तात्या कोकणातल्या राजापूरचे. स्वातंत्र्य मिळालं आणि तात्यांचा जन्म झाला. दोन मैल पायपीट करत चढउताराचा रस्ता पार केला की शाळा, असे त्यांचे हायस्कूलचे शिक्षण सुरू झाले. इयत्ता आठवीनंतरच इंग्रजीची तोंडओळख सुरू झाली. त्या काळातील मॅट्रिकला तात्यांना ७० टक्के मार्क मिळाले. रत्नागिरीला शिकायचे का मुंबईला, हा वाद तब्बल दोन महिने चालू होता. मुंबईचा खर्च परवडणार नाही या निष्कर्षाला तात्यांचे वडील आले व तात्यांची बोळवण रत्नागिरीला झाली. दोन-तीन महिने सायन्स शिकल्यावर त्या विषयात आपल्याला गती नाही हे त्यांच्या लक्षात आले. सध्यासारखे खाजगी क्लासेस त्यावेळेला बोकाळलेले नव्हते. अकरावीला सहामाहीला एक विषय राहिला आणि तात्यांनी स्वतःहून निर्णय घेऊन कला शाखेत प्रवेश घेतला. पोराला राजापूरचा अव्वल डॉक्टर बनवूयात, असे त्यांच्या वडिलांचे स्वप्न इथेच संपले. पण तात्यांचे काहीच बिघडले नाही. बीएची छानशी पदवी घेतली व नंतर लॉ करून तात्यांनी कोकणात प्रॅक्टिस सुरू केली. जिल्ह्यातील नामवंत वकील म्हणून खोर्याने पैसा आला. जोडीला घरच्या वाडीचे उत्पन्न अजून चार वाड्या घेऊन दसपट झाले. वकिलीत मिळणारा अफाट पैसा हा वाडीचे उत्पन्न म्हणून दाखवून टॅक्स म्हणून सरकार दरबारी भरायचे, पण टळले. सोन्याने लगडलेली दिसायला देखणी बायको घरात आली पण तिला ओळीने तीन मुलीच झाल्या. चौथ्या वेळेला घराण्याचा वारसदार जन्माला आला. आता सारा आनंदीआनंदच घरात होता.
धाकटा दत्ता जन्माला आला, तेव्हा मोठी मुलगी हायस्कूलमध्ये घालण्याच्या वयात आली होती. चांगली नामवंत शाळा पाहिजे, वाट्टेल तेवढे पैसे देऊ पण शिक्षण उत्तम झाले पाहिजे, या विचाराने तिची रवानगी पुण्याच्या एका होस्टेल असलेल्या शाळेत झाली. तिच्याच पाठीवर आलेल्या धाकटीला शिक्षणाची फारशी गोडी कधी नव्हतीच. हेच सारे गुण तिच्या तीनही लेकीत उतरले असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण कलागुण मात्र तीनही मुलींमध्ये भरपूर उतरले होते. मोठीला नाट्यसृष्टीचे मोठेच वेड.
कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडकसाठी तिने अनेक छोटी मोठी कामे केली होती. पदवीसाठी ललित कला हा विषय निवडून ती छानशी पदवीधर झाली. मधलीला स्वतःला नटण्याची खूप आवड. छानछोकीची राहाणी व नवनवीन कपडे विकत घेऊन मिरवण्याची हौस. तिने फॅशन डिझायनिंगचा रस्ता निवडला. छानसे मार्क मिळवून तो कोर्स संपवला. धाकटीला चित्रकलेची उपजतच जाण होती. शाळा संपल्यानंतर तिने थेट कमर्शियल आर्ट्सला प्रवेश घेतला व त्यातच ती छान रमली.
तीन मुलींच्या शिक्षणाकडे त्यांची आई जरी कौतुकाने पाहत असली, तरी तात्यांना मात्र रुखरुख होती की पोरी माझे नाव काढण्याजोगे शिकत नाहीत. संध्याकाळच्या वेळेला मित्रांशी बोलताना हातात ग्लास आल्यावर त्यांचे दुःख बडबडण्यातून बाहेर येत असे. पंचवीस सालांचा संसार उलटलेल्या त्यांच्या देखण्या पत्नीला हे अजिबात आवडत नसे. गडगंज पैका मिळवणारा वकील असलेल्या नवर्यासमोर बोलणे मात्र तिला कठीणच होते.
