हास्यजत्रेला ज्यांनी जन्म दिला ते दोन निर्माते-दिग्दर्शक आणि लेखक हे एक नव्हे ‘दोन’ सचिन आहेत, एकाचं नाव आहे ‘सचिन गोस्वामी’ आणि दुसर्याचं ‘सचिन मोटे’. एक खानदेशातल्या धुळ्याचा, तर दुसरा पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारचा. महाराष्ट्रातल्या दोन वैविध्यपूर्ण भागातून, अगदी खेड्यातून ही दोन मुलं एकत्र येतात आणि ही ‘जत्रा’ सुपरहिट करतात, यामागे मोठा खटाटोप आहे.
– – –
सचिन या नावातच जादू आहे. सचिन नाव असलेले फारच कमी लोक असे आहेत की ज्यांनी काही पराक्रम नाही केला. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर. त्याचे वडील प्रख्यात कवी आणि प्राध्यापक रमेश तेंडुलकर हे ख्यातनाम संगीतकार सचिनदेव बर्मन यांचे चाहते, सचिनदांच्या नावावरून सचिनचे नाव ठेवले गेले. तीच गोष्ट मराठी चित्रपटांचे ख्यातनाम निर्माते शरद पिळगावकर यांची. तेही सचिनदेव बर्मन यांचे चाहते. त्या काळात सचिन हे आधुनिक वाटावे असे नाव होते. ते त्यांनी त्यांच्या मुलाचे ठेवले, पुढे तोही मुलगा ‘मास्टर सचिन’ या नावाने मराठी-हिंदी चित्रपटात गाजला आणि पुढे सचिन पिळगावकर म्हणून मराठी-हिंदी चित्रपटात दिग्दर्शक म्हणून नावाजला जातोय. इतकेच नव्हे तर शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याही आधी त्याने चित्रपटसृष्टीत सुवर्णमहोत्सव साजरा केला. सर्वदूर कीर्ती पसरलेले हे तीन सचिन सर्वश्रुत असले तरी आपल्या आजूबाजूचे काही सचिन नीट निरखून पहिले तर ते काही ना काही पराक्रम करीत असलेले दिसतीलच. अलीकडे मराठी मालिकाविश्वात एक नव्हे, दोन सचिन धुमाकूळ घालताहेत. ‘सोनी’ या नव्याने सुरू झालेल्या मराठी चॅनलवर नव्याने सुरू झालेली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघता बघता प्रचंड लोकप्रिय झाली. बघता बघता एवढ्याचसाठी की मराठी रसिक तर ही ‘हास्यजत्रा’ परत परत बघतातच, पण साक्षात अमिताभ बच्चनही ती बघतात आणि त्यातल्या कलाकारांना भेटायची इच्छाही प्रकट करतात. लतादीदीही ती पाहायच्या. ५०० भागांपर्यंत पोचलेली ही मालिका एवढा पराक्रम गाजवू शकते याचं श्रेय टीमवर्कला तर आहेच, त्यातल्या कलाकारांना आहे, चॅनलला आहे, समोर बसून हसणार्या सेलेब्रेटींनाही आहे; पण माझ्या मते ही सर्कस सिद्धहस्तपणे एका तंबूखाली पेलून धरणार्या निर्माता-दिग्दर्शक आणि लेखकांनाही आहे.
या हास्यजत्रेला ज्यांनी जन्म दिला ते दोन निर्माते-दिग्दर्शक आणि लेखक हे एक नव्हे ‘दोन’ सचिन आहेत, एकाचं नाव आहे ‘सचिन गोस्वामी’ आणि दुसर्याचं ‘सचिन मोटे’. एक खानदेशातल्या धुळ्याचा, तर दुसरा पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारचा. महाराष्ट्रातल्या दोन वैविध्यपूर्ण भागातून, अगदी खेड्यातून ही दोन मुलं एकत्र येतात आणि ही ‘जत्रा’ सुपरहिट करतात, यामागे मोठा खटाटोप आहे. त्यांनी एक पहाड खोदला आणि तो खोदता खोदता दोन वेगळे बोगदे तयार झाले आणि नेमके ते एकमेकांसमोर उघडून पुढे एक यशस्वी महामार्ग तयार झाला आणि तो या ‘हास्यजत्रे’पर्यन्त येऊन ठेपला.
