प्रशांत दळवी यांच्या बहुतेक सर्व नाटकांना सामाजिक, कौटुंबिक स्पर्श असतो. ‘गेट वेल सून’, ‘चारचौघी’, ‘चाहूल’, ‘ध्यानीमनी’, ‘सेलिब्रेशन’ या नाटकांतून त्यांनी वेगळी वाट निवडली. आता ‘संज्याछाया’मधूनही वयोवृद्धांचा गंभीर भावनिक प्रश्न मांडून तो वार्यावर न सोडता त्याला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. तो लक्षवेधी आहे. कथानकाची मांडणी ही यातील जमेची बाजू. अंजन आणि रंजन यांची सुरेख पेरणी केलीय.
– – –
नाटककार प्रशांत दळवी यांच्या ‘संज्याछाया’ नाटकावर भाष्य करण्यापूर्वी आधी जयवंत दळवी यांच्या ‘संध्याछाया’ या गाजलेल्या शोकांतिकेची दखल घ्यावी लागेल. कारण कथानकाचे कुळ अन् मूळ हे त्यातच आहे. किंबहुना त्या नाटकाने उभ्या केलेल्या प्रश्नांवर नवं, सकारात्मक उत्तर शोधण्याचा आणि ते मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून केला गेलेला आहे.
जयवंत दळवी यांच्या नाट्यप्रवासातले ‘संध्याछाया’ हे दुसरे व्यावसायिक नाटक. १९७३च्या सुमारास ते रंगभूमीवर आलं. दळवींच्याच ‘वाट ती सरेना’ या मौज दिवाळी अंकात १९६६साली प्रसिद्ध झालेल्या कथेवरून त्यांनीच नाट्य उभे केले होते. एक हृदयस्पर्शी शोकात्मिका त्यात होती. आपल्या मुलांबद्दल काही स्वप्नं उराशी धरून जगणारे ‘नाना नानी’ हे वृद्ध दांपत्य त्यात आहे. वयोमानानुसार त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढते आहे. मुलांचा सहवास त्यांना हवाहवासा वाटतो. पण दोन्ही मुले नोकरीच्या निमित्ताने दूरवर आहेत. एक परदेशी तर दुसरा युद्धभूमीवर. एकाकीपण, अपमान सहन न झाल्याने हे वृद्ध दांपत्य अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतं, असं सुन्न करणारं कथानक दळवींसारख्या कल्पक नाटककाराने नेमकेपणाने गुंफले होते.
१९७३ ते २०२२ या पन्नास वर्षाच्या मध्यंतरानंतर नव्या पिढीचे नाटककार प्रशांत दळवी यांनी पुन्हा एकदा हाच विषय मांडलाय (तेही ‘दळवी’च हा विलक्षण योगायोग). त्यांनी मूळ कथानकाला वेगळी कलाटणी देऊन, बदलत्या काळात नव्या संकल्पना मांडून वयोवृद्धांच्या एकाकी जीवनात नंदनवन कसे बहरेल, याची प्रफुल्लित वाट दाखवून दिलीय.
संज्या आणि छाया हे वयोवृद्ध दांपत्य. पती मंत्रालयात नोकरीवर होते पण आता सेवानिवृत्त, तर पत्नीही महिला बचत गट चालविणारी. जेवणाचे डबे तयार करून पोहचविण्याचा तिचा व्यवसाय. या दोघांनी त्यांच्या तरुणपणी दळवींचं ‘संध्याछाया’ हे नाटक बघितलेलं. त्याचवेळी त्यांनी असं निराश आणि आत्महत्येपर्यंत नेणारे वृद्धत्व टाळण्याचा निर्णय घेतलेला. तशी दोघांची पक्की मानसिक तयारी झालेली. मुलांकडून सहाय्याची जराही अपेक्षा न ठेवता त्यांनी ‘हॅपीनेस सेंटर’ सुरू केलंय. ज्यातून त्यांना एकीकडे समाजसेवा आणि दुसरीकडे समाधानही मिळतंय. मुलाचे लग्न, सुनांची बाळंतपणे यात गुरफटून न राहता ते नवं काहीतरी करू पाहतात. एक थाप मारून दोघे एक डावही खेळतात. तो खूप काही सांगून जाणारा.
