सर्वसामान्य भारतीय चित्रपटरसिक सिनेमा पाहायला का जातो, या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे, मनोरंजनासाठी. धकाधकीच्या आयुष्यातून विरंगुळा मिळावा, जीवनातील अडचणींपासून तीन तास ब्रेक मिळावा यासाठी सिनेमापेक्षा स्वस्त आणि मस्त दुसरा पर्याय अस्तित्वात नाही. जिथे गरीब हिरो श्रीमंत होतो, सर्वसामान्य दिसणार्या मुलाच्या प्रेमात सुंदर मुलगी पडते. हडकुळा मुलगा चार गुंडांना लोळवतो, असे ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपट प्रेक्षकांना आवडतात. असेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सहसा धुंवाधार कमाई करतात. हा आनंद देणारी स्टार मंडळी सिनेमात आहेत का हे पाहूनच प्रेक्षकांकडून सिनेमाची निवड केली जाते. ‘जो दिखता है, वही बिकता है’ हीच प्रेक्षकांची पसंती लक्षात घेऊन सिनेमाच्या एका तिकिटात दोन शाहरुख खान किंवा दोन अमिताभ बच्चन दाखवून डब्बल रोल, डब्बल मजावाल्या सिनेमांची निर्मिती केली जाते. ७०च्या दशकानंतर हिरोला हिरोगिरी दाखविण्याची दुप्पट संधी मिळवून देणार्या डबल रोल सिनेमांचा पूर आला. त्याआधी कथेची गरज म्हणून सिनेमात डबल रोल असायचे पण, नंतर मात्र हिरोला अधिक फुटेज मिळावं म्हणून डबल रोल सिनेमांची निर्मिती व्हायला लागली.
या दाम दुप्पट मनोरंजनाची सुरुवात एका अपरिहार्य अडचणीमुळे झाली. मूकपटांच्या काळात स्त्रियांना नाटकात, सिनेमात काम करायला बंदी होती. त्यामुळे पुरुष कलाकार स्त्रियांच्या भूमिका करायचे. १९१७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लंका दहन’ चित्रपटात भगवान राम आणि त्यांची पत्नी सीता अशा दोन भूमिका होत्या. या दोन्ही भूमिका साकारून अण्णासाहेब साळुंके हे सिनेमात दुहेरी भूमिका करणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले कलाकार बनले. १९३१ साली ‘आलमआरा’पासून सिनेमा बोलू लागला, दोन वर्षांनी ‘आवारा शहजादा’ हा हिंदी बोलपटातील दुहेरी भूमिका असलेला पहिला सिनेमा ठरला. शाहू मोडक यांनी या चित्रपटात राजकुमार आणि एका गरीब व्यक्तीची भूमिका केली होती. जिथे मुळात पडद्यावर माणसं बोलतायत, ट्रेन धावतेय हे पाहूनच प्रेक्षक थक्क व्हायचे. त्यात एकच माणूस दोन भूमिकेत वावरतोय ही गोष्ट प्रेक्षकांसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. प्रेक्षकांना अचंबित करणार्या ट्रिक फोटोग्राफीची भुरळ पुढे अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांना पडली. १९४६ साली अशोक कुमारचा डबल रोल असलेल्या ‘किस्मत’ने हिंदी सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची किस्मत दुपटीने बदलली. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील हा पहिला ब्लॉकब्लस्टर हिट सिनेमा होता. हिरोची दुहेरी भूमिका असलेले चित्रपट प्रेक्षकांची मोठी गर्दी खेचू शकतात ही फायद्याची गोष्ट या सिनेमामुळे सिनेक्षेत्राला कळली. दुहेरी पात्राचा हा डबल धमाका १९५८ सालातील ‘मधुमती’ सिनेमाने ट्रिपल करून दाखवला. पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटाची नायिका वैजयंतीमालाने (मधुमती, माधवी, राधा) तीन भूमिका साकारल्या होत्या. भरीस भर म्हणून दिलीपकुमारचाही (आनंद, देवेंद्र) असा डबल रोल होता. ‘मधुमती’च्या यशामुळे आणि डबल रोलच्या आकर्षणामुळे अनेक अभिनेत्यांनी या सिनेमाच्या रिमेकमध्ये काम केलं. ‘कुदरत’ (राजेश खन्ना, हेमा मालिनी) ‘कर्ज’ (ऋषी कपूर, सिमी गरेवाल), ‘ओम शांती ओम’ (शाहरुख खान, दीपिका पदुकोण) इत्यादी.
