परवाच्या दिवशी आमच्या सुलतानला (आमचा बोका) लागोपाठ दोन शिंका आल्या, म्हणून लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले तर डॉक्टर म्हणाले, ‘थंडी बाधली.’
मला जरा काळजीच वाटली. म्हटलं,’ बरं वाटेल ना हो त्याला लवकर?’
तर म्हणाले, ‘हो, जरा थंडीमधे काळजी घ्या त्याची.’
तेव्हा लक्षात आलं, सकाळी चांगलंच गार व्हायला लागलंय. काय आहे, माझा आणि सूर्योदयाचा तसा काही संबंध नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी अखिल जगतात काय घडते, याचा मला पत्ताच लागत नाही.
माझं काय म्हणणं आहे, माझ्यासारख्या लोकांसाठी आज काय घडणार आहे त्या गोष्टींची विशेष बातमी करून टीव्हीवर दाखवायला हवी. उदा. आज सकाळी अंमळ गारठा आहे, आज कोणतं क्षेपणास्त्र हवेत उड्डाण करणार, आज सकाळी सौंदर्यकुमारी बाळंत होणार आणि आंखो देखा हाल बघा आमच्या वाहिनीवर, असं सगळं महत्वाचं सकाळीच दाखवायला हवं. म्हणजे बाहेर पडायचं की दिवसभर टीव्ही बघायचा हे ठरवता येतं.
विशेष करून माझ्यासारख्या लोकांना हवामानाबद्दल तर सांगायलाच हवं. लहानपणापासूनच माझा भूगोल जरासा गडबडलेला आहे. म्हणजे बघा, तापमान म्हणायचं की तपमान? ते अंश सेल्सियसमध्ये नोंदवतात की सेल्सियस अंशांमध्ये? असे काही खूपच किरकोळ प्रश्न मला पडलेले असतात. कित्येक वर्षं तर मला वाटायचं की वेधशाळा ही फक्त ग्रहणाचे वेध लागले की मगच काम करते. पण, ‘आज गरज के साथ छिटे पडेंगे’ असे वेधशाळेने वारंवार बातम्यात दिलेले वाक्य ऐकले आणि मग वेधशाळेचा आवाका लक्षात आला. योगायोग असा की माझा एक शाळकरी मित्र वेधशाळेत नोकरीला लागला. अशातच त्याची भेट झाल्यावर त्याला मी सेल्सियस अंश की अंश सेल्सियस असा प्रश्न विचारला. तर तो म्हणाला, तुला आवडेल ते म्हण. त्याचा खरा गोंधळ वेगळाच आहे. तापमान फॅरेनहाईटमध्ये नोंदवायचं की डिग्रीमध्ये यात जरासा गोंधळ उडाला आहे असे म्हणतोय.
आजचा हवामानाचा अंदाज- आकाश शक्यतो निरभ्र राहील, हलक्या सरींचा अंदाज. कमाल तापमान ३२ डिग्री सेल्सियस, किमान तापमान १८ डिग्री सेल्सियस. मच्छीमार बांधवांसाठी विशेष सूचना, पालघर मुंबई येथील समुद्रकिनारा मासेमारीसाठी अनुकूल राहील.
लहानपणापासून आकाशवाणीवर हवामानाचा हा अंदाज ऐकून ऐकून माझ्या डोळ्यासमोर तर नेहमी चित्र उभे राहते. लुंगी, टोपी घातलेले मच्छीमार बांधव असे समुद्रकिनार्यावर रेडिओ सेट, हल्ली मोबाईलचा रेडिओ सेट चालू करून, हातात वल्हे घेऊन उभे आहेत. जसेही रेडिओवर अनुकूलची घोषणा झाली की लगेच बांधव ‘ऑल वेल’चा इशारा एकमेकांना करत असावेत आणि होडी समुद्रात घालत असावेत. नक्की असंच होत असणार. अथवा रोज रोज मच्छीमार बांधवांसाठी या सूचना का देत असतील?
या सूचनांचा मला मात्र फार फायदा होतो. आताही, महाराष्ट्रात पारा खाली उतरला अशी बातमी दूरदर्शन आणि आकाशवाणी यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितली आणि मग सुलतानाला सर्दी का झाली हे माझ्या लक्षात आले.
लगोलग मी आमचे मफलर्स, शाली, स्वेटर्स हे सगळं बाहेर काढून तयार ठेवलं. आम्ही दोघेही ऑफिसला जाताना न चुकता स्वेटर्स घालून जातो आता. गाडीत बसल्यावर जरासं गरम होतं, पण एसी कमी कर म्हणजे नक्की एसीचं तापमान कमी करायचं की ते वाढवून थंडपणा कमी करायचा हे न समजल्याने ड्रायवरने ‘क्या करू मॅडमजी?’ असे शुद्ध मराठीत मला विचारले. जागतिक तापमान दोन अंशांनी वाढायला असे बेजबाबदार लोकच कारणीभूत आहेत याची मला कल्पना आली; पण अशा लोकांना काय शिकवायचं म्हणून मी शांत बसले.
