□ खाद्यतेलांचे भाव यापुढेही चढेच राहणार- पाम तेलाच्या किंमतींमध्ये वाढीचे परिणाम
■ आदरणीय नितीन गडकरींना सांगा… ते पाण्यात फोडणी देण्याचं आणि पदार्थ तळण्याचं काहीतरी टेक्निक निश्चित शोधून काढतील आणि त्याची घोषणा करतील!
□ केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडून संसदेत येण्याजाण्यासाठी सायकलचा वापर; आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायाम म्हणून सायकल चालवत असल्याचे प्रतिपादन
■ त्यांच्याच राजवटीतले पेट्रोल आणि डिझेलचे दर त्यांनाही परवडत नाहीत, असं ते बिचारे सांगतील तरी कसे?
□ रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालांशी; केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्यावर कारवाईची मागणी
■ या कुलदीपकांना रस्त्यांसाठी गुळगुळीतपणाचीच उपमा द्यायची होती तर स्वत:च्या मेंदूंची तरी द्यायची, असलं काहीतरी सुचत असेल तर मेंदूवर सुरकुत्या असण्याची शक्यता कमीच आहे.
□ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिमानाने स्वत:ला देशाचे सेवक म्हणवतात; काही लोक मात्र स्वत:ला मालक समजतात- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
■ या तथाकथित सेवकाचा रोजचा बदलता कपडेपट, रंगपट, आलिशान राहणीमान सांभाळता सांभाळता खर्या मालकांच्या म्हणजे जनतेच्या हातात भिकेचा कटोरा आलेला आहे, त्याचे काय?
□ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणारा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, झुकणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
■ दिल्लीची थुंकी झेलणार्या दुतोंडी महाराष्ट्रद्रोह्यांची वळवळ ठेचायला मराठीजन समर्थ आहेतच!
□ मार्च महिन्यात गुड न्यूज मिळणार, कोरोना निर्बंध आणखी शिथील होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
■ गेल्या होळीला घातलेले साकडे या होळीला तरी पूर्ण होऊ दे रे देवा म्हाराजा!
□ २०२४ साली मोदी सरकार ४०० जागांनी निवडून येणार : चंद्रकांत दादा पाटील
■ कुठे? व्हेनेझुएलात? आधी उत्तर प्रदेश, उत्तराखंड राखा.
□ देशात परिवर्तनाची गरज असून त्यादृष्टीने विरोधकांची एकजूट होते आहे : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या उपस्थितीत ग्वाही
■ राष्ट्रीय पातळीवरचे सुडाचे राजकारण मोडून काढण्यासाठी शिवसेनेला पुढाकार घ्यावाच लागणार, कळीची भूमिका बजावावीच लागणार. त्याचीच ही नांदी आहे.
□ बारसाठी जन्मतारखेचा घोळ; एनसीबीचे समीर वानखेडे फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी
■ जैसी करनी, वैसी भरनी
□ ठाण्यात अखेर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचं ठरलं, भाजपला धाकधूक
■ महाविकास आघाडीत काड्या सारून फाटाफूट घडून येत नाही, तर टेन्शन येणारच ना!
□ मुंबई महानगरपालिकेचे स्पेशल ऑडिट करायला हवे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
■ तो पीएम केअर्स नावाचा खासगी फंड आहे, त्याचं झालं का हो ऑडिट देवेंद्रजी?
□ लग्न असेल तरी श्रेय घ्यायचे, मुलगा झाला तरी श्रेय घ्यायचे अशी काहींची कार्यपद्धती : देवेंद्र फडणवीस यांची टीका
■ यूपीएच्या काळातल्या योजनांची नावं बदलून खपवणार्या केंद्र सरकारबद्दल असं बोलू नका देवेंद्रजी! मोदीजींना काय वाटेल?
□ सीएएविरोधी आंदोलकांविरुद्धच्या उत्तर प्रदेश सरकारच्या दंडात्मक कारवाया सुप्रीम कोर्टाकडून रद्द, परतावा देण्याचे आदेश
■ आता ‘द्वेषद्रोही’ सर्वोच्च न्यायालयाला कुठे पाठवणार भक्तगण, इस्लामाबादला?