(बरखाऽऽस्त महल! धब्बेगद्दार इकमाल शयनकक्षात पहुडलेले. पहार्यावरचे शिपाई डोळ्यात काजळ घालून नटलेले. त्यांच्या हातात देशी धाटणीच्या पिस्तुल. काहीजणांकडे चोरलेले धनुष्य. तर काही निरनिराळ्या प्राण्यांचे आवाज काढत पहारे देताय. मध्यरात्रीचे ठोके पडतात. घुबडांचे सुमधुर गायन, वटवाघळांचे नर्तन चालूय. अश्या भयमधुर प्रसंगी अचानक इकमालांच्या शयनकक्षातून एक किंकाळी घुमते. त्यासरशी बाहेरील गस्तीवरले शिपाई आत धावतात. तो आत जमिनीवर इकमाल बेशुद्ध होऊन पालथे पडलेले दिसतात. काहीजण खिडक्या-दारं बघण्यासाठी धावतात, काहीजण कक्षातील कपाटं आणि इतर अडगळीच्या जागा शोधू लागतात. एक-दोघं इकमालांच्या जवळ जाऊन त्यांना उताणे करतात.)
शिपाई १ : आयोव, हुजूर तर बेसूद पडले ना बाबा! आता?
शिपाई २ : नीट बघा रे! कुणीतरी नक्की काही काळंबेरं केलेलं दिसतंय! यामागे व्यापक कट असू शकतो. कुणी ह्या कक्षाच्या बाहेर जाता कामा नये! (शिपाई १ कडे बघत) काही घाव वगैरे नाहीत ना? हुजूरांना? काही हल्ला वगैरे झालेला नाही ना?
शिपाई १ : (शरीरावर कसलेही व्रण नसल्याची खात्री करून घेत) नाही नाही!
शिपाई २ : काही विषप्रयोग वगैरे प्रकार?
शिपाई १ : नाही. तसं काहीही जाणवत नाही!
शिपाई २ : काही संशयास्पद असं? काळजीनं नीट बघा. (मागील एक शिपायाकडे बघत) आणि तुम्ही! आधी जाऊन सरदार नरुलांना खबर द्या! कुणी दफ्तरी असेल त्यांस वैद्यांस आणावयास धाडा. बरखा महलची सुरक्षा कडक करण्याच्या सूचना धाडा. कुणीही संशयास्पद आढळलं तर त्याला ‘उपा’ लावा नि आत कोठडीत धाडा. जा लवकर!
शिपाई १ : (पुन्हा निरखून आणि बारकाईने बघितल्यावर) काहीही आढळत नाहीय. नेमके कश्याने बेसूद झाले असतील हुजूर?
शिपाई २ : काहीच कळायला मार्ग नाही. ( कक्षाची छाननी, तपासणी करणार्या शिपायांकडे बघत) काही सापडलंय का?
शिपाई ३ : (खिडकीकडे लक्ष वेधून घेत) हो इथली खिडकी साधारणपेक्षा मोठी आहे.
शिपाई २ : अरे हळू! ती त्यांनी खास बनवून घेतलीय! त्यांना रात्री-अपरात्री पंतांसोबत गुप्त मिटींगा-सेटिंगा असतात. त्यासाठी त्यांना कुठे पंचतारांकित जागी जावं लागतं. तिथे जाताना खिडक्यांतूनच पास मिळतो म्हणे! आणखी दुसरं काही आहे का?
शिपाई ४ : (हातात काही कागदं घेऊन येतो.) काही जुनी-पुरानी राजीनाम्याची कागदं मिळालीय. कसला राजीनामा असावा हा?
शिपाई २ : मूर्ख! तो काही विषय आहे का? त्यावेळी ते वारंवार पंतांवर नाराज व्हायचे! कदाचित मूड स्विंग होत असतील, त्यावेळी! आणि म्हणोन ते हे कागदं दाखवत सर्वांनाच धमक्या द्यायचे. पण तो विषय आता आहेच कुठे? दुसरं काही आढळतंय का बघा!
शिपाई ५ : (एक पेनड्राइव्ह दाखवत) ह्या पेनड्राइव्हमध्ये एक व्हिडिओ आढळलाय.
शिपाई २ : काय आहे त्यात? कसला व्हिडीओ आहे हा?
शिपाई ५ : त्यांचाच आहे तो! त्यात ते म्हणताय, ‘आणि म्हणोन करामतीकरांनी निधी पळवला केवळ त्यामुळेच आम्ही उठाव केला….’
शिपाई २ : श्शूऽऽऽ हळू! बंद कर ते! आता ते दोघं सोबतच आहेत! कुणी ऐकलं तर आपली पंचाईत! काही संशयास्पद चमत्कारिक काही आहे का? ते बघा.
शिपाई ६ : (एक खोकं घेऊन येतो.) हे खोकं मिळालंय!
