‘ब्रह्मराक्षस’ प्रकरणानंतर सारंगला बराच आराम मिळाला होता. एखादे जबरदस्त प्रकरण घडावे आणि मेंदूबरोबर हातपायाला देखील काही काम मिळावे, असे त्याला गेले दोन तीन दिवस सतत वाटत होते. आर्थिक अडचण हा विषयच नव्हता. आताही त्याच्या खात्यात दोन तीन कोटी रुपये आरामात पडलेले होते. स्वत:चा जुहूसारख्या एरियात फ्लॅट होता. मालकीच्या दोन दोन चारचाकी खाली त्याची वाट बघत उभ्या होत्या. पण ’आयुष्यात थरार नसेल तर मजा कसली?’ ही विचारसरणी असलेला सारंग नुसता लोळत कसा पडणार?
गेले दहा दिवस सकाळी दहापर्यंत लोळावे त्यानंतर पेपर वाचत वाचत हेवी नाश्ता करावा, दुपारी बाराला एक बीअर मारत अंघोळ करावी, अंघोळ उरकली की पुन्हा जॅक डॅनियलची बाटली उघडावी ती थेट तीनपर्यंत. तीनला दाबून जेवणावर आडवा हात मारावा आणि पुन्हा ताणून द्यावी ती रात्री दहापर्यंत. दहा वाजता मर्सिडिज काढून जिवाची ‘रात्रीची मुंबई’ करायला मोकळा. पण हे असे किती दिवस करणार? त्याचा त्यालाच कंटाळा यायला लागला होता. त्याच्या ह्या कंटाळ्याची दखल देव लवकरच घेणार होता.
रविवारी सकाळी सकाळी दारावरची बेल पाचव्यांदा वाजली आणि सारंगला एकदाची जाग आली. अर्धवट गुंगीत असलेल्या सारंगला त्या बेलचा अर्थ लक्षात आला आणि गुंगी कुठल्या कुठे पळाली. ’संकटात सापडलेला कोणी मदत मागायला आला आहे’ ह्या विचाराने त्याचा उत्साह उसळ्या मारू लागला. नाइट गाऊनचा बेल्ट बांधत तो घाईघाईने दरवाज्याकडे धावला. दरवाजा उघडला तर समोर पन्नाशीतील एक स्त्री उभी होती. नऊवारी नेसलेली, खेडवळ वाटणारी स्त्री काहीशा शंकित नजरेने त्याच्याकडे बघत होती.
’दर्यावर्दी साहेब आहेत का?’
’हो आहेत ना.. या आत या..’ सारंगने तिला आदराने सोफ्यावर बसवले आणि तो पाणी आणायला आत वळला. आतूनच त्याने त्या स्त्रीचे नीट निरीक्षण केले. स्त्री खेडेगावातील वाटत असली, तरी सधन घरातील असावी. अंगावरचे दागिने, कपडे त्याची साक्ष देत होते. सारंगने बाहेर येऊन पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला.
’सारंग दर्यावर्दी साहेब तुमचे वडील का?’ तिने भाबडेपणाने विचारले आणि सारंगने मनातल्या मनात डोक्याला हात लावला. खाजगी गुप्तहेर म्हणजे पन्नाशीचा, टक्कल टोपीखाली लपवणारा, कायम सुटाबुटात वावरणारा असतो हे जवळपास प्रत्येकाच्या मनातले चित्र त्याचा घात करीत असे. पंचवीस वर्षाचा, पीळदार शरीराचा आणि घार्या डोळ्याचा हा युवक गुप्तहेर असेल, असा त्या बिचारीला तरी काय अंदाज म्हणा.
’नाही. मी स्वत: सारंग दर्यावर्दी आहे,’ तो शांतपणे म्हणाला आणि समोरच्या बाईला ठसला लागता लागता राहिला, ’बोला.. काय काम होते तुमचे?’
’मला हवालदार जमखंडेनी तुमच्याकडे मदतीसाठी पाठवले आहे. करमाळ्याजवळच्या पारगे गावातून आली आहे मी. त्यांनी काल तुम्हाला बरेच फोन लावले, पण तुम्ही उचलले नाहीत.’
बाईने गावाचे नाव सांगितले आणि सारंगला संदर्भ लागला. करमाळ्यात सोडवलेल्या एका खुनाच्या केसमध्ये त्याला जमखंडे हवालदाराची प्रचंड मदत झाली होती. एकदम जबरदस्त माणूस.
