घरगुती पिझ्झा तयार करण्याचा निश्चय पक्का केल्यानंतर आधी सुरू झाले संशोधन. आपल्याकडे मिळणार्या पिझ्झाची चव कशी आहे, त्यासाठी लागणारा उत्तम प्रतीचा कच्चा माल कुठे मिळेल, इथपासून ते कोणत्या चवीचा पिझ्झा खवय्यांना पसंतीला पडू शकतो, याचे संशोधन सुरु केले. मग वेगवेगळ्या चवीचे १० ते १२ प्रकारचे शाकाहारी-मांसाहारी पिझ्झा तयार करणे ते मित्रमंडळी, नातेवाईक यांना खाऊ घालणे, त्यात काय कमी जास्त आहे, हे जाणून घेणे, त्यानुसार बदल करणे, हे प्रयोग नोकरी सांभाळून सात महिने सुरू होते. अखेर २०१७च्या डिसेंबर महिन्यात नोकरीचा राजीनामा दिला.
– – –
अमेरिकेचे आणि पिझ्झाचे नाते जगजाहीर आहे. तिथे राहणारा प्रत्येक माणूस पिझ्झाच्या प्रेमात आहेच. जगभरात प्रत्येक देशात पिझ्झावर प्रेम करणार्या मंडळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. माझा आणि पिझ्झाचा पहिला संबंध आला तो मी अमेरिकेत सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर म्हणून नोकरी करत होतो तेव्हा… म्हणजे १९९७मध्ये. अमेरिकेतल्या मिझोरीमध्ये नोकरी करत असताना सुटीच्या दिवशी मित्रांची गाठ पडायची, मग जेवणखाण, गप्पा असा कार्यक्रम रंगायचा. तिथले मित्र पिझ्झा तयार करायचे… आपणही ते शिकायला हवे अशी एक भावना निर्माण झाली आणि आपसूकच माझे हात पिझ्झा तयार करण्यासाठी वळू लागले. महिन्यातून दोनचार वेळा तरी मी पिझ्झा तयार करायचोच… कधी त्यात खंड पडला तर अगदी चुकल्या चुकल्यासारखे व्हायचे…
नोकरी मस्त चालली होती, महिन्याच्या महिन्याला पगार येत होता, सगळे कसे छान चालले होते. भविष्याचा विचार करताना आपण काहीतरी व्यवसाय सुरू करायला हवा, असा विचार डोक्यात सुरू झाला. २०१७मध्ये या विचाराने उचल खाल्ली. आपण चांगला पिझ्झा बनवू शकतो, तर तोच व्यवसाय सुरू करायला हरकत काय, असं ठरवून त्यात उतरायचे ठरवले. सात महिने त्यावर संशोधन केले आणि डिसेंबर २०१७मध्ये फुजित्सू कंपनीतल्या नोकरीला कायमचा रामराम करून पूर्णवेळ याच व्यवसायात उतरायचे ठरवले. सुरुवातीला थोडी धाकधूक होती- कसे होईल, जमेल का, लोकांना आवडेल का, प्रतिसाद कसा मिळेल; पण आता एकदा उतरायचे ठरवले तर माघार नाही, हे यशस्वी करायचे या ईर्ष्येने मी आणि पत्नी पौर्णिमा असे आम्ही दोघांनी मिळून घरगुती पिझ्झा तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या पाच वर्षांत आमचा पिझ्झा खवय्यांच्या पसंतीला उतरवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.
पूर्वपीठिका
१९९४मध्ये शास्त्र शाखेतून पदवी मिळवल्यानंतर पुण्यातल्या इंडसर्चमधून मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी सुरू केली. पूनावाला फायनॅन्शियलमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम सुरू झाले. आठ-नऊ महिने काम केले असेल तोच एक नवीन संधी आली. डीएसएस या सॉफ्टवेअर कंपनीत दीड वर्ष काम केल्यावर अमेरिकेत संधी चालून आली. २००३मध्ये मी पुन्हा भारतात आलो. त्यानंतर बीएमसी सॉफ्टवेअर, टेक महिंद्रा, इन्फोसिस, फुजित्सू अशा कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणू काम करायला खूप आवडायचे. पण जसजशी माझी प्रगती होत होती, तसतसा मी प्रमोशन मिळून जबाबदारीच्या पदांवर जात होतो. मला ज्या प्रोग्रॅमिंगमध्ये सुरुवातीपासून रस होता ते काम बंद झाले होते. सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर असणार्या फुजित्सू कंपनीत मी ग्रूप हेड म्हणून काम करीत होतो. माझा दिवस सुरु व्हायचा तो सकाळी सहापासून आणि तो संपायचा रात्री अकरा बारा वाजता… आपण हे किती दिवस करणार म्हणून एक फूड जॉइंट घरातूनच सुरू करायचं ठरवलं आणि तयारीला सुरवात झाली….
