प्रत्येक भूमिका डॉक्टरांना कठोर परिश्रम करायला भाग पाडत होती, त्यांना आतून तोडून-फोडून टाकत होती, त्याचबरोबर त्यांना पुन्हा नव्याने घडवत काही नवी मूल्ये, नवी परिमाणे देत होती. त्या प्रत्येक भूमिकेबरोबर असा वादळी प्रवास करताना डॉक्टरांचे अंतरंग कितीदा उद्ध्वस्त होऊन गेले असेल? भूमिका करण्यासाठी सज्ज झालेल्या डॉक्टरांना रंगभूमीवरच्या झगमगाटात प्रवेश करण्यापूर्वी विंगेतल्या अंधारात क्षणभर उभे राहताना… स्वतःशीच एकाग्र होताना नेमके काय वाटत असेल? उत्सुकता… भीती… आशंका… कदाचित ते तरंग अधिक स्पष्ट होत जाऊ नयेत, म्हणून तर त्यांनी ती विंगेतल्या अंधारातून संवादांची फेक करत रंगमंचावर एकदम झेप घेण्याची आपली एक शैली ठरवून टाकली असेल का? काशिनाथ घाणेकर यांची २ मार्च रोजी पुण्यतिथी. म्हणून यशोधरा काटकर यांच्या ‘अपूर्व, अलौकिक, एकमेव’ या पुस्तकातून घेतलेले हे टिपण.
– – –
डॉक्टरांची आमच्या आयुष्यात झालेली पहिली ‘एन्ट्री’..
डॉक्टरांची विंगमधून वाक्ये बोलत, प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरत एकदम रंगमंचावर प्रवेश करण्याची लकब सर्वांच्या परिचयाची आहे. तसे अगदी तळमजल्यापसून मोठमोठ्याने बोलत, भरभर जिना चढत ते एकदम झपाट्याने आमच्या घराच्या दारातून आत शिरले. बरोबर सुलोचना मावशी, कांचनताई, बेबीताई (मीना वेंगुर्लेकर) आणि इरावतीबाई (डॉक्टरांच्या पत्नी) असा सगळा लवाजमा होता. डॉक्टर घाणेकरांची ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मधली संभाजीची भूमिका त्या वेळी इतकी गाजत होती, की डॉक्टर म्हणजे संभाजीच हे समीकरण आम्हा त्या वेळच्या नाटकवेड्या शाळकरी मुलांच्या मनात पक्के ठसून गेले होते; पण आज त्यांना मी प्रत्यक्षच इतक्या जवळून बघत होते. त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व, उजळ, गुलाबी गौरवर्णाला शोभेलसा हलक्या रंगाचा पोशाख, कुडत्याच्या खिशातून डोकावणारे शुभ्र रुमालाचे ऐटदार टोक या सगळ्याकडे मी चकित होऊन एकटक बघत राहिले होते. आणि त्यांचे ते चमकदार डोळे… आमचे सगळे घरच त्यांच्या आगमनामुळे प्रकाशमान होऊन गेले होते, त्यांच्या उत्साहाने अन् आमच्या आनंदाने भरून गेले होते. प्रत्यक्ष संभाजीराजे रायगड सोडून सगळे शिलेदार अन् शिबंदी डेरेदाखल करून आमच्या चारखणी घरात अवतीर्ण झालेले होते. त्याचा तो अवर्णनीय आनंद नंतर कित्येक दिवस आमच्या शाळकरी बावळट चेहर्यांवर टिकून होता. असे डॉक्टर प्रथम आमच्या घरी आले आणि घरचेच झाले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘अश्रूंची झाली फुले’,’ गारंबीचा बापू’ ही नाटके,तसेच ‘पाठलाग’, ‘मधुचंद्र’, ‘मराठा तितुका मेळवावा’ हे चित्रपट आम्ही या घरच्या वशिल्यामुळे किती वेळा बघावेत? आणि प्रत्येक वेळी आनंदून, फुशारून जाऊन म्हणावे
‘ते ना… ते आमचे डॉक्टर!’