’काल फोन मी घरी विसरून गेलो होतो. रात्री बर्याच उशिरा घरी आलो आणि मग फोन न बघताच झोपी गेलो.’
’मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे.’
’बोला ना..’
बाई काही क्षण एकदम भावनाप्रधान झाली, तिचे डोळे थोडे पाणावले देखील. मात्र काहीशा जिद्दीने तिने आवंढा गिळला आणि बोलायला सुरुवात केली.
’माझं नाव अनुसूया ढाकणे. मी माझ्या मिस्टर आणि मुलांसोबत पारग्यात राहते. तिथे आमची जमीन आहे, डेअरी आहे, गोठा आहे आणि एक पिठाची गिरणी देखील आहे. चांगले तालेवार घराणे आहे आमचे. आम्हा नवराबायकोला एकच मुलगा- मदन. मदन देखील चांगल्या वळणाचा आणि एकदम हुशार. दोनच महिने झाले पुण्याला शिकायला गेला होता. दिवाळीच्या सुट्टीत घरी आला आणि अचानक पाडव्याच्या दिवशी त्याने शेतातला झाडाला दोरी बांधून…’ इथे मात्र अनुसूयाबाईंचा हुंदका फुटला आणि त्या ढसढसा रडायला लागल्या.
’शांत व्हा आई… सावरा..’
’सारंग साहेब, माझा मुलगा आत्महत्या करणार्यांतला नव्हता हो. येवढा तालेवार असून शेतात मजुरांच्या बरोबरीने राबायचा, त्यांच्या ताटात जेवायचा. पहिली मोटरसायकल देखील पुण्याला निघाला तेव्हा दिली आम्ही त्याला. नाहीतर गावभर सायकलवरच भटकायचा. पैशाची कसली घमेंड कधी त्याला नव्हती. एक आई म्हणून तर मी त्याला सर्वांपेक्षा जास्त जवळून ओळखते. कितीही मोठे संकट आले, आघात झाला तरी कोलमडून पडणार्यातला नव्हता माझा मदन.’
’पोलिसांना कोणावर काही संशय?’
’पोलिसांनी फाइल बंद सुद्धा केली..’ थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या.
’काय?’
’हो! त्यांना मदनच्या खिशात त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि मोबाइलमध्ये आत्महत्या करतो आहे सांगणारा व्हिडिओ देखील सापडला. केस बंद करण्यासाठी त्यांना एवढे पुरेसे होते. पण ह्या आईला खात्री आहे की माझा मुलगा कोणाची तरी शिकार झाला आहे. पण माझे गार्हाणे कोण ऐकणार? कायद्याला तर पुरावे लागतात. शेवटी माझी अवस्था बघून जमखंडे हवालदार साहेबांनी तुमची मदत घेण्याचा सल्ला दिला.’
सारंग जरा विचारात पडला. आत्महत्या केलेल्या प्रत्येकाच्या जवळच्याला, विशेषतः जर ते आई बाप असतील तर त्यांना, मुलाची आत्महत्या स्वीकारायला वेळ लागतोच. असे होणे शक्यच नाही हेच त्यांचे ठाम मत असते आणि ते सहजासहजी बदलत नसते.
’ती चिठ्ठी, व्हिडिओ सर्व काही खरे सांगत नाहीये का आई? तुमचे मन सत्याला स्वीकारायला घाबरत आहे,’ समजुतीच्या स्वरात सारंग बोलला.
’सारंग साहेब, मदनच्या आधी माझी तीन मुलं वारली. माझ्या ह्या डोळ्यांसमोर त्यातल्या दोघांनी प्राण सोडले तर एकाने पोटात असताना. इतके सर्व कटू सत्य पचवून देखील मी ठामपणे सांगते आहे की, माझा मदन आत्महत्या करूच शकत नाही!’
अनुसूयाबाईंच्या स्वरातला विश्वास, त्यातला ठामपणा कुठेतरी सारंगच्या तर्कबुद्धीला हलवून गेला आणि त्याने पारग्याला जाण्याचा निर्णय घेतला.