सात महिन्याचे रिसर्च
घरगुती पिझ्झा तयार करण्याचा निश्चय पक्का केल्यानंतर आधी सुरू झाले संशोधन. आपल्याकडे मिळणार्या पिझ्झाची चव कशी आहे, त्यासाठी लागणारा उत्तम प्रतीचा कच्चा माल कुठे मिळेल, इथपासून ते कोणत्या चवीचा पिझ्झा खवय्यांना पसंतीला पडू शकतो, याचे संशोधन सुरु केले. मग वेगवेगळ्या चवीचे १० ते १२ प्रकारचे शाकाहारी-मांसाहारी पिझ्झा तयार करणे ते मित्रमंडळी, नातेवाईक यांना खाऊ घालणे, त्यात काय कमी जास्त आहे, हे जाणून घेणे, त्यानुसार बदल करणे, हे प्रयोग नोकरी सांभाळून सात महिने सुरू होते. अखेर २०१७च्या डिसेंबर महिन्यात नोकरीचा राजीनामा दिला.
घरगुती पिझ्झाचा प्रचार सुरू केल्यानंतर २०१८मध्ये १८ मार्च रोजी मला पहिली मोठी ऑर्डर मिळाली १० पिझ्झा एका पार्टीसाठी करून देण्याची. तेव्हा घरात गॅस ओव्हन होता, त्यावर पिझ्झा तयार व्हायला वेळ लागायचा. त्यामुळे मनावर खूपच दडपण होते. आपण वेळेत डिलिव्हरी देऊ शकू का, पिझ्झा गरम राहील का, असे एक ना अनेक प्रश्न समोर आ वासून उभे होते. पण सगळे मस्तपणे पार पडले, ज्यांनी ऑर्डर दिली होती त्यांच्याकडून पिझ्झाचे कौतुक झाले. त्यामुळे भविष्यात यश मिळेल, असा एक आत्मविश्वास मनात निर्माण झाला. त्यानंतर माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून ऑर्डर यायला लागल्या, पैसे मिळायला सुरुवात झाली. जून महिन्यात इलेक्ट्रिक विथ पिझ्झा स्टोन असणारा ओव्हन घेतला, त्यात दहा मिनिटांत एकावेळी दोन पिझ्झा तयार व्हायला लागले. त्यामुळे कामाला थोडी गती मिळू लागली. हळूहळू ऑर्डर वाढत होत्या त्यामुळे इन्स्टाग्राम, फेसबुकवर पिझिटोज नावाचे पेज तयार केले. त्यावर पोस्ट टाकायला सुरुवात केली. त्यातून ऑर्डर वाढू लागल्या होत्या. पण आपण रोज फक्त १२ ते १५ पिझ्झाच तयार करायचे हे तत्व मी पहिल्यापासूनच ठरवले होते. कारण ऑर्डर वाढल्या तर त्याचा परिणाम पिझ्झाच्या चवीवर होऊ शकतो, त्यामुळे ते टाळणे आणि उत्तम दर्जाचा पिझ्झा खवय्यांना देण्यासाठी हे बंधन घालून घेतले. व्यवसाय सुरू केलेल्या दिवसापासून आम्ही दोघेजण जवळपासच्या परिसरात पिझ्झा पोहचवायचो. पिझ्झाचा प्रसार होत असताना मला औंध, बाणेर या भागातून ऑर्डर यायच्या त्यावेळेस पिझा पाठवेपर्यंत थंड होईल, ते तुम्हाला चालणार आहे का, असे विचारायचो. पण चवीपुढे कुणाचे काही चालते का? सर, तुम्ही पाठवा आम्ही गरम करून घेतो, अशी सांगणारी मंडळी भेटली, त्यामधून व्यवसायवाढीला मदत झाली.
व्यवसाय २०१९मध्ये चांगला सेट झाला होता. पण २०२०च्या जानेवारीत व्यवसाय थोडा थंडावला. मार्चमध्ये कोरोना आला आणि धंदा पूर्ण शून्यावर येऊन थांबला. मार्च ते मे दरम्यानचा काळ खूपच कठीण गेला. तेव्हा, अनेकजण पिझ्झासाठी फोन करायचे, पण परिस्थितीच अशी होती की कुणाला काही देताच येत नव्हते. मे महिन्यानंतर लॉकडाऊन खुला व्हायला लागला होता. पण पूर्वीसारखे सगळे सुरू झाले नव्हते, कोरोना असल्यामुळे लोक देखील हॉटेलमधून मागवायला घाबरत होते, अशातच पत्नीच्या एका मैत्रिणीचा पिझ्झा हवा आहे म्हणून फोन आला. तेव्हा, आमच्याकडे मैदा नाही असे त्यांना सांगितले. तुम्हाला किती मैदा लागणार आहे, तो मी आणून देते, असे सांगत त्यांनी अवघ्या काही क्षणांत तो आमच्या घरी पोहोचवला आणि तिथून पुन्हा व्यवसाय पिकअप व्हायला सुरुवात झाली.
