रसिक प्रेक्षकांसाठी मल्हार, रॉयल थिएटर निर्मित ‘३८ कृष्ण व्हिला’ हे नवं कोरं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. हॅण्डसम आणि डॅशिंग अभिनेते डॉ. गिरीश ओक या नाटकातून आपल्या नाटकांचे नाबाद अर्धशतक पूर्ण करीत आहेत. बार्डो या चित्रपटासाठी यावर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लेखिका, अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे या नाटकाच्या लेखिका आहेत आणि या नाटकात प्रमुख भूमिकेत देखील दिसणार आहेत. विविधांगी विषयाची असंख्य यशस्वी नाटके रंगभूमीवर सादर करणारे विजय केंकरे हे नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत. संगीत अजित परब, नेपथ्य संदेश बेंद्रे आणि प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. निर्मिती मिहिर गवळी यांची असून, उत्कर्ष मेहता आणि ऋतुजा शिदम हे सहनिर्माते आहेत.
निर्माते संतोष शिदम म्हणाले, सध्या रंगभूमीवर कॉमेडी नाटकांची लाट उसळली आहे, पण प्रत्येक प्रेक्षकांची आवड वेगळी असते. अशाच वेगळी आवड जपणार्या रसिकांसाठी आम्ही हे सामाजिक, आशयघन नाटक घेऊन आलो आहोत. कोविड निर्बंध उठल्यावर प्रेक्षक निर्धास्त वातावरणात एक चांगल्या विषयावरील हे नाटक पाहायला येतील अशी खात्री वाटते.
डॉ. गिरीश ओक म्हणाले, या वर्षी माझ्या रंगमंचीय कारकिर्दीला ३८ वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच अंकाचे ‘३८ कृष्ण व्हिला‘ हे नवीन नाटक देखील याच वर्षात आले आहे, हा एक सुखद योगायोग आहे. त्याचबरोबर हे नाटक माझे पन्नासावे नाट्यपुष्प आहे. १९८४ साली ‘साहेब विरूद्ध मी’ या नाटकातून मी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. इतक्या वर्षात अनेक विषयांची, जॉनरची नाटकं केली आहेत, पण या नाटकातील भूमिका वेगळी आहे. हे शब्दप्रधान चर्चानाट्य आहे. नाटकात दोन तास रियल टाइममध्ये ही दोन्ही पात्रं एकमेकांशी संवाद साधतात. त्यातून अशा काही गोष्टी समोर येतात ज्या उत्कंठावर्धक आहेत. विजय केंकरे यांचे दिग्दर्शन नाटकाला वेगळेच परिमाण देऊन जाते.
डॉ. श्वेता पेंडसे म्हणाल्या, एका प्रतिष्ठित माणसाला एक अपरिचित स्त्री भेटायला येते आणि त्या दोन तासात ती स्वतःची बाजू कशी मांडते, त्या अनुषंगाने कथेचे वेगवेगळे पदर कसे उलगडत जातात हे या नाटकात पाहायला मिळेल. नाटक पाहताना प्रेक्षकांना, का? कुठे? काय? असे प्रश्न पडत जातात आणि ते या नाटकात गुंतत जातात, त्यांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत जाते. आज सगळं काही पटकन सांगा, असं म्हणणार्या इन्स्टाग्रामच्या जनरेशनला दोन तास नाटकात गुंतवून ठेवणे खूपच कठीण आहे, परंतु या कथेचे वेगळेपण आणि विजय केंकरे यांनी दिग्दर्शक म्हणून या नाटकाची ज्या प्रकारे बांधणी केली आहे ते पाहता सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हे नाटक पाहताना मजा येईल.
त्या म्हणाल्या, या नाटकांच्या कलाकारांची निवड सर्वस्वी विजय केंकरे यांनी केली आहे. मला ही भूमिका डॉ. गिरीश ओक यांच्या सोबतीने साकारता आली याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजते. अनेक महिला या भूमिकेशी रिलेट करू शकतील. स्त्रीची बलस्थाने, तिच्या भावना, तिचा कणखरपणा, प्रसंगी तिचं हळवं होणं… प्रत्येकाचा एक स्थायी भाव असतो. नाटक पाहताना प्रत्येक प्रेक्षक या भूमिकांशी स्वतःला कनेक्ट करतो. मी खूप वर्षांनी या नाटकातून रंगभूमीवर पुन्हा आले आहे, या सर्व टीमसोबत काम करताना मजा येतेय.
दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले, काही वर्षांपूर्वी श्वेता पेंडसे हिचं ‘माझिया मना‘ नावाचं स्किझोफ्रेनिया विषयावरील राज्य नाट्य पुरस्कारविजेतं नाटक मी वाचलं होतं, तेव्हा आमच्यात पहिल्यांदा बोलणं झालं होतं. ‘३८ कृष्ण व्हिला’चा विषय आवडला आणि मी ते करायचं ठरवलं. हे एक सामाजिक नाटक आहे, पण एका बाजूने त्यात धक्का बसेल असंही काहीतरी आहे. आपण ठरवतो की अमुक एक माणूस अमुक एका प्रकारचा आहे, तो तसा नसतो किंवा तसा असतो… आपला अंदाज बरोबर की चूक याचं उत्तर आपण शोधायला लागतो. या नाटकातही प्रेक्षकांनाही व्यक्तिरेखांबदल प्रश्न पडत राहतात. मला वाटतं नाटकात नाट्य असायला हवं. या नाटकाचे संवाद हे त्याचं बलस्थान आहे. या नाटकाच्या नावात एका वास्तूचा उल्लेख आहे, ‘३८ कृष्ण व्हिला’ तिचं या नाटकात एक प्रमुख स्थान आहे. नाटकात कथानकापेक्षा व्यक्तिरेखा जास्त महत्वाच्या आहेत, त्या प्रेक्षकांना गुंतवून टाकतात. दोन्ही कलाकार अगदी उत्तम काम करत आहेत. मी नाटकातील काही रोचक प्रसंग अधोरेखित केले आहेत. नाटकात दोनच पात्रं असल्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी या नाटकातील, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना वेशभूषा या विभागांना चांगली संधी मिळाली आहे व त्यांनी या नाटकात कामगिरी खूप छान पार पाडली आहे.