कथा-कादंबर्या, प्रवास वर्णन, थोरल्या संतांची चरित्रे अशी जवळपास ८१ पुस्तके आप्पांनी लिहिलेली आहेत. त्यांची मुलगी वीणा देव यांनी मृण्मयी प्रकाशनतर्पेâ त्यातली काही नव्याने छापलीसुद्धा आहेत. आयुष्यभर हालअपेष्टा सहन करत अनुभवांचे प्रचंड मोठं भांडार आप्पांसारख्या लेखकांनी तुमच्या-आमच्यासाठी लिहून ठेवलंय जणू त्यांनी केलेली वेगळ्या विश्वातील नर्मदा परिक्रमाच घरबसल्या अनुभवावयास मिळावी!
– – –
शिवाजी महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यावर पायपीट करणारे गोनीदा म्हणजे गोपाल नीळकंठ दांडेकर ऊर्फ आप्पा दांडेकर हे पहिले व बाबासाहेब पुरंदरे दुसरे. साधे सरळ रस्त्याने चालताना सुद्धा आपण फक्त थकतो. या दोघांची वयं पाहिली तर गाडी नाही, घोडं नाही, विमान नाही- अगदी तानाजीची घोरपडसुद्धा हाती नाही; तरी भर उन्हात पायपीट आणि पायपीट. अन्न, वस्त्र, निवारा मिळेल याची खात्री नाही. डोळ्यांपुढे फक्त एकच मूर्ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांची.
मात्र आप्पा दांडेकर यांना संतांविषयी आणि त्यांच्या ओव्या व अभंगांबद्दलही कमालीची आत्मीयता होती. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी यांच्याविषयी त्यांनी खूप सुंदर पुस्तकेही लिहिली आहेत. स्वतःच्या लहानपणापासूनच्या भटकंतीवर त्यांनी स्मरणगाथा, कुणा एकाची भ्रमणगाथा यांच्यासारखी जगावेगळी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांनी काही काळ गाडगे बाबांबरोबर घालवून लिहिलेले गाडगे बाबांचे चरित्र अप्रतिम सुंदर आहे. ज्ञानेश्वरांवर ‘त्यानी मोगरा फुलला’ ही कादंबरी लिहिली आहे. तिच्या सार्वजनिक वाचनाचे कार्यक्रम त्यांची कन्या वीणा देव आणि ते स्वतः करीत. संस्कृत हिंदी व मराठीवर त्यांची उत्तम पकड होती. लता मंगेशकर व आशा भोसले यांना त्यांनी मराठी आणि संस्कृत शब्दोच्चाराचे धडे दिल्याचे आशाताईंनी सांगितले आहे.
गोनीदा पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडेसारख्या छोट्या गावात पत्नी नीरा आणि मुलगी वीणा यांच्यासह कच्च्या पक्क्या घरात रहात. लिखाण आणि भाषणे हेच उपजीविकेचे साधन होते, त्यामुळे दारिद्र्य रेंगाळत होते. शिवाय लहानपणी साधू गोसाव्यांच्या नादी लागून हिमालयापासून काशी-हरिद्वारपर्यंत त्यांचे उभे बालपण फरफटत गेले. दिशाहीन जगणे अनुभवले. छोट्या-मोठ्या साधुसंतांची प्रवचने ऐकली, हिंदी संस्कृतमध्ये. परिणामी त्यांची वाणी रसाळ झाली. धार्मिकतेची जोड आणि उघड्या डोळ्यांनी जग अनुभवले असल्याने कथा-कादंबर्यांची पुस्तके मग ती ऐतिहासिक असोत वा सामाजिक- खूपच गाजली. त्यांच्या कथांवर ‘जैत रे जैत’, ‘पवनाकाठचा धोंडी’ आणि ‘देवकीनंदन गोपाला’ हे सिनेमासुद्धा निघाले… बराच काळ ते गाडगे महाराजांबरोबर राहिले. गोपाळ बुवा नावाने प्रवचने देत.