दुहेरी भूमिका असलेले चित्रपट आता बॉलिवूडचा अविभाज्य भाग बनले आहेत. पण काही वर्षांपूर्वी त्याचं फार चलन नव्हतं. देव आनंदने ‘हम दोनों’ या सिनेमात दोन भूमिका साकारल्या होत्या. मेजर वर्मा आणि कॅप्टन महेश आनंद या भूमिकेतील भावनिक गुंतागुंत आणि कुचंबणा देव आनंदने खुबीने रंगवली. या दोन भूमिका त्याच्या कारकिर्दीतील मैलाचे दगड ठरतात. मेजर वर्माची देहबोली तर भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची आठवण यावी अशी आहे.
५० आणि ६०च्या दशकात राज, दिलीप, देव या त्रयीने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपट दिले. त्यांच्या कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा भारतीय सिनेमा कात टाकू पाहत होता. स्वातंत्रप्राप्तीनंतर दोन पिढ्या बदलल्या, राजकीय परिस्थिती, समाज बदलत होता. या बदलांच्या पार्श्वभूमीवर हिंदी सिनेमा देखील एका नवीन स्टारच्या शोधात होता. त्याचवेळी राजेश खन्ना हे ‘सुपरस्टार’ वादळ दुहेरी भूमिकेतून वाजत गाजत आलं. ‘आराधना’ सिनेमात राजेश खन्नाने किशोर कुमारच्या आवाजातील ‘मेरे सपनो रानी…’ अशा अनोख्या अंदाजात पडद्यावर गायलं की आणि देशभरातील लाखो तरुणी राजेश खन्नाच्या प्रेमात पडल्या. त्याला मुली स्वत:च्या रक्ताने प्रेमपत्र लिहून पाठवू लागल्या. देशभरातील तरुण ‘गुरू कुर्ता’ घालून मान तिरपी करून बोलू चालू लागले. इतर हिरोंचे निष्ठावान चाहते, एका रात्रीत पक्ष बदलून ‘काका’ लाटेत सामील झाले.
अशा वातावरणात पडद्यावर एका राजेश खन्नाला पाहून प्रेक्षकांचं समाधान कसं होईल? ‘आराधना’पाठोपाठ ‘सच्चा झूठा’, ‘दाग’, ‘हमशकल’, ‘मेहबूबा’, ‘महाचोर’, ‘भोला भोला’, ‘दर्द’, ‘धरम और कानून’, ‘हम दोनों’… या सिनेमातून राजेश खन्ना पडद्यावर दुहेरी भूमिकेत दिसला.
