दुसर्याच दिवशी त्यांनी मेघनाला भेटायला बोलावलं. त्यांनी अंदाज केल्याप्रमाणे ती थोडी विचित्रच होती. तिच्या बोलण्यात विसंगती होती. चोरीची तक्रार आपण का केली, याआधीही दोनदा तीच तक्रार घेऊन का आलो होतो, याचा खुलासा तिला नीटसा करता येत नव्हता, पण पोलिसांनी बंगल्यावर यायला हवं, याबद्दल मात्र ती ठाम होती. तिला आणखी प्रश्न विचारले, दमदाटी केली, तर विचित्र परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता रणदिवेंना वाटल्यामुळे त्यांनी तिची पाठवणी केली.
– – –
इन्स्पेक्टर रणदिवे त्यांच्या फ्लॅटवर आरामात चहा घेत बसले होते. आज बर्याच महिन्यांनी कुटुंबीय त्यांच्याकडे राहायला आले होते, त्यामुळे रणदिवेंना आज त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा होता.
“पोलिस डिपार्टमेंटची नोकरी म्हणजे विंचवाचं बिर्हाड. कधी पाठीवर धोपटं टाकून निघावं लागेल, हे कुणीच सांगू शकत नाही,“ रणदिवे बायकोकडे बघून हसले खरे, पण त्या हसण्यात एक खंत होती. अर्थात, बायको-मुलं आता चार दिवस इथेच राहणार असल्यामुळे त्या काळात तरी त्यांना एकटं राहावं लागणार नाही, याचा आनंद होता. नाहीतर बदलीनिमित्त इथे शहरात राहायला आलो, पण फ्लॅटमध्ये एकटं राहावं लागतं, रात्री घरी आल्यावर दिवसभरात काय घडलं याबद्दल बोलायलाही कुणी नसतं, याची त्यांना नेहमी खंत वाटे. चहा घेऊन झाला आणि त्यांचा मोबाईल वाजला. नको असलेला कॉल आला होता, अर्थात, ड्युटीचा.
शहरातल्या कार्तिकनगर भागात एका बंगल्यात चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. खरंतर रणदिवेंनी चोरीच्या तक्रारीची स्वतःहून दखल घेण्याची गरज नव्हती. पोलिस स्टेशनमध्ये इतरही सक्षम अधिकारी होते. शिवाय टीमला आधी तपास सुरू करायला सांगून नंतर त्यांना लक्ष घालता आलं असतं. त्यांच्या बायकोनेही तेच सुचवलं. मात्र, आपल्या हद्दीतला गुन्हा म्हणजे जणू घरातलीच समस्या असल्यासारखं रणदिवे वागत आणि स्वतः त्यात लक्ष घालून तपास तडीला नेईपर्यंत त्यांना चैन नसे. आजही तसंच झालं. बायको आणि मुलाला दुपारी सिनेमाला आणि मॉलमध्ये न्यायचं प्रॉमिस त्यांनी केलं होतं, पण ते अर्धवट सोडून त्यांना ड्युटीवर जाणं भाग होतं.
कार्तिकनगर हा उच्चभ्रूंच्या वस्तीचा भाग होता. सगळ्या श्रीमंत माणसांचे इथे मोठमोठे बंगले होते. त्यातले अनेक बंगले आणि जागा मोठ्या असल्या तरी घरात राहणार्या माणसांची संख्या अगदीच कमी होती. बर्याच बंगल्यांत तर फक्त ज्येष्ठ नागरिक राहत होते. त्यामुळे हा भाग तसा शांत असायचा. इथे वाहनांचीही फारशी वर्दळ नसायची. त्यातल्याच इनामदारांच्या बंगल्यात चोरी झाल्याची तक्रार आली होती. रणदिवे पोलीस स्टेशनला पोहोचले, तेव्हा सबइन्स्पेक्टर देवकर आणि हवालदार शिंदे बंगल्यावर जाऊन पाहणी आणि पंचनामा करून परत आले होते.
“काय काय मुद्देमाल गायब आहे?“ त्यांनी माहिती घेण्यासाठी विचारलं.
“ही चोरीची केस जरा विचित्रच आहे, साहेब,“ देवकर म्हणाले.
“विचित्र म्हणजे?“
“म्हणजे त्यांच्या घरी चोरी झालीच नाही, असं मालकांचं म्हणणं आहे.“
रणदिवेंना हे ऐकून धक्काच बसला. असं कसं होऊ शकतं? चोरीची तक्रार आली म्हणून तर पोलिसांची टीम तिकडे गेली होती. मग चोरीच झाली नाही, असं मालक कसं म्हणू शकतात? त्यांनी त्यांचं बोलणं फिरवलं होतं की काय?
