विश्वासघातकी छापखाना मालकाच्या बरोबर ब्राह्मणी टोळकंप्रबोधनकारांना भेटायला आलं. प्रबोधनकारांनी त्यांना वाटेलाही लावलं. पण ते टोळकं शांत झालं नाही. रात्री त्यांनी प्रबोधनचा काटा काढायचं ठरवलं होतं. ब्राह्मणांच्या बालेकिल्ल्यात एक ब्राह्मणेतरी नियतकालिक चालूच कसं शकतं, असा त्यांचा प्रश्न होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि सद्भाव यांची त्या रात्री राखरांगोळी होणार होती. त्या रात्री नेमकं काय घडलं याचे दोन वेगवेगळे वृत्तांत प्रबोधनकारांनी लिहिलेले आहेत. पहिला माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात, तर दुसरा शनिमाहात्म्य या पुस्तकात.
आधी आपण आत्मचरित्रातला वृत्तांत बघू. त्या रात्री १२ वाजल्यानंतर मोरोबादादाच्या वाड्यात ७-८ भट जमले. तेथेच नजीकच्या खोलीत छापखान्याचा फोरमन गुप्ते रहात असे. किल्ली त्याच्याजवळच असे. खाबूराव त्याच्याकडे ओरडतच गेला, `अहो, छापखान्यात मागल्या बाजूने कोणीतरी शिरले आहे. टाळे खोला. दिवा लावा. आपण शोध घेऊ. गुप्त्याने टाळे उघडताच सर्व मंडळी शोधाशोध करू लागली. टेबलावर टाळे नि किल्ल्या होत्या, त्या खाबूरावाने पळवल्या. बाकीच्यांनी छापखान्याची पाटी खाली काढून भटांनी राकेल ओतून जाळली. गुप्त्याला धक्के मारून बाहेर काढले नि छापखान्याला निराळे टाळे लावून मंडळी पसार झाली. गुप्ते माझ्याकडे ओरडत आला.’
शनिमाहात्म्य या पुस्तकात आलेली हकीकत थोडी वेगळी आहे. ती अशी, (ब्राह्मणी टोळक्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर) पुण्यात उलट सुलट कायदेबाजीच्या भानगडी कोण कोण कसकसे चालवितात, याचा मला पुरा छडा लागला. अखेर उडदामाजी काळे गोरे निवडीत बसण्याची वांझोटी खटपट करीत न बसता मी प्रबोधन छापखान्याचा बोर्ड काढून घेऊन त्यावरील माझ्या नावाच्या संबंधाचा जाहीर संन्यास घेतला. गायतोंड्याला दिलेले पैसे, छापखाना चालविण्यात झालेला खर्च, बुडालेली बिले, वगैरे बाबतीत अजमासे दीड दोन हजाराची कचकचीत ठोकर खाऊन, या भिंतीच्या निर्जीव हंसापायी मी सक्षौरप्रायश्चित्त घेतले…
शनिमाहात्म्य या पुस्तकातलं पुढचं वर्णन जास्त महत्त्वाचं आहे. ते असं, आपत्तींचे आघात ग्रहांच्या दशेने पडोत वा माझ्या व्यावहारिक मूर्खपणाने होवोत, त्यांच्या उत्पत्ती स्थिती लयाची चिकित्सा करून, प्रयत्नवादाची समशेर विशेष हट्टी आग्रहाने पाजळण्याचा माझा प्रकृतीधर्मच आहे. हट्टी निश्चयाने मी एकदा एखाद्या घटनेचा पिच्छा पुरवू लागलो की त्यात तोंड फुटले तरी माघार घेण्याचा गुणधर्म माझ्यात नाही… विशेषत: भिक्षुकशाही कारस्थाने हाणून पाडण्यासाठी स्वत:चे नाक कापून भटांस अपशकून करायला मी कधीच कमी करणार नाही. आदळआपट्या शनीने मला सर्वस्वनाशाच्या मसणवटीत बसवता बसवताच माझ्या जन्मजात प्रयत्नवादाच्या डुक्कर मुसंडीच्या पलित्यावर एका जबरदस्त निश्चयाच्या चकमकीची ठिणगी पडून त्याला भडकवला. मायावी प्रबोधन