वेड्यावाकड्या रेषा मारल्या किंवा सरळ चेहर्यांच्या ऐवजी विचित्र आकाराचे चेहरे काढले की व्यंगचित्र तयार होते, अशी अनेक हौशी व्यंगचित्रकारांची समजूत दिसते… त्यावरून हटकले की, ती माझी स्टाइल आहे, असे हास्यास्पद उत्तर मिळते. अस्सल व्यंगचित्रकाराच्या व्यंगचित्रात काँपोझिशन कसे असते, चेहर्यांचं, शरीरांचं, कपड्यांचं रेखाटन किती बारकाईने केलेलं असतं, बारीक आणि जाड रेषेचा कसा अचूक वापर केलेला असतो आणि त्या व्यक्तिचित्रांमधून त्या व्यक्तिरेखांचं व्यक्तिमत्त्व किती चपखल उभं केलेलं असतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे व्यंगचित्र. ठळक रेषांमधून चितारलेल्या, अट्टल गुंडासारख्या मस्तवाल दिसणार्या महागाई आणि बेरोजगारी यांनी लुटलेला सामान्य माणूस पातळ रेषेने अगदीच किडकिडित केलेला आहे. त्याला पाहिल्यावर ‘याला लुटले आहे’ असं वेगळं सांगावं लागत नाही. त्यांनी लुटलंय हे माहिती आहे, ते समोर आहेत, पण तरीही कारवाई कोणावर करायची, असा प्रश्न विचारणार्या इरसाल हवालदाराच्या चेहर्यावरचा बेरकीपणाही पाहण्यासारखा आहे… अगदी अलीकडच्या काळात महागाईने आणि बेरोजगारीने उच्चांक गाठलेला असताना, जनता भिकेला लागत असताना ‘आपल्या कारकीर्दीत लाज वाटावी असे काही घडले नाही,’ अशा दांभिक वल्गना करणार्या सत्ताधीशांची आठवण करून देणारा आहे तो निलाजरेपणा.