नक्की काय प्रकार घडलाय, हे रणदिवेंना समजून घ्यायचं होतं. त्यांनी दिवेकरांना विचारल्यावर त्यांनी खुलासा केला.
“साहेब, सकाळी मी ड्युटीवर आलो, तेव्हा एक साधारण तिशीची, स्वभावाने थोडी गरीब दिसणारी मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आली. कार्तिकनगरमधल्या बंगल्यात चोरी झालेय, असं सांगायला लागली. या बंगल्यात सुशीला इनामदार या मालकीणबाई एकट्याच राहतात. ही त्यांची भाची, मेघना. रात्री घरात चोर शिरताना तिने बघितले होते आणि ती त्यांना घाबरून लपून बसली, असंही तिनं सांगितलं.“
“मग? बंगल्याचे मालक कुठायत, हे विचारलं नाही तुम्ही?“
“विचारलं की. त्या बाहेर गेल्यायत, असं तिनं सांगितलं. ती अगदीच गयावया करत होती, खूप घाबरली होती. चोर अजूनही बंगल्यातच दडून बसलेत की काय, असं तिला वाटत होतं, म्हणून आम्ही तातडीने तिकडे गेलो.“
“मग काय झालं?“ रणदिवेंची उत्सुकता वाढली होती.
“बंगल्यात जरा शोधाशोध केली. गेट तोडल्याची, दरवाजा उचकटल्याची किंवा खिडकीचे गज कापल्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती, तेव्हा आम्हीही गोंधळलो. पण ती मुलगी मात्र चोरांना तिनं बघितलंय, यावर ठाम होती.“
आता रणदिवेही चक्रावले. ती मुलगी एवढी अस्वस्थ झाली होती, रडत होती की तिच्याबद्दल संशयास्पद असं तेव्हा काहीच वाटलं नाही, असंही दिवेकरांनी सांगितलं. त्यांची चूक नव्हतीच. पोलिसांकडे तक्रार आल्यावर आधी शहानिशा करणं आणि गरज वाटल्यास प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणं हे पोलिसांचं कर्तव्यच होतं. खरा धक्का बसला, तो इनामदार बाई घरी आल्या, तेव्हा. त्या आल्या आल्याच मेघनावर ओरडायला लागल्या. तिचा या घराशी काही संबंध नाही, तिनं सांगितलेली तक्रार तुम्ही ऐकूनच का घेतली, तिच्यावर विश्वास का ठेवला, मालकाचं ऐकायच्या ऐवजी दुसर्याच कुणाचं का ऐकलं अशी तोफच त्यांनी डागली. त्या जरा आक्रमक आहेत, हे पहिल्याच भेटीत दिवेकरांच्या लक्षात आलं. अर्थात, त्या बंगल्याच्या मालक असल्यामुळे त्यांच्या म्हणण्याला महत्त्व होतंच. चोरी झालीच नसल्याचं स्वतः मालकाचं म्हणणं असेल, तर पोलीस तरी काय करू शकणार होते?
“त्या परिसरात आणखी कुणाकडे काही चोरीची घटना घडली आहे का, याचा तपास करा. चोरांची टोळी असेल, तर एकाच घराला टार्गेट केलं नसेल. कदाचित ह्या घरात काही मिळालं नाही, म्हणून दुसर्या घरात घुसले, तिथलं काही लंपास केलं, असंही घडलं असेल,“ रणदिवेंनी शक्यता व्यक्त केली.
रणदिवे त्यांच्या सहकार्यांशी बोलत असतानाच त्यांच्या बायकोचा त्यांना फोन येत होता. तो कशासाठी असणार, याची त्यांना कल्पना आली होती. आजचा सगळाच कार्यक्रम रद्द करावा लागणार, हेही त्यांना लक्षात आलं होतं. त्यांनी नंतर फोन करतो, एवढाच निरोप दिला आणि ते कामाला लागले.
पोलिसांनी कार्तिकनगरमधल्या इतर घरांमध्ये चौकशी केली, त्या परिसरातली छोटी दुकानं, ऑफिसेस, इमारती सगळं धुंडाळलं, पण कुणाकडे कसलीही चोरी झाली नव्हती. सीसीटीव्हीतही तसं काही आढळून आलं नव्हतं. महत्त्वाचं म्हणजे, इनामदारांच्या बंगल्यालाही सीसीटीव्ही नव्हते. बाईंनी ते बसवण्याचं कधी मनावर घेतलंच नव्हतं.