काही भागीदार्या मैत्रीतले संबंध बिघडवण्यासाठी झालेल्या असतात, तर काही केवळ पैशाच्या हव्यासापोटी होतात, तर काही पुढे कोर्टकचेर्या करण्यासाठी जुळून येतात. काही भागीदार्या ‘युती’ म्हणून गाजतात तर काही ‘आघाडी’ म्हणून राज्य करतात. पण हे दोघे एकत्र आले ते एका विशिष्ट आनंदासाठी, एकाला आलेली स्वतंत्र ऑफर त्याने मित्राला, सहकार्याला बरोबर घेऊन प्रत्यक्षात आणली आणि त्याचं या प्रचंड यशाच्या महामार्गात रूपांतर झालं.
धुळ्यातला सचिन लहानपणापासून बडबड्या. लहानपणी केवळ खूप बोलतो म्हणून तो शाळेतल्या शिक्षकांचा आवडता होता. त्याच एका स्वभावामुळे शाळेत ‘मिशीविना शिवाजी’ या नाटुकल्यात त्याला भूमिका मिळाली. ती त्याने चोख पाठांतर करून केली. ती स्नेहसंमेलनापुरती होती. त्याला नाटक म्हणतात हेही त्याला माहिती नव्हते. खानदेशात तेव्हा नाटक हा प्रकारच रूजला नव्हता. तशात हा सचिन गोस्वामींच्या घरात जन्मला तरी त्याचे वडील धुळ्याच्या टॉवर बागेत हेड माळी होते आणि आई शाळेत शिक्षिका. त्यांना वाचनाची आणि कवितांची आवड, त्यामुळे घरात सुसंस्कृत वातावरण. पण धुळ्यातल्या अत्यंत गजबजलेल्या वस्तीत राहणं, तिथे पैलवान लोकांची वस्ती फार. त्यामुळे युक्तीपेक्षा शक्तीचाच विचार जास्त. तशात जे अपवाद होते त्यात सचिनची गणना होऊ लागली. घरातल्या वातावरणामुळे शक्तीकडे नवळता युक्तीकडे खेचला गेला आणि धुळ्यातल्या लोकसेवा दलाच्या कार्यक्रमाची त्याला ओढ लागली. तिथल्या व्याख्यानांसाठी नानासाहेब गोरे, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे भारावून टाकणारे वक्ते यायचे, त्याचा परिणाम सचिनच्या व्यक्तिमत्त्वावर अगदी बालवयातच झाला. शिवाय तो काळ रेडिओचा होता, त्यामुळे नाटक-सिनेमातली गाणी आणि लोकगीतांचा आस्वादही घेता येत होता.
मातृसेवा संघातील शाळेतलं दहावीपर्यंतचं शिक्षण संपलं आणि सचिन धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात गेला आणि तिथून एकांकिका वगैरेंच्या विश्वाची थोडी ओळख झाली. पण एकांकिकांच्या बाबतीत त्या कॉलेजमध्ये सीनियर लोकांची मोनोपॉली होती, त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळत नव्हती. भगवान ठाकूर नावाचे प्राध्यापक होते, ते अत्यंत कडक शिस्तीचे होते, शिवाय ते दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीने पुण्यातल्या स्पर्धेत भाग घेत असत. सुरुवातीची दोन वर्षे सचिनला त्या माहोलपासून नाईलाजाने दूर राहावे लागले. तिसर्या वर्षी मात्र सचिन आणि त्याचा मित्र मनोज वाघ, ठाकूरसरांच्या त्या ऑडिशनला (तेव्हा ‘ऑडिशन’ हे आत्ताइतके जीवनावश्यक गोष्टींमध्ये मोडणारे नव्हते) पंधरा मिनिटं आधीच पोहोचले. ठाकूर सरांनी नोटिस लावली होती की ज्यांना नाटकात काम करायचंय त्यांनी सकाळी आठ वाजता हजर राहावे. सीनियर मुले गाफील राहिली आणि ठाकूर सरांनी साताठ मिनिटं वाट बघून वर्गाचे दरवाजे बंद केले, आणि तिथे जी कोणी मुले हजर होती त्यांनाच घेऊन एकांकिका करायचे ठरवले. त्यात सचिन आणि मनोज निवडले गेले. ती एकांकिका ठाकूर सरांनी स्वत:च लिहिली होती, ‘व्यर्थ न हो बलिदान’. अनंत कान्हेरे यांच्या जीवनावर आधारित. त्यातल्या ब्रिटिश अधिकार्याची भूमिका सचिनला मिळाली, कारण तो बर्यापैकी उजळ रंगाचा होता आणि ब्रिटिश बनण्यासाठी थोड्याशा मेकपने त्याचा रंग खुलणार होता. ती एकांकिका पुणे विद्यापीठातल्या स्पर्धेत पारितोषिक विजेती ठरली आणि अशाप्रकारे सचिन गोस्वामीमध्ये नाट्यकिड्याने प्रवेश केला. आणि मग डोक्यात फिट बसले की आता याचे रीतसर शिक्षण घेतले पाहिजे, म्हणून मग एनएसडी, दिल्लीला प्रवेश घेऊन शिकण्याचे मनात आले. परंतु शैक्षणिक अटी पूर्ण न झाल्यामुळे तिथे अॅडमिशन मिळाले नाही म्हणून मग औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यविभागात सचिनने प्रवेश घेतला.