माझी आई (माधवी देसाई) ही तर त्यांच्या गुरूंची (चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर) कन्या, या नात्याने तिला ‘आबीताई, आबीताई…’ करत त्यांनी खिशात टाकले. आम्ही मुली त्यांना आधीच वश झालेल्या होतो. हळूहळू आमचे सगळे कुटुंबच डॉक्टरांचे फॅन बनून गेले. गावात नाटकाचे प्रयोग लागले की त्या निमित्ताने डॉक्टरांची घरी फेरी होई. ते आले की सर्वांशीच पोटभर गप्पा ठोकत. माझा हात बघण्याचे निमित्त करून अतिशय गंभीर चेहर्याने म्हणत,
‘तू म्हणजे अगदी आतल्या गाठीची आहेस, अगदी पक्की आहेस बरं!’
खरोखरीच घरात घडलेल्या अनेक घटना ते सांगत. डॉक्टरांना ज्योतिष येत असावे, हा माझा गैरसमज त्यामुळे बरेच दिवस टिकून राहिला.
डॉक्टरांना या सगळ्या बातम्या पुरवणारा फितूर आमच्याच घरातला होता, हे मला समजायला बरीच वर्षे जावी लागली.
पण, मध्ये एक कालखंड असा आला की त्यामध्ये डॉक्टरांची भेट होणेच काय त्यांचे नाव घेणेही दुरापास्त होऊन गेले.
डॉक्टरांच्या नाटकांचे प्रयोग लागले की आम्ही पूर्वीसारखीच थिएटरवर धाव घेत असू.
डॉक्टर रंगमंचावरून आम्हाला बघत, मध्यांतर झाले की आत बोलावून घेत अन् अगदी पूर्वीसारखी प्रेमाने चौकशी करत; पण आमच्याशी, विशेषत: आई किंवा आज्जीशी बोलताना त्यांच्या डोळ्यांच्या कोपर्यात कुठेतरी दुःखाची अंधारी ठिपक्यासारखी सावली पडली आहे, त्यांचा खणखणीत स्पष्ट आवाज ओढल्यासारखा होत, आत खेचला जातोय्, असे मला आतून वाटत राही. कांचनताई आणि डॉक्टरांच्या नाजूक नातेसंबंधांमुळे मावशीने त्यांना आपल्या घरातून हद्दपार करून टाकले होते. कांचनताईवर तर अनेक बंधने घालण्यात आली होती. ती वर्षे सर्वांनाच अपार क्लेश देऊन गेली; पण कालचक्र हळूहळू फिरत गेले. पुढे कांचनताईशी विवाहबद्ध झालेले डॉक्टर प्रभादेवीच्या घरचे सदस्य झाले, ही आम्हा सर्व मुलींदृष्ट्या अतिशय आनंदाची गोष्ट होती. पूर्वी त्यांच्या अनेक भूमिकांवर, रंगमंचावरच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा होणार्या आम्हा सर्व मंडळींच्या हळूहळू लक्षात येत गेले, की आता आमचे अन् त्यांचे नाते बदलले आहे. आता ते मावशीचे जावई, कांचनताईचे पती, घरातल्या सगळ्या बच्चेकंपनीचे काका आणि आमच्या फॅन क्लबचे भाऊजी झाले होते. आतल्या आत ते जसे जाणवत गेले तसे मी आपोआपच त्यांच्याशी पोक्तपणे वागू लागले… नव्हे, तसे वागावेच लागले.
सकाळी सकाळी माझी तिकडे फेरी झाली की डॉक्टर त्या आपल्या खिडकीजवळच्या ठरावीक खुर्चीत बसलेले असायचे. मी दारातून आत डोकावत जाळीदार पार्टीशनमधून बघत अंदाज घेई.
‘गुड मॉर्निंग, डॉक्टर!’
