□ मोदींच्या सभेसाठी पुन्हा मुंबईकर वेठीला.
■ मुंबईत येऊन घाटकोपरला रोड शोचा तमाशा करायचा, लोकांना वेठीला धरायचं आणि पलीकडच्या रुग्णालयात होर्डिंग दुर्घटनाग्रस्तांची चौकशीही करायची नाही, इतकी असंवेदनशीलता फक्त मोदीच दाखवू शकतात.
□ मोदींचा आत्मविश्वास ढासळलाय – शरद पवारांची टीका.
■ म्हणूनच ते वातातल्याप्रमाणे काहीही बडबडतात आणि त्यांचे भाट त्याचे अर्थ लावून लोकांवर थापत असतात.
□ आरोपीला पीएमएलएअंतर्गत अटक करू शकत नाही – ईडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका.
■ न्यायालयं रोज इतके कपडे फेडत असतात, तरी या यंत्रणांना लाज कशी वाटत नाही, त्यांच्यातली लाचारी संपून कर्तव्यबुद्धी कशी जागी होत नाही.
□ काळजीवाहू सरकारला बळीराजाची काळजी नाही – जयंत पाटलांचा राज्य सरकारवर हल्ला.
■ त्यांना फक्त निवडणुकांची काळजी आहे, बाकी कशाकडे लक्ष तरी आहे का? काळजी फार पुढची गोष्ट झाली.
□ होर्डिंगसाठी आता स्ट्रक्चरल मजबुती प्रमाणपत्र बंधनकारक.
■ म्हणजे आता होर्डिंगवाल्यांच्या ‘चहापाण्याच्या खर्चा’त आणखी थोडी वाढ होणार तर. होर्डिंगखाली जीव गमावलेल्यांचे मृत्यू ‘सार्थकी’ लागले म्हणायचे.
□ ‘पन्नास खोके एकदम ओके’ घोषणा देत शिवसैनिकांचा मिंधेंना दणका.
■ शिवसैनिकांचा खरा दणका चार तारखेला कळणार आहे.
□ मुंबईत मोदींची अनधिकृत होर्डिंग्ज उभारून आचारसंहितेचा भंग.
■ आचारसंहितेचं आचार म्हणजे लोणचं घालून ठेवलंय मोदींनी सगळीकडे… निवडणूक आयोग अशा तक्रारींकडे लक्ष तरी देणार आहे का?
□ गद्दारांना गाडणे हा शिवसेनेचा इतिहास – अरविंद सावंत.
■ तोच वर्तमान आणि तेच भविष्य पण असणार आहे.
□ दादरमधील रखडलेल्या इमारतींच्या बांधकामाचा मुद्दा महायुतीला भोवणार.
■ दादरमध्येच कशाला, सगळीकडे नुसती बोटं घालून ठेवली आहेत… यांच्यानंतर सत्तेत येणार्यांच्या डोक्याला ताप!!
□ सरड्याच्या रंगाप्रमाणे मोदी स्वत:चेच शब्द बदलतात – प्रियंका गांधी.
■ सरड्यांच्या स्वाभिमानाचा काही विचार करा प्रियांकाजी. आधीच ते मोदींना पाहिल्यापासून निराशेच्या गर्तेत भिरकावले गेले आहेत.
□ निवडणूक आयोग मेलाय की नशेत धुंद आहे? – तृणमूलच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांची टीका.
■ त्यांचं नेमकं काय झालंय ते माहिती नाही, पण त्यांचा अंतरात्मा मात्र शंभर टक्के मरण पावलेला आहे.
□ दिल्लीहून आलेले पार्सल दिल्लीला परत पाठवणार – महाविकास आघाडीचे भूषण पाटील यांना ठाम विश्वास.
■ त्यांनाही बरंच आहे ते, तिथे मासळीचा वास वगैरे येत नसेल!
□ मोदींच्या रोड शोच्या वेळेस अजित पवार ‘नॉट रिचेबल’
■ चार तारखेनंतर बरेच जण नॉट रीचेबल होणार आहेत!
□ नरेंद्र मोदी हे खोट्यांचे सरदार – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला.
■ आणि माठांचे पण!
□ ठाण्यात मोदींच्या सभेतून नरेश म्हस्के आऊट.
■ निवडणुकीत काय होणार त्याची रंगीत तालीम!
□ म्हस्केंच्या रॅलीत ‘उद्धवसाहेब आगे बढो’च्या घोषणा
■ सगळेच कार्यकर्ते मिंधे नसतात.
□ मिंध्यांची दडपशाही सुरू; ठाण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना पोलिसांकडून शहर सोडण्याच्या नोटिसा.
■ असे दडपशहा पायउतार झाल्यानंतर चोरून लपून छपून गायब होतात…
□ भाजपा २५५च्या वर जाणार नाही – अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांचा दावा.
■ २५५पर्यंत जाईल ही पण जरा मोठीच अपेक्षा झाली!
□ शिवतीर्थावर मोदींचे भाषण सुरू असताना लोक निघाले.
■ हल्ली ते ज्या प्रकारे बोलतात ते पाहिलं तर मुळात लोक सभेला गेले होते, याचंच आश्चर्य वाटतं!
□ मी माझं लेकरू तुम्हाला सोपवतेय – रायबरेलीत सोनिया गांधी भावुक.
■ रायबरेलीमधल्या लोकांची भूल उतरली असेल तर आपलं कोण, परकं कोण याची जाणीव त्यांना झाली असेलच.
□ वन नेशन, वन लीडर… मोदींचा खतरनाक प्लॅन – अरविंद केजरीवाल.
■ असं ज्या देशांमध्ये होतं, त्यांच्यात आणि भारतात फार फरक आहे. भारतातली जनता आणि लोकशाहीचे इतर स्तंभ इतकी विटंबना होऊ देणार नाहीत, अशी आशा बाळगा केजरीवाल!
□ हायकोर्टाला तातडीने जागा द्या, डिसेंबरची वाट पाहू नका – मिंधे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दट्ट्या.
■ असं कसं? तुम्ही सारखे सरकारला धारेवर धरणार, प्रशासनाला कानपिचक्या देणार आणि सरकार ते करायला तुम्हाला आणखी मोठी जागा देणार? आमी नाई जा!