महाराष्ट्रात २० तारखेनंतर झालेला सन्नाटा पाहून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याचा जीव कासावीस झाला. तो धावतपळत माझ्याकडे आला. मी म्हणालो, पोक्या, तू एवढा अस्वस्थ झालास तर भाजपमय झालेल्या आणि वॉशिंग मशीनमध्ये
टाकलेल्या गद्दार नेत्यांची काय अवस्था झाली असेल! तुला विरंगुळा हवा असेल तर तू मुख्यमंत्री तसेच फडणवीस आणि अजितदादांच्या मुलाखती घेऊन आलास तर तुझी फुकटात करमणूकही होईल आणि ज्ञानात भरही पडेल. तशी पोक्याच्या अंगात वीरश्री संचारली आणि तडफेने तो कधी या कामगिरीवर गेला आणि केव्हा परत आला ते त्यालाच समजलं नाही. त्याच या मुलाखती.
– नमस्कार फडणवीसजी. तुमचं अभिनंदन.
– कशाबद्दल?
– तुम्ही शतक ठोकल्याबद्दल.
– ते होय. महायुतीच्या जाहीर सभांमध्ये शंभर भाषणं ठोकल्याबद्दल म्हणतोस ना तू! अरे, तुला माहीत नाही, माझ्या या रेकॉर्डची
‘गिनीज’ बुकात नोंद झाल्याची खबर आत्ताच मला फोन करून अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलीय. तेव्हापासून अगदी चीनच्या पंतप्रधानांपासून ते होनोलुलूच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत शेकडो नेत्यांचे फोन येताहेत. आत्ताच रशियाच्या पुतीनचा फोन येऊन गेला. पुतीन म्हणजे काही साधीसुधी असामी नाही. तुटून पडले होते त्या दुबळ्या युक्रेनवर. मोदी साहेबांनी मध्यस्थी केली नसती तर ते युद्ध आटोक्यात आलंच नसतं. त्या इस्रायल आणि इराणचीच गोष्ट घ्या. तिथेही मोदीसाहेबांनी दोघांना दम दिला नसता तर त्या दोघांचंही खरं नव्हतं. केवढा धाक आहे त्यांचा जगावर.
– मग लोकसभा निवडणुकीत युद्धात हरलेल्या योद्ध्यासारखे का काकुळतीला आले होते ते?
– मुळीच नाही. वाटल्यास शहा साहेबांना विचारा. ती एक खेळी होती त्यांची विरोधकांना चुचकारण्याची. अत्यंत जहाल बोलून झाल्यावर थोडं मवाळपणाचं पाणी शिंपडावं लागतं.
– पण मानलं तुमच्या मोदीसाहेबांना. अष्टपैलू अभिनय करतात ते. पण खरोखरच या निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना दगा दिला तर काय अवस्था होईल त्यांची.
– पोक्या, तू अजिबात काळजी करू नकोस. दगडाचं काळीज आहे त्यांचं. ते किती निगरगट्ट आहेत ते महाराष्ट्रानेच नव्हे तर सार्या देशाने गेल्या दहा वर्षांत पाहिलंय. कितीही मोठं संकट आलं तरी घाबरत नाहीत ते. आता पंजाबमधल्या शेतकर्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं, पण घाबरले का ते? आपल्या महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल दिल्लीत धाडसी आंदोलन केलं, पण त्यांना काही फरक पडला का? मणिपूरमध्ये महिलांवर एवढे अत्याचार झाले, पण त्यांनी त्याची थोडी तरी दखल घेतली का? त्या देवेगौडांच्या नातवाने एवढे मोठे सेक्स स्वँâडल केलं पण…
– अहो अशा अनेक आव्हानात्मक आंदोलनांना सामोरे न जाता त्यांनी पळपुटं धोरण स्वीकारलं याला तुम्ही बेडरपणा म्हणता का? जो माणूस जनतेवर होणार्या अन्यायाविरुद्ध उभा ठाकत नाही तो कसला देशाचा नेता म्हणवून घेतो? दहा वर्षांत त्यांनी सामान्य जनतेची जी पिळवणूक केलीय त्याला तोड नाही. त्यांच्या जीएसटीनं भाववाढीनं, खोट्या थापांनी जनतेचं जिणं मुश्कील केलंय. त्याचीच फळं मिळणार आहेत त्यांना ४ तारखेला. तेव्हा मात्र टीव्हीचं बटण बंद करू नका. कमळाचं बटण किती मतदारांनी दाबलंय याचा हिशोब मिळेल तेव्हा पळून जाऊ नका.