मग मान वाकडी करून वाघोबांनी चष्म्यातून डोळे रोखून एकदा बघितले की हुश्श! डॉक्टरांबरोबर जेवायला बसायचे तरी वाघोबांचे डोळे रोखलेले असायचे, त्यामुळे चूपचाप जेवणे भाग असे. सुलोचनामावशी स्वतः एवढी नामवंत अभिनेत्री. त्यामुळे चित्रपट व्यवसायातल्या मंडळींच्या, साहित्यिकांच्या चेष्टा, बातम्या, गॉसिपला जेवणाच्या टेबलवर अगदी ऊत येई, हसतखिदळत जेवणे पार पडत. डॉक्टर मात्र ‘किती मूर्ख या बायका!’ म्हणून अपार दयाबुद्धीने आमच्याकडे बघत. अतीच झाले की मधूनच तिकडून एक डोस मिळे,
‘हं, खा ती भाजी, माझी आई नेहमी म्हणायची की मेल्या, चव भाजीत नसते, ती जिभेत असते.’
डॉक्टरांच्या कैलासवासी आईचा मी पुढे पुढे इतका धसका घेतला की त्यांच्याकडे न बघताच मी ताटातले सगळे जेवण संपवत असे.
डॉक्टरांची आई हा त्यांच्या मनातला एक अतिशय मृदू कप्पा होता. चिपळूणसारख्या गावात एका सर्वसामान्य कुटुंबात
सौ. यमुनाबाई घाणेकरांच्या पोटी आठव्या नंबरावर शेंडेफळ बनून डॉक्टरांचा जन्म झाला. या हूड बाळावर आईचे तसे जरा जास्तच प्रेम होते. सर्व भावंडांना जेवायला भाकरी मिळायची, तर या लाडोबाला मात्र दुधावरची साय, तुपातला शिरा असे काही थोडे लपवून-छपवून ती माऊली खायला घालायची. तिच्या आठवणीने डॉक्टर नेहमी सद्गदित होऊन जात.
‘अगं, मी आमच्या घरात सगळ्यात काळाकुट्ट म्हणून ती…’
‘डॉक्टर, तुम्ही काळे?’
मला हसू फुटायचे.
‘मग? माझे भाऊ श्याम, भार्गव बघितले नाहीस, कस्सले हॅण्डसम दिसतात. त्यांच्या मानाने मी काळाच. म्हणून ती मला खापर्या म्हणायची. मी आलो की म्हणायची, ‘हं, आले काळोबा!’ त्या आठवणीने डॉक्टरांना अगदी गुदगुल्या व्हायच्या. यातला गमतीचा भाग सोडला तर डॉक्टरांचा आईबाबतचा हळवेपणा वादातीत होता. ते स्वतः वयाने मोठे होत गेले, एवढे नावारूपाला आले, तरी तो आईवेडेपणा त्यांच्या मनात कायम घर करून राहिला. माझी आज्जी (लीलाबाई पेंढारकर), सुलोचनामावशी, माई मंगेशकर आणि ललितादेवी वालचंद या सर्वांनीच या आईवेड्या मुलाहून मूल असणार्या बाळाचे अगदी शेवटपर्यंत अतिशय लाड केले.
डॉक्टरांचे एखादे नवीन नाटक वा चित्रपट सुरू होणार असो, ललितादेवींचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते काम सुरूच व्हायचे नाही. तसेच पेडर रोड वरून जाता-येता ’प्रभु कुंज’ हे लतामावशीचे निवासस्थान आले की
डॉक्टर मोठ्या भक्तिभावाने त्या दिशेने बघत नमस्कार करत.
‘माझी आई… आई आहे बरं ती!’
त्यांनी पुढे ’दादी माँ’ या चित्रपटात दुर्गा खोटे यांच्याबरोबर ‘सोमू’ची भूमिका केली, तेव्हा ’ऐ माँ, तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी…‘ या गाण्यात डॉक्टरांना अभिनय करता करता कसे खरोखरीच भरून आले आहे, ते सारखे जाणवत राहायचे आणि ते बघता बघता मलासुद्धा अगदी रडू फुटायचे.