सिनेमा इंडस्ट्री, निर्माते आणि दिग्दर्शक उगवत्या हिरोभोवती गरागरा फिरत असते. ज्या निर्मात्याकडे ‘नाव’वाला हिरो असेल त्यालाच फायनान्सर सिनेमासाठी पैसे कर्जाऊ द्यायचा आणि हीरो देखील जोवर डिमांड आहे तोवर पैसे कमावून घ्या या विचारांचे असायचे. ऐंशीनव्वदच्या दशकात प्रत्येक लहान मोठा हिरो एकावेळी तीस ते चाळीस चित्रपट साईन करायचा. अशा भाऊगर्दीत नामवंत हीरोला सिनेमात घ्यायचं तर त्याला ‘आवडेल’ अशी गोष्ट तयार करायला हवी हे नवीन निर्मात्यांनी ओळखलं आणि यातूनच सिनेमात हिरोच्या दुहेरी, तिहेरी भूमिकांचं पीक यायला सुरुवात झाली. सत्तरच्या दशकातलं राजेश खन्ना हे वादळ तीन वर्षांत शमलं. याला कारण होतं अमिताभ बच्चन हे महावादळ. ‘नमक हराम’, ‘आनंद’ या चित्रपटांत अमिताभसमोर राजेश खन्ना कमी पडतोय हे स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर काही वर्षात ‘जंजीर’ आला आणि रोमँटिक राजेश खन्नाला विसरून प्रेक्षक ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभच्या प्रेमात पडले. अमिताभने केवळ राजेश खन्नाची छुट्टी केली नाही तर सिनेमात हिरोव्यतिरिक्त इतर भूमिका करणार्या कलाकारांना देखील निवृत्त केलं.
एकेकाळी मेहमूद, जगदीप, भगवान दादा, जॉनी वॉकर, राजेंद्रनाथ असे विनोदी अभिनेते (सिनेमा वाईट असेल तरी) मनोरंजनाची एक बाजू लावून धरत असत. पण अमिताभ हा ऑल राऊंडर नट, ‘आय कॅन टॉक इंग्लिश, वॉक इंग्लिश.. असे विनोदी संवाद बोलायचा. ‘काला पत्थर’मध्ये धीरगंभीर व्हायचा, ‘त्रिशूल’मध्ये दहा गुंडांना लोळवायाचा, ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या नाम है’ गाणं म्हणायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनेमा सुपरहिट करून निर्मात्यांना पैसे कमावून द्यायचा. १९७५ साली दीवार आणि शोले या सिनेमाच्या यशामुळे अमिताभ हे नाणं खणखणीत आवाजात वाजायला लागलं होतं. बॉक्स ऑफिसच्या फायद्याचं गणित मांडून निर्मात्यांनी ‘अदालत’ सिनेमात दुहेरी भूमिकेतून अमिताभला जनतेच्या न्यायालयात पाठवलं. निकाल अमिताभच्या बाजूने लागला. यानंतर बच्चन साहेबांची ‘डबलडेकर’ गाडी सुसाट वेगाने धावू लागली. ‘कस्मे वादे’, ‘डॉन’, ‘दी ग्रेट गॅम्बलर’, ‘देशप्रेमी’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘बेमिसाल’ अशा दोन अमिताभ असलेल्या सिनेमांची रांगच लागली.
१९८३ साली ‘महान’ सिनेमा प्रदर्शित झाला. वडील आणि दोन मुलांच्या भूमिकेतून बच्चन स्टाईल मनोरंजनाचा ट्रिपल डोस द्यायला ‘महान’ची निर्मिती करण्यात आली होती. परंतु ‘अति झालं अन् हसू आलं’ अशी गत या सिनेमाची झाली आणि ‘महान’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन लहान झालं. यातून धडा घेऊन अमिताभने ‘महान’सारखी तिहेरी भूमिका पुन्हा कधी केली नाही. पण दुहेरी भूमिकांमधून तो प्रेक्षकांसमोर येत राहिला. ‘आखरी रास्ता’, ‘तुफान’, ‘बडे मियां छोटे मियां’, ‘सूर्यवंशम’, ‘लाल बादशाह’, ‘हम कौन हैं’ असे अनेक दुहेरी भूमिकांचे चित्रपट अमिताभच्या नावावर जमा आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत चालणार्या ट्रेंडचं, वाजणार्या संगीताचं आणि धावणार्या हिरोचे अनुकरण करण्याची प्रथा आहे. अमिताभ डबल रोल करत असेल तर समकालीन हिरो या स्पर्धेत मागे कसे राहतील? धर्मेंद्रने ‘गजब’, ‘फांदेबाज’, ‘डबल दी ट्रबल’, ‘समाधी’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘प्रतिज्ञा’… अशा अनेक सिनेमांत डबल रोल केला.