त्या मानाने धुळ्यापेक्षा सातारा हे शहर जास्त पुढारलेलं, पुणे-कोल्हापूरच्या मधलं असल्यामुळे बर्यापैकी सुधारलेलं. ‘सचिन मोटे’ हा या शहरातला. वडिलांचं किराणा मालाचं दुकान, पण घरांत एकूण नाटक-सिनेमाविषयी पोषक वातावरण होतं. लहानपणापासून सचिनला गोष्टी सांगायचं भयंकर वेड. एखादी गोष्ट रंगवून सांगणं हा त्याचा हातखंडा होता. शाळेत सुद्धा एखादा ऑफ पिरीयड असला तर क्लासटीचर सचिनला वर्गात उभं करून गोष्ट सांगायला लावायचे. मग सचिन ती गोष्ट रंगवून रंगवून, वाढवून वाढवून सांगत असे. अगदी कितीही दिवस ती वाढवून सांगणे त्याला जमत असे. पुढे मालिका लिहिताना ही सवय त्याला उपयोगाला आली. घरात सगळ्यांनाच सिनेमाची आवड. त्याचा मामा तर सिनेमाच्या वेडाने झपाटलेला होता. त्याने ‘आनंद’ हा राजेश खन्ना, अमिताभ यांचा सिनेमा अख्खाच्या अख्खा लिहून काढला होता, तो सुद्धा आठवून आठवून. आणि तो मधूनच ते स्क्रिप्ट वाचून दाखवायचा आणि सचिनला म्हणायचा की तू सिनेमात जा, त्याचं रीतसर शिक्षण घे, पुण्याच्या एफटीआयआयला जा. पण सचिनला ते शक्य नव्हते. त्याने बी.फार्म करावे अशी मोठ्या भावाची इच्छा आणि नंतर सातार्यात मेडिकल स्टोअर सुरू करावे अशी योजना. त्यादृष्टीने एक वर्षाच्या कोर्ससाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे एका एकांकिकेत भाग घेतला आणि त्यावेळी त्याला वाटले की हे काहीतरी करण्यासारखे क्षेत्र आहे, म्हणून मोठ्या भावाकडे तो व्यक्त झाला. त्याने त्याला प्रोत्साहन दिले आणि पुण्याला पाठवले. बी फार्मचा एक वर्षाचा कोर्स झाल्यावर सचिन पुण्यात एक मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी करू लागला आणि तिथे त्याला संध्याकाळी नाटकांच्या ग्रुप्समध्ये काही ना काही करायची संधी मिळाली. त्याचबरोबर त्याने पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयात वि. भा. देशपांडे यांचा नाट्यप्रशिक्षणाचा कोर्सही केला. त्यामुळे थोडी उमेद मिळाली आणि त्यानंतर महाराष्ट्र कलोपासक संस्थेने सत्यदेव दुबेंचे शिबिर आयोजित केले होते, ती तिन्ही शिबिरे सचिनने पार पाडली. मुळातच अबोल असलेला सचिन मागे मागे असायचा. या वर्कशॉपमुळे त्याची भीड चेपली आणि जरा जरा तो व्यक्त होऊ लागला. पुण्यात बर्यापैकी स्पर्धा, एकपात्री वगैरे करत असताना अचानक मामांचे निधन झाले त्यामुळे त्याला सातार्याला परतावे लागले आणि वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानात उभे राहावे लागले. तिथे त्याचा मित्र नितीन दीक्षित, त्याने सचिनला त्याच्या नाट्यसंस्थेत येणार का विचारले. मोठ्या उत्साहाने सचिन त्याच्या नाट्यसंस्थेत गेला, तर तिथे नितीन आणि सचिन असे दोघेच त्या संस्थेत होते. आणखी दोघे त्यांना नंतर मिळाले, अशी चौघांची नाट्यसंस्था झाली आणि त्यातून त्यांनी बर्यापैकी एकांकिका-नाटके करायला सुरुवात केली. सचिनचे किराणा मालाचे दुकान हाच त्यांच्या नाटकाचा अड्डा झाला. यांच्या रिहर्सल चालायच्या आणि गिर्हाइक ताटकळत उभे राहायचे, त्यातून लक्ष गेले तर काही माल विकला जायचा. गल्ल्यावर पण मित्रच बसलेले असायचे. पुढे नाटकातून धंद्यात लक्ष जाईना, मग