अभियंता दिनाच्या निम्मिताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया याचं स्मरण करतो. या निमित्ताने मी आजवर जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या विश्वेश्वरैयांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.
१. कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक व्हीआयपी व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरू होईना.
पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या व्हीआयपीनां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं. परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं. मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री. संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं. या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता. पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली व्हीआयपी मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली. गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डयन मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती. याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती. फिरोज मोमीन हा तो अवलिया.
२. विजार-शर्टातला आयटीआय शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजण कुतूहलाने पहात असतांना ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का, असा टोमणा त्यातील एकाने मारला.
त्या तरुणाने कार चार्ज केली आणि दुसर्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली.
पुढे त्यांनी किमान ५० एक नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या.
१९७६ साली एका प्रख्यात जापनीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं सायकल टाईम याने इचलकरंजीमध्ये ते १२ सेकंदात बसवून दाखवलं.
जगप्रसिद्ध फाय गृपचे संस्थापक श्री. पंडितराव कुलकर्णी हे या अभियंत्याच नाव.
३. युरोपमध्ये फिरता रंगमंच पाहून ‘तो मी नव्हेच’ या नाटकासाठी ते महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बर्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं.
कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांच्या एका मित्राने पणशीकरांना एका लोहाराच्या पालावर घेवून गेले. पणशीकरांनी अगदी इनिच्छेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली.
त्या लोहाराने दुसर्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.
किर्लोस्करांनी डीझेलवर चालणारा जनरेटर मार्केटमध्ये आणला तेव्हां या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला जो डीझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० टक्के किमतीत बनवला होता.
ही असामी म्हणजे इयत्ता दुसरी शिकलेले म्हादबा मिस्त्री अर्थात महादेव शेळके.
४. उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एका तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ लागला.
पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत वस्त्रोद्योग, उर्जा, महामार्ग, बांधकामांसारख्या क्षेत्रात आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला.
कित्तेक उच्चशिक्षित अभियंत्याना घडवणारा बंडी, धोतर, गांधीटोपी वेशातला हा अशिक्षित पण विद्वान अभियंता म्हणजे रामचंद्र मारुती मोहिते.
५. सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक मुंबईतील माझगाव डॉकवर वेल्डरचं काम करणार्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसायिक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरू केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे); जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे. २०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला.
बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.
हे आहेत मुंबईतील डीएएस ऑफशोअरचे श्री. अशोक खाडे, आणि डीएएसचा फुल्लफॉर्म आहे – दत्ता, अशोक, सुरेश.
६. टाटा मोटर्समध्ये काम करणार्या एका इंजिनीअरने टाटा इस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरुन कंपनीचे २.५ करोड रुपये वाचविले.
त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली.
टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला. ज्याची मजल आज ७५,००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे. पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीम कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही… २२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, लाइफ सायन्सेस, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे पीस अप्लिकेशन, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बर्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली. वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींची पुढे आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये याचं नाव अग्रक्रमावर येतं. आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मुळचे रहिमतपूरचे आणि व्हीआयटी कॉलेजचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर असणारे बीव्हीजी म्हणजेच भारत विकास ग्रुपचे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड यां सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं. माहितीत असलेल्या, नसलेल्या अशा सर्वच विश्वेश्वरैयांच्या खर्याखुर्या वंशजांना अभियंता दिनाच्या निम्मिताने मानाचा सलाम!