हिरोच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदी सिनेमातील अनेक हिरोइन्सनी देखील डबल रोल साकारले आहेत. यात सर्वात लोकप्रिय सिनेमा म्हणजे हेमा मालिनीचा ‘सीता और गीता.’ साध्या सरळ सीताची संपत्ती बळकावून लोभी काकी आणि चुलत बहिणी तिच्यावर अत्याचार करतात. एक दिवस सीता अपघाताने गीताच्या घरी पोहोचते आणि अरे ला कारे करणारी, दोन ठेवून देणारी सीताची जुळी बहीण गीता सीताच्या घरी पोहोचते. पहिल्या भागात सीताचा छळ, मेलोड्रामा पाहून प्रेक्षक डोळ्यातून आसवं गाळत आणि मध्यंतरानंतर गीता बहिणीवर केलेल्या अत्याचाराचा बदला घेते, तेव्हा प्रेक्षक खुश होऊन टाळ्या वाजवत. या सिनेमात धर्मेंद्र, संजीव कुमार, सुमधुर संगीत, थोडी हाणामारी, भावुक प्रसंग, सत्याच्या विजय, सलीम-जावेदची पटकथा आणि दोन हेमा मालिनी इतक्या गोष्टी प्रेक्षकांना एका तिकिटात पाहायला मिळाल्यावर तो सुपरहिट होणारच होता. या सिनेमाची प्रेरणा असलेला दिलीप कुमारचा ‘राम और श्याम’ हा सिनेमा तेलगू भाषेतील ‘रामडु भीमुडु’ (१९६४) या सिनेमावर आधारित होता आणि तो सिनेमा फियरलेस नादिया यांच्या मुकाबला (१९४२) सिनेमावर आधारित होता. याच गोष्टीवर नंतर जितेंद्रने ‘जैसे को तैसा’, अनिल कपूरने ‘किशन कन्हैया’, सलमान खानने ‘जुडवा’, वरुण धवनने ‘जुडवा-२’ हे चित्रपट केले. ‘धूम-३’मधील चोरीचे रहस्य रगंतदार करण्यासाठी एक चोर जुळ्या भावाच्या मदतीने पोलिसांना चकवा देतो, ही कल्पना रचली गेली. या सिनेमात आमीर खानने खलनायकी प्रवृत्तीची भूमिका केली होती. असाच काहीसा प्रकार शाहिद कपूरच्या ‘कमीने’ सिनेमात देखील पाहायला मिळाला.
१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘आँखें’ या सिनेमाने दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना मनमोहन देसाई यांची ‘यशाची गुरुकिल्ली’ सापडली. गोविंदा आणि राज बब्बर त्यात जुळ्या भूमिकेत होते. डेव्हिडच्या ‘जुडवा’, ‘जुडवा-२’, ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमातील जुळ्या भावांनी निर्मात्यांना मालामाल केलं. जुळे भाऊ नसतील तेव्हाही ‘कुली नंबर वन’, ‘साजन चले ससुराल’मधील गोविंदा पडद्यावर दुहेरी भूमिका साकारायचा.
जुळे भाऊ या विषयातून लाजवाब विनोदनिर्मिती होऊ शकते हे गुलजार यांनी अंगुर सिनेमातून दाखवून दिलं. संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांचं विनोदाचे टायमिंग आणि कामातील सहजता यामुळे हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी यातील विनोद जुना होत नाही. हा चित्रपट किशोर कुमार आणि असित सेन यांच्या ‘दो दूनी चार’ या सिनेमाचा रिमेक होता. या कथेवर गेल्या वर्षी नाताळमध्ये रोहित शेट्टी रणवीर सिंग, वरुण शर्मा यांची ‘सर्कस’ घेऊन आले होते, पण ती कसरत काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही.