दोन-तीन वर्षांनी सचिनने संजयला, मोठ्या भावाला सांगितले की मी वर्षभर मुंबईत जाऊन प्रयत्न करतो, काही जमलं तर ठिकाय, नाहीतर परत येईन. त्यावेळी सातार्यात थिएटर अकादमीची नाटके यायची तसेच व्यावसायिक नाटकेही मोठ्या प्रमाणात यायची. पुरुषोत्तम बेर्डे, विनय आपटे, विजय केंकरे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी अशी नावे मुंबईत गाजत होती, त्यांना भेटून काही करता आले तर पाहू, औरंगाबादहून चंद्रकांत कुलकर्णी धाडस करून मुंबईत जाऊन आपलं नाटक उभं करतो तर तोच आदर्श आपण का बाळगू नये, असे म्हणून सचिन मोटे मुंबईला निघाला.
खरे तर ‘ब्रेक के बाद’ हे सदर लिहायला घेतले ते ज्यांनी माझ्याबरोबर नाट्य-चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला किंवा, ज्यांनी माझ्याबरोबर आपली कारकीर्द सुरू केली, किंवा ज्यांना माझ्या नाटकांत भूमिका करून पुढच्या करकीर्दीसाठी मार्ग मोकळा झाला, अशा कलावंतांबद्दल लिहिण्याच्या उद्देशाने. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी माझ्या कोणत्याच नाटकात काम केले नाही की माझ्यासाठी काही लिहिलेही नाही. मग मी त्यांच्याबद्दल या सदरात का लिहितोय? याचं कारण एकच, की मला त्यांच्या एकूण कारकिर्दीच्या सर्जनशील प्रवासाचे वाटलेले कौतुक. अनेक कलाकार या मुंबईत येऊन प्रचंड संघर्ष करून यश मिळवतात. त्या संघर्षाच्या काळात अनेक मान-अपमान सहन करावे लागतात, अनेक वेळा यश हुलकावणी देऊन निघून जाते. कित्येक वेळा संघर्ष अर्ध्यावर टाकून पळून जावे लागते. किंवा उद्योग तरी बदलून गेलेला असतो. पण या दोघांच्याही संघर्षाच्या काळात हे दोघेही मला वेगवेगळ्या पद्धतीने भेटून गेले होते आणि त्यातून एकत्र न येता सुद्धा त्यांच्या प्रवासातला मी एक वाटेत भेटलेला वाटसरू होतो.
‘नाट्यदर्पण’ने ‘कल्पना एक आविष्कार’ अनेक ही नाट्यस्पर्धा काही वर्षे घेतली होती, त्यातल्या एका स्पर्धेला मी परीक्षक होतो. त्यात दोन मुलांनी अतिशय सुंदर एकांकिका सादर केली. एक, जो त्या एकांकिकेचा लेखक आणि अभिनेता होता, विलास पडळकर आणि दुसरा अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी. सर्व पुरस्कार त्या एकांकिकेला दिले. त्यानंतर मी सचिन गोस्वामीला एका नाटकासाठी बोलावले होते, त्यातल्या दुसर्या भूमिकेसाठी आनंद इंगळे याची निवड केली होती. ते नाटक होते ‘कुरकुर’. तो विषय माझ्या डोक्यात अनेक महिने रेंगाळत होता, त्यावर संजय पवारने नाटक लिहावे आणि त्याचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णीने करावे व मी त्याची निर्मिती करावी अशी योजना होती, परंतु नाटक झालेच नाही. पुढे त्याच विषयावर पाच वर्षांनी मी नाटक लिहिले ते ‘जाऊ बाई जोरात’…
पहिला ब्रेक
सचिन गोस्वामी औरंगाबादहून मुंबईत आला ते एकदम ९२च्या दंगलीत. त्याला आमदार निवासात आसरा मिळाला, तिथून विद्यापीठात रोज चालत जात असे, कारण बससाठी पैसे नसत. एकेक काम मिळत गेले, पुढे ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या नाटकांतही काम मिळाले आणि त्याच नाटकात सविता खोसे हिच्याशी ओळख होऊन पुढे त्याचे रूपांतर सहजीवनात झाले.