सत्तरच्या दशकात त्यांचे आमच्याकडे येणे जाणे सुरू झाले. मध्यम उंची, गोरापान रंग, धारदार नाक, निळे डोळे, मागे वळवलेले केस, कुडता आणि स्वच्छ धोतर एवढाच त्यांचा पेहराव. सुंदर अक्षरात मोजक्या शब्दांत ते पत्र पाठवीत. ‘व्याख्यानासाठी नाशिकला येतोय. दोन दिवस तुझ्या घरी राहीन. मुगाचे वरण पोळी किंवा भाकरी चालेल.’ एवढेच शब्द बस्स. अमुक-तमुक लोकांनी व्याख्यान ठेवलेली आहेत, त्यांना भेटून प्रत्येकी शंभर रुपये सांगून ठेव, असाही निरोप असे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, शिवाजी महाराज, किल्ले वा रामायण यातल्या कोणत्याही विषयावर ते अत्यंत मधुर भाषेत सुंदर भाषणे करीत. मधून विनोदाची पेरणी असेच.
एका व्याख्यानात त्यांनी परिचय करून देणार्या माणसांचे नमुने सांगितले. म्हणाले, मी एकदा अकलूजला गेलो होतो. एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त माझे प्रवचन ठेवलेले होते. थाटमाट चांगलाच होता. स्टेजवर या मंडळींची भाषणे झाली. मी व्याख्यानासाठी उभा राहिलो एवढ्यात माझा परिचय करून देण्यासाठी एक उतावीळ तरुण पुढारी पुढे झाला व मला, ‘बसा बरं खाली, तुमचा परिचय मी करून देतो,’ म्हणाला. त्याला अडवत मी म्हणालो, ‘माझ्याबद्दल आपणास काही कल्पना आहे का? माझी पुस्तके, मी काय करतो, काय नाही, याची तुम्हाला कल्पना आहे का?… ‘दांडेकर बुवा, अनेकांचा परिचय मी करून देत असतो. माझा गाढा अभ्यास आहे. आपण निश्चिंत राहा,’ म्हणाला. तरीही मी नेटाने त्याच्या हातात माझे नाव, गाव, छोटासा परिचय, पुस्तके यांचे टिपण केलेला कागद दिला व म्हटले, ‘हा माझा अल्पपरिचय एकदा डोळ्यांखालून मात्र अवश्य घाला.’ अत्यंत पारंगत वत्तäयाप्रमाणे त्याने तो कागदावरचा परिचय भरभर वाचून काढला. मोठ्या आत्मविश्वासाने डायसजवळ तो उभा राहिला. समोर दोन-तीनशे मंडळी बसलेली होती. मी त्याच्या मागच्या एका खुर्चीवर बसलो होतो. माझ्या लायनीत स्टेजवर अनेक मोठमोठी नेते मंडळी स्थानापन्न झालेली होती. स्टेजवरील नेत्यांचा अघळपघळ परिचय करून देत शेवटी माझ्याकडे पाहून म्हणाला, ‘आजचे पाहुणे सोनोपंत दांडेकर हे महाराष्ट्रातील फार मोठे प्रवचनकार आहेत. मी त्याचा शर्ट खेचत म्हणालो, गो. नी. दांडेकर माझे नाव. गोपाल नीलकंठ… त्यावर माझ्याकडे मागे पाहत तो म्हणाला, ‘असू द्या हो काय फरक पडतो? सोनोपंत दांडेकर काय तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती आहेत का?…’ पुढे पाहात म्हणाला, ह्यांनी भाराभर पुस्तकं लिहिलीत. त्यांची नावे सांगत बसलो तर फार वेळ वाया जाईल. लहानपणापासून ते सारखे या गडावरून त्या गडावर, या अरण्यातून त्या अरण्यात फिरत असतात. माझ्या दाढीकडे पाहत म्हणाला, ‘इतके की त्यांना दाढी करायलासुद्धा वेळ मिळालेला नाही. अहो इतकेच नाही तर या धावपळीत त्यांना लग्न करायला सुद्धा वेळ मिळालेला नाही… मी बसल्याजागी अवाक झालो कारण नीरा व वीणा पहिल्यांदाच माझ्या व्याख्यानासाठी मजसवे आलेल्या होत्या व प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या बिच्चार्या!
त्याची गाडी आता बेफाम सुटली होती तो म्हणाला, हे सारखे अरण्यात फिरतात त्यामुळे जाणकार लोक त्यांना ‘अरण्यपंडित’ म्हणतात. त्या शब्दाचा अर्थ त्याला माहित नव्हता; पण प्रेक्षकांत काहींना माहित होता. ते खदखदा हसू लागले. कारण अरण्यपंडिताचा अर्थ महामूर्ख असा आहे. असा हा परिचय!
