‘मार्मिक’ने महाराष्ट्राला व्यंगचित्रांची ताकद दाखवून दिली. ‘मार्मिक’ची अनेक आकर्षणे होती आणि आजही आहेत- पण सर्वात महत्त्वाची आकर्षणं दोन होती, एक होतं ‘मार्मिक’चं मुखपृष्ठ आणि दुसरी होती रविवारची जत्रा. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्याच्या फटकार्यांनी या रविवारी कोणाचा कोथळा निघणार आहे, कोणाचं खरं रूप उघडं पडणार आहे, कोणाच्या दंभाचा स्फोट होणार आहे, याची उत्सुकता वाचकांना असायची. लोक अधाशासारखे या जत्रेवर तुटून पडायचे… त्या काळातही शिवसेनेवर अनेक प्रहार होत होते… मराठी भाषकांच्या हिताची भाषा सलणारे अस्तनीतले निखारे तेव्हाही होते. पण, शिवसेनेचे लढवय्ये कडवट मावळे ही शिवसेनेची ताकद होती. तिच्या बळावर आणि मराठीजनांच्या आशीर्वादाच्या पाठिंब्याने शिवसेनेने हर प्रकारच्या वादळाचा सामना केला, बलाढ्य शत्रूंना चारीमुंड्या चीत केलं… त्याचंच दर्शन घडवणारी, शिवसेनेच्या सळसळत्या चैतन्याने भारलेली ही रविवारची जत्रा आहे… आजही परिस्थिती तीच आहे… जंग जंग पछाडून महाविकास आघाडी सरकार पडत नाही हे पाहून काही बाटग्या भाडोत्रींना आणि सुपारीबाज दलालांना हाताशी धरून शिवसेनेला जेरीला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत… पण, शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली की सगळ्या उंदरांची कशी पळापळ होते, ते आताही दिसते आहेच…