एरवी घरात त्यांचे राहणे अतिशय साधे पण स्वच्छ व टापटिपीचे असे. तसे त्यांचे जेवणही अगदी सात्त्विक असायचे. दूध, दही, लोणी, ताक, तूप हे पदार्थ त्यांच्या मर्जीतलेच. कोकणस्थी जातकुळीला स्मरून शिक्रण, डाळिंब्यांची उसळ आणि अळूची फतफती भाजी (भरपूर दाणे घातलेली!) त्यांना अतिशय आवडायची. ते दौर्यासाठी कोकणात गेले की तिथल्या पालेभाज्या, आंबे, फणस, कणगं अशा खास पदार्थांच्या टोपल्या भरभरून घेऊन यायचे. ते सगळे प्रकार स्वत: आवडीने खायचे ते खायचे; पण इतरांच्या घशाखाली कोंबायचे. त्यामुळे कितीही नाके मुरडली तरी त्यांच्यासमोर जेवणाच्या टेबलावर हे पदार्थ खाण्याची आणि ‘किती छान… आहाहा… किती छान!’ असे म्हणण्याची कसरत आम्हाला करावी लागायची. मात्र हे पदार्थ डॉक्टर जितक्या आवडीने खात, तितक्याच आवडीने चायनीज, मुघलाई, कॉन्टिनेन्टल पदार्थ हादडायला त्यांना आवडे. वूस्टर सॉस, टबॅस्को सॉस, रशियन सॅलड अशी नुसती नावे घेतली तरी लहान मुलासारखे त्यांच्या जिभेच्या टोकाला अगदी पाणी सुटे अन् स्स्… केल्यासारखा त्यांचा चेहरा आनंदून जाई.
डॉक्टरांच्या हट्टी स्वभावाची लक्षणे तशी लहानपणापासूनच दिसू लागली होती. पुराने खवळलेल्या नदीत उड्या टाकणे, खोगिराशिवाय घोड्यावर बसणे असे शौक त्यांनी अगदी शाळकरी वयापासूनच केले. मॅट्रिक संपवून ते पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याला कलाटणी देणारी ती घटना घडली. ‘त्राटिका’ नाटकातली नटवर्य नानासाहेब फाटकांची भूमिका डॉक्टरांनी बघितली आणि त्यांना स्वतःचे श्रेय सापडले. मग अभ्यासाची पुस्तके धूळ खात पडली आणि डॉक्टर आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धांत रमू लागले. कॉलेजच्या नाटकासाठी कधी त्यांची निवड होई, कधी होत नसे. तिथे त्यांना मनासारखी भूमिका मिळाली नाही तर ते चक्क प्रॉम्पटरचे काम करत; पण कधी तेही नाकारले गेले तर मात्र खूप निराश होऊन जात. याचा अर्थातच अभ्यासावर परिणाम व्हायला लागला. एकदा तर त्यांनी अगदी कंटाळून जाऊन घर सोडले, चिपळूणदेखील सोडले आणि कोल्हापूर गाठले. खिशात पैसे नव्हतेच, म्हणून त्यांनी सरळ फुटपाथवर पथारी टाकली आणि तिथे मिळेल तो उसळपाव खाऊन दिवस काढले. त्या ठिकाणी एका गब्बर पाटलाशी त्य्ाांची मैत्री झाली. मग काय विचारता? कोल्हापुरातले तमाशे बघायचे, कोल्हाटणींच्या पालावर जायचे, अशा प्रकारात त्यांच्या रात्री रंगू लागल्या. सुदैवाने त्यांच्याकडे होते-नव्हते ते पैसे लवकरच संपले आणि डॉक्टरांना नाखुशीने का होईना घरी परतणे भाग पडले.
