मसूदची हत्या ही भारतासाठी मोठी हानी होती. त्यावेळीही भारतात भाजपाचेच सरकार होते. तत्कालीन भारत सरकारतर्फे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी दिल्लीत अफगाणिस्तानी वकिलातीत कमांडर मसूद यांना श्रद्धांजली वाहिली होती. कारण अहमदशहा मसूद हा पाकिस्तानविरोधात जागतिक जनमत बनविणारा आणि अफगाणी जनतेसोबतच भारताचे हित जोपसणारा अफगाणी योद्धा व नेता होता.
—-
अफगाणिस्तानातील धर्मांध इस्लामी राजवट तालिबानच्या रूपात सन २००१नंतर आता पुन्हा सत्तेत आली आहे. तालिबानचा धर्मांध, दहशतवादी, अमानवी, स्त्रीविरोधी चेहरा हाच अफगाणी मुस्लिमांचा नव्हे, तर जागतिक इस्लामचा मुख्य चेहरा असल्याचं दर्शविण्यात आपल्याकडची माध्यमे दंग झाली आहेत. परंतु त्याच अफगाणी भूमीत जन्मलेल्या आणि कट्टर इस्लामी तालिबानला विरोध करणार्या अनेक योद्ध्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक तालिबानविरोधी योद्धेदेखील अफगाणी मुस्लिमच आहेत. पण इस्लामविरोधी अजेंडा राबवणार्यांकडून हे मात्र विचारात घेतले जात नाही.
रशियाच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपाचा विरोधक म्हणून कमांडर अहमदशहा मसूदची राजकीय नि लष्करी कारकीर्द सुरू झाली होती. मसूद स्वत: सुन्नी मुस्लिम. अफगाणिस्तानच्या उत्तर प्रांतातील पंजशीर खोरे हे त्याचे जन्मस्थान. सत्तरच्या दशकात मसूदने काबूलच्या पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीतून अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर राजकीय कारकीर्द सुरू झाली. लवकरच मसूद हा जनतेचा आवडता नेता बनला. त्याची मातृभाषा अफगाणी फारसी म्हणजेच ‘दारी’ ही होती. मात्र त्याचबरोबर तो पश्तू, उर्दू, फ्रेंच आणि इंग्लिश भाषेतूनही संवाद साधत असे. महाविद्यालयीन जीवनात त्याने जगातील सर्व क्रांतिकारक योद्ध्यांच्या लेखनाचे वाचन केले होते. त्यात प्रामुख्याने माओ त्से तुंग आणि चे गेव्हारा यांचा उल्लेख करता येईल. मसूदची वैचारिक जडणघडण साम्यवादी विचारांत झाली होती. तो स्वत:वरील साम्यवादी क्रांतीचा प्रभाव मान्य करत असे, तरीही त्यास स्वतःच्या देशाच्या कारभारात अफगाणबाहेरील कोणत्याही शक्तीचा प्रभाव वा हस्तक्षेप मान्य नव्हता. ‘अफगाणी जनतेचं भवितव्य हे अफगाणी जनतेच्या हाती आहे, आधुनिक विचार अफगाणी जनतेत रुजवून सर्व अफगाणी जनतेचं भलं व्हावं. मात्र हे अफगाणी जनताच ठरवू शकते, बाहेरील कोणतीही शक्ती नव्हे….’ ही त्याची भूमिका होती. मसूद स्वत: लिबरल विचारांचा असला तरी रशियाच्या साम्यवादी राजवटीच्या विरोधात जनसमर्थन मिळविण्यासाठी त्याला इस्लाम धर्माचाच आधार घ्यावा लागला. ही त्याची राजकीय अपरिहार्यता होती. त्यातून त्याने अफगाणास्तानातील बुर्हानोद्दिन रब्बानी यांच्या नेतृत्वाखालील जमात ए इस्लामी या संघटनेच्या युवा शाखेचे नेतृत्व स्वीकारले. पण पुढे जमात ए इस्लामीमध्येही मवाळ नि जहाल असा संघर्ष सुरू झाला. मसूदला मवाळ इस्लामी ठरवून त्याची हत्या करण्याचाही प्रयत्न जहालांचे नेते हिकमतयार यांनी केला, त्यावेळी मसूद अवघा बावीस वर्षांचा होता.