ते आमच्याशी गप्पा मारत घरात बसले की छोट्या पुरचुंडीतून गड-किल्ल्यावर सापडलेले रंगीबेरंगी खडे आम्हाला दाखवीत. बहिर्गोल भिंगातून त्या खड्ड्यांचे निरीक्षण केले तर ते अत्यंत चमकदार असे वेगळे रंगातले असायचे. ते रंगीबेरंगी खडे कोणत्या गडावर कोणत्या ठिकाणी कसे सापडले, हे ते रसभरीत वर्णनासह सांगायचे. सुरुवातीस मी काही वर्ष एचएएल टाऊनशिपमध्ये राहायचो. एके वर्षी ते पाच-सहा तगड्या हौशी ट्रेकर तरुणांना घेऊन मुक्कामी आले. सटाण्याजवळच्या भिलवडी गावाजवळच्या मांगीतुंगी या किल्ल्यांना भेट द्यायला ते जाणार होते. या डोंगरावर जाण्यासाठी हजारात पायर्या चढाव्या लागतात. तेथेच मोठे जैन स्थानक आहे. हजारो लोक दरवर्षी तेथे जातात. अनेक तरुण-तरुणींचे जत्थे घेऊन आप्पा अनेक गडांवर जायचे आणि मिळेल तेथे या लोकांची सोय करायचे. माझी क्वार्टर तशी बेतास बात होती. बेडरूम, हॉल, किचन व बाहेर पटांगण. माझ्या पत्नीस, अनुराधास म्हणाले, अनुराधा, आम्ही भुकेले आहोत. सात वाजेपर्यंत स्वयंपाक तयार होईल ना? अनुने हो म्हटले नाही कोणाला म्हणणार? त्या काळात मदतीला कोणी नसे. अनुराधा खरोखरच सुगृहिणी. पंचवीस-तीस पोळ्या, पिठलं भात, बटाट्याची भाजी केली. त्यात आप्पांना मुगाचे वरण लागे. सगळे जेवायला बसले. मी वाढायचे काम केले. ते तरुण बाहेर जाऊन गप्पा मारत बसले. मुटकुळे करून आप्पा सोफ्यावर गाढ झोपी गेले. झोपण्यापूर्वी म्हणाले, अनुराधा उद्या सकाळी आमच्या बरोबर दशम्या दे. वाटेत जेवण मिळते ना मिळते.
तरुणांसाठी मोठी सतरंजी अंथरली, पांघरुणे दिली. दमलेली अनु गाढ झोपी गेली. कारण सकाळी लवकर उठायचे होते. आप्पांसह ती मंडळी पहाटे लवकर उठली. आंघोळी केल्या आणि तयार झाले. गंमत अशी की, त्या तरुणांनी ओले कपडे तसेच बाथरूममध्ये टाकून ठेवले होते. मी त्यांना आत बोलावले. तुमची ही अंतर्वस्त्रं का धुतली नाहीत, मी जाब विचारला. बहुदा तुम्ही चांगल्या घरातले दिसता. पण दुसर्याच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर त्या घरातल्या लोकांना मदत करायची असते, आपले कपडे, अंथरूण-पांघरूण आवरून ठेवायचे असते, हा संस्कार तुमच्यावर कोणी केला नाही का? अप्पा तुम्हाला जगाची ओळख करून देत आहेत. त्यात बाहेर गेल्यावर काही पथ्ये असतात ती प्रथम पाळायला शिका. ते उत्तम ओशाळले, सॉरी म्हणू लागले. आप्पांनी आत येऊन विचारलं, का रे, काय झाले? मी हसत उत्तरलो, या तरुणांना जरा गुरुमंत्र देत होतो. ज्ञानेश्वरीतील आठव्या पानावरचा दहावा श्लोक…
आप्पांचे भाषण ऐकून भारावलेले कॉलनीतील लोक दुसरे दिवशी माझ्या घरी येऊन त्यांच्या पाया पडत. गर्दी पाहून आप्पा मला म्हणाले, अरे पाया पडण्यासाठी येणार्यांना तिकीट तरी लाव, मला प्रवासात पैसे तरी उपयोगी पडतील. त्यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, लता आणि आशाची गाणी मला खूप आवडतात. विशेषतः भावगीते. माझ्या घरात लाइट नसल्याने रेडिओ नव्हता. ट्रान्झिस्टर्स नव्यानेच बाजारात येत होते. प्रकाशकांकडून मानधन कधीच वेळेवर मिळत नसायचे. इतर वेळी पायपीट धावपळ चालूच असायची, पण लिखाणाला बसलो की काहीतरी धून आजूबाजूला असावी असे वाटायचे. या दोन गानकोकिळा. पण त्यांना म्हणणार कसे? आणि काय म्हणायचे मला रेडिओ घेऊन द्या.. हे तर कदापि शक्य नव्हते. एकदा मुंबईला व्याख्यानासाठी गेलो होतो. आशाला कुठून तरी कळले की अप्पा मुंबईत आलेत. आशा-लता तशा दोघीही फार जीव लावायच्या. त्यांच्या घरी कायम मुक्काम असायचा. खाण्यापिण्याची छान बडदास्त असे. आयुष्यभराच्या भ्रमंतीमुळे पोटात कायम आग पडलेली असायची. मुगाची डाळ व भाकरी एवढाच माझा आहार असल्याने व मांसाहार करीत नसल्याने मी तसा त्रासदायक वाटत नसे. मात्र त्या दोघींचा मांसाहारी जेवण बनवण्यात हातखंडा. मी उतरलो तेथे आशा मला शोधीत आली. थोड्या गप्पा-टप्पा झाल्यावर तिने हातातला पुडकं मला सोपवत म्हटलं, आप्पा हे तुम्हाला.. मी चमकून विचारलं, यात काय आहे?