इकडे घरातले वातावरण प्रचंड तापलेले होते. डॉक्टरांना सज्जड दम मिळाला आणि या बिघडलेल्या कार्ट्याला अगदी एक शेवटचा चान्स द्यायचा म्हणून रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजात दाखल होण्याची शिक्षा फर्मावण्यात आली. इथून पुढे मात्र डॉक्टरांनी स्वतःला शिक्षणात जे गुंतवून घेतले ते अगदी बी.डी.एस. होऊन गोल्ड मेडल पटकवेपर्यंत! अर्थात ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये आल्यावर ते पुन्हा एकदा तिथल्या नाटकवेड्या मंडळीत सामील झाले. डॉक्टरांना नट म्हणून ज्यांनी अक्षरशः घडवले ते त्यांचे गुरू श्री. रामचंद्र वर्दे त्यांना याच काळात भेटले. त्या दोघांची मैत्री इतकी जुळली की काय विचारता! वर्द्यांनी डॉक्टरांना डोळ्यांसमोर ठेवून त्यांना मध्यवर्ती भूमिका देण्यासाठी स्वतःच एकांकिका लिहिल्या. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांच्या ज्या नाटकांची दिग्दर्शने केली त्यातून डॉक्टरांना सतत चमकवले. नाटकाच्या तालमी संपवल्यावरदेखील, हे झपाटलेले गुरू-शिष्य रस्त्यावर संवादांचे पाठांतर करत, उच्चार सुधारून घेत, चुका सुधारत जे. जे. ते फ्रेंच ब्रिजपर्यंत चालत घरी जायचे. वर्द्यांनी तरूण काशिनाथवर जे संस्कार या काळात केले, त्यामुळे डॉक्टरांमधल्या अभिजात कलागुणांना एक झळाळी प्राप्त झाली, त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते नाट्यस्पर्धा गाजवू लागले, उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके पटकावू लागले.
तसे बघितले तर डॉक्टरांची शरीरयष्टी लहानखोर होती. रंगमंचावर वावरण्यासाठी ती कितपत योग्य होती, हा एक प्रश्न होता. डॉक्टरांचा तेजस्वी देखणेपणा हा एरवी अतिशय लोभसवाणा, तेव्हाच्या मराठी चित्रपटातल्या नायकाच्या भूमिकेसाठी तो अतिशय योग्य होता; पण रंगभूमीवर अनेक विविध रंगांच्या अन् ढंगांच्या भूमिका साकार करताना, विशेषतः खलनायकी छटा असणार्या भूमिका करताना तो कितपत उपयोगी ठरला असता? वर्द्यांनी डॉक्टरांचे सगळे गुण-दोष अचूक हेरले आणि रंगमंचावर चालावे कसे, अगदी इथपासून या शिष्योत्तमाला शिकवून तयार केले. ही शिकवण डॉक्टरांना पुढच्या कारकिर्दीत अतिशय उपयोगी पडली. चित्रपट आणि नाटकांतून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका रंगवल्या आणि मराठी प्रेक्षकांना तृप्त केले.
डॉक्टरांचा स्वभाव अगदी पार्यासारखा चंचल… मूड चांगला असला तर ते अगदी प्रेमळ आणि आनंदी असत; पण कधी त्यांचे तापमान चढले की खलास! क्षणार्धात त्यांचा चेहरा रंग बदलून लालबुंद होई, चमकदार डोळे रागाच्या तीक्ष्ण ठिणग्या फेकू लागत, संताप अनावर झाला की समोर असलेल्या माणसाला तो अर्धमेला होईपर्यंत जी काही लाखोली वाहिली जाई, की ज्याचे नाव ते! पण तेच डॉक्टर दुःखी होत भावविवश झाले, की त्यांना अगदी ओक्साबोक्शी रडू फुटे. हे