संतापाच्या भरात मी निर्णय घेतला आणि सॉलिसिटर मेहतांना बोलवून मुकेशला सर्व हक्कातून मुक्त केले. त्याला माझा वारस म्हणून नाव लावायला देखील मी कायदेशीर बंदी घातली. येवढेच नाही, तर शहरातील सर्व प्रमुख पेपरात मुकेशच्या फोटोसकट बातमी छापून आणली आणि त्याला बेदखल केल्याचे जाहीर केले. त्या रात्री मी जो मनातून कोसळलो तो कोसळलोच.
—-
शेठ कुंदनलाल गुंदेचा
सकाळपासून प्रचंड अस्वस्थ वाटते आहे. डॉ. संकलेचांचा फोन आला आणि मनावर एक प्रकारचे खेद आणि विषादाचे सावट पसरले आहे. काय झाले असेल नक्की? का मुकेशने इतका टोकाचा निर्णय घेतला असेल? आणि ज्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबात स्वार्थ आणि मक्कारी भरलेली आहे, तो मुकेश हा असा निर्णय घेतो? आश्चर्य आहे!! एक तर बाजारात उतरलेला नवा प्रतिस्पर्धी ‘रमण’ साम-दाम-दंड-भेद वापरून आपला धंदा बुडवायला बघतोय, त्यात हे नवे प्रकरण…
तुम्हाला वाटेल की, एखाद्या माणसाबद्दल मी इतका विखारी कसा बोलू शकतो? तुमची चूक नाही! कारण तुम्हाला मुकेश माहिती नाही. मुकेश माझा एकुलता एक मुलगा… हो बरोबर वाचताय… माझा सख्खा मुलगा. तरी देखील माझे त्याच्याबद्दलचे हे मत आहे म्हणजे आता विचार करा. आई नसलेले पोर म्हणून आधीच त्याच्या वागण्याकडे थोडेसे दुर्लक्ष झाले होते, पण ते इतकेही नव्हते की पोराने मवाली बनावे. धंद्याचा व्याप कितीही वाढता असला, तरी मी ह्या ना त्या मार्गाने मुकेशवर लक्ष ठेवून होतो. दिवाणजी, ड्रायव्हर, घरातले नोकर सगळे त्याच्या काळजीने त्याच्यावर अधिक लक्ष ठेवून असायचे. पण इतके सर्व असूनही मुकेशला वाईट संगत आणि नको ते नाद लागायचे ते लागलेच.
आधी धाक घालून पाहिला, एकदोनदा तर हातदेखील उचलला, पण मुकेशवर काही परिणाम झाला नाही. तो उलट अधिक वेगाने त्या दलदलीत रुतत चालला होता. शेवटी मन घट्ट करून त्याला हॉस्टेलमध्ये भरती केले. चारच दिवस… पाचव्या दिवशी वीरपुत्र तिथून घरी पळून आले. शेवटी चार मित्रांशी चर्चा करून मी निर्णय घेतला आणि मुकेशला पेढीवर बसवले. दिवसभर माझ्या डोळ्यासमोर राहावे लागत असल्याने मुकेशवर आता बराच वचक बसला होता. अध्येमध्ये रात्री तो गायब व्हायचा, पण नशा आणि इतर जुगार यासारख्या व्यसनांचे प्रमाण लक्षणीय कमी झाले. मग मात्र मी इतर शहाणे बाप करतात, तसे त्याच्या काही छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. याचा फार मोठा फटका मला लवकरच बसणार होता…
आजवर चित्रपटात पाहिलेले पोलिस चक्क पेढीच्या दारात उभे राहिले आणि मी हादरलो. याआधी एक दोनदा चोरीच्या मालाची चौकशी करायला काही वेळा पोलीस येऊन गेले होते; पण तशी प्रकरणे परस्पर दिवाणजीच हाताळत असत. मात्र आज चक्क माझ्या केबिनच्या दाराबाहेर पोलीस हजर झाले आणि मनात शंकेची पाल चुकचुकली.