रणदिवेंनी आता मेघनालाच भेटायचं ठरवलं. अशी तक्रार देण्यामागे तिचा काहीतरी स्वार्थ असणार, हे उघड होतं. त्यांनी तिच्याविषयी माहिती काढली, तर ती इनामदार बाईंची भाची असली तरी कायम बंगल्यात राहत नाही, हेही त्यांना समजलं. काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. आता तिचा घटस्फोट झाला आहे, एका भाड्याच्या खोलीत ती राहते, अधूनमधून इनामदार बाईंकडे येते, अशी माहितीही मिळाली. आता तर तिला भेटण्याची त्यांना अतिशय गरज वाटू लागली.
हा तपास सुरू असतानाच अचानक एक बंदोबस्ताचं काम आलं आणि रणदिवे त्याच्या नियोजनात अडकले. मेघनाला भेटायचं राहून गेलं.
रजा घेऊन गावाला गेलेले एक पोलीस शिपाई महादेव सोनावणे ड्युटीवर आले आणि त्यांच्या कानावर हा चोरीचा प्रकार आला. इनामदारांचा बंगला आणि मेघनाचं नाव ऐकल्यावर मात्र त्यांचे डोळे चमकले. त्यांनी थेट रणदिवेंचं केबिन गाठलं.
“झाली का सुट्टी?“ रणदिवेंनी त्यांची चौकशी केली. सोनावणेंचा चेहरा मात्र गंभीर होता. त्यांना साहेबांना अत्यंत महत्त्वाचं काहीतरी सांगायचं होतं.
“साहेब, ह्या चोरीच्या केसबद्दल जरा वेगळीच माहिती आहे माझ्याकडे,“ ते म्हणाले. रणदिवेही ते ऐकण्यासाठी सरसावून बसले.
“ही मेघना याच्या आधीपण एकदोनदा पोलिस स्टेशनला आली होती,“ असं त्यांनी सांगितल्यावर रणदिवेंना धक्काच बसला. ते कान टवकारून ऐकायला लागले.
“कशासाठी?“ त्यांनी उत्सुकतेनं विचारलं.
“अशीच चोरीची तक्रार द्यायला,“ शिंदेंनी माहिती दिली. मग त्यांनी सविस्तरच सगळी हकीकत सांगितली. याआधी सहा महिन्यांपूर्वी मेघना पोलिस स्टेशनला आली होती. बंगल्यावर चोरी झालेय, लवकर चला, अशी गयावया करत होती. शिंदे स्वतःच पोलीस स्टेशनला होते. त्यांनी तिचं ऐकून घेतलं आणि बंगल्याचा पत्ता शोधून तिथे फोन केला, तर तेव्हाही तिथे काहीच चोरी झाली नसल्याचं समजलं. आणखीही एकदा ती वेगळं काहीतरी कारण सांगून पोलिसांना बंगल्यावर येण्यासाठी विनवण्या करत होती. आधीचा अनुभव असल्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही.
“साहेब, तुम्ही आणि दिवेकर साहेब, दोघांची इथे आत्ताच बदली झाल्यामुळे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाही. म्हणूनच तिनं पुन्हा इथे यायचं धाडस केलं असेल,“ सोनावणे म्हणाले. रणदिवेंचा चेहरा आता गंभीर झाला. वरकरणी ही बाई जराशी विचित्र आणि विक्षिप्त दिसत असली, तरी त्यांच्या मनात उगाच नाना शंका निर्माण झाल्या होत्या. प्रत्यक्ष मेघनाला भेटल्याशिवाय काही खुलासा होणार नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं होतं.
दुसर्याच दिवशी त्यांनी मेघनाला भेटायला बोलावलं. त्यांनी अंदाज केल्याप्रमाणे ती थोडी विचित्रच होती. तिच्या बोलण्यात विसंगती होती. चोरीची तक्रार आपण का केली, याआधीही दोनदा तीच तक्रार घेऊन का आलो होतो, याचा खुलासा तिला नीटसा करता येत नव्हता, पण पोलिसांनी बंगल्यावर यायला हवं, याबद्दल मात्र ती ठाम होती. तिला आणखी प्रश्न विचारले, दमदाटी केली, तर विचित्र परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता रणदिवेंना वाटल्यामुळे त्यांनी तिची पाठवणी केली. मात्र, तिच्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एका महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती केली.
रणदिवेंना आता स्वतः बंगल्यावर जाऊन इनामदार बाईंचीही भेट घ्यायची होती.