एकविसाव्या शतकातील डबल रोलवाला सिनेमा कसा असावा हे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी २००० साली ‘कहो ना प्यार है’ या सिनेमात दाखवून दिलं. पदार्पणाच्या सिनेमात दुहेरी भूमिका साकारताना हृतिकने उत्तम अभिनय आणि सफाईदार नृत्याच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर डबल बार फोडला.
‘सीता और गीता’, ‘राम और श्याम’ ही जुळ्यांची जुळवून आणलेली गोष्ट पिटातल्या प्रेक्षकांना भावणारी आहे. अशा बिग बजेट मसाला सिनेमासाठी हिरो ही पहिली चॉइस असते. प्रमुख भूमिकेत जर स्त्री पात्र घ्यायचं असेल तर ते साकारणारी अभिनेत्री ग्लॅमरस, अभिनय येणारी आणि शारीरिक क्षमता असलेली हवी ही प्रमुख मागणी असते. हेमा मालिनीनंतर त्या दर्जाची अभिनेत्री मिळायला सोळा वर्षं लागली. श्रीदेवीला घेऊन ‘चालबाज’ निर्माण केला गेला. ती होती म्हणूनच सनी देओल आणि रजनीकांत या मोठ्या स्टार्सनी या स्त्रीप्रधान सिनेमात काम केलं. ‘सीता और गीता’च्या कथेवर मराठीत उषा चव्हाण यांना घेऊन ‘चोरावर मोर’ हा सिनेमा तयार झाला होता. अशोक सराफ आणि रवींद्र महाजनी हे हिरो या सिनेमात होते. कंगना राणावतने ‘तनू वेड्स मनू’ या सिनेमात तनूसोबत कुसुम दत्तो या हरयाणवी भाषा बोलणार्या मुलीची भूमिका केली होती. या दोन्ही भूमिकांतील फरक कंगनाने सुंदर रीतीने दाखवला होता. या सिनेमाला दर्दी आणि गर्दी अशा दोन्ही स्तरांतून प्रेम मिळालं. सालस, संस्कारी मुलीची भूमिका करणार्या राखीने ‘शर्मिली’ सिनेमातून खलप्रवृत्तीच्या जुळ्या बहिणीची भूमिका केली तेव्हा प्रेक्षकांना धक्का बसला होता.
‘दो कलियां’ हा लहान मुलांचा उत्तम डबल रोल सिनेमा. बच्चे मनके सच्चे या गाण्यात दोन वेण्या घातलेली लहानगी नीतू सिंग मोठ्या माणसांना कसं वागावं याचा वस्तुपाठ देताना दिसते. या सिनेमात विभक्त आईबाबांना पुन्हा एकत्र आणणार्या जुळ्या मुलींची गोष्ट सांगितली आहे. नेहमी हिरो किंवा हिरोईन यांचे डबल रोल असण्याच्या पार्श्वभूमीवर बालकलाकार नीतू सिंगला घेऊन बनवलेला हा सिनेमा आबालवृद्धांना खूप भावला.
मोठ्या हिरोंना घेऊन निर्माण झालेले अनेक चित्रपट वाईट दर्जा असल्यामुळे प्रेक्षकांनी नाकारले आहेत. ‘हाऊसफुल’ या सिनेमांची सीरिज चालल्यामुळे दिग्दर्शक साजिद खानचा आत्मविश्वास वाढला होता, आपल्याकडे विनोद करू शकणारे मोठे स्टार आहेत तर कथेला कोण विचारतो या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्याने सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर या तिघांना तिहेरी भूमिका देऊन ‘हमशकल’ नावाचा वाह्यात सिनेमा बनवला. हे नऊ हिरो आणि तमन्ना भाटिया, बिपाशा बासू, ईशा गुप्ता या तीन हिरोईन घेऊन बनलेल्या या सिनेमातील कलाकारांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावर इतकी टीका सहन करावी लागली की त्यांना काही दिवस कोणाला शकल दाखविण्याची सोय राहिली नाही.