मनातील भीती खरी ठरली.. पोलीस मुकेशसाठीच आले होते. मुकेशने मात्र कधीच अंदाज घेऊन पळ देखील काढला होता. मुकेशच्या अनेक मवाली जुन्या दोस्तांपैकी कोणा एकाच्या मैत्रिणीला लग्नाआधी दिवस राहिले होते. माझ्या नावाचा गैरवापर करत मुकेशने तिला पेढीशेजारच्याच एका छोट्या हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि अॅबोर्शन देखील करून घेतले. उपचारात काय कुचराई झाली माहिती नाही, पण ती पोरगी गेली आणि आता पोलिस आरोपींच्या मागावर होते. त्या दिवशी मात्र माझ्या संतापाचा स्फोट झाला. गुंदेचा घराण्याचा वारस हे असे घृणास्पद कृत्य करतो? आजवर मी त्याच्या सगळ्या चुकांना माफी दिली, त्याला सांभाळून घेतले. पण आता मात्र पाणी डोक्यावरून गेले होते. त्याच्या चुकांकडे मी केलेले दुर्लक्ष एका अजाण पोरीचा जीव घेऊन बसले होते. कसा माफ करणार होतो मी स्वत:ला?
त्या संतापाच्या भरात मी निर्णय घेतला आणि सॉलिसिटर मेहतांना बोलवून मुकेशला सर्व हक्कातून मुक्त केले. त्याला माझा वारस म्हणून नाव लावायला देखील मी कायदेशीर बंदी घातली. येवढेच नाही, तर शहरातील सर्व प्रमुख पेपरात मुकेशच्या फोटोसकट बातमी छापून आणली आणि त्याला बेदखल केल्याचे जाहीर केले. त्या रात्री मी जो मनातून कोसळलो तो कोसळलोच. आजही लोक एक कणखर पिता म्हणून माझ्याकडे बघतात, माझ्या निर्णयाचे वारेमाप कौतुक करतात. मी देखील कधी मुकेशची आठवण आलीच, तर त्या अजाण मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणतो आणि मग मुकेशचा चेहरा आपोआप काळवंडून जातो. मुकेशबद्दल कुठून ना कुठून बातम्या येत असतात. वर्षभराची शिक्षा भोगून तो सुटला, त्याने स्वत:ची वडापावची गाडी चालू केली आहे, कोणा गरीब, सालस मुलीशी लग्न केले आहे… एक ना दोन… अशा बातम्या सतत मिळतच असायच्या. आणि एक दिवस अचानक मुकेशने सहकुटुंब शहर सोडल्याची बातमी मिळाली. त्यानंतर वर्षभर तो जणू गायबच होता. मी देखील त्याची माहिती मिळवायचा प्रयत्न केला नाही. आणि हा असा स्वार्थी, निर्दयी मनुष्य स्वत:ची किडनी विकण्यासाठी डॉक्टरकडे गेला होता?
—
मुकेश
स्वत:च्याच घरात पाय ठेवताना कधी छातीत इतकी धडधड होईल, स्वत:चीच शंभरवेळा लाज वाटेल असे कधी वाटले नव्हते. अर्थात तसे काही वाटण्याइतका जबाबदार आणि समंजस मनुष्य मी आयुष्यात कधीच नव्हतो. पैशाची गर्मी आणि नशेची धुंदी आयुष्यावर कधी व्यापली ते कळलेच नाही. कळले असते, तरी मी सुधारलो असतो का? बेदरकार आयुष्य जगण्याची मस्ती मी सोडली असती का? काय कमी होते आयुष्यात? एक आईची माया सोडली तर काहीच नाही. मी देखील काही मातृभक्त वगैरे नव्हतो. उलट आईचा एक धाक कमीच आहे त्याचेच मला बरे वाटायचे. हाताशी पैसा होता, नोकर-चाकर, गाडी-बंगला सर्व ऐश्वर्य दारात पाणी भरत होते. मुख्य म्हणजे अत्यंत समंजस असे वडील देवाने मला दिले होते. पण ते म्हणतात ना, विनाशकाले…