उघडून बघा ना.. मी पुडकं उघडलं त्यात एक छानसा ट्रॅन्झिस्टर होता. अगं, हे कशाला?
‘माझी आणि दीदीची गाणी तुम्हाला आवडतात ना म्हणून.. तुम्हाला ऐकण्यासाठी आणलाय!’
अगं पण तुला कसं कळालं माझ्याकडे रेडिओ नाही ते?
नक्की नाही सांगता यायचं पण मनाच्या कोपर्यात कुठेतरी अशी अनुभूती जाणवली ‘या हृदयाचे त्या हृदयाशी’ म्हणतात ना तसे वाटले त्या क्षणी घेऊन आले बस्स!
आप्पांची भाषण खूप भारावून टाकणारी असत, श्रोते मग्न होऊन जात. एकदा ज्ञानेश्वरीवर त्यांचे प्रवचन होते. खूप सुंदर रंगले. भारावलेल्यांत एक बँकेचे मॅनेजर होते. माझे चांगले मित्र होते. त्यांनी आप्पांना आग्रह केला की संध्याकाळचे जेवण माझ्याबरोबर घ्यावे. अप्पा म्हणाले, माझ्या मुलीला, अनुराधाला विचारा; तिने परवानगी दिली तर येतो. ज्ञानेशांचं कुटुंब आपल्याबरोबर असणार आहेच, असं मॅनेजर म्हणाले. ते अपेयपान करणारे होते म्हणून मी आवर्जून त्यांना सांगितलं, ‘नॉनव्हेज आणि हॉट ड्रिंक्स चालणार नाहीत. साधं जेवण चालेल. संध्याकाळी आम्ही जेवायला त्यांच्याकडे गेलो. साहेबांची ड्रिंक्स घ्यायची सवय, त्यांनी दोन तीन पेग मारले होते. गृहिणीने चांगले जेवण केले होते. गोडात उकडीचे मोदक होते. आप्पांचा प्रश्नच नव्हता. ते अत्यंत माफक जेवले. मात्र मोदक आवडीने खाल्ले. तरुण सुगरणीला शाबासकी दिली. नंतर गप्पा सुरू झाल्या. साहेब रंगात आले होते त्यांनी विचारलं, आप्पासाहेब, ‘मोगरा फुलला त्याचा वेलू गेला गगनावरी’ यात ज्ञानेश्वरांना काय सांगायचे आहे?…’ त्यावर, ‘ज्ञानरूपी मोगरा फुलला त्याचा वेलू गगनावरी गेला म्हणजे सर्वदूर त्याची कीर्ती वेलाप्रमाणे वाढतच गेली,’ असं काहीसं भाष्य अप्पांनी केलं व त्या अनुषंगाने अनेक दाखले दिले. पण, साहेबांचा वेलू इंचाइंचाने वर जात होता. ते विचारू लागले, ‘पण वेलू गगनावर कसा गेला? त्याला आधार काय? कोणत्याही वेलीला वर जाण्यासाठी आधाराची गरज असते. हा विनाआधार गेलाच कसा?’ आप्पांना अंदाज आला. ते मुकाट बसून राहिले. आम्हाला निरोप द्यायला साहेब दारापर्यंत आले, परंतु त्यांचा वेलूचा गुंता सुटलाच नव्हता.