गाव तसे अगदी खेडेगाव नव्हते. आकाराने लहान म्हणून गाव म्हणायचे, नाहीतर शहरातील सर्व सुविधा इथे देखील सहजपणे उपलब्ध होत्या. घराघरावर डिश अँटेना उगवलेल्या होत्या, हातात मोबाइल विसावलेले होते, ग्राम बाजारसारखे मोठे दुकान डौलाने उभे होते. गावाचे निरीक्षण करत करत तो एकदाचा ढाकणेंच्या ’नर्मदा निवास’ला पोहोचला. ऐसपैस असा बंगला होता तो. बाहेर तीन ट्रॅक्टर, दोन चारचाकी, तीन चार दुचाकी, शेतीची तीन चार यंत्रं दिमाखात उभी होती. घरात प्रवेश करण्यापूर्वीच एकूण सुबत्तेची कल्पना येत होती.
मदनच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी अंथरूणच धरले होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून सारंग त्याला दिलेल्या खोलीत विसावला. प्रâेश होऊन घरच्या दुधाचा अस्सल चहा ढोसून तो गावाची फेरी मारायला बाहेर पडला. गाव तसे लहान होते मात्र शेतीचा विस्तार प्रचंड होता. फिरता फिरता ’पारगा पोलिस स्टेशन- अंकित- करमाळा’ बोर्ड दिसला आणि त्याची पावले आपोआप त्या दिशेने वळली. चौकीत शिरला तर समोर दत्त म्हणून हवालदार जमखंडे हजर. सारंगला बघून त्यांच्या चेहर्यावर एकदम आनंद दाटून आला.
’या सारंग साहेब. मला विश्वास होता की, त्या माऊलीची प्रार्थना व्यर्थ जाणार नाही.’
’हा सगळा प्रकार तरी काय आहे जमखंडे?’ खुर्चीवर विसावता विसावता सारंगने विचारले.
’मी स्वत: चक्रावून गेलोय बघा साहेब. ह्या चौकीला माझी बदली होऊन आता दोन वर्षं होत आली. गावातल्या प्रत्येक माणसाला मी चांगला ओळखून आहे. मदन म्हणजे तरी अगदी हिरा होता बघा. तरुण रक्त आहे म्हणून माज नाही, पैसा आहे म्हणून रुबाब नाही आणि हुशारी आहे म्हणून जिथे तिथे नाक खुपसायची सवय नाही. शेत, घर, अभ्यास आणि वाचन मंदिर ह्यापलीकडे त्याला जग नव्हते.’
’वाचन मंदिर?’
’मदन आणि त्याच्या मित्रांनी मिळून गावातल्या लोकांची वाचनाची आवड वाढावी म्हणून चालू केले आहे. खुद्द आमदार साहेबांनी कौतुकाने पंचवीस हजार रुपये दिले आहेत. असा गुणी मुलगा आत्महत्या कसा करेल?’
’काही प्रेमाची भानगड?’
’शक्य नाही! गावातल्या कोणत्याही पोरीला ‘अय दिदी’शिवाय त्याने हाक मारलेली मी बघितलेली नाही. अहो बघावं तेव्हा त्याच्या जोडीला कोणी ना कोणी असायचेच. त्याला वेळ तर मिळायला हवा ह्या सगळ्यासाठी.’
’मग पुण्यात काही घडल्याची शक्यता?’
’आम्ही त्या दृष्टीने देखील चौकशी केली. पण कुठेही संशयाला जागा नाही.’
’मला ती चिठ्ठी आणि व्हिडिओ बघायला मिळेल का?’
’हो दाखवतो ना..’
सारंगने अत्यंत बारकाईने ती चिठ्ठी वाचली. स्वच्छ, सुंदर मोत्यासारखे अक्षर. प्रत्येक शब्दामध्ये अगदी मोजल्याप्रमाणे अंतर. कुठेही खाडाखोड नाही की अक्षराचे वळण बदलेले नाही. जणू टाईप केलेली चिठ्ठी.
’मी आत्महत्या करतो आहे. माझ्या ह्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही. मी आयुष्याचा खरा अर्थ शोधायला जातो आहे.’ व्हिडिओ मध्ये देखील आधी ती चिठ्ठी दिसते आणि त्यानंतर मदन चिठ्ठी वाचून दाखवतो.
’पण आत्महत्येमागे काहीतरी तरी कारण असेल ना?’
