुमारी अशा यात्रेवर निघाले होते. नवरात्रीच्या दुर्गा अष्टमीला नेमका त्यांचा मुक्काम श्रीनगर येथे पडला होता. त्यांना नेमाप्रमाणे कुमारी पूजा करायची होती. तिथल्या मुस्लिम नावाड्याच्या अठराविश्वे दारिद्रय असलेल्या झोपडीतील एका चिमुरडीमध्ये विवेकानंदांना साक्षात दूर्गा दिसली व त्यानी त्या नावाड्याला त्या कन्येच्या पूजेसाठीची परवानगी मागितली. तिचे त्यांनी यथोचित पूजन केले आणि विधीवत् तिच्या पायावर डोके ठेवले. त्या नावाड्याच्या डोळ्यातून अश्रू आले… स्वामी विवेकानंदांचे विश्वबंधुत्वाचे हे स्वरूप आठवायचे की अविवेकी विवेकांचे फिल्मी नक्राश्रू खरे मानून सलोख्याला चूड लावायची, यातून निवड आपल्याला करायची आहे.