सिनेमा चर्चेत यावा म्हणून काही वेळा कथेची गरज नसताना एकाच हिरोच्या अनेक भूमिकांचा सिनेमात समावेश केला जातो. उदा. ‘कलम ३०२’ चित्रपटाची जाहिरात ‘अशोक सराफ सप्तरंगी भूमिकेत’ अशीच यायची. प्रत्यक्षात अशोक सराफांचा सीन पडद्यावर १५-२० मिनिटेही नव्हता. या सिनेमाचे प्रमुख कलाकार ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे होते. शिवाजी गणेशनने तमिळ भाषिक ‘नवरात्री’ (१९६४) या चित्रपटात नऊ भूमिका साकारल्या होत्या. याच्याच ‘नया दिन नयी रात’ या हिंदी रिमेकमध्ये संजीव कुमारने नऊ भूमिका केल्या. गोविंदाने ‘हद कर दी आपने’ या सिनेमात सहा भूमिका साकारल्या होत्या. त्या पाहून प्रेक्षकही ‘हद कर दी आपने’ असंच म्हणाले. ‘बैराग’ सिनेमातील दिलीपकुमार यांची तिहेरी भूमिका पाहून त्यांच्या निष्ठावान चाहत्यांनाही राग आला होता. कमल हसन ‘दशावतारम’ या चित्रपटात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, दहाव्या शतकातील ख्रिश्चन धर्मगुरू, जपानी मार्शल आर्टपटू वगैरे दहा भूमिकांत दिसले होते. आशुतोष गोवारीकरच्या `व्हॉटस युअर राशी?’ चित्रपटात प्रियांका चोप्राने १२ भूमिका केल्या होत्या. या भूमिकांची नोंद गिनीज बुकमध्ये होणार अशी चर्चा झाली. त्यानंतर बातमी आली की हिंदीतल्या प्रियंका चोप्राच्या १२ भूमिकांना राजेश शृंगारपुरेने ‘शंभु माझा नवसाचा’ या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात १३ भूमिका करून टफ फाईट दिली आहे. याबद्दल त्याचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदलं गेल्याचं देखील बोललं गेलं.
काही दिग्दर्शकांना हटके कल्पना सुचत असतात. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘शेम टू शेम’ नावाच्या चित्रपटात सर्वच कलाकारांचे डबल रोल्स होते. जुळ्यांच्या तब्बल ५४ जोड्या यात होत्या. या जोड्या प्रेक्षकांसोबत जुळल्या नाहीत, पण एक वेगळा प्रयोग म्हणून बेर्डे यांचं कौतुक झालं. ‘आली लहर केला कहर’ ही म्हण मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील जॉन्सन जॉर्ज यांना लागू होते. ‘आरानू नजान’ या सिनेमात त्यांनी महात्मा गांधी, लिओनार्दो दा विंची ते येशू ख्रिस्त अशा तब्बल पंचेचाळीस भूमिका साकारल्या आहेत. या अनोख्या विक्रमाची दखलही पुढे गिनीज बुककडून घेण्यात आली होती.
कथेची मागणी आहे म्हणून दुहेरी भूमिका असतील तर तो सिनेमा फसण्याची शक्यता कमी असते. पण पडद्यावर जास्तीत जास्त वेळ आपणच दिसायला हवं या अट्टाहासापोटी एखादा हीरो दुहेरी भूमिका करत असेल तर तो चित्रपट झिरो ठरतो. त्याचप्रमाणे चित्रपटात एकापेक्षा जास्त भूमिका असतील तर एक उत्तम अभिनेता प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करून प्रत्येक पात्रातील शारीरिक, भावनिक बदल ठळकपणे दर्शवतो, पण जर अभिनयक्षमता कमी असेल तर मात्र तो हिरो, एका पात्राला मिश्या आहेत, दुसर्याला नाहीत, एक भाऊ गावंढळ आहे आणि दुसरा शहरी पेहराव करतो इतकाच फरक दाखवू शकतो.