सगळे भावभावनांचे वादळ त्यांना जसे अंतर्बाह्य उन्मळून टाकायचे, तसेच ते त्यांच्या आजूबाजूला सतत असणार्या, त्यांच्यावर अतिशय प्रेम करणार्या माणसांनादेखील अतिशय हादरवून टाकत असे. या वादळाचा झपाटा ओसरायला वेळ लागायचा; पण तो एकदाचा संपला की डॉक्टर पुन्हा एकदा पार्यासारखे शांत, स्वच्छ अन् लख्ख झालेले असत. कोणताही माणूस संपूर्णतः निर्दोष नसतो; पण डॉक्टरांच्या स्वभावामध्ये गुण-दोषांची एक विचित्रशी सरमिसळ झालेली होती. मिळालेल्या प्रत्येक भूमिकेसाठी आपला जीव पणाला लावायचा, त्यासाठी स्वतःला अगदी झोकून द्यायचे; मग त्यात मेलो तरी बेहत्तर, असे मानणार्या नटांच्या जातकुळीतले डॉक्टर होते. भूमिकेमध्ये शिरताना ते त्यात सर्वस्व ओतायचे. त्यामुळे ती भूमिका जिवंत व्हायची. तिचे अनेक कंगोरे स्पष्ट होत प्रेक्षकांच्या नजरा दिपवून टाकायचे. त्यामागे डॉक्टरांच्या या मनस्वी पण संमिश्र स्वभावाचे गुपित दडलेले होते. संभाजी, लाल्या, बापू… रंगवताना डॉक्टरांना बघणे हा माझ्या दृष्टीने एक अतिशय रोमांचक अनुभव असे; कारण रोजच घरात समोर वावरणार्या डॉक्टरांच्या म्हटले तर काहीशा परिचित व्यक्तिमत्त्वाच्या सीमारेषा कशा, कुठे, कधी धूसर होत जातात अन् रंगमंचावरील भूमिकेला कुठून प्रारंभ होतो, ते बारीक नजरेने अनुभवणे खरोखरच विलक्षण थ्रिलिंग होते. डॉक्टरांच्या स्वभावाचा प्रभाव त्यांच्या भूमिकेवर पडतोय, की त्या भूमिकेची आसुसून अनुभूती घेणारे डॉक्टर त्यामुळे काहीसे बदलत चालले आहेत, त्याबद्दलही मी विचार करत राही. सर्वांनाच असे वाटते, अगदी आजतागायत असे वाटत आले आहे की डॉक्टरांच्या आक्रमक, शीघ्रसंतापी स्वभावाचा प्रभाव त्यांच्या सर्व भूमिकांवर पडत गेला, त्यामुळे त्या भूमिका इतक्या झळाळून उठल्या आणि वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या अंतःकरणात घर करून राहिल्या. कदाचित ते खरेदेखील असेल; पण ती प्रत्येक भूमिका डॉक्टरांना कठोर परिश्रम करायला भाग पाडत होती, त्यांना आतून तोडून-फोडून टाकत होती, त्याचबरोबर त्यांना पुन्हा नव्याने घडवत काही नवी मूल्ये, नवी परिमाणे देत होती. त्या प्रत्येक भूमिकेबरोबर असा वादळी प्रवास करताना डॉक्टरांचे अंतरंग कितीदा उद्ध्वस्त होऊन गेले असेल? भूमिका करण्यासाठी सज्ज झालेल्या डॉक्टरांना रंगभूमीवरच्या झगमगाटात प्रवेश करण्यापूर्वी विंगेतल्या अंधारात क्षणभर उभे राहताना… स्वतःशीच एकाग्र होताना नेमके काय वाटत असेल? उत्सुकता… भीती… आशंका… तो परकायाप्रवेश करण्यापूर्वी कोणत्या भावनांचे हलकेसे तरंग त्यांच्या मनात रेंगाळत असतील? कदाचित ते तरंग अधिक स्पष्ट होत जाऊ नयेत, म्हणून तर त्यांनी ती विंगेतल्या अंधारातून संवादांची फेक करत रंगमंचावर एकदम झेप घेण्याची आपली एक शैली ठरवून टाकली असेल का? मी स्वतःशीच विचार करत ते नाटकापूर्वीचे नाट्य बघत राही.
