ते कोणत्या वेळी काय करतील त्याचा भरवसा नव्हता. अचानक चार पाच भिकारी त्यांच्याकडे पैसे मागायला लागले. ए रफीक, पैसा पैसा म्हणत त्यांनी रफीकचा झगा ओढायला सुरुवात केली. नवलकरांनी झग्याच्या खिशात हात घातला, पण पैसे पॅन्टच्या खिशात होते. त्यांनी झगा वर केला आणि पॅन्टमधून पैसे काढले. त्यावेळी त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. कारण वेषांतर करूनसुद्धा इथे मोठी गफलत झाली होती. अरब झग्याच्या खिशात पैसे ठेवतो आणि झग्याच्या आत कधी पॅन्ट घालत नाही.
– – –
मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे नेते आणि परिवहन व सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकरांचा फोन आला. भडेकर कॅमेरा घेऊन लगेच निघा. कामाठीपुर्यातील वेश्यांची देवी विसर्जनाला निघाली आहे. त्यांची मिरवणूक खेतवाडीपर्यंत आली आहे. त्याचा फोटो काढा. उद्या त्यावर मी लिहिणार आहे. अनेकदा अपरात्री येणारे फोन महत्वाचे असतात. त्यामुळे गाढ झोपत असतानाही कुणाचे फोन आले तर ताडकन उठून डोळे चोळत निघण्याची मला सवयच झाली होती. मी स्कूटर घेऊन निघालो. वाटेत दिसणार्या प्रत्येक मिरवणुकीकडे बारकाईने पाहात होतो.
नवरात्रौत्सवाचा आजचा नववा दिवस. देवीच्या विसर्जनाचा घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या देवी ट्रकवर ठेवून त्यांची मिरवणूक वाजत गाजत चालली होती. एकामागोमाग एक ट्रक पुढे सरकत होते. पुढे मागे शेकडो महिला देवीची आरती, गाणी गात, नाचत होत्या. कुणी नटून थटून ठुमकत ठुमकत निघालेल्या. कुणी जाडजूड वेण्या बुचड्यावर घालून फुगड्या घालत होत्या. भर रस्त्यात काही केस सोडलेल्या बायका… त्यांच्या अंगात देवीच वारं संचारलेलं… त्या ऊहू ऊहू करत घुमत घुमत पुढे निघालेल्या. रंगीबेरंगी साड्या घातलेल्या काही घरंदाज देखण्या सोज्वळ महिलाही होत्या. त्यात पुरुष मंडळी नगण्यच.
यात नवलकरांना अपेक्षित असलेल्या बायांचे फोटो घेणे म्हणजे अवघडच झाले. यातील कोणती देवी वेश्यांची? ते कसे ओळखायचे? कुणाला विचारायचे? पुन्हा नवलकरांना फोन करावा, तर रात्रीचे दोन वाजून गेलेले. आणि ते जागे असतील तरी फोनवरून कसे सांगू शकतील. मला ज्या मिरवणुकीबद्दल शंका होती. त्या ट्रकवर चढून चालकाला विचारले की वारांगनांची देवी कोणती? तर त्याला वारांगनांचा अर्थच कळेना. त्या बायांना पाहून माझी जीभच जड झाली. काही विचारावे तर तोंडात बसायचे. भलत्याच बायांचा फोटो आला तर नसती आफत यायची. माझी फार पंचाईत झाली. काही सुचेना. यातून मार्ग कसा काढायचा. ठोस माहिती देणारा भरोश्याचा कुणी भेटेना. मिरवणुका तर चौपाटीच्या दिशेने पुढे सरकत होत्या. थोड्याच वेळात सर्वच देवींचे विसर्जन होईल आणि मी फोटो काढला नाही तर नवलकर माझे विसर्जन करतील.
एक अवलिया आठवला जो यातील तज्ज्ञ जाणकार होता. त्याचे आमच्या घराशेजारील देनावाडीजवळ ओरिएंटल हेअर कटिंग नावाचे सलून होतं. तो नवलकरांचा मित्र होता. तो रात्री सलून बंद करून दुकानातच झोपतो हे माहीत होते. मी मागच्या बाजूने दरवाजा ठोकून त्याला झोपेतून उठवले आणि नवलकरांचे महत्त्वाचे काम आहे असे सांगून त्याला स्कूटरवर बसवले.