शाहू मोडक यांचा ‘औट घटकेचा राजा’ (१९३३), हंसा वाडकर यांचा ‘संत सखू’ (१९४१), राजा परांजपे यांचा ‘पेडगावचे शहाणे’ (१९५२) अशा चित्रपटांमध्ये मराठी कलाकार दुहेरी भूमिकेत दिसले आहेत. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा गोसावीची गोष्ट’ या सिनेमात राजा गोसावी यांनी तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. जयश्री गडकर (रंगपंचमी), भावना (पाठलाग), दादा कोंडके (आंधळा मारतो डोळा) या कलाकारांनी सिनेमातील दुबार पेरणी पडद्यावर दाखवली होती.
एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन रूपांत पडद्यावर दाखवण्यासाठी जे शूटिंग केलं जातं ते ट्रिक फोटोग्राफी या प्रकारात मोडतं. १९१७ साली भारतीय सिनेमात ही करामत पहिल्यांदा दिसली. सुरुवातीच्या काळात दुहेरी भूमिका चित्रीकरणाला तांत्रिक मर्यादा होत्या. ज्याचा डबल रोल दाखवायचा आहे त्याच्या मागील बाजूला कोणतीही हलणारी वस्तू न ठेवता स्थिर बॅकग्राऊंडसमोर त्या कलाकाराला संवाद बोलायला सांगत. डबल रोल शूटिंग सुरू असताना कॅमेरा एकाच जागी ठेवला जायचा. राम अलीकडे बोलत असताना कॅमेर्याच्या अर्ध्या भागाला बाजूला टेप लावून शूटिंग केलं जात असे आणि जेव्हा राम पलीकडे जाऊन श्याम बनायचा तेव्हा कॅमेर्याच्या दुसर्या अर्ध्या भागाला बाजूला टेप लावून शूटिंग केलं जात असे. शूटिंग संपल्यावर संकलन करताना दोन्ही रिळांवर उमटलेली टेपची रेश काढली जायची पण ती पूर्ण जायची नाही. पुसटशी दिसायचीच. आजही टेलिव्हिजनवर जुने चित्रपट पाहताना डबल रोलवाले हिरो समोरासमोर आले की ही पुसटशी रेष पाहायला मिळते. जुळ्या भूमिकांमध्ये धावपळीचे किंवा हाणामारीचे प्रसंग असतील तर कलाकारांचे डुप्लिकेट घेतले जात. आज व्हीएफएक्स आणि संकलनाचे प्रगत तंत्रज्ञानामुळे एकाच कलाकाराला पडद्यावर कितीही भूमिकांमध्ये दाखवणं सोपं झालं आहे. पाठीमागे हिरवा पडदा लागून कलाकाराला संवाद म्हणायला लावा आणि संकलन करताना कोणतीही बॅकग्राऊंड मर्ज करा. आता तर एका कलाकारावर दुसर्या कलाकाराचा चेहराही लावता येतो, इतकं तंत्रज्ञान सोपं झालं आहे. येणार्या काही दिवसात महाभारतावर येणार्या चित्रपटात एक कलाकार, पाच पांडव आणि शंभर कौरव अशा एकशे पाच भूमिका एकटाच साकारतोय अशी बातमी दिसली, तर नवल वाटायला नको.
डबल रोलचा बादशाह मिथुनच…
बॉलिवुडमध्ये डबल रोलचा बादशाह कोण विचारले तर मिथुन चक्रवर्तीकडेच बोट दाखवावे लागेल. त्याने आजपावतो १९ चित्रपटांत डबल रोल केले आहेत. त्याच्या पाठोपाठ कादर खान (१८), जितेंद्र (१६), अमिताभ (१५), धर्मेंद्र (१५), राजेश खन्ना (११), गोविंदा (१०), शाहरुख खान (८) यांनी डबल रोल केले आहेत.