– पोक्या, तुझा गैरसमज होतोय. आमच्या भक्तमंडळींना विचारय ते तुला खात्रीने सांगतील, पावसाच्या चिखलातून आमचं कमळच उगवणार आहे.
– तो चिखल आणि ते कोमेजलेलं कमळ तुम्हालाच लखलाभ होवो. मला अजितदादांकडे जायचंय…
– नमस्कार अजितदादा. चेहरा पडलेला का दिसतोय? जीव नकोसा केला का त्या पोरसवद्या रोहित पवाराने?
– हे बघ, अशा बच्चेकंपनीला मी हिंग लावून विचारत नाही. कर तुला करायचे तेवढे आरोप. आम्ही पैसे वाटले म्हणतो हा लबाड. आमच्या लोकांनी दादागिरी, जोरजबरदस्ती केली म्हणतो हा मतदान केंद्रात. केली असेल तर दे पुरावे. मी नुसताच उपमुख्यमंत्री नाही, तर बारामतीचा दादा आहे. जिथे पाय मारीन तिथे पाणी काढीन. एकदा माझी सुनेत्रा निवडून येऊ दे. मग दाखवतो याला हिसका.
– पण त्या शंभर टक्के पराभूत होतील असं सगळ्याच सर्व्हेंचे अंदाज आहेत…
– खोटे आहेत ते. मॅनेजेबल आहेत.
– तरीही तुम्हाला काय वाटतं, किती जागा मिळतील महायुतीला?
– तू मला युतीचं विचारू नकोस. माझी ही सीट माझी प्रतिष्ठा आहे. बारामतीकरांवर माझा विश्वास आहे. मत दिलं नाही तर माझ्याशी गाठ आहे, असा सज्जड दम दिलाय त्यांना. बघू कशी निवडून येत नाही माझी सीट!
– पण महायुती…
– खड्ड्यात गेली ती महायुती. त्यांच्यावर अवलंबून नाही मी. तेल लावत गेले त्यांचे बाकीचे उमेदवार. मला त्यांच्याशी कर्तव्य नाही. एकट्याच्या जिवावर लढतोय मी ही निवडणूक.
– एवढे भडकू नका दादा. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे.
– तू मला अक्कल शिकवू नकोस. नाहीतर माझ्या तोंडातून वंगाळ बाराखडी बाहेर पडेल.
– लय भडकलेले दिसतायत. आपण सीएम सायबाकडे जाऊया.
– नमस्कार सीएमजी
– या या या या. पेढे घ्या.
– अहो, पण डिलीव्हरीपूर्वीच पेढे?
– अरे ४ जूनला कोण शुद्धीत असणाराय. आम्ही सगळे मुख्यमंत्री दिल्लीत देवदर्शनाला म्हणजे माननीय, पूजनीय मोदीसाहेबांना पदस्पर्श करायला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहोत. त्यांचा निवडणूक अर्ज भरायलाही गेलो होतो ना आम्ही सगळे.
– बरोब्बर. मग ४ जूनला त्यांचं सांत्वन करायला जावंच लागणार तुम्हाला. तेव्हा तुम्हा एकेकाची गॅरंटी संपलीय हे ते हुकूमशहासारखा मोठ्ठा आवाज करून सांगतील तेव्हा भूकंप झाल्यासारखा हादरा बसेल तुम्हाला… येतो.