नाटकात कुठेही मुलांना गुन्हेगाराच्या पिंजर्यात मात्र उभं केलेलं नाही उलट त्यांनी त्यांच्या भविष्यासाठी, स्थैर्यासाठी झटलं पाहिजे, असाही एक विचार पुढे येतो, हे संतुलन महत्त्वाचे. भावनिक निराशेपोटी आत्महत्या न करता आजच्या युगात नव्या संकल्पना हाती घेऊन समर्थपणे जगण्याचा मंत्र त्यातून दिला आहे. तो दिशादर्शक ठरतो.
प्रशांत दळवी यांच्या बहुतेक सर्व नाटकांना सामाजिक, कौटुंबिक स्पर्श असतो. ‘गेट वेल सून’, ‘चारचौघी’, ‘चाहूल’, ‘ध्यानीमनी’, ‘सेलिब्रेशन’ या नाटकांतून त्यांनी वेगळी वाट निवडली. आता ‘संज्याछाया’मधूनही वयोवृद्धांचा गंभीर भावनिक प्रश्न मांडून तो वार्यावर न सोडता त्याला सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. तो लक्षवेधी आहे. कथानकाची मांडणी ही यातील जमेची बाजू. अंजन आणि रंजन यांची सुरेख पेरणी केलीय. ‘आसू आणि हसू’ याची भट्टीही जमवण्यात त्यांनी नाटककाराचे कसब सिद्ध केले आहे. संवादातली सहजता आणि साधेपणा यातून नाटक एका उंचीवर पोहचते.
एकांकिका स्पर्धेपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत एकत्र प्रवास केलेल्या प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे ट्युनिंग मस्त जुळले आहे. परिणामी, नाट्याची यातही बांधणी मजबुतीने होते. दोघेही त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या पहिल्या दहाएक प्रयोगांना जातीने हजेरी लावून आपला आविष्कार तपासतात. त्यामुळे कुठेही त्रुटी राहात नाहीत. अपेक्षित नेमकेपणा आणि रसिकांचा प्रतिसाद कळतो. असा प्रकार दुर्मिळच!
चंद्रकांत कुलकर्णी यांनी दोन्ही अंक चढत्या क्रमाने मांडले आहेत. यातले अनेक संवाद हे उपदेशाचे डोस न वाटता तो मैत्रीचा सल्ला बनतो. नाट्य कुठेही पकड सोडत नाही किंवा रेंगाळतही नाही. गंभीर क्षणांना पटकन विनोदाची झालर ज्या खुबीने दिलीय. ती लाजवाबच!
रंगभूमीवरले दोघे दिग्गज रंगकर्मी ‘टायटल रोल’मध्ये सफाईदारपणे वावरतात. निर्मिती सावंत यांची छाया आणि वैभव मांगलेंची संज्या ही जोडगोळी फिट्ट शोभून दिसणारी. एक आदर्श जोडपे जे वृद्धापकाळाचा बागुलबुवा न करता ज्या प्रकारे वावरते ते विलक्षणच. दोघांची देहबोली अप्रतिमच. भावभावनांची घुसमटही दोघांनी संयमाने साकारली आहे. मिश्कील विनोद पेरून आसवांना रोखण्यात ते यशस्वी झाले आहेत. अन्य अनेक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखांची उत्तम साथसोबतही नाट्यात आहे. त्यामुळे रंगत वाढून गती मिळते. सुनील अभ्यंकर (न्यायमूर्ती कानविंदे), योगिनी चौक (सौ. कानविंदे) या दांपत्याच्या एकूणच वैचारिक बदलामुळे ते लक्षवेधी ठरतात. अभय जोशी (डॉ. भागवत), आशीर्वाद मराठे (रघु), मोहन साटम (सदावर्ते मास्तर), संदीप जाधव (इन्स्पेक्टर गायकवाड), राजस मुळे (किशोर) सार्यांच्याच भूमिका नाट्याला पूरक ठरल्या आहेत.