त्याने चारपाच मिरवणुका बघितल्या आणि त्यात वेश्यांची देवी कोणती ते छातीठोकपणे सांगितले. त्याच्या भरवश्यावर मी फोटो घेतले आणि दुसर्या दिवशी नवलकरांच्या हाती दिले. फोटो बघून ते काय विचारतील याबद्दल धाकधूक वाटत होती. कारण पूर्वीचा एक प्रसंग मला आठवला.
लोकसभेची निवडणूक होती. मतदानाचा दिवस होता. कामाठीपुरा येथील वेश्यांनी आपला व्यवहार बंद ठेवून मतदानकेंद्राबाहेर लांब रांगा लावल्या होत्या. तेथील सोशल वर्करला माहिती विचारून मी त्यांचा फोटो घेतला. त्याखाली कामाठीपुरा येथील वेश्यांनी मतदानाचा हक्क बजावला, असे लिहून संपादक पु. रा. बेहरे यांच्या हाती दिले. बेहरे म्हणाले, या वेश्या आहेत कशावरून? आपण हा फोटो छापला तर त्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकतील. मग तुला ते सिद्ध करावे लागेल ते कसे करशील? त्यांचे म्हणणे मला तंतोतंत पटले मी बापडा कसं काय सिद्ध करू शकणार?
मी कानाला खडा लावला. असे फोटो घेताना आणि घेऊन झाल्यावर त्याची बातमी करताना शंभर वेळा विचार केला पाहिजे, नाहीतर या बाया दावाही ठोकतील अन् मलाही ठोकून काढतील. तेव्हापासून त्या गल्लीत जाणे मी कायमचे बंद केले. मी तसा सिद्ध पुरुष असूनही त्यांना सिद्ध करण्यास असमर्थ होतो.
प्रमोद नवलकर अनेक वृत्तपत्रात सातत्याने लिखाण करत. भटक्याची भ्रमंती हे सदर सलग ५० वर्षे त्यांनी लिहिले. अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. भ्रमंती नावाचा दिवाळी अंकही ते काढत. लेखासोबत छायाचित्र असावे म्हणून ते मला सोबत घेऊन जात. कधी माझ्यावर एकट्याने सिंहाच्या गुहेत जाऊन फोटो काढून आणण्याची वेळ यायची.
मुंबईतील हिजड्यांचे विश्व या विषयावर त्यांनी लेख लिहिला होता, त्यासाठी काही फोटो काढायचे होते. अशाच एका मध्यरात्री ते मला गोलपिठ्याला हिजड्यांच्या वस्तीत घेऊन गेले. त्यांच्या लेखाला अनुसरून फोटो कसे हवे ते आम्ही अगोदर गाडीत ठरवले होते. नवलकर स्वत: गाडी चालवीत होते. एका मोहल्ल्यात गाडी उभी केली. तेव्हा एक सुंदरीसारखी दिसणारी खिडकीजवळ आली. टपावर हात ठेवून तिने आत वाकून पाहिले.
अंदर आवू क्या? – ती
तेरा नाम क्या है?- नवलकर
शशी
क्या, घूमने आती है?
कहाँ?
तुम जहाँ बोलेगा वहाँ
कहां तक जानेका?
अरे कहीं भी घूमके आयेंगे
तो चलो यही घूमेंगे
शशी दार उघडून आत आली. तिला जेथून फिरावेसे वाटत होते तेथून नवलकर गाडी फिरवीत होते. तिने सांगितले त्या ठिकाणी गाडी थांबवली. ती उतरली तसे नवलकरही उतरले. दोघांचे फोटो घेण्यासाठी मीही बाहेर आलो. तिने नवलकरांच्या कंबरेत हात घालून फोटोला पोझ दिली. तसे नवलकरांनी तिला बाजूला केले. मी दोन चार फोटो घेतले. ‘उद्या पुन्हा या, मी नवीन साडी घालून येते’ असे म्हणून ती निघून गेली.