तीच गोष्ट सचिन मोटेची, मला असाच एकदा फोन आला, ‘मी सातार्याहून आलोय, एक रंगकर्मी आहे, मला तुम्हाला भेटायचे आहे.’ मी जनरली त्यावेळी कोणाचेही फोन उचलत असे, आणि एखादा स्ट्रगलर असेल तर त्याला नाराज करीत नसे, आजही अशा लोकांना होईल तेवढी मदत करतो. मी त्यावेळी त्याला ऑफिसमध्ये भेटायला बोलावले. ‘मी सचिन मोटे, सातार्याहून आलोय, तुमचं काही नवीन नाटक वगैरे सुरू करणार असाल तर मला सहायक म्हणून तुमच्याबरोबर काम करायचेय… त्यावेळी नेमकं मी एन. चंद्रा यांच्या ‘घायाळ’ या चित्रपटावर काम करीत होतो, पण त्यालाही वेळ होता. नाटकही नव्हते. त्याच्यासमोर विजय केंकरेला फोन लावला आणि त्याला सांगितले की असा असा मी एक मुलगा पाठवतोय, तुझ्या नवीन नाटकात बघ कुठे अॅडजस्ट होतोय का…’ सचिन मोटे त्याला जाऊन भेटला, एकाला एक लागून तो मुंबईत नाटकांत काम करू लागला… पुढे काही वर्षांनी एक नाटक आले.. ‘एक डाव भटाचा..’ लेखक सचिन मोटे, दिग्दर्शक सचिन गोस्वामी… ते नाटक म्हणजे पुढे धुमाकूळ घालणार्या ‘हास्यजत्रे’ची नांदी होती…
दुसरा ब्रेक
सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची छुपी भागीदारी सुरू झाली ती मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल नाट्यशाखेत.. तिथून सचिन मोटेला त्याच्यातला लेखक सापडू लागला. अभिनय करता करता दोघेही कधी लेखन, तर कधी दिग्दर्शन करीत राहिले. त्यानंतर हे नाटकाचं माध्यम बदलून ते कधी टेलिव्हिजनमध्ये प्रवेश करते झाले ते त्यांचं त्यांनाच कळले नाही. समोर आलेली संधी ओळखून त्याचा फायदा घेऊन सचिन गोस्वामी मल्टिकॅमेरा सेटअपवर दिग्दर्शक म्हणून बसू लागला. वेगवेगळ्या चॅनेल्सची कामे करीत राहिला. राकेश सारंग निर्मित ‘फु बाई फु’ या स्टँडप कॉमेडी शोमध्ये पुन्हा दोघे एकत्र आले. त्या शोचे ग्रुमिंग करता करता त्या शोचा महत्वाचा भाग बनले. लेखक-दिग्दर्शक बनले आणि यथावकाश निर्मातेही बनले.
मध्येच त्या दोघांनी ‘एक डाव भटाचा’ नाटकावर आधारित ‘मस्त चाललंय आमचं’ हा मराठी सिनेमाही केला. एका बाजूने सचिन गोस्वामी झी, ई टीव्ही, कलर्स अशा वाहिन्यांसाठी शो करीत होता, ते गाजत होते, त्यात ‘फु बाई फु’, ‘कोण होणार करोडपती?’, ‘हास्यसम्राट’, ‘खुपते तिथे गुप्ते’ यांसारखे अनेक गाजलेले शो सचिन गोस्वामीने केले. दुसर्या बाजूने सचिन मोटे गुरू ठाकूरबरोबर ‘हास्यसम्राट’ लिहीत होता, तर आशिष पाथरे, राजेश देशपांडे यांच्याबरोबर अनेक मोठमोठ्या इवेंट्सच्या स्किट्सचे लिखाण करीत होता. हिंदी मालिकेत त्याला मोठा ब्रेक मिळाला. ‘आर. के. लक्ष्मण’ या हिंदी मालिकेने त्याला नाव आणि आर्थिक स्थैर्य दिले. पुढे दुसर्या एक हिंदी मालिकेसाठी त्याने काम केले, पण त्यांच्याकडून खूपच विचित्र मागणी आणि डिक्टेशन होऊ लागल्यामुळे कंटाळून त्याने हिंदी मालिका सोडून घरी बसणे पसंत केले. त्या गॅपमध्ये पुन्हा एकदा सचिन गोस्वामीबरोबर ‘आमच्या हिचे प्रकरण’ नावाचे नाटक केले.