अफगाणिस्तानात रशियाच्या वाढत्या प्रभावाच्या विरोधात मसूदने जनआंदोलन उभे केले. ते सशस्त्र होते. रशियाने १९७९मध्ये थेट लष्करी हस्तक्षेप केल्यावर मसूदने गोरिला वॉर आणि अफगाणी युद्धकौशल्याच्या जोरावर जोरदार लढा दिला. रशियाला पराभूत करण्यात मसूदच्या मुजाहीद फौजांचा वाटा खूप मोठा होता. म्हणूनच रशियाच्या माघारीनंतर स्थापन झालेल्या इस्लामिक स्टेट ऑफ अफगाणिस्तान सरकारात तो सरंक्षणमंत्री झाला. तालिबानचा उदय १९९६मध्ये झाल्यावर त्याने तालिबानच्या मूलतत्ववादी कट्टर जिहादी इस्लामच्या स्वरूपास पूर्णत: विरोध केला. निकराचा प्रयत्न करूनही काबुल तालिबान्यांच्या हाती पडताच त्याला देश सोडून ताजिकीस्तानमध्ये आश्रय घ्यावा लागला. तिथे त्याने ‘युनायटेड इस्लामिक प्रâंट फॉर साल्व्हेशन ऑफ अफगाणिस्तान’ अर्थात ‘नॉर्दन अलायन्स’ची स्थापना केली. २००० साली युरोपचा दौरा करून मसूदने पाकिस्तान हाच तालिबानचा समर्थक असल्याची स्पष्टोक्ती करून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाने दबाव वाढवावा यासाठी युरोपियन पार्लमेंटमध्ये प्रयत्न सुरू केले. त्याच वेळी गनिमी काव्याचा आधार घेत त्याने तालिबान राजवटीविरोधातही लढा सुरू ठेवून अनेक अफगाणी नागरिकांना मुक्त केले, त्यांना मदतही केली. याच कारणांनी मसूद तालिबानचे मुख्य लक्ष्य होता. त्याला मारण्याचे तालिबानचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले होते. ९ सप्टेंबर २००१ या दिवशी उत्तर अफगाणिस्तानातील तख़र प्रांतात एका बंकरमध्ये तो आश्रयाला असताना दोन सुसाइड बॉम्बर पत्रकार असल्याचे दाखवून मुलाखत घेण्याच्या बहाण्याने मसूदला भेटण्यास आले. या मुलाखतीदरम्यानच व्हिडीओ कॅमेर्यात लपवलेल्या बॉम्बचा विस्फोट झाला. मसूद या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याच वेळी ‘रिसर्च एनालिसिस विंग’ म्हणजे भारताच्या ‘रॉ’ या गुप्तचर संघटनेने मसूदला उपचारासाठी हेलिकॉप्टर पाठवले आणि फारखोर या ताजिकीस्तानमधील भारतीय हवाई दलाच्या नियंत्रणाखालील एअरबेसवरील इस्पितळात घेऊन जाताना त्या हेलिकॉप्टरमध्येच मसूदचा मृत्यू झाला. मसूद नऊ सप्टेंबर २००१ला वारला आणि त्यानंतर दोनच दिवसांनी तालिबान आणि अल कायदा या संघटनांनी मिळून ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कच्या ट्विन टॉवरवर विमानहल्ला केला. मसूदची हत्या नि ट्विन टॉवर हल्ला यात नक्कीच सहसबंध होता.
मसूदची हत्या ही भारतासाठी मोठी हानी होती. त्यावेळीही भारतात भाजपाचेच सरकार होते. तत्कालीन भारत सरकारतर्पेâ परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी दिल्लीत अफगाणिस्तानी वकिलातीत कमांडर मसूद यांना श्रद्धांजली वाहिली होती. कारण अहमदशहा मसूद हा पाकिस्तानविरोधात जागतिक जनमत बनविणारा आणि अफगाणी जनतेसोबतच भारताचे हित जोपसणारा अफगाणी योद्धा व नेता होता. तालिबानविरोधात लढणारा भारतमित्र योद्धा म्हणून अहमदशहा मसूदचं योगदान तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने मान्य केलं होतं. परराष्ट्र सचिव ब्रिजेश मिश्रा यांनीही मसूदची हत्या ही भारतासाठी खूप दु:खदायक असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
अफगाणी मुस्लिम जनतेला सरसकट तालिबान-समर्थक ठरवणं हे भारतात मुस्लिमद्वेषाचा अजेंडा राबवायला व निवडणूक जिंकायला उपयोगी असले तरी असे करणे हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अपरीपक्व असल्याचं निदर्शक आहे. अफगाणिस्तानात मसूद यांना राष्ट्रीय नायक मानले जाते. अफगाणिस्तानात सन २००३ साली मसूद फौंडेशनची स्थापना केली गेली असून त्याद्वारे शिक्षण, आरोग्यसुविधा, शेतीविकास यासाठी कार्य केले जाते. यासाठी भारत सरकारतर्पेâ सहकार्य दिले जात आहे. अहमदशहा मसूद आणि भारत यांच्या स्नेहाचे प्रतिक म्हणून राजधानी दिल्लीतील रस्त्यास अहमद शहा मसूद असे नाव दिले आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय परिप्रेक्ष्यात विचार करता अजून तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा वा योगी आदित्यनाथ यांनी भारतीय हिंदुराष्ट्राच्या राजधानीतल्या रस्त्याला एका अफगाणी मुस्लिम व्यक्तीचे नाव कशाला, म्हणून ते बदलण्याची मोहिम अद्याप हाती घेतलेली नाही हे विशेष!
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई नि अफगाणी शांतीदूत म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वीच तालिबानच्या नव्या सरकारसोबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. या दोन्ही नेत्यांनी मसूद यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल गौरवाने लिहीलं आहे, बोललं आहे. ते त्यांच्या मतावर कितपत ठाम राहतील माहीत नाही. पण मसूदच्या तालिबानविरोधातील हौतात्म्याचा वारसा नि योगदान स्वीकारायचे की मसूदलाही इस्लामी अफगाणी नेता म्हणून मुस्लिमविरोधी अजेंडा राबवत राहायचे? हा खूप मोठा प्रश्न आज श्री. मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारत सरकार, सरकारसमर्थक नि मोदींचे भक्त यांच्यासमोर आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून पंजशीर खोर्यात सर्व तालिबानविरोधक एकत्र येऊ लागले आहेत. यातील बहुतांशजण अफगाण राष्ट्रीय लष्कराचे सैनिक आहेत. त्यांचं नेतृत्त्व अहमदशाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद करत आहे. त्याच्यासोबत माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह आणि बल्ख प्रांताचे माजी गव्हर्नर यांची तुकडीदेखील आहे. पंजशीरमध्ये नऊ हजार तालिबान विरोधक सैनिक आहेत. पंजशीरचा खराखुरा शेर आणि भारताचा मित्र असणार्या मसूदचा वारसा केवळ अफगाणिस्तानच्याच नव्हे तर संपूर्ण युरेशियाच्या भविष्यासाठी महत्वाचा आहे.
– राज कुलकर्णी
(लेखक वकील आणि राजकीय कार्यकर्ते आहेत)