अप्पा म्हणाले, ज्ञानेश, हा बहुदा मदिराक्षीच्या झाडावर असावा सकाळपर्यंत उतरेल खाली. असो.
गाडगे बाबांबरोबर आप्पा बराच काळ राहिलेले. बाबांची भाषण वरवर फटकळ वाटत पण जनसामान्यांना अज्ञान व गरिबीतून वर काढण्यासाठी परखडपणे कीर्तनांतून खडे बोल सुनावीत, भरपूर विनोदही करीत. खेडोपाडीच्या अडाणी अशिक्षित वैदूंवर, जादूटोण्यांवर विश्वास ठेवणारांना सांगत, बाबांनो, देवापुढे हात पसरुन काही मिळणार नाही, पोरांना शिकवा. घरदार अंगण, गावातले उकिरडे, रस्ते स्वच्छ ठेवा. अडलेल्याला तुम्हीच मदत करा. तो काळा बसलाय पंढरीत, तो कशाला येईल तुमच्या मदतीला?… त्यांना स्वच्छतेची आवड होती. कुठल्याही खेड्यात गेले की झाडू, शिरई मागून घेत व रस्ते झाडायला सुरुवात करीत. तासाभरात पाचपन्नास जण झाडू घेऊन बाबांबरोबर सामील होत. गावकरी कीर्तन सप्ताहानिमित्त गावजेवण ठेवत. बाबा स्वत: वाढत. मात्र स्वत: गाडग्यात शिळंपाकं अन्न घेऊन एकट्याने झाडाखाली बसून खात. पाया पडू पाहणाराला चिरफळलेल्या काठीने मारत म्हणायचे, ‘माझ्या कशाला पाया पडला, जा त्या काळ्याच्या पाया पडा (पंढरीच्या विठोबाला ते प्रेमाने काळ्या म्हणत) म्हणजे तो तुम्हाला आयतं ताट आणून देईल. मुखात सतत ‘गोपाला गोपाला’चे नाम स्मरण चालू असे.
अप्पा भारावून म्हणाले, बाबांनी गावोगावी अनेक धर्मशाळा काढल्या. गरिबांसाठी अन्नछत्रं उघडली. हजारो रुपयांच्या देणग्या मिळत होत्या. पण बाबांनी त्या पैशांना स्पर्श केला नाही. कुटुंबीयांना, अगदी पत्नीलासुद्धा स्पर्श करू दिला नाही. तुमच्या नाशिकच्या धर्मशाळेजवळच बाबांची एक झोपडी होती. तेथे पत्नी व लहान मुलगा राहायचा. त्याला सर्पदंश झाला. औषध पाण्यावाचून तडफडत मेला. बाबांसारख्या संताची पत्नी असूनही त्या बाईंना छोटी-मोठी हलकी सलकी कामे करावी लागत. आल्या गेल्या भक्त व भाविकांना बाईची कणव येई; पण बाबांचा खूप धाक होता. भाविक कपडालत्ता खाण्याचे जिन्नस गुपचूप आणून देत, पण त्या जिनसा लपवताना बाईंची दमछाक होई, कारण झोपडी खूप लहान होती. आठ-दहा दिवसांनी बाबा झोपडीत येत आणि सगळे जिन्नस बाहेर काढून गरिबांना वाटून द्या म्हणून सांगत. त्यांचे वागणे म्हणजे निरपेक्षपणाची हद्द होती. सांगताना आप्पाच्या डोळ्यांत पाणी तरारले. आप्पांची स्मरणगाथा तसेच गाडगे बाबांचे चरित्र व इतर पुस्तके खूप वाचनीय आहेत. त्या सो कॉल्ड परिचयकाप्रमाणे मी त्यांच्या पुस्तकांची यादी लिहित नाही. कारण कथा-कादंबर्या, प्रवासवर्णन, थोरल्या संतांची चरित्रे अशी जवळपास ८१ पुस्तके आप्पांनी लिहिलेली आहेत. त्यांची मुलगी वीणा देव यांनी मृण्मयी प्रकाशनतर्फे त्यातली काही नव्याने छापलीसुद्धा आहेत. आयुष्यभर हालअपेष्टा सहन करत अनुभवांचे प्रचंड मोठं भांडार आप्पांसारख्या लेखकांनी तुमच्या-आमच्यासाठी लिहून ठेवलंय. त्यातून त्यांनी केलेली वेगळ्या विश्वातील नर्मदा परिक्रमाच घरबसल्या अनुभवावयास मिळावी!