डॉक्टरांचा रंगभूमीवरचा वावर अतिशय आत्मविश्वासपूर्ण व डौलदार असे. त्यांचे रंगभूमीवर उभे राहणे व चालणे मराठी रंगभूमीवर कामे करणार्या तरुण मंडळींनी जरूर बघावे, त्यातून काही शिकावे असे मला नेहमी वाटायचे. डॉक्टरांच्या मते रंगभूमीवर काम करायचे असेल तर त्यासाठी अनेक पथ्ये पाळायची गरज होती. नाटक सुरू होण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी ते नाट्यगृहात हजर व्हायचे. नाटकाची सगळी प्रॉपर्टी ते जातीने तपासून बघत. स्टेजवरची प्रकाशयोजना नीट आहे की नाही त्याकडे लक्ष देत. रंगभूमी व विघ्नहर्त्या गणनायकाची साग्रसंगीत पूजा केल्याशिवाय त्यांच्या नाटकाचा पडदा कधी उघडला जात नसे. या सगळ्या गोष्टींकडे डॉक्टरांचे जितके अगदी बारीक लक्ष असे, तितकेच रंगमंचापाठी अंधारात मूकपणे वावरणार्या कामगार वर्गाकडेही असे. त्यांच्याकडून चूक झाली तर डॉक्टरांकडून ‘थोतरी’त खाण्याची पाळीही एखाद्यावर येई; पण नाटक रात्री उशिरा संपल्यानंतर सगळे कामगार जेवल्याशिवाय डॉक्टर कधी जेवायला बसत नसत, हेही खरे आहे. डॉक्टरांनी आपले अवघे जीवनच रंगभूमीला समर्पित केले होते. त्यांच्या लेखी तो केवळ कीर्ती, पैसा, पुरस्कार मिळवण्याचा एक मार्ग नव्हता. अभिनय त्यांचा प्राण होता आणि रंगभूमी हे त्यांचे सर्वस्व होते. एक ‘स्टार क्वालिटी’ असणारा, त्याचबरोबर अभिनयाविष्काराच्या अनेक शक्यता अंगी असणारा एक अत्यंत सक्षम अभिनेता म्हणून डॉक्टरांचे स्थान
रंगभूमीच्या इतिहासात पक्के झाले आहे. मराठी भाषिक नटाने अशी ‘स्टार क्वालिटी’ मिळवणे व ती वर्षानुवर्षे टिकवून ठेवणे, हे सोपे नक्कीच नव्हते. आपल्या रंगभूमीच्या इतिहासात अशी पात्रता अंगी असणारे किती नट होऊन गेले? किती उदाहरणे दाखवता येतील?
आपण ‘स्टार’ आहोत हे डॉक्टर स्वत: कधीही विसरले नाहीत. थोरामोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या ठायी ते नम्र असत; पण एरवी मात्र एक व्यक्ती म्हणून, उत्तम डेंटिस्ट आणि अभिनेता म्हणून त्यांनी अहंकार सतत जपला, नव्हे, त्याला सतत कुरवाळून, आंजारून-गोंजारून तो अखेरपर्यंत फुलत ठेवला. त्यांच्या नावाची जाहिरात करताना ‘…आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर’ अशी करण्यात येत असे. म्हणजे नाटकातले बाकीचे नटनट्या, मग ते कितीही ज्येष्ठ वा कसलेले असोत, ते सगळे एका
ओळीचे मानकरी आणि डॉक्टर मात्र त्यापेक्षा कुणीतरी वेगळे! ते नाव अलगपणे घेतल्याशिवाय त्या ओळीची जशी पूर्तता होणार नाही, तसेच डॉक्टर तिथे असल्याशिवाय नाटक सफल, संपूर्ण होणार नाही, असेच त्यांना त्यातून सुचवायचे असे ना? डॉक्टरांनी इतरांपासूनचे आपले वेगळेपण कसोशीने जपले. स्वत:मधल्या कलाकाराची अस्मिता स्फुलिंगासारखी सतत जागती ठेवण्यासाठी, ती प्रखर करण्यासाठी त्यांनी असे मार्ग शोधून काढले होते. घरात ते सर्वांशी अतिशय मिळूनमिसळून वागत. तरीही ते ‘ते’ आहेत आणि आम्ही बापडे ‘आम्ही’च आहोत, हे कधी विसरता येत नसे.
