महापौर घोड्यावर बसलेत म्हणजे घोडेवाल्यांचा पाठलाग करण्यासाठी असेल, तर चांगला फोटो मिळेल म्हणून मी धावणार्या प्रत्येक घोडेस्वाराकडे बारकाईने पाहात होतो. पण एकही महापौरांसारखा दिसेना. दूरवर गर्दी दिसली. जिथे गर्दी तिथे बातमी! म्हणून जवळ जाऊन डोकावून पाहिले तर महापौर खर्या घोड्यावर नव्हे, तर खोट्या लाकडी घोड्यावर म्हणजे मेरी गो राऊंडवर बसून त्याचे परवानापत्र तपासत होते. ते बनावट असल्याचे सिद्ध झाल्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
– – –
`तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडेच्या भूमिकेने नटवर्य प्रभाकर पणशीकरांना अमाप प्रसिद्धी मिळाली. पुढे याच भूमिकेमुळे मा. छगन भुजबळ यांनाही यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले. तेव्हापासून लोकांनी भुजबळांना कायम लक्षात ठेवले.
राजकीयपटाच्या रंगमंचावर यशस्वी मार्गक्रमण करत असताना ते सामान्य शिवसैनिकाचे नगरसेवक झाले. मुंबईचे महापौर झाले तेही सलग तीन वेळा. मग आमदार, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. `तो मी नव्हेच’चे अनेक प्रयोग त्यांनी केले आणि ते यशस्वी झाले. सीमा प्रश्नाच्यावेळी जे आंदोलन झाले त्यावेळी कर्नाटकाच्या पोलिसांनी प्रवेशबंदी करूनही त्यांनी वेषांतर करून बेळगाव शहरात प्रवेश केला होता. त्यांच्या त्या भूमिकेने पोलिसांनीही तोंडात बोटे घातली होती. मराठी चित्रपटातही त्यांनी उत्कृष्ट भूमिका केली.
१९८८ साली भुजबळ मुंबईचे महापौर असताना त्यांनी वेषांतर करून जुहू चौपाटीवर अकस्मात छापा टाकला होता आणि तेथील अनधिकृत व्यवसाय बंद पाडले होते. त्यावेळी महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्याने काही पत्रकारांना फोन करून मुख्यालयात बोलावले, त्यात मीही होतो. पालिकेच्या मोटारीतून आम्हाला जुहू चौपाटीवर नेण्यात आले. पुढील नाट्य गुप्त ठेवले गेले असले तरी महापौर छापा टाकणार असल्याची कुणकुण मला ड्रायव्हरकडून लागली होती. अतिक्रमणविरोधी पथकाच्या आठ दहा गाड्या रस्त्यावर लांब उभ्या करण्यात आल्या. चौपाटीवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होणार होती. तत्पूर्वी महापौर भुजबळ साध्या वेषात चौपाटीत पाहणी करण्यास आले. सोबत अतिरिक्त आयुक्त राममूर्ती आणि अनेक अधिकारी होते.
चौपाटीवर नेहमीप्रमाणे गर्दी होती. सर्व धंदेवाले व्यवसायात मग्न होते. त्यापैकी कोणाला उचलायचे ते महापौर खूण करून अधिकार्यांना सांगत होते. मी कॅमेरा लपवत त्यांच्या मागून अंतर ठेवून चालत होतो. क्रिकेट खेळणार्या मुलांकडून त्यांनी बॅट घेतली आणि एक दोन चेंडू ऑफ ड्राइव्ह मारले आणि अखेरचा चेंडू सातासमुद्रापार (म्हणजे पाण्यात) मारल्यामुळे तो हरवला आणि खेळ बंद झाला. चौपाटी म्हणजे क्रिकेटचे मैदान नाही, हे त्यांनी हा फटका मारून दाखवून दिले.
चना जोर गरम असे ओरडत चणेवाला टोपली घेऊन आला. महापौरांनी त्याच्याकडून चणे घेतले आणि पैसे दिले. हा फोटो घेताना भैयाला संशय आला आणि तो टोपली टाकून पळत सुटला. पुढे त्याने मला गाठले व हळूच विचारले, भाईसाब ये कौन साहब है? मी म्हटले, ये साहब नहीं मल्याळी पिक्चर के हिरो है। उनका शूटिंग चालू है।
चौपाटीवर बसलेल्या जोडप्यांना काही हिजडे पैशासाठी सतावीत असल्याचे महापौरांनी पाहिले आणि इशारा केला तसे साध्या वेषातील पोलीस त्यांना पकडण्यासाठी धावले, तो फोटो घेण्यासाठी मीही धावलो. खूप दमछाक झाली म्हणून वाळूत बसकण मारली व थोडी विश्रांती घेतली.