तात्यांचे शेंडेफळ दत्ता बुद्धीने तेज पण गणितात आनंद. अर्थातच ज्या विषयात भरपूर मार्क पडायला हवेत, तिथेच तो भरपूर मार खायचा. इयत्ता तिसरीपासूनच गणिताची शिकवणी दत्ताच्या वाट्याला आली होती. अभ्यासाची बैठक नावाचा प्रकार दत्ताच्या कधी गावीच नसे.
पंधरा-वीस मिनिटे ‘एका जागी बसणे म्हणजे महापाप’, असे त्याचे खास वाक्य इयत्ता आठवीपासूनच त्याच्या सार्या मित्रांत प्रसिद्ध झाले होते. बहिणींचे शिक्षण व दत्ताचे शिक्षण यामध्ये एक फार मोठा बदल घडून आला होता. तीनही बहिणी वडिलांसारख्याच मराठी माध्यमातून शिकल्या. कारण त्यांच्या वेळी मराठी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळा जवळपासच्या भागात होत्या. दत्ताचा जन्म झाल्यावर त्यांच्या गावात तीन वर्षांनी पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली.
सर्व मालदार मंडळींची पोरे इंग्रजी शाळेत ‘घातली’ गेली. पोरे- पोरी कशी हुशार, टायवाली, यास-फ्यास करत इंग्रजीतून बोलणारी, याचे सार्या गावाला कौतुक. स्वतःची पोरे पोरी मराठीतून शिकणारी निदान सात आठशे घरे, तर इंग्रजी माध्यमातून शिकणारी जेमतेम तीस घरे अशी ढळढळीत विभागणी तिथे झाली होती.
आता एक गंमतच पहा ना. तात्या सकाळी आठ वाजल्यापासून अशीलांशी बोलण्यामध्ये गर्क. जेवणानंतर कोर्टात तर सायंकाळी पुन्हा उशिरापर्यंत अशीलांबरोबरच्या चर्चा. जेवणाआधीची अर्ध्या तासाची ग्लासाबरोबरची खास बैठक कधीच न चुकणारी. दत्ताबरोबर गप्पा अशा कधी फारशा होतच नसत. संवाद झाल्यास तो लाडाकोडाचा होई एवढेच. दत्ता सतत आईबरोबर व आई त्याच्या मागे मागे. घरात पाच सहा नोकर असले तरी तात्या सोडून इंग्रजीचा गंध किंवा बोलणे यापैकी कोणालाच नाही. शाळा संपली की दुसर्या दिवशी पुन्हा शाळेत जाईपर्यंत इंग्रजीचे वाक्य दत्ताच्या कानावर पडणे अशक्यच.