मराठी नाटकात दिवाणखाना हा पाचवीला पुजलेलाच! असं कायम म्हटलं जातं खरं, इथेही दिवाणखाना आहेच, पण तो क्षणार्धात कार्यालयात बदलणारा. हे यातील वेगळेपण. प्रसन्न वातावरण घेऊन जाणारी रंगसंगतीही नाट्याच्या शैलीला शोभणारी. ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी विचारपूर्वक सारी मांडणी केलीय. पुरुषोत्तम बेर्डे यांनी पार्श्वसंगीतात भडकपणा टाळलाय. नाटकाचा पोत ओळखून प्रसंगानुसार ताल धरलाय. वेशभूषा, रंगभूषा या दालनाकडेही गंभीरपणे बघितलं गेलंय. वेशभूषा बदलातील वेग काहीदा थक्क करून सोडतो. प्रतिभा जोशी आणि भाग्यश्री जाधव या दोघींनी वेशभूषा व्यक्तिरेखांना साजेशा दिल्यात. रवी-रसिक यांची प्रकाशयोजना आणि अशोक पत्की यांचे गीत-संगीत यात आहे. ‘व्हेन वुई आर देअर’ या गाण्याने नाट्याचा समारोप होतो. ते गाणं गुणगुणतच रसिक सकारात्मक ऊर्जा घेऊन नाट्यगृहाबाहेर पडतो. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली दिसत नाही. पडद्यामागे जाणकार अनुभवी रंगकर्मींची तयारीची टीम असल्याने नाटक एका कळसाला पोहचते.
म्हातार्यांकडे कुणी बघायचे, हा प्रश्न आज विभक्त कुटुंबपद्धतीत सर्रास विचारला जातोय. मुलं नोकरी-धंद्याच्या निमित्ताने सातासमुद्रापार गेलीत. त्यांना पैसा मिळतोय. त्यांची जीवनशैली बदलली आहे. पण आईवडिलांना मात्र उतारवयात घरात भयाण जगणं नशिबी आलंय, अशा वेळी एका कैफात जगण्याचा निर्धार या नाट्याने दिलाय, जो लाख मोलाचा ठरतो. जयवंत दळवी यांची मूळ ‘संध्याछाया’ ही शोकांतिका आज नव्या समीकरणात सुखात्मिकेत रूपांतरित करण्याचा जो कल्पक तसेच अभ्यासपूर्ण ‘प्रयोग’ प्रशांत दळवी यांनी केलाय, त्याची नोंद मराठी नाट्यसंहितेच्या इतिहासात घेतली जाईल.
‘माझ्या आयुष्यातली दुःखे ही ओठांना माहीत नसल्याने ते सतत हसतच राहतात’, असे चार्ली चॅप्लीन म्हणाला होता. त्याची आठवण यातील आशयातून येत राहाते. ‘संध्यानंद’ देणारे हे ‘संज्याछाया’ नाट्य म्हणजे वयोवृद्ध एकाकी दांपत्याला वैचारिक आधार देणारे, ‘सुखी माणसाचा सदराच’ प्रदान करणारे विलक्षण नाट्य आहे. निराशेकडून आशेकडे अलगद घेऊन जाणारे. कोरोनाच्या संकटानंतर रंगभूमीवर आलेल्या या नाटकातला सकारात्मक विचारही दीर्घकाळ रसिकांच्या स्मरणात राहील. त्यासोबतच जगण्याची निश्चित दिशा दाखवून बळही देईल, यात शंकाच नाही!
‘संज्याछाया’
लेखन – प्रशांत दळवी
दिग्दर्शन – चंद्रकांत कुलकर्णी
नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
संगीत – पुरुषोत्तम बेर्डे
प्रकाश – रवि-रसिक
गीतसंगीत – अशोक पत्की
निर्माते – दिलीप जाधव / श्रीपाद पद्माकर
निर्मिती – जिगीषा / अष्टविनायक