‘नवकोट नारायण श्री. कुंदनलाल गुंदेचा’ या नुसत्या नावावर बाजारपेठेत लाखोंचे व्यवहार चालतात. विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे कुंदनशेठ गुंदेचा आणि या सगळ्याला काळे फासणारा मी; त्यांचा एकेकाळचा वारस मुकेश गुंदेचा. आज त्यांच्यासमोर बसण्याची देखील मला लाज वाटत होती. कधी नाही ते पायाला कंप सुटला होता. शेठजींच्या चेहर्याकडे तर बघण्याची देखील हिंमत होत नव्हती. एकेकाळच्या हसर्या, रुबाबदार चेहर्याची पार रया गेली होती या तीन-चार वर्षांत…
जो प्रश्न मी टाळत होतो, तोच प्रश्न अखेर समोरून आला. काय उत्तर देणार होतो मी? का गेलो होतो मी डॉक्टरकडे? घरच्या अडचणीचे कारण सांगितले पण ते काही पप्पाजींसारख्या मुरलेल्या माणसाला पचणारे नव्हते. त्यांनी बरीच खोदाखोद करत चौकशी केली, पण मी ठाम राहिलो. सुलक्षणा मात्र त्यांच्यासारख्या मुरलेल्या व्यापारी माणसासमोर टिकू शकली नाही आणि तिचा बांध फुटला…
शेवटी मला खरे काय ते सांगावेच लागले. माझ्या एकुलत्या एका मुलाचे ‘कुंदन’चे अपहरण झाले होते. पप्पांचे स्वप्न मी काही पूर्ण करू शकलो नाही, पण माझा मुलगा माझ्यासारखा नीच होणार नाही याची मात्र मी प्राणपणाने काळजी घेत होतो. अगदी हौसेने आजोबांच्या नावावरच त्याचे नाव देखील ‘कुंदन’ ठेवले होते. खटला चालू असतानाच मला पप्पाजींनी मला बेदखल केल्याचे कळले होते. माझ्यासारख्या नराधमाला अगदी हीच शिक्षा योग्य होती. पप्पाजींचे नाव लावण्यास मी खरंच नालायक होतो! वाईट येवढेच की, माझ्या चुकांची खरी जाणीव मला जेव्हा झाली, तेव्हा मी पूर्ण एकटा पडलो होतो. खूपदा मनात यायचे की धावत जावे आणि पप्पाजींचे पाय धरावे. पण यावेळी जो अक्षम्य अपराध घडला होता, त्याची जाणीव मला कायम रोखून धरायची…
आता मात्र मी एक सच्चे आणि प्रामाणिक आयुष्य जगण्याचा निर्धार केला होता. व्यसनी मित्रांची एक शेवटची मदत घेतली आणि त्यांच्या ओळखीवर दत्त नाक्याला वडापावची गाडी सुरू केली. गाडीवरची सगळी कामं मी सांभाळायचो, फक्त वडे बनवण्यासाठी एक माणूस ठेवला होता. हळूहळू त्याच्याकडून मी ते काम देखील शिकून घेतले. गाडीच्या मागेच छोटेसे कपड्यांचे दुकान चालवणार्या शामरावांशी ओळख वाढत गेली आणि एक दिवस त्यांची मुलगी सुलक्षणा धर्मपत्नी म्हणून आयुष्यात आली. दोनाच्या मदतीला अजून दोन हात आले आणि खर्या अर्थाने माझी भरभराट सुरू झाली. शामराव गेले आणि त्यांचे दुकान माझ्या ताब्यात आले, वडापावची गाडी जाऊन आता छोटे ‘नाष्टा सेंटर’ सुरू झाले. सगळे काही सुरळीत चालू होते. पप्पांजीची माणसे नजर ठेवून आहेत हे देखील मी जाणून होतो. पण आता समाधान हे होते की आता त्यांची माणसे माझ्याविषयी फक्त आणि फक्त कौतुकानेच बोलत असतील.
—
शेठ कुंदनलाल गुंदेचा
रमण इतक्या खालच्या पातळीला गेला? व्यापारातील स्पर्धा, चढाओढ मी समजू शकतो. मी आजवर त्याला कधी घाबरलो देखील नाही. आमच्या काळातही स्पर्धा असायची, एकमेकांचे ग्राहक पळवले जायचे, भाव-तोल देखील व्हायचे. पण वैयक्तिक पातळीवर दोन व्यापार्यांच्यात कधीच मनभेद झाले नाहीत. आमचे वैयक्तिक संबंध कायम चांगले राहिले. एकमेकांच्या कुटुंबाची देखील आपलेपणाने काळजी घेतली गेली आणि आज या रमणचे धाडस चक्क मुकेशच्या मुलाला पळवण्यापर्यंत गेले? ही कोणती व्यापारी स्पर्धा समजायची? आणि त्या निरागस लेकराची चूक काय? तर बेदखल असला तरी त्याचा बाप माझा मुलगा आहे आणि तो माझा नातू आहे?