तिथल्या नोकरदार श्रीमंत पालकांच्या मुलांच्या घरची स्थिती याउलट. आई वडील इंग्रजीत बोलण्यात तरबेज तर आया मुलांचा गृहपाठ इंग्रजीतून करून घेण्याला कायमच सरसावलेल्या. इयत्ता चौथीपर्यंत सगळं कसं छान छान होतं. पाचवीमध्ये विषय वाढले, अभ्यास वाढला, पण दत्ताची इंग्रजीतून व्यक्त होण्याची समज मात्र निर्माण होऊ शकली नाही. अभ्यास करायचा तो पाठांतर करून. साधे सोपे पाठांतर होत असे. पण गणिताचे पाठांतर कसे करणार? गणित काय विचारले आहे तेच कळले नसले तर? आधीच गणिताची नावड असलेला दत्ता सातवीपासून गणिताची भीती बाळगू लागला. चौथीपासून दत्ताला त्याच शाळेतील एका मास्तरांची शिकवणी लावलेली होती. पण त्यांच्याही प्रयत्नाला फारसे यश येत नसे. शाळेबद्दलची नावड दत्ताच्या मनात हळुहळू रुजू लागली. प्राथमिक शाळेत असताना ८० टक्के मार्क मिळवणार्या दत्ताचे मार्क आता ५०-५२ ला येऊन अडकले होते तर गणितात जेमतेम चाळीसच मिळायचे. ही परिस्थिती पाहून तात्यांची चिडचिड प्रचंड वाढत होती. आधीच तीन मुलींच्या शिक्षणाबद्दलची नाराजीची साय त्यांचे मनावर दाटून राहिलेली. तात्यांच्या मनात आता सतत भीती एकच. आपला लाडका एकुलता एक वारसदार दत्ता काय शिकणार, कोण बनणार? इयत्ता दहावीला त्याला असेच जेमतेम मार्क पडले तर प्रवेश कुठे आणि कसा मिळणार? कोर्टात कोणतीच केस कधी न हरलेल्या तात्यांना शिकणारा दत्ता मात्र रोज हरण्याची भीती दाखवत होता.
तीनही मुलींचे शिक्षण एकीकडे त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात यशदायी ठरत होते. एका छोट्या सिरीयलमध्ये मोठीला काम मिळाले आणि ती सिरीयल प्राईम टाईममध्ये गाजूही लागली. तात्यांचे अशील तिचे कौतुक वकील साहेबांकडे करत असत. मोठीच्याच ओळखीने मधलीला त्या सिरीयलचे कपडेपट सांभाळण्याचे काम मिळाले होते. गंमतीची गोष्ट म्हणजे मोठीचे नाव कलाकार असल्याने कुठेही येत नसे. याउलट कपडेपट सांभाळणार्या फॅशन डिझायनर मधलीचे नाव मात्र ठळकपणे रोज श्रेयनामावलीमध्ये येत असे. गावामध्ये बातमी गाजत होती. तात्यांच्या दोन मुलींनी पुण्याला जाऊन नाव काढले हो! आईच्या अंगावर यामुळे मूठभर मांस चढले तरी ते ती दाखवू शकत नव्हती आणि तात्यांना ते आनंद देत नव्हते. या सार्यात एका बातमीने खूपच मोठी भर घातली. कमर्शियल आर्टिस्टचा कोर्स संपवून पहिल्या क्रमांकाने कॉलेजातून पास झालेल्या तिसरीला एका मोठ्या अॅडव्हर्टायझिंग कंपनीने महिना २५ हजाराची नोकरी देऊ केली आणि यासाठी कॉलेजनी तिचा सत्कारसुद्धा केला. या आधी त्या कॉलेजच्या बाबतीत असे कधी घडले नव्हते.
याच दरम्यान दत्ताची दहावी संपली. तात्यांचे नशीब, दत्ताचे ही नशीब आणि त्याहीपेक्षा ज्या मास्तरांना भरपूर पैसे देऊन दत्ताला शिकवायला लावले होते त्यांचेही नशीब अक्षरशः फळफळले आणि दत्ताला फर्स्ट क्लास मिळाला. त्या दिवशी तात्यांना जो काही ब्रह्मानंद मिळाला होता तो शब्दांत पलीकडचाच होता. रत्नागिरीहून मागवलेले दहा किलो पेढे वाटून झाल्यानंतर नवीन स्कॉचची बाटली तात्यांनी उघडली व आनंदात डुंबून गेले.