’सारंग साहेब आम्ही प्रचंड शोध घेतला. गावातील जवळपास प्रत्येकाची चौकशी केली. पुण्याला तीन चकरा मारल्या. हाताला काहीही लागले नाही.’
सारंगने त्या चिठ्ठीचा एक फोटो काढून घेतला, तो व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये घेतला आणि घराकडे रवाना झाला.
रात्री झोपताना ’मी आयुष्याचा खरा अर्थ शोधायला जात आहे’ हे शब्द त्याच्या डोळ्यासमोर नाचत होते. काय रहस्य असेल ह्या शब्दांमागे? अध्यात्म? गूढविद्या? तंत्र-मंत्र? विचाराच्या नादात त्याचा डोळा कधी लागला त्यालाच कळले नाही. सकाळी सगळ्यात आधी त्याने आपला मोर्चा ’वाचन मंदिरा’कडे वळवला. नवखा माणूस पाहून तिथे बसलेली दोन तीन मुले जरा कुतूहलाने त्याच्याकडे बघायला लागली.
’हॅलो. मी सारंग दर्यावर्दी. ह्या वाचन मंदिरासंदर्भात माहिती मिळाली म्हणून खास मुंबईवरून येथे आलो आहे. आमच्या सामाजिक संस्थेतर्पेâ अशीच काही वाचन मंदिरे उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण इथे गावात आलो आणि मदन संदर्भात समजले. फार वाईट वाटले ऐकून.’ मदनची आठवण निघताच उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहर्यावर उमटलेली दुःखाची छाया स्पष्ट दिसत होती. एक दोघांनी पुढे होऊन सारंगला वाचन मंदिर फिरवायला सुरुवात केली. पाच सातशेच पुस्तके असतील, पण विषयांचे प्रचंड वैविध्य दिसत होते. विज्ञान, तंत्रज्ञान, स्वमार्गदर्शन, राजकारण, अनुवाद, आत्मचरित्र अशा अनेक विषयांवर पुस्तके दिसत होती. मात्र सारंगला अपेक्षित अशी गूढविद्या अथवा ब्लॅक मॅजिक, भूतकथा वगैरे विषयांवरचे एक देखील पुस्तक आढळले नाही.
’वा छान संग्रह आहे,’ सारंग मनापासून म्हणाला. त्याच्या कौतुकाने सगळ्यांचे चेहरे खुलले. ’पण काय हो गावात कोणी भूतकथा, भयकथा वाचत नाही का?
हॉरर विषयाचे एकही पुस्तक दिसत नाही. मला खूप आवडतात अशा कादंबर्या,’ सारंगने हळूच खडा टाकला. ’छे! आम्ही सगळे मदनच्या विचारांचेच आहोत. प्रथा, परंपरा, देव, दानव अशा कुठल्याही गोष्टीवर आमचा विश्वास नाही. आमच्यासाठी फक्त विज्ञान श्रेष्ठ!’ एका युवकाने तडफदारपणे सांगितले आणि मदन चमकला. त्या दिवशी देखील हाताला काही लागले नाही. सारंगची व्यवस्था मदनच्या खोलीतच केलेली होती. त्या दिवशी रात्री सारंगने त्याचाच फायदा घेतला आणि खोलीचा कोपरा अन कोपरा धुंडाळायला सुरुवात केली. दोन तासाच्या प्रयत्नांनी सारंगला यश लाभले आणि पुस्तकांच्या रॅकमागच्या पोकळीत मदनचे बँकेचे पासबुक त्याला सापडले. त्याने पासबुक उघडून तपासायला सुरुवात केली आणि नकळत एक हलकीशी शीळ त्याच्या ओठातून बाहेर पडली.
’जमखंडे, माझे एक काम करा प्लीज. मदनच्या मृत्यूनंतर त्याच्या एखाद्या मित्राच्या राहणीमानात अचानक काही बदल झाला आहे का, त्याने ऐपत नसताना एखादी मोठी खरेदी केली आहे का याचा छडा लावा.’
जमखंडेंनी आपले काम चोख बजावले आणि एका काळ्या सावळ्या युवकाला दुसर्याच दिवशी सारंग समोर उभे केले.
‘साहेब हा राजन सस्ते. मदनचा मित्र. गॅरेजमध्ये कामाला आहे पण सध्या रोज तालुक्याच्या तमाशा फडात शेकड्याने पैसे उडवतोय.’