“साहेब, ती माझी लांबची भाची असली, तरी ती नातेवाईक म्हणून घेण्याच्या योग्यतेचीही नाही,“ इनामदार बाईंनी स्पष्टच सांगितलं. ती कशी खोटारडी आहे, इथे आल्यावरही कशी कटकट करते, अधूनमधून अशा तक्रारी करून त्रास देते, असं बाईंनी सांगितलं. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तिला कायमचं घरी ठेवून घेत नाही, याचा सूड म्हणून ती त्रास देते, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
मेघनावर आठ दिवस नीट लक्ष ठेवल्यानंतर, तिच्याविषयी माहितीतल्या सगळ्यांकडे चौकशी केल्यानंतर रणदिवेंच्या हाती जी माहिती लागली, ती या तपासाला वेगळं वळण देणारी होती.
दुसर्याच दिवशी इनामदारांच्या बंगल्याव्ारचा फोन खणखणला. रणदिवे स्वतः फोनवर होते. कुठल्यातरी बाईच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी बंगल्यात प्रवेश करून चौकशी आणि तपास केल्याबद्दल त्यांनी इनामदार बाईंपाशी दिलगिरी व्यक्त केली. मेघनाला योग्य ती समज दिली असून ती यापुढे त्रास देणार नाही, असा शब्दही दिला. इनामदार बाईंना हायसं वाटलं.
चार दिवसच मध्ये गेले असतील, अचानक एके दिवशी भल्या पहाटे पोलिसांची जीप आणि मागे एक मोठी गाडी बंगल्याच्या बाहेर येऊन थांबली. रणदिवेंसह पोलीस पथक पटापट गाडीतून उतरलं आणि त्यांनी जोशात बंगल्यात प्रवेश केला. बंगल्याच्या दारापाशी गडबड उडाली. दोन माणसं पोलिसांना रोखायला बघत होती, पण पोलीस पूर्ण तयारीत आले होते. त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. पथक थेट आत घुसलं, सगळीकडे तपासणी सुरू झाली. एका खोलीत पथक घुसलं आणि समोर बांधून ठेवलेली दहा छोटी मुलं त्यांना दिसली. पोलिसांनी तातडीने त्यांची सुटका केली, त्यांना धीर देऊन गाडीत नेऊन बसवलं.
इनामदार बाई लगबगीने बाहेर आल्या. त्यांच्याबरोबर एक आडदांड माणूसही होता. “माझ्या बंगल्यात तुम्ही घुसलातच कसे? आता तुमच्यावर कारवाईच करायला लावते,“ वगैरे आरडाओरडा त्यांनी सुरू केला. अर्थात, रणदिवेंवर त्याचा काहीही परिणाम होणार नव्हता.
“चांगल्या वस्तीत राहिलं, म्हणजे आपला व्यवहार चांगला असतो, असं नाही, बाई! मुलांना पळवून बाहेरच्या देशात विकायचे उद्योग करताय तुम्ही, हे लपून राहील, असं वाटलं का तुम्हाला?“ रणदिवेंनी दरडावलं. आता आपली सुटका नाही, हे इनामदार बाईंच्या लक्षात आलं होतं. महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
“तुमची भाची मेघनामुळेच तुमचं कारस्थान उघड झालं,“ रणदिवेंनी बाईंना स्पष्टच सांगितलं. मेघना विक्षिप्त होती, डोक्यानं थोडी कमी होती, हे रणदिवेंना पहिल्याच भेटीत लक्षात आलं होतं. पण ती चोरीची तक्रार करतेय, त्यामागे वेगळंच कारण आहे, हेही त्यांना जाणवलं होतं. तिचा बाईंवर संशय होता, मुलांना विकण्याच्या या धंद्याची तिला चाहूल लागली होती. मात्र तिला नेमकं सांगता येत नव्हतं. ती जास्त बोंबाबोंब करू नये, म्हणून इनामदार बाईही तिला सांभाळत होत्या. अधूनमधून ती येईल तेव्हा घरी राहायला देऊन, तिच्याशी गोड बोलत होत्या. मात्र मेघना येईल तेव्हा तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं. ती ज्या वस्तीत राहत होती, तिथल्याही एका मुलीला याच बंगल्याच्या आवारात बघितल्यासारखं तिला वाटलं होतं, पण ठोस पुरावा तिच्याकडे नव्हता. चोरीची तक्रार केली, की पोलीस घरी येतील, बाईंची चौकशी होईल, सगळं प्रकरण उघड होईल, असं तिला वाटत होतं. म्हणूनच ती चोरीच्या खोट्या तक्रारी करत होती. बाईंच्या चलाखीमुळे दरवेळी ती खोटी ठरत होती. प्रत्यक्षात खरं कोण आणि खोटं, लबाड कोण, हे तिच्या चतुराईमुळेच उघड झालं होतं.