दुसरा एक इसम धावत आला. म्हणाला, अहो तिकडे चला… महापौर घोड्यावर बसलेत. फोटो छान होईल. पण घोड्याच्या मागे कोण धावेल? तरी कॅमेर्याचे ओझे घेवून पुन्हा धावत गेलो, पण महापौर दिसेनासे झाले… घोडेवाले घोडे घेऊन सैरावैरा पळत होते. चौपाटीवर घोडे फिरवतात, त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू झाली. एक अधिकारी म्हणाला, रोको रोको, नहीं तो घोडे को गोली मार दूँगा।
महापौर घोड्यावर बसलेत म्हणजे घोडेवाल्यांचा पाठलाग करण्यासाठी असेल, तर चांगला फोटो मिळेल म्हणून मी धावणार्या प्रत्येक घोडेस्वाराकडे बारकाईने पाहात होतो. पण एकही महापौरांसारखा दिसेना. दूरवर गर्दी दिसली. जिथे गर्दी तिथे बातमी! म्हणून जवळ जाऊन डोकावून पाहिले तर महापौर खर्या घोड्यावर नव्हे, तर खोट्या लाकडी घोड्यावर म्हणजे मेरी गो राऊंडवर बसून त्याचे परवानापत्र तपासत होते. ते बनावट असल्याचे सिद्ध झाल्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
लाकडी घोडे व इतर सामान वेगळे करून ते जप्त करण्यात आले. अचानक सुरू झालेल्या धाडसत्रामुळे फेरीवाल्यांची पळापळ झाली. जो तो डोक्यावर ठेला घेऊन पळत सुटलेला. काही अवधीतच सगळी बजबजपुरी नाहीशी होऊन जुहू चौपाटी स्वच्छ सुंदर दिसायला लागली. फोटोही चांगले मिळाले.
भुजबळ महापौर असताना रोज धडाकेबाज कारवाई व्हायची, त्यामुळे आम्ही कॅमेरा घेऊन त्यांच्या मागोमाग असायचो. मी खात्रीने सांगतो, महानगरपालिकेच्या इतिहासात जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवणारा हा एकमेव महापौर असावा. काय केलं म्हणजे रोज प्रसिद्धी मिळेल याचे तंत्र भुजबळांना अवगत असावं. त्यांच्या इतका अॅक्शनबाज नेता मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. ते भाषणाला उभे राहिले की तावातावाने मुद्दे मांडतात, विविध अंगविक्षेप आणि चेहर्यावरील भावमुद्रा मिनिटामिनिटात बदलतात. जसा विषय त्या विषयाला अनुसरून हातवारे करत, डोळे इकडे तिकडे फिरवत, भुवया उंचावत फोटोग्राफरला जे हवे तसे करून दाखवतात.
भुजबळ उपोषणाला बसले तर कॅमेर्यापुढे असा चेहरा पाडतील की तुम्हाला वाटेल साहेब दोनचार दिवस अन्नपाण्यावाचून उपाशी आहेत. आम्हा फोटोग्राफरनाही तेच हवं असतं. त्यांचा कार्यक्रम म्हटला की आम्ही दोनचार मिनिटात मोकळे होतो. नाहीतर इतर नेत्यांच्या भाषणात तास न् तास फोटोच मिळत नाहीत. ते चेहर्यावर काहीच एक्स्प्रेशन देत नाहीत. त्यांच्या फोटोत विजयोत्सव आहे की श्रद्धांजलीची सभा आहे काहीच कळत नाही. मी मी म्हणवणारे नेते कॅमेर्यासमोर आले की गोंधळून जातात. भाषण विसरतात. गंभीर होतात. चेहर्यावर स्माइलही देत नाहीत. आणि कॅमेरा बाजूला झाला की पुन्हा आवेशपूर्ण जोशपूर्ण सिंहाची डरकाळी फोडतात. होतं असं अनेकांचं. त्यांना कॅमेर्याची अॅलर्जी असते. भुजबळांचे तसे नाही. ते आजही वयोमानानुसार पेहराव बदलून कॅमेर्यासमोर येतात. उपस्थितांसमोर मार्गदर्शनपर भाषण करून दोन चार शालजोडीतले देतात. त्यांच्या मतदारसंघातील श्रद्धाळू मतदारांना ते आसाराम बापूंसारखे अध्यात्मिक गुरूही वाटतात.
त्यांनी गिरगाव चौपाटीवर छापा टाकून दणादाण उडवून टाकली, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. चौपाटीवर कचरा टाकणारे, घाण करणारे फेरीवाले, झोपड्या बांधून राहणारे यांना हुसकावून लावले. परवानाधारक भेळपुरी, पाणीपुरी विकणार्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याची पाहणी केली. त्यांना स्वच्छता ठेवण्याची ताकीद दिली. दुसर्या दिवशी राजभवनातील कार्यक्रमासाठी मी त्यांना चौपाटीसमोरच्या रस्त्यावरून जाताना पाहिले. खरेच चौपाटी सुंदर व स्वच्छ झाली होती. पण एक दृश्य पाहून मी अवाक झालो. शाळेचा गणवेष घालून दोन मुले चौपाटीवर अभ्यास करत होती. राजभवनातील कार्यक्रम आटोपून मी पुन्हा माघारी आलो. ती मुले अभ्यासात दंग होती. प्रथम लांबूनच दोन चार फोटो घेतले. जवळ जाऊन त्यांची चौकशी केली. ते घाबरले. त्यांना मी पोलीस वाटलो असेन बहुधा. ते वह्यापुस्तके दप्तरात टाकून पळण्याच्या बेतात होते. त्यांचा हात धरून मीही खाली वाळूत बसलो. इतक्यात समोरून त्यांची आई आली. म्हणाली, अहो, पोरांना काय विचारता? मला विचारा, आमच्या घराची काय वाताहात झाली.