शालेय जीवनात दत्ताला फर्स्ट क्लास कधीच दिसला नव्हता. तो दहावीला मिळाल्याचा आनंद त्यालाही झाला होता. दत्ताच्या जबाबदारीतून अक्षरशः सुटल्याची भावना त्याच्या आईला झाली होती. आपल्याला शिकायला वडिलांनी मुंबईला पाठवले नाही ही खोलवर रुतलेली बोच तात्यांच्या मनातून पुन्हा उफाळून आली. निकालाच्या दुसर्याच दिवशी मुंबईच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये रूम बुक करून खास गाडी काढून तात्या दत्ता व पत्नीसह मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या एका सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रिन्सिपलची अपॉइंटमेंट मुंबईतील एका प्रसिद्ध वकील मित्रातर्फे ठरवली होती. दत्ता इंजिनियर होणार नाही हे गणितामुळे तात्यांना कळले होते. डॉक्टर करायचे का वकील, एवढाच त्यांचे पुढे प्रश्न होता. दत्ताला किंवा त्याच्या आईला काही विचारण्याचा प्रश्नही उद्भवलेला नव्हता. प्रिन्सिपलना भेटल्यानंतर त्यांनी दत्ताचे मार्कशीट पाहिले. सौम्य शब्दात तात्यांना त्यांनी सांगितले की आमच्या कॉलेजचा शेवटचा प्रवेश दत्ताला मिळालेल्या मार्कापेक्षा २५ टक्क्यांनी जास्त असतो. वकिली डावपेचात मुरलेल्या तात्यांनी शांतपणे त्यांची नेहमीची खेळी केली. मग मुलाला प्रवेशासाठी मला कितीची देणगी द्यावी लागेल? रक्कम सांगा रोख का चेक तेही सांगा. दोन्हीची सोय करूनच मी आलो आहे. प्रिन्सिपल सरांना असे अनेक तात्या भेटले असल्यामुळे त्यांनी थंडपणे उत्तर दिले एका टक्क्याला दहा हजार फक्त. रोख दिलेत तर फारच उत्तम. नाहीतर वेगळ्या नावाने पावती मिळेल, ती तुम्हाला चालेल का? तात्यांनी बॅग उघडली, रक्कम दिली व प्रवेश निश्चित केला. दत्ताला वडील खूप कमावतात हे माहिती होते, पण बापाकडे एवढी रोख रक्कम असते हे तो प्रथमच पाहत होता. त्याचे लहानपण त्याच क्षणी संपले. शिकून पैसा मिळणे शक्य नाही, पण बापापेक्षा जास्त कमावणे गरजेचे आहे हे त्याला लख्ख उमगले. साक्षात्कारच म्हणा ना.
तात्यांनी प्रथम सायन्स घेतले, ते सोडून आर्ट्सला प्रवेश घेतला होता व वकील झाले होते हे त्याला कानोकानी ऐकून माहिती होते. ती चूक आपण करायची नाही हेही त्याने त्याच क्षणी ठरवले. थेट प्रिन्सिपल सरांना सांगून टाकले, मला आर्ट्सलाच प्रवेश हवा आहे. आता थक्क होण्याची वेळ होती. आईच्या मनात कोकणी म्हण आली, ‘अंड्यातून पोरगे बाहेर आले’.
‘मार्मिक’च्या वाचकांना आता प्रश्न पडला असेल की दत्ताचे पुढे काय झाले? उत्तर अगदी सोपे आहे. बारावी आर्ट्स ५५ टक्के मार्कांनी पास झालेला दत्ता एका केटरिंग कॉलेजमध्ये दाखल झाला. कोर्स संपवून पदवी हाती आल्यानंतर नवी मुंबईताrल एका मोठ्या हॉटेलमध्ये दोन वर्षे त्याने उमेदवारी केली. राजापूरच्या एका वाडीचे रूपांतर एका मोठ्या रिसॉर्टमध्ये करून तो आज तात्यांपेक्षा मालदार झाला आहे. दत्ताचा शब्द आता घरात शेवटचा असतो. तात्यांसाठीचा बार कायम भरलेला राहील याची काळजी तो नक्की घेतो.
तात्पर्य : पालकांनी स्वतःच्या राहून गेलेल्या स्वप्नांची ओझी मुलांच्या पाठीवर लादून त्यांचे शिक्षणात ढवळाढवळ केली तर अपयश नक्की. पैसे मोजून शिकवता येते. पण आवडीची करिअर अंगभूत कलागुणातून, कौशल्यातून सुद्धा सुंदर सुरू होते. तात्यांच्या तीनही मुली व मुलगा दत्ता यांनी ते कृतीतून करून दाखवले.