छापखान्याच्या पाट्या खाली उतरण्यासाठी माझा मनुष्य बापू जाधव गेला असता, काही निवडक शनिदेवांनी एक पाटी लाथ मारून खाली पाडली आणि त्यावर थुंकीमिश्रित रॉकेल ओतून ती भररस्त्यावर जाळली. शेलक्या शिव्यांच्या नांदी भरतवाक्यात `पुण्यात प्रबोधन? आम्ही जिवंत असता ही ब्राह्मणेतरी महामारी येथे? अशी जळून खाक करू. असा त्या पवित्र ब्रह्मवांत्युत्पन्नांनी मोठा वेदघोष केला. सात्विक संतापने प्रबोधनाभिमानी जाधवने मला ही गोष्ट सांगताच माझा प्रयत्नवाद बेफाम फुरफुरला आणि करीन तर ह्या शनिखान्यातच स्वतंत्र प्रबोधन छापखान्याची प्राणप्रतिष्ठा करीन. अशी मी प्रतिज्ञा केली. पुण्याचे पाणी पिऊन माणुसकीवर निखारे ओतण्याइतकी माझी जीवनचर्या शनीच्या पिंडाची बनविण्याची जरी मला इच्छा नाही, तरी केवळ या इरसाल शनीच्या कृत्याचा सक्रिय निषेध म्हणून कम कमी दोन वर्षे तरी प्रबोधन छापखाना या शनींच्या छातीवर बसून चालवीन. मग मला जिकडे जायचे तिकडे जाईन. पुण्यात प्रबोधन? होय पुण्यात प्रबोधन चालवून दाखवीन. ठार मेलो तरी हरकत नाही. भडाडलेल्या होळीत उभा राहून या शनीच्या शनिमाहात्म्याचे दात पाडीन, तर नावाचा ठाकरे! या माझ्या प्रयत्नवादी महत्त्वाकांक्षेला बापूसाहेब चित्रे आणि बापू जाधव यांनी पूर्ण पाठिंबा देताच, मी स्वतंत्र छापखान्याच्या व्यवस्थेसाठी मुंबईस आलो.’
आत्मचरित्र ‘माझी जीवनगाथा’मध्ये यातलं नाट्य टाळून प्रबोधन पुण्यात सुरू करण्याचा निश्चय सौम्य शब्दांत व्यक्त झालाय, तो असा, `वास्तविक, पुण्यात व्यापार व्यवहार करण्याची कल्पनाही कधी मला शिवलेली नव्हती. पण अकल्प परिस्थितीने मला तेथे ओढून आणले. माझा व्यवहार तो अवघा महिना दीड महिन्याचा. पण पुण्यातून प्रबोधनाचा काटा काढलाच की नाही, ही घमेंड पुणेरी कारवाईखोर भटांना पचू द्यायची नाही, असा मी निर्धार केला. काढीन तर पुण्यातच प्रबोधन छापखाना काढीन, अशा संकल्पाने मी बाहेर पडलो.
जुलै १९२४च्या सुरुवातीला प्रबोधनचा तिसर्या वर्षीचा १८वा अंक प्रकाशित झाला. त्यानंतर तिसर्या वर्षातला अंक छापला गेला नाही. म्हणजे ही घटना १९२४च्या जुलै महिन्यातच घडली असावी. या घटनेनंतर चारच वर्षांनी म्हणजे सप्टेंबर १९२८ मध्ये शनिमाहात्म्य प्रकाशित झालंय. तर ‘माझी जीवनगाथा’ फार उशिरा म्हणजे सप्टेंबर १९७३मध्ये प्रकाशित झाली. दरम्यान पन्नास वर्षं निघून गेली होती. त्यामुळे त्यात वर्णन केलेल्या तपशीलापेक्षा `शनिमाहात्म्य’मध्ये चार वर्षांनी लिहिलेले तपशील जास्त विश्वासार्ह मानावे लागतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. अर्थात त्यातले काही तपशील कालांतराने महत्त्वाचे वाटले नसल्याने आत्मचरित्रात वगळले गेले असतील किंवा महत्त्वाचे वाटल्याने नव्याने जोडले गेले असतील. काहीही झालं असेल. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याला दोन्ही ठिकाणी लिहिलेल्या घटनांचा तर्कसंगत क्रम नव्याने लावावा लागतो.