लाइफस्टाइल बदलणार आहे…
माझी आई शिक्षिका आणि वडील बँकेत काम करायचे. फूडच्या व्यवसायाशी आमचा दुरुनही काही संबंध नव्हता. व्यवसाय सुरू करण्याआधी मी पत्नी, दोन्ही मुली आणि आईला कल्पना दिली होती. नोकरी सोडल्यानंतर लाइफस्टाइल बदलणार आहे, पूर्वीसारखी राहणार नाही, त्याला तुमची तयारी आहे ना, तसे असेल तरच नोकरी सोडेन, असे घरात सांगितल्यावर सगळ्यांनी मला सपोर्ट केला. त्यामुळे मनाने उभारी घेतली आणि हा व्यवसाय सुरू झाला.
असेही अनुभव
पिझ्झा मी घरातून तयार करतो. त्यामुळे बर्याचदा खवय्यांच्या खूप अपेक्षा असतात. एकदा तर एका व्यक्तीने मला पिझ्झाला जो सॉस लावला जातो तो अगदी कडेपर्यंत लावा, अशी सूचना केली होती. त्यावर सर, तसे केले तर पिझ्झाची चव बिघडू शकते, हे त्यांना पटवून द्यावे लागले. पण त्यात खूप वेळ खर्च झाला. तुम्ही घरी पिझ्झा तयार करता तर तो बाहेरच्यापेक्षा स्वस्त मिळावा, अशीही अपेक्षा अनेकजण करत असतात. पिझ्झाची ऑर्डर घेतली की तो कधी नेणार याची विचारणा आम्ही करतो. त्यांना पिझ्झा गरम खाता यावा हा हेतू असतो. पण काही वेळा अचानक त्यांची येण्याची वेळ बदलते, तसे अॅडजेस्ट करावे लागते.
कामानिमित्ताने बाहेरगावी जावे लागणार असेल तेव्हा पिझ्झाच्या ऑर्डरसाठी फोन आला तर तुम्ही पुन्हा आल्यावर आम्ही पिझ्झा घेऊन जातो असे सांगणारे लोक देखील आहेत. पिझ्झा घरीच बनवत असल्यामुळे खवय्येमंडळी त्याला सर्वाधिक पसंती देतात. शिकागो डीप डिश आणि सिसिलिया पिझा पुण्यात फार कुठे मिळत नाही. खास हे पिझ्झा घेण्यासाठी येणार्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या दोन्ही पिझाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. शिकागो डिप डिश पिझ्झा तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. पिझ्झासाठी रोज फ्रेश वस्तूंचा वापर केला जातो.
निओपॉलिटिन स्टाईल पिझ्झा…
इटलीमध्ये निओपॉलिटिन पिझ्झा प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी एकजण भेटले होते, त्यांनी निओपॉलिटिन पिझाचा विषय काढला होता. तेव्हा तो पिझ्झा तयार करण्याचे ठरवले. या पिझ्झाचे पीठ तिप्पट महाग आहे. मुंबईमधील एक कंपनी ते आयात करते. हा पिझ्झा तयार करण्यासाठी फ्रेश मोझरेला वापरला जातो, ते तयार करणारी मंडळी खूप कमी आहेत आणि ते चटकन उपलब्ध देखील होत नाही. पण काही दिवसांपासून हा पिझ्झा बनवायला सुरुवात केली आहे. लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद आहे. नुकतीच टर्किश मिडे (बोट पिझ्झा) हा नवा प्रकार देखील सुरू केला आहे. त्यात पालक, मका, लसूण याचे मिश्रण असते. याखेरीज चिकन खिमा असणारा पिझ्झादेखील उपलब्ध आहे. यात चीजचे प्रमाण कमी असते.
मित्रमंडळींकडून कौतुक
प्रसाद तू आयटीमधून वेळेत बाहेर पडलास, तू सुटलास अशी प्रतिक्रिया मला अनेक मित्रांकडून मिळते. कोरोनाच्या काळात आयटीच्या कामाची शैली बदलून गेली आहे, कामात ताणतणाव वाढले आहे. कामांमधून समाधान मिळत नाही, अशी खंत अनेकजण व्यक्त करत असतात. त्यामुळे वेगळा मार्ग निवडण्याचा आपला निर्णय चुकला नाही, याचे कायम समाधान मला वाटते.
दर्जा टिकवून ठेवायचा आहे, बस्स…
पिझ्झाचा दर्जा मला टिकवून ठेवायचा आहे, त्यात कोणतेही कॉम्प्रमाईझ होता काम नये. सध्या मी आठवड्याला ६०पर्यंत पिझ्झा तयार करतो. ती संख्या मला ८० ते ९०पर्यंत न्यायाची आहे. व्यवसाय करत असताना जगण्यात निवांतपणाही हवा आहे. दर्जा हीच आमची खूण असणार आहे.