’राजन… तुला मदनने पाच लाख रुपये कशासाठी दिले होते?’
’पाच लाख? आणि मला कशाला देईल तो?’
’मग सध्या उडवतोयस ते काय मेहनतीचे पैसे आहेत का रे?’ सारंगच्या आवाजात आता चांगलीच जरब आली होती. राजन खाली मान घालून गप्प उभा होता; पण त्याचे हळुवार थरथरणारे पाय सारंगने अचूक हेरले होते. सारंगने हीच योग्य वेळ आहे ते ओळखले आणि खाणकन एक आवाज राजनच्या कानाखाली काढला. राजन खालतीच बसला. सारंगला पुन्हा हात उचलावाच लागला नाही.. पोपटाने ताबडतोब चोच उघडली.
’मदनचे सुकन्यावर प्रेम होते..’
’सुकन्या?’ सारंगने आश्चर्याने विचारले.
’ती मारवाड्याची?’ जमखेडेने आश्चर्याने विचारले.
’हो तीच. पण तिचा बाप जातीबाहेर लग्न लावून देणार नाही हे तिला चांगले माहिती होते आणि तसे पण तिला गावाकडच्या मदनपेक्षा ती शिकत असलेल्या पुण्यातील शहरी पोरांचे आकर्षण जास्ती होते.’
’मग?’
’शेवटचा प्रयत्न म्हणून मदन पण पुण्यात शिकायला गेला. पण तिथे त्याने सुकन्याचे जे रूप पाहिले; त्याने त्याला धक्काच बसला. सिगरेट ओढणारी, लहान लहान चड्ड्या घालून वेगवेगळ्या मुलांच्या गाड्यांवर हिंडणारी सुकन्या त्याला चांगलेच हादरवून गेली. त्याने दिवाळीच्या सुट्टीत आल्यावर ही गोष्ट मला सांगितली. आधी मी त्याला तिचा नाद सोडायला सांगितले पण त्याचा विश्वास होता की तो तिला सुधारू शकेल, तिची चूक तिला उमगेल. मग मी मदत करायचे कबूल केले आणि तिथेच चुकलो मी शहरातल्या आत्याच्या ऑपरेशनचे खोटे कारण सांगून त्याच्याकडून पाच लाख रुपये उकळले होते ते त्याला आता परत हवे होते. पुण्यात त्याला स्वत:चा वेगळा फ्लॅट घेऊन राहायचे होते, पैसे खर्च करून सुकन्याला इम्प्रेस करायचे होते. पण हे घरी सांगता येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने माझ्या मागे पैशाचा तगादा लावला.’
’तू काय केलेस मग?’
’मी खूप विचार केला आणि मला एक भन्नाट कल्पना सुचली. तसेही मला मदनच्या धास्तीने पैसे उधळता येत नव्हते, मौजमजा देखील करता येत नव्हती. संधी मिळेल तसा मी पुण्यामुंबईत जाऊन ऐष करायचो पण त्यात काही मजा नव्हती. जर मदनच नाहीसा झाला तर? हा विचार माझ्या मनात आला आणि मी मदनला एक युक्ती सांगितली. मी त्याला आत्महत्येचा एक खोटा व्हिडिओ बनवण्याचे सुचवले आणि तो व्हिडिओ मी सुकन्याला पाठवतो, ते बघून तिला खर्या प्रेमाचे महत्त्व कळेल असे पण समजावले. आधीच चिंतेत असलेल्या मदनला ते पटले. त्याने माझ्या सांगण्याप्रमाणे चिठ्ठी लिहिली आणि तिच्यासकट व्हिडिओ देखील बनवला. आता तो फाशी घ्यायचा प्रयत्न करतोय असा व्हिडिओ मी बनवतो असे सांगत मी त्याला दोरी मानेत अडकवायला लावली आणि पायाखाली उंच ओंडका पण दिला.’
’मोठ्या विश्वासाने त्याने दोरी गळ्यात अडकवली आणि तू…’
’…आणि मी क्षणात त्या ओंडक्याला लाथ मारून गावाकडे धाव घेतली….’ गुढघ्यात डोके खुपसून राजनने एक मोठा हुंदका दिला आणि सारंगचे वाक्य पूर्ण केले.