ती सांगू लागली…
माझ नाव सखू रामचंद्र पवार, परिस्थितीमुळे आम्हाला राहातं घर सोडावं लागलं. नवर्यालला अर्धांगवायू झाला. कुठे निवारा नाही म्हणून चौपाटीवर झोपडी बांधून गेली १५ वर्षे राहतोय. मी मोलमजुरी करून मुलांना शिक्षण देते. काल महापौरांनी चौपाटीला भेट दिली. त्यात आमचं झोपडं पाडलं आणि आम्ही उघड्यावर पडलो. ती बोलत असतांना त्यांची उमा नावाची मुलगी मध्येच म्हणाली, पोलीस अभ्यासही करू देत नाहीत. ते अधून मधून येतात आणि इथून उठा म्हणतात. हाकलून देतात. आमची पुस्तके-दप्तरे रस्त्यावर फेकून देतात. दप्तरातून पेन पडलं तर तेही एका पोलिसाने लागलीच खिशात टाकलं. ते शिकू देत नाहीत आणि जेवूही देत नाहीत. सांगा कसं जगायचं? त्याची शोकांतिका ऐकून मला गहिवरून आले. मी त्यांची बातमी फोटोसहित वृत्तपत्रात ठळक प्रसिद्ध केली. चौपाटीच्या भेटीदरम्यान भुजबळांच्या नकळत घडलेली घटना त्यांना माहीत नव्हती. माझ्या बातमीने ते अस्वस्थ झाले. फोटोही बोलका होता. महापालिकेचे सुरक्षा अधिकारी शिसोदीया यांनी वृत्तपत्राकडे खुलासा पाठवला. त्यात म्हटले असे कोणतेही झोपडे पाडले नाही. सखुबाई पवार यांनी मच्छिमार सावंत यांच्या उपस्थितीत लिहून दिले आहे की माझे कोणतेही झोपडे पाडले नाही. तो खुलासा संपादकांनी मला वाचण्यास दिला. त्याची झेरॉक्स प्रिंट काढून मी तात्काळ सखुबाईंना जाऊन भेटलो व जाब विचारला.
त्या म्हणाल्या, कमाल झाली. लोक गरिबाची बघा चेष्टा करतात. मला लिहिता वाचताही येत नाही. तुम्ही माझ्या पोरांचा फोटो छापला त्याच दिवशी म्युनिसिपालटीचे निळ्या कपड्यात लोक (सुरक्षा रक्षक) आले. ते मला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथील पोलिसाने एका कागदावर माझा अंगठा मागितला. मी म्हटलं मला लिहिता वाचता येत नाही, तुम्ही काय लिहिले आहे ते मला ठाऊक नाही, मग अंगठा कसा देऊ? मी दिला नाही.
सखुबाईचे सर्व बोलणे मी एका कागदावर लिहून घेतले त्याखाली तिची सहावीत शिकणारी मुलगी उमा हिची स्वाक्षरी घेतली आणि ते सर्व दस्तावेज संपादकांना दिले. त्यांनी पुन्हा सखुबाईची मुलाखत फोटोसह वृत्तपत्रात छापली. ही बातमी दोनदा छापून आल्यानंतर माझे ज्येष्ठ सहकारी पत्रकार आणि महापौरांचे मित्र प्रभाकर राणे हे माझ्यावर भयंकर संतापले. ते महापौरांची बाजू घेऊन माझ्याशी भांडू लागले. मी जाणून बुजून महापौरांना बदनाम करतो आहे, अशी त्यांची धारणा झाली. त्यांची समजूत घालता नाकात दम आला.
हा सूर्य आणि हा चंद्र…
राणेंना स्कुटरवर घेऊनच मी चौपाटीवर गेलो आणि उमाची भेट घालून दिली. पोलिसाने दप्तर कसे फेकून दिले आणि पडलेले पेन कसे खिशात टाकले ते सर्व तिने राणे काकांना सांगितले. ते ऐकून राणेंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी स्वत:च्या खिशातले पेन आणि पैसे देऊन उमाची समजूत घातली. माझ्या फोटोने गरीब निराधार कुटुंबाच्या दु:खाला वाचा फोडता आली यात मला आत्मिक समाधान तर मिळालेच, पण भुज-बळही वाढले.