मी नवलकरांना म्हटले, साहेब फोटो हिजड्यांचा हवा आहे.
मग तोच होता की आता — नवलकर
कमाल आहे तिचे बोलणे चालणे आणि आवाजही बाईसारखा. तो हिजडा असेलही पण फोटोत तरी तो दिसायला हवा, ही तर बाई वाटते दुसरा बघा. प्लीज!
पुन्हा गाडीच्या गाडीच्या चकरा सुरू झाल्या, रात्रीचे दोन वाजत आले. रस्ता अधिकच गजबजलेला वाटत होता. दाराबाहेर उभ्या राहणार्या वेश्या रस्त्यावर आल्या, एक जणीने चिक्कार घेतलेली. तिच्याकडून मार खाणारा बहुधा दलाल असावा. भडक मेकअप केलेल्या बाया कोण आणि हिजडे कोण फरक कळत नव्हता.
दुसर्या गल्लीच्या नाक्यावर सगळेच उंच धिप्पाड साड्या नेसलेले टाळ्या वाजवणारे हिजडे होते. आमची गाडी थांबली पण कुणीही गाडीजवळ येईना. मागे हॉर्न वाजवून वैतागलेले टॅक्सीवाले. ट्रॅफिक जाम तुंबला पण नवलकरांना पर्वा नाही. गाडी दुसर्या नाक्यावर थांबवली. पण इथली माणसं खतरनाक दिसतात. रेड लाइट एरीयात अजून कोण महाभाग असणार? माझं टेन्शन वाढलं. कुठून बुद्धी सुचली आणि इथं आलो असं झालं.
दोन हिजडे गाडीजवळ येवून नवलकरांना म्हणाले, साहब, आता है ऊपर?
पहिला माला. उधर सब नंगा नाच गाना चलता है. चलो ना. हम दोनो नाचेंगे खूब
साहेबाने वर डोकावून पाहिले. नवा अड्डा सापडला.
पुढील अंकी नवा विषय.
साहेब गाडीतून उतरले तसा मीही कॅमेरा घेऊन पायउतार. साहेबांनी डोळा मारला की क्लिक करायचे असे ठरलेले. पण या भयाण मध्यरात्री फोटोसाठी दोन चार फ्लॅश मारले तर सर्व सावध होतील. आणि कॅमेर्याच्या दिशेने येतील. मग आमची मनसोक्त… सहा गोळ्या आणि आदमी पचास… म्हणजे अब तेरा क्या होगा कालिया! शोलेतील गब्बरसिंगचा डायलॉग आठवला आणि अंगाला घाम फुटला.
मरावे परी कीर्तीरुपी उरावे असे बापाने सांगितलेले. पण मरायला इथे कशाला आला होता, असे विचारले तर सांगायचे काय? मरणाची जागा रणांगणाची असावी ही तर गणिकांची.
परंतु तसे होणे नव्हते. दैव आमच्या बाजूने अनुकूल होते. फोटो सुखरुप काढून झाले. साहेबांनी त्यांना पैसे दिले तसे ते खूष झाले.
साहब, कल आना हं फोटू लेके. इधरीच आना. पिंजरा भुलना नहीं, असे म्हणून त्यांनी नवलकरांच्या दोनही गालाचे चुंबन घेतले व निघून गेले.
काही दिवसातच नवलकरांचा रंगीत फोटो मुखपृष्ठावर असलेले ते साप्ताहिक महाराष्ट्रभर झळकले. फोटोतील त्या हिजड्याला कुणीतरी तो अंक दाखवला. फोटोतील माणूस शिवसेनेचा नेता असल्याचे त्यांना कळताच धक्काच बसला. विशेष म्हणजे नवलकरांच्या घरी एक पत्र आले, त्यात शेवटी लिहिले होते, माफ करना साहब आपको पहचाना नहीं.