एका बाजूला रमणवर संतापाची आग डोक्यात उठत असताना, दुसरीकडे मला चक्क मुकेशचे कौतुक वाटत होते. आजवर मी बघितला होता तो बेधुंद, मस्तवाल आणि स्वार्थी मुकेश. आज समोर बसला होता मुलाच्या सुरक्षेसाठी तळमळत असलेला, ‘मला बाप झाल्यावर कळले की, माझ्या प्रत्येक कृतीने तुम्हाला किती यातना दिल्या आहेत’ असे पायावर डोके ठेवून रडत सांगणारा आणि स्वत:च्या पोरासाठी किडनी विकून पैसे जमा करायला निघालेला गलितगात्र बाप!
मुकेशच्या चुकीची शिक्षा त्या छोट्या कुंदनला का? मुकेशने आपल्याला शिक्षा दिली म्हणून? इतके कठोर झालो आहोत आपण? आपल्या आणि मुकेशच्या संबंधाचा आणि आपल्या आणि रमणच्या लढाईचा फटका त्या निरागस जिवाला का? आता या उतारवयात आपण आपलाच अहंगंड कुरवाळत बसायचे आहे का? मुकेश भलेही नालायक असले पण तो लहानगा कुंदन या आयुष्य संपत चाललेल्या कुंदनचा आधार होऊ शकणार नाही का? अरे.. काही झाले तरी या गुंदेच्या घराण्याचा तो वारस नाही का? काही एक ठाम निश्चय करून मी उठलो आणि इन्स्पेक्टर बनहट्टीचा नंबर फिरवला…
—
इन्स्पेक्टर बनहट्टी
तुम्ही काही म्हणा, पण थोरामोठ्यांच्या पार्टीचा माहौल काही औरच असतो. अगदी तुमच्या बड्या बड्या चित्रपटांतल्या पडद्यावरच्या पार्ट्या देखील यापुढे झक मारतील. रोशनीचा झगमगाट, मंद अत्तराचा सुवास, सुळसुळत इकडे तिकडे फिरणारे रेशमी कपडे आणि नावे देखील ऐकली नसतील अशी खाद्यपदार्थांची रेलचेल. आता हातात आहे त्या ग्लासातील व्हिस्कीचे तर नावदेखील दुसर्यांदा उच्चारणे मला जमलेले नाही. पण अशी तरल व्हिस्की मी आयुष्यात कधी प्यायलेलो नाही. पुन्हा मनात आले, तर कदाचित प्यायला मागवेन देखील… कारण आता आपला खिसा जड आहे! पंचवीस वर्षाच्या नोकरीत कमावणार नाही एवढा पैसा पंचवीस तासात मी कमावला आहे. कमावलाय म्हणजे माझ्या कामगिरीवरती खूश होऊन तो मला गुंदेचा बाप-बेट्याकडून मिळालाय.
अरे हो! तुम्हाला सांगायचेच राहिले… गुंदेचा फॅमिली पुन्हा एकत्र झाली आहे. बापाने मोठ्या मनाने मुलाला माफ केले आहे आणि पुन्हा वारस देखील नेमले आहे. बिझनेस सांभाळताच रमण आणि मुकेशने हातमिळवणी केली आहे आणि रमणच्या मैत्रीखातर त्याला एका दुकानात पार्टनरशिप देखील दिली आहे. सुलक्षणाने भाऊ मानल्यापासून आता रमण देखील गुंदेच्यांचा घरचा एक सदस्य झाला आहे.
माझ्या मेंदूवर सध्या लाल-हिरव्या नोटांचा अंमल पसरलेला आहे आणि त्याला आता या व्हिस्कीची साथ लाभली आहे म्हणून मी निवांत आहे. पण एकदा मी वास्तवात आलो आणि भला थोरला रिकामा वेळ मिळाला की, मला काही प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. तुम्हाला फोन येतो… तुम्ही दिलेल्या पत्त्यावर धावता आणि तिथे अपहरण झालेला मुलगा निवांत टेडी बेअरशी खेळताना तुम्हाला दिसतो. एकही पैसा न घेता, वर नवा कोरा टेडीबेअर देऊन त्याला कोणी असे मोकळे सोडून दिलेले असते? अपहरणाची केस अशी ‘शिंपल’ असते होय?
रमणच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुकेशने डाव साधला की रमणच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुंदनशेठनी डाव साधला?
– प्रसाद ताम्हनकर
(लेखकाचे गुन्हेगारी कथालेखनावर प्रभुत्व आहे)