त्या संध्याकाळी कारस्थानी ब्राह्मणांनी घरी येऊन प्रबोधनकारांचं डोकं खाल्लं. प्रबोधनकार बर्या बोलाने छापखाना रिकामा करून खोटारड्या मालकाला परत देणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी त्याच रात्री आधीच नियोजन केलेलं कारस्थान प्रत्यक्षात आणलं. फोरमन गुप्तेला फसवून त्यांनी छापखान्यावर ताबा मिळवला. तो महत्त्वाचा होता, कारण छापखान्यावर जप्तीच्या नोटिसा असल्यामुळे खरेदीविक्रीची कागदपत्रं काहीच झालेली नव्हती. छापखाना ज्याच्या ताब्यात, त्याची मालकी असणार होती. प्रबोधनकारांना हे माहीत होतंच की कायदेशीरदृष्ट्या आपण फसवले गेलोय, बुडीत खाती गेलेला छापखाना फसवून आपल्या गळ्यात मारला गेलाय. कायद्याच्या बाजारातही आपली बाजू लंगडी आहे. त्यामुळे त्यांनी त्यात गुंतून न पडता या भानगडीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी छापखान्यावरचा बोर्ड काढणं गरजेचं होतं. कारण तोच मालकीचा तुटका फुटका पुरावा होता. तो संबंधही त्यांनी तोडायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी त्यांचा सहकारी बापू जाधव याला छापखान्यावरचा बोर्ड काढायला पाठवलं. ब्राह्मणी गुंडांनी हे शांतपणे होऊ द्यायला हवं होतं. पण जिंकल्याच्या राक्षसी आनंदात त्यांनी पाटी लाथ मारून खाली पाडली. त्यावर थुंकले. रॉकेल ओतून ती भररस्त्यात जाळली. प्रबोधनकारांच्या नावाने शिवीगाळ केली. पुण्यात प्रबोधन पुन्हा आला तर त्याला जाळून खाक करू, अशी माजोरडी भाषा केली. त्यामुळे प्रबोधनकार चवताळून उठले. त्यांनी प्रतिज्ञा केली की ब्राह्मणी गुंडांच्या नाकावर टिच्चून किमान दोन वर्षं तरी पुण्यात प्रबोधन चालवेनच.
हे घडताच बापूसाहेब चित्रे नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळांकडे केले. पुढे केंद्रीय मंत्री, पंजाबचे राज्यपाल अशी मोठमोठी पदं भूषवणारे काकासाहेब तेव्हा नव्या दमाचे वकील होते. ते बापूसाहेबांचे मित्रही होते. काकासाहेबांना त्या लबाड छापखाना मालकाची केस नीट माहीत होती. त्याच्या छापखान्यावरच्या चार जप्त्यांची वॉरंट तर त्यांच्याकडेच पडून होती. त्यांनी बापूसाहेबांना चित्रशाळेच्या वासुकाका जोशींकडे चिठ्ठी देऊन पाठवलं. सकाळी कोर्ट उघडताच वासुकाकांनी बेलिफाकडून छापखान्याला टाळं ठोकलं. आता प्रबोधनचा बोर्ड उतरल्यामुळे छापखाना पुन्हा जुन्या मालकाचा झाला होता. त्यामुळे पाठोपाठ उरलेल्या सगळ्याच सावकारांच्या जप्त्यांची टाळी लागली. त्यामुळे छापखाना मालक रडत प्रबोधनकारांकडे आला. प्रबोधनकारांनी त्याला हाकलवलं, आता कशाला शंख करतोस? सावकारांना बुडवून आणखी वर माझ्याही नरड्याला हात घालीत होतास ना? बस आता हात चोळीत. पुढे छापखान्याचा लिलाव झाला. साप्ताहिक आत्मोद्धार काढणार्या जळगावच्या सीताराम नाना चौधरींनी तो विकत घेतला. छापखान्यात राहिलेलं प्रबोधनकारांचं सामान त्यांनी परत केलं. जळगावशी प्रबोधनकारांचं जवळचे ऋणानुबंध होतेच. त्यात आणखी एक भर पडली.
छापखाना मालकाला धडा मिळाला, पण त्या धावपळीत प्रबोधन मात्र बंद पडलं. प्रबोधनकारांनी नवा प्रबोधन छापखाना उभारण्यासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले. पण मधल्या काळात प्रबोधनचे अंक निघणं थांबलंच. हे पहिल्यांदाच घडलं होतं. ऑक्टोबर १९२१ पासून जुलै १९२४ पर्यंत पाक्षिक प्रबोधनचे सलग ६६ अंक निघाले होते. हे मोठं यश होतं. प्रबोधन बंद झाल्यामुळे प्रबोधनकार निराश झाले होते. त्यांनी त्यांची मनोवस्था ‘शनिमाहात्म्या’त नोंदवली आहे, पाडळी सोडताना पाय ठेवण्यासाठी शनीने निर्माण केलेली ही मायेची पायरी पायाखालून निसटताच मी खास शनीच्या अड्ड्यातच हातपाय तुटून निर्निकल अवस्थेत चारी मुंड्या चीत पडलो. प्रबोधन बंद पडला. हातातली जीवनदेवता लेखणी सांदीला पडली. माझ्या विक्रमाचे हातपाय तोडले जाऊन मी अक्षरशः अस्तित्वातून उखडला गेलो. असून नसून सारखा झालो. पुढे काय?