काही दिवसानंतर एका मध्यरात्री मी निवांत झोपेत असताना पुन्हा नवलकरांचा फोन आला, भडेकर कॅमेरा घेऊन खाली या. मी गाडीत बसलोय. पुन्हा झोपेचं खोबरं. नेसल्या वस्त्रानिशी त्यांच्या गाडीत जावून बसलो.
ते बोलू लागले, हे पहा आपण आता जेथे फोटो काढण्यासाठी जाणार आहोत, तेथे तुम्ही माझ्याशी ओळख दाखवायची नाही. गाडी थांबवल्यावर प्रथम तुम्ही उतरा, मग मी गाडी घेऊन पुढे जाईन. गाडी एका ठिकाणी उभी केल्यावर मी खाली उतरीन आणि तुम्ही अंतर ठेवून माझ्या मागे हळूहळू चालत या. मी इशारा करताच मी ज्याच्याशी बोलत जाईन त्याच्याबरोबर फोटो घ्या. तुम्ही माझ्या मागे असलात तरी मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या केसालाही कुणी धक्का लावणार नाही. घाबरू नका.
त्यांनी असे म्हटल्यावर मला धक्काच बसला. मेलो. म्हणजे आज गंडांतर योग आहे. नको ती भीती मनात आली. हे नसते मार खाण्याचे धंदे आहेत असे मनाशी पुटपुटत होतो. ते कोणत्या वेळी काय करतील त्याचा भरवसा नव्हता.
नवलकरांनी गाडी गेटवेजवळच्या ताज हॉटेलजवळ थांबवली. गाडीत बसल्या जागीच त्यांनी अरब घालतात तसा पांढरा झगा घातला. डोक्यावर पांढरी गोल टोपी घातली. आरशात निरखून पाहिले, नि म्हणाले तुम्ही उतरा आणि माझ्या मागे या.
अचानक चार पाच भिकारी त्यांच्याकडे पैसे मागायला लागले. ए रफीक, पैसा पैसा म्हणत त्यांनी रफीकचा झगा ओढायला सुरुवात केली. नवलकरांनी झग्याच्या खिशात हात घातला पण पैसे पॅन्टच्या खिशात होते. त्यांनी झगा वर केला आणि
पॅन्टमधून पैसे काढले. त्यावेळी त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. कारण वेषांतर करून सुद्धा इथे मोठी गफलत झाली होती. अरब झग्याच्या खिशात पैसे ठेवतो आणि झग्याच्या आत कधी पॅन्ट घालत नाही मी फोटो घेऊन पुढे चालत्ा गेलो. मागून नवलकर गाडी घेऊन आले. त्या रात्री नाना सोंगे घेऊन आम्ही फिरत होतो. बॉम्बे हॉस्पिटलजवळच्या एका हॉटेलात ते अरबाच्या वेषात गेले. तेथील वेटर अरबाला पाहून कशी आस्थेवाईकपणे चौकशी करतात. त्यांच्या समोरच्या टेबलवर बसून मी फोटो काढत होतो.
नवलकर असे फोटो का काढून घेत आहेत. याचा मला काही उलगडा होईना. मी दुसर्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन विचारणा केली. ते म्हणाले, एका ओळखीच्या माणसाला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये लिव्हरचे ऑपरेशन करून घ्यायचे होते. मी त्यासाठी त्यांना शिफारसपत्रही दिले, कारण त्याला स्पेशल रुम हवी होती. पण व्यवस्थापनाने खोली खाली नसल्याचे सांगून त्याला परत पाठवले, मात्र त्याचवेळी कोणताही रोग नसलेला अरब कुटुंबासह बॉम्बे हॉस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये केवळ तपासणीसाठी लोळत पडलेला होता. आखाती देशातील गर्भश्रीमंत अरब मुंबईत येतो तेव्हा त्याला कसा अनुभव मिळतो, येथील लोक त्याच्यामागे लाचारासारखे कसे वागतात यावर `ही मुंबई की दुबई’ नावाचा एक लेख दिवाळीच्या भ्रमंती अंकात छापायचा होता. यासाठी हे सर्व वेषांतर नाट्य करावे लागले.