थंडी म्हणजे कवींना, ललित लिखाण करणार्या लेखकांना सुगीचा काळ वाटतो. पावसाळ्यावर जशा भरभरून कविता येतात, तशाच गुलाबी थंडीवर येतात. मी कित्येकदा सोसायटीमध्ये फिरून, ऑफिसच्या गच्चीवर जाऊन, वावरात जाऊन, गेलाबाजार शेजारच्या चिनूच्या शाळेत जाऊनसुद्धा कुठे गुलाबी रंगाचे काही दिसते का हे तपासायचा प्रयत्न केला, पण माझी नजरच जरा गंडलेली असावी. जे अखिल जगताला दिसते ते मला कधीच दिसत नाही. आता बघा लोकांना थंडी म्हणजे गुलाबी, रोमांचित करणारा ऋतू वाटतो. मला मात्र बाजरीच्या भाकरी, तिळाचे, डिंकाचे, अळिवाचे लाडू, गाजर हलवा, मटार कचोरी हे सगळे पदार्थ करायला लावून आमचे काम वाढवणारा ऋतू वाटतो. मटार या भाजीचं पीक तर सर्वप्रथम ज्याने घेतलं त्याला ‘तुम्हीच खवैय्ये’ या शोमध्ये आलेल्या लोकांच्या हातच्या मटार करंज्या खाण्याची शिक्षा करायला हवी. मटार करंजी म्हणू नका, मटार कचोरी म्हणू नका, मटार भात, कटलेट असे सगळे पदार्थ थंडीच्या नावाखाली हादडले जातात. एका थंडीत तर मटार इतका खाण्यात आला होता की ऑफिसमध्ये ‘काय मॅटर आहे’ असे विचारण्याऐवजी मी ‘काय मटार आहे’ असे विचारले होते.
मटार, गाजर हलवा आणि थंडी यांचा जसा घनिष्ट संबंध आहे, तसे आंघोळ आणि थंडी हे एकमेकांचे शत्रू म्हणावेत इतके दूरचे आहेत. थंडीच्या दिवसांत अंघोळीसाठी अख्ख्या घरादाराच्या मागे लागावे लागते. अंघोळ करा म्हणून मागे लागलं की आमचे अहो, ‘मुश्किल में घबराना नहीं, सर्दीयों में नहाना नहीं’ असली फालतू वाक्ये तोंडावर मारत असतात. शेजारचे कुलकर्णी काका तर म्हणतात की कसे लोक १५-१५ दिवस बिनाअंघोळीचे राहतात कुणास ठाऊक? आम्हाला तर तेराव्या दिवशीच कंटाळा येतो. सकाळी उठण्यापासून ते मुलांना, नवर्याला आणि स्वतःला तयार करून कामाला धाडणे हे थंडीतील सगळ्यांत जिकीरीचं काम असतं.
काही लोकांना मात्र थंडीत फिरायला जायला फार आवडतं. सकाळी फिरायला जाणार्यांना आणि व्यायाम करणार्यांचा तर ऊत आलेला असतो. झोपेसारखी महत्वाची गोष्ट सोडून वेड्यासारखं फिरायला जाणारे हे लोक मला अजिबातच आवडत नाहीत. रुमाल, सर्दी, फुर्रर्र, सूर्रर्रर्रचा हा मौसम. गपगुमान झोपावं, छान स्वप्नं बघावीत. एवढंच वाटलं तर स्वप्नात फिरायला जावं. उठून आवरून ऑफिसलाच कसेबसे जातो आम्ही.
काल सकाळी ऑफिसला निघाले होते तर खाली सिक्युरिटी गार्ड एकदम शाल गुंडाळून, मफलर बांधून बसलेला होता. शेजारच्या एका काकांना उगीचंच संभाषण करायची सवय आहे. गार्डला असे शाल गुंडाळलेले बघून काका त्याला म्हणाले, ‘बहोत थंड गीर रही है ना?’ अर्थातच हे सांगायला नकोच की, ‘खूप थंडी पडली आहे’ याचं हे हिंदी भाषांतर होतं. मी काकांच्या समोरच खाली सगळीकडे बघायला सुरुवात केली. काकांनी विचारलं, ‘काय शोधते आहेस?’ मी म्हणाले, ‘गिरी हुई ठंड.’ काका माझ्याकडे रागाने बघून निघून गेले. भर थंडीत काकांचा पारा चांगलाच चढलेला होता.
आमच्यासारख्या सामान्य माणसाला बाहेरचा पारा उतरला की चढला ते माहिती नाही. कुकरचा पारा आता उतरलाय आणि तो उघडता येणार आहे आणि गरमागरम भात खाता येणार आहे, एवढं ठाऊक आहे. बाहेरचा पारा उतरला की उकळत्या डिग्रीचा चहा आम्हाला लागणार, हे आम्हाला माहिती आहे. डोक्याचा पारा फार चढू देऊ नये हेदखील आम्हाला ठाऊक आहे.
पण काहीही म्हणा, थंडीचं एक बरं असतं. खाण्यापिण्याची चंगळ असते. कितीही, कसंही खाल्लं तरी सगळं पचनी पडतं. सहलींना जायला मजा येते. पावसाळा संपून थंडी आलेली असल्यामुळे निसर्ग असा फुललेला असतो. आयुष्य सुंदर आहे असं वाटायला जे काही क्षण आणि ऋतू मदत करतात त्यात थंडी महत्वाची आहे. छान आवडत्या लोकांना बरोबर घ्यावं, निसर्गाच्या जवळ जावं. चहाचे कपच्या कप रिते करावेत. शाल पांघरून गाण्याच्या, कवितेच्या धुंद मैफिली अनुभवाव्यात. चांदण्या रात्रीत शेकोटी पेटवून उबेला बसावं. शिळोप्याच्या गप्पा माराव्यात. राजकारण ते शेजार्यांच्या चिनुचे उद्योग इथवर सगळं बोलावं. गरमागरम जेवण करावं, गोधडीत धूम झोप काढावी. सगळं सगळं रसरसून अनुभवावं. फक्त, तापमान की तपमान किती उतरलं ते विचारू नये.