ब्रेक के बाद
सचिन गोस्वामीच्या एकूण कामावर खूश होऊन ‘कलर्स मराठी’ने त्याला निर्माता होण्याची ऑफर दिली आणि ती संधी सचिनने सोडली नाही. त्यासाठी एकटा निर्माता न होता स्वत:बरोबर सचिन मोटेलाही घेतले.. मोटे हो ना करीत त्याच्या बरोबर उभे राहिले आणि दोघांनी मिळून भागीदारीत ‘वेट क्लाऊड’ ही कंपनी स्थापन करून ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ही स्टँडप कॉमेडी सुरू केली. त्यात वैभव मांगले, विशाखा सुभेदार, समीर चौघुले, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, अरुण कदम, अंशुमन विचारे, अतुल तोडणकर वगैरे जबरदस्त कलाकार ‘बुलेट ट्रेन’ गाजवत राहिले… चारशे यशस्वी भागानंतर ती मालिका बंद केली. २०१७मध्ये सोनी मराठी हे नवे चॅनल सुरू झाले आणि त्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांना घेऊन सुरू केली. आणि या जत्रेने तमाम मराठीच नव्हे तर सर्व भाषिक रासिकांना वेड लावले. आज घराघरात मालिका बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पण, ‘नको त्या मालिका, नको त्या बातम्या, नको ते क्रिकेट’ अशाही भावना असलेला एक प्रेक्षकवर्ग आहे. अशा अनेकांनी या हास्यजत्रेसाठी पुन्हा टेलिव्हिजनवरची धूळ झाडली. इतकेच नव्हे तर सोशल नेटवर्कवर या जत्रेचे तुकडे प्रचंड प्रमाणात बघितले जातात. एकेकाळी पुलंची पुस्तके वाचताना वाचक एकटाच खुदकन हसायचा. आता मोबाइलवर ही ‘हास्यजत्रा’ बघताना, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळा कॉलेजात, शेतात, घरात, पार्लरमध्ये, सलोनमध्ये, हेडफोन लावून एकटेच किंवा समूहाने हसत असतात. हा एक नवीनच विक्रम साजरा होत आहे. ‘सोनी मराठी’च्या अमित फाळकेनी तर प्रत्यक्ष अमिताभ बच्चन यांची सर्व कलाकारांशी भेट घडवून आणली. कारण बच्चनसाहेब घरी असले तर ही जत्रा न चुकता बघत आणि त्या कलाकरांना भेटावे असे त्यांनाच प्रकर्षाने वाटू लागले. प्रत्यक्ष लतादींदीनी पत्र पाठवून स्वहस्ताक्षरात सर्वांचे कौतुक केले. अशोक मुळ्येंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन्ही सचिन आणि सहकलाकारांचा वर्षा बंगल्यावर सत्कार घडवून आणला. अनेक महत्वाच्या लोकांपासून ते अगदी सामान्य प्रेक्षकांनीही मालिका प्रचंड यशस्वी करून दिली असून सुद्धा, ऐन पाचशेव्या भागानंतर ती बंद होत आहे, हा संयम एकूणच वाखाणण्यासारखा आहे.
यातील समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता, वनिता, गौरव मोरे, प्रभाकर मोरे आणि पॅडी कांबळे, आणि लेटेस्ट ओंकार भोजने, सायली परब आणि इतर सर्व… हे एकापेक्षा एक सरस कलाकार त्यात मोहून टाकणार्या टायमिंगसकट प्रचंड हसवत असतात. २०१७ साली सुरू झालेली ही ‘जत्रा’, मध्यंतरीच्या लॉकडाऊनच्या काळात घरात अडकून पडलेल्या अनेक कुटुंबांचा मोठ्ठा विरंगुळा झाली. त्या भयानक टेन्शनच्या काळात ‘हास्यजत्रेने’ लोकांना रिलॅक्स करण्याची फार मोठी कामगिरी केली.
