हीरूमीने सांगितलेली गोष्ट… एकदा एका पारध्याने लावलेल्या जाळ्यात एक मुठीएवढा चिमुकला पक्षी अडकला.
पारध्याने त्याला फाशातून सोडवलं आणि तो त्याची मान मुरगळणार एवढ्यात तो पक्षी माणसांसारखा बोलू लागला. तो म्हणाला, हे पारध्या, मी तुझ्या एका घासाचाही नाही. मला मारून तुला काय मिळणार? मला सोडलंस, तर मात्र मी तुला तीन महत्त्वाच्या शिकवणी देईन. त्या तुला आयुष्यभर पुरतील. एक शिकवण मी तुझ्या मुठीत असतानाच देईन. दुसरी झाडाच्या फांदीवर बसून देईन. तिसरी आकाशात उडताना देईन.
पारध्याने थोडा विचार केला. मग म्हणाला, इथे कोणाला शिकवणींमध्ये रस आहे. त्यापेक्षा या पक्ष्याचं पातळ तर्रीवालं कालवण केलं तर ते जास्त उपयोगी ठरेल.
त्याच्या बोटांचा मानेभोवती विळखा बसला, तसा तो पक्षी म्हणाला, ठीक आहे. तू मला मारायचंच ठरवलं असलं तर आता तेच माझं भागधेय. पण, मला मारण्याआधी फुकटात मिळणारी माझी पहिली शिकवण तरी ऐक.
पारधी थबकला.
पक्षी म्हणाला, हातातून निघून गेलेल्या कोणत्याही गोष्टीचा कधी शोक करू नकोस.
पारध्याला ही शिकवण आवडली. तो म्हणाला, चल, तुला मुक्त करतो. पण, दुसरी शिकवण आत्ताच सांगायची.
पक्षी म्हणाला, ठीक आहे, अशक्यप्राय गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नकोस.
पारध्याने मूठ सैल केली. पक्षी भुर्रकन् उडाला आणि फांदीवर जाऊन म्हणाला, तुझ्याइतका मूर्ख पारधी मी पाहिला नाही. मी चुकून एक लिंबाएवढा हिरा गिळला आहे. माझ्या गोड बोलण्याला भुलून तू मला सोडून दिलं नसतंस, तर मला कापून तो हिरा तुला मिळवता आला असता.
हे ऐकल्यावर पारधी मटकन खाली बसला आणि रडवेला होऊन आपल्या नशिबाला बोल लावू लागला. रडू लागला. पक्षी झाडावर बसून पाहात होता.
थोड्या वेळाने शोक आवरून पारधी त्याला म्हणाला, आता निदान तुझी शेवटची शिकवण तरी दे. तेवढाच माझ्या मनाला दिलासा.
पक्षी म्हणाला, काय उपयोग तुझ्यावर त्या शिकवणीचा? आधीच्या दोन शिकवणींचं काय लोणचं घातलंस? मी तुला सांगितलं होतं, गेल्या गोष्टीचा शोक करू नकोस. तू त्या हिर्याचा शोक केलासच. मी तुला सांगितलं होतं, अशक्यप्राय गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. माझा आकार बघ. माझ्या चोचीचा आकार बघ. माझा गळा केवढा. त्यातून लिंबाएवढा हिरा मी गिळू शकतो का? पण, तू विश्वास ठेवलासच ना?
पारध्याने निमूट मान हलवली.
पक्षी म्हणाला, माझी तिसरी शिकवण ही आहे की मूर्ख माणसाला शिकवण देणं हे दगडावर बी रुजवण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे… निव्वळ महामूर्खपणाचं.
…अन गरूडाने घेतली गगनभरारी
एका राजाला एकदा दोन गरुडाची पिलं भेटीदाखल मिळाली. अतिशय देखण्या आणि डौलदार जातीची ती पिलं मोठी होऊन आपल्या राजचिन्हाला साजेशी बनावीत, म्हणून त्याने एका अनुभवी प्रशिक्षकाकडे त्यांना सोपवलं.
वर्षभराने प्रशिक्षकाचा निरोप आला की आपले गरुड मोठे झाले आहेत, त्यांची झेप पाहायला या.
राजा पोहोचला. प्रशिक्षकाने गरुडांना मैदानात आणलं आणि इशारा केला… एक गरुड आकाशात झेपावला आणि सुरेख भरारी घेऊ लागला. दुसरा गरुड मात्र उडाला आणि शेजारच्या एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. असं अनेकदा झालं.
राजाने संतापून प्रशिक्षकाला विचारलं. तो मान खाली घालून म्हणाला, महाराज, मीही अनेक उपाय केले, पण, तो ती फांदी सोडतच नाही. तिच्यावर उडतच नाही.
राजाने दवंडी पिटवली. जो कोणी दुसर्या गरुडाला गगनभरारी घ्यायला लावेल, त्याला शंभर मोहरा इनाम. अनेकांनी प्रयत्न केले, फोल गेले. दुसरा गरुड फांदी सोडेना.
एक दिवस राजा राजवाड्याच्या प्राचीवर फेरी मारत असताना त्याला आकाशात दोन्ही गरुड सुंदर भरारी घेताना दिसले, तो ताबडतोब पक्षीशाळेकडे गेला. तिथे प्रशिक्षकाने सांगितलं की एका शेतकर्याने दुसर्या गरुडाला आकाशात भरारी घ्यायला लावलं.
राजाने शंभर मोहोरांची थैली देत शेतकर्याला विचारलं, इतकी अशक्यप्राय गोष्ट तू कशी साध्य केलीस? शेतकरी म्हणाला, त्यात काहीच अवघड नव्हतं महाराज. मी त्या झाडाची ती त्याच्या सवयीची फांदी तोडून टाकली. गरुड आकाशात झेपावला.