डॉक्टर एक कलावंत म्हणून उमदे होतेच, तसेच ते माणूस म्हणूनही उमदे, मनस्वी आयुष्य जगले. स्वत:च्या मनाला जे पटेल तेच करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळे लोक त्यांना हट्टी, दुराग्रही समजत. त्यांच्याबद्दल अनेक अफवा, गैरसमज पसरत वा जाणूनबुजून पसरवले जात; पण डॉक्टरांनी कधी त्याची पर्वा केली नाही. आपल्या मस्तीत, धुंदीतच ते जगत राहिले. प्रेक्षकांनी त्यांच्यावर जे भरभरून प्रेम केले त्यातच ते खूष असत. मध्यंतरी त्यांची नाटके कमी झाली. एखादेच ‘गुंतता हृदय हे’ किंवा ‘तुझे आहे तुजपाशी’चे प्रयोग लागायचे; पण त्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडायच्या. बेळगावसारख्या मिश्र भाषिकांच्या गावातदेखील ‘काशीनाथ घाणेकर काय काम करतंय हो… ‘ म्हणत नाटकवेड्या मंडळींची गर्दी होत असे.
आपल्या सर्वांच्या आवडत्या पुलंचे ‘तुझे आहे तुजपाशी’ मी हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरदेखील पाहिले. ते पाहताना
डॉक्टरांची आठवण हमखास यायची अन् वाटायचे,
‘छे! हे काही श्याम नव्हेत. श्याम म्हणजे डॉक्टरच!’
डॉक्टरांनी ’रायगड’ सोडल्यानंतर अनेक कसलेल्या नटांनी ती जागा भरून काढायचा किती तरी प्रयत्न केला; पण डॉक्टरांच्या संभाजीचा तो आवेश, ती भावनापूर्ण संवादांची फेक, आबासाहेब हे जग सोडून गेल्यानंतरचा तो तडफडाट, हे सर्व अगदी एकमेवाद्वितीय असेच होते. त्यांनी बोलता बोलता एकदम गर्दन रोखून पॉज घेतला आणि भुवई उंचावली की प्रेक्षक श्वास रोखून आता पुढे कोणता स्फोट होणार, त्याची वाट बघू लागत; हे मी स्वतः प्रेक्षागृहात कितीतरी वेळा अनुभवले आहे. जगज्जेत्या सिकंदराबद्दल असे म्हणतात की,
‘ही केम, ही सॉ अॅण्ड ही कॉन्कर्ड…’
डॉक्टरांच्या नजरेतली जरब सिकंदरच्या नजरेतील जरबेप्रमाणे प्रेक्षकांवर हुकूमत गाजवत होती. त्यांना जिंकून कायमचे गुलाम बनवून टाकत होती.
डॉक्टरांना किती तरी करायचे होते. अनेक किल्ले जिंकायचे होते. कांचनताईला उशिरा का होईना हनिमूनला परदेशी घेऊन जाण्यापासून ते रवी वर्मा अन् हॅम्लेट रंगवण्याची अनेक स्वप्ने त्यांनी वर्षानुवर्षे मनातल्या खोल तळात जपून ठेवली होती. रवी वर्माने त्यांना त्या काळात इतके झपाटून टाकले होते की उठताबसता त्यांच्या तोंडी हा एकच विषय असे. आपल्या कादंबरीचे नाट्यरूपांतर लवकरात लवकर करावे, यासाठी त्यांनी दादांच्या (रणजित देसाई) पाठी नुसता ससेमिरा लावला होता. त्याला कंटाळून मी त्यांना म्हटले,
‘डॉक्टर, तुम्ही रवी वर्मा म्हणून कसे शोभाल? तो तर केरळाईट आणि तुमचा रंग तर असा कोकणस्थी…’
माझ्या या वक्तव्यावर त्यांनी मला जे काही प्रेमळ आहेर दिले, ते इथे न सांगितलेलेच बरे! पण माझी खात्री होती की वेळ आल्यावर त्यांनी या भूमिकेसाठी काळा मेकअप जरूर केला असता आणि हॅम्लेटच्या भूमिकेसाठी मोठ्या उत्साहाने तलवारबाजी शिकून घेतली असती. असा हा हट्टी माणूस!
जेवढा हट्टी, तेवढाच प्रेमळ!