तीन तासांचे एक विनोदी नाटक लिहिताना तोंडाला कसा फेस येतो, हे मी अनेकवेळा अनुभवले आहे. इथे तर ही मंडळी चारशे-पाचशे एपिसोड, जे एकेक तासांचे असतात अगदी सहज करून जातात. हा दर्जा राखणे म्हणजे सुळावरची पोळी भाजण्यासारखे आहे. हे अत्यंत कठीण काम मोठ्या शिताफीने करायची जबाबदारी लेखक आणि कलाकारांची जेवढी आहे, तेवढीच सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दोन निर्माता-दिग्दर्शकांचीही आहे. त्यांच्यातला लेखक-दिग्दर्शक सतत जागृत असतो असे जाणवते. वाट्टेल तशा अॅडिशन्स घेण्याचा मोह कलावंतांना होऊ शकतो. त्यासाठी डोळ्यांत तेल घालून राहावे लागत असणार हे नक्की. त्यातल्या संहिता, विषयातलं नावीन्य, त्याची रचना मांडणी याचं काय करीत असतील असा मला प्रश्न पडला.
‘माझी आणि सचिन मोटेची वीस पंचवीस वर्षांपासूनची दोस्ती,’ इति सचिन गोस्वामी, ‘मोटेला गोष्टी खूप छान सुचतात, त्यांचा विस्तार खूप छान जमतो त्याला. आमच्या लेखकांशी आम्ही सविस्तर चर्चा करतो, शिवाय लिखाण झाल्यावर त्यावर भरपूर चर्चा करून त्याचा कीस काढून त्यातला अतिरेक टाळतो किंवा त्यातले धोके आता चटकन लक्षात येतात. शिवाय एक दिग्दर्शक म्हणून हे सर्व कसं चित्रित करायचं याचा आडाखाही आता सवयीने चटकन ठरवता येतो, शिवाय लोकांसमोर दिसणार्या आमच्या कलाकारांची शक्तिस्थळं कशी फुलवावीत आणि त्यांच्यातल्या उणिवा कशा झाकाव्यात याचाही विचार होत असतो. ही एवढी सजगता ठेवल्यामुळे, त्यातला ताजेपणा जपल्यामुळे, कोणाला कुठे थांबवायचे याचा निर्णय घेता आल्यामुळे, ही ‘जत्रा’ पाचशे भागापर्यंत रंजक ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो, असे आता म्हणावेसे वाटते,’ असे सचिन गोस्वामीचे म्हणणे. तर ‘पाचशे एपिसोडनंतर आता केवळ पैसे मिळतात म्हणून करीत रहाणे यात पुढे दिसणारा धोका आम्ही ही मालिका थांबवून टाळू शकतो, असे आता जाणवायला लागले,’ असे सचिन मोटेला वाटते. ‘प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय असते.. मला वाटतं आता ‘लय’ म्हणजे, ‘नाश’ नव्हे, तर थांबायची वेळ आलेली दिसते, या बाबतीत आमच्यात दुमत नाही. या नैसर्गिक चक्राला सामोरं जाऊन आम्ही अगदी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना थांबायचं ठरवलं आहे,’ असं दोघांचही म्हणणं.
सुनील गावस्करांनी ऐन शिखरावर असताना निवृत्ती घेतली. सचिन तेंडुलकरने एकच छोटासा ‘बॅड पॅच’ अनुभवला, पण नंतर आपण विक्रमादित्यच आहोत हे सिद्ध केले. तसेच या दोन सचिननी जत्रेचा तंबू आवरता घेतला असला तरी त्यांच्यातली सर्जनशीलता पुन्हा नव्या जोमाने उफाळून येईल आणि एखाद्या बीजाचे अंकुरामध्ये रूपांतर होऊन त्याचा फळाफुलांनी लगडलेला जसा वृक्ष होतो तसे ते पुन्हा भरभरून देण्यासाठी काहीतरी नवं घेऊन येतील.
कारण हे दोन्ही सचिन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले आहेत, म्हणूनच जमीन खडकाळ असो किंवा सुपीक, त्या जमिनीतून पीक कसे काढायचे, हे दोघांनाही माहिती आहे.