शिपाई २ : (अत्यंत संतापत) ठेव ते बाजूला! पुन्हा खोके शब्द बोललास तरी गर्दन उडवली जाईल!
शिपाई ६ : (घाबरत) पण…
शिपाई २ : पण-बिन काही नाही! हा विषय इकमाल आणि त्यांच्या कबील्यासाठी जिव्हाळ्याचा, अस्मितेचा आणि त्याचवेळी गोपनीयतेचा आहे. त्याला कुणी छेद दिला तर इकमाल संतापतात! चरफडतात! विव्हळतात!
(तोच नरुल, शिकस्त धावत येतात. त्यांच्यामागे निरोप देण्यासाठी गेलेला शिपाई आत येतो. आत असलेले शिपाई मुजरे घालतात.)
शिकस्त : (धावत रडत इकमालच्या उश्याला बसत) अब्बू! क्या हुआ अब्बू को? या अल्लाह! हे काय झालंय?
नरुल : (शिपायांकडे बघत) काय झालंय इथे? कुणी काय केलंय? धब्बेदारांना? तुम्ही काय करत होतात? पहारे नीट देता येत नाहीत का तुम्हाला?
शिपाई २ : (पुढे होत) सरदार, आत-बाहेर कुणीही नव्हतं. पण ऐन ठोक्याला सुभेदारांची किंकाळी घुमली म्हणून आम्ही आत आलो तर सुभेदार इकमाल इथे पालथे पडलेले आढळले. आम्ही पूर्ण कक्ष तपासला असता काहीही संशयास्पद आढळलं नाही.
नरुल : मग इकमालांची अशी अवस्था केली कोणी?
शिकस्त : (डबडबल्या डोळ्यांनी) अरे आधी अब्बूंना बघा! कुणी काही आणा रे!
शिपाई ३ : वहाण… वहाण आणा रे!
शिकस्त : इधर क्या विंचु निकला क्या? मारने के वास्ते वहाण बुलारेला तू? अब्बू घायतळके पड़े है। और तेरेकू कुछ भी सुचता क्या? साले…!!
नरुल : अरे वो सुंघाने के वास्ते बुला रेला होगा। तू कायकू इत्ता भड़क रहा है?
शिकस्त : नरुल, आप दरबारी अदब भूल गए हो शायद…! जरा अदब से बात कीजिए!
नरुल : माफी शहज़ादे!! वो बोले तो ये फ़ारसी-उर्दू इत्ती जमती नहीं मेरेकू! तो इधर-उधर हो जाता मेरेसे। (शिपायांकडे बघत) सालों तुम्हें पता नहीं? रोज चहापन्हा के खेटर सूंघने वाले को खेटर सुंघाने से क्या फायदा?
शिकस्त : (दातओठ खात) नरुल जरा अदब!!!
नरुल : माफी शहजादे!! वो बोलते बोलते मैं जरा फिसल जाता…! (तोच कक्षासमोरून कुणी सेविका जाताना दिसते, तशी टाळी वाजवून खुणेनं नरुल तिला पाणी आणायला सांगतो. ती घाईने पाणी घेऊन येते) हे सुंदरी थोडं पाणी शिंपड!! (ती पाणी शिंपडते. त्यासरशी इकमालांना थोडी अर्धवट शुद्ध येते.)
इकमाल : (पुटपुटतात.) आणि म्हणोन…!! तोबा, तोबा!! (सुंदरीकडे बघून पुन्हा बेशुद्ध होतो.)
शिकस्त : (दुःखावेगात मोठ्याने) होश में आवो अब्बू! क्या हुआ जरा बतावो! या अल्लाह! अब्बू कुछ सुन क्यों नहीं रहे? आखिर कोई कुछ बतायेगा, क्या हुआ है इन्हें?
शिपाई ५ : (शेजारील शिपायाच्या कानात पुटपुटतो) धक्का बसला म्हणावं की फटका? काही कळंना.
नरुल : हे सुंदरी पुन्हा पाणी शिंपून बघ जरा! (सुंदरी पाणी शिंपडून बघते.)
शिपाई १ : (मागील शिपायांकडे बघत बारीक आवाजात विचारतो.) ही आणि कुठल्या खान्यातली म्हणायची?
शिपाई २ : जऽऽ….
शिपाई १ : ओ हळू! (नरुल आणि शिकस्तकडे खुणेने दाखवत) ते ऐकतील. काही काय बोलताय?
शिपाई २ : अहो, मी म्हणतोय, जवळून बघितल्याशिवाय काय कळणार? मुदपाकखान्यातील आहे की आणखी कुठली? (सुंदरी अजूनही पाणी शिंपडून मान हलवून बघतेय. इकमाल मात्र बेशुद्धावस्थेत.)
नरुल : सुंदरी, हुजूर हलतही नाहीत! कुणाकडे वैद्य येईपर्यंत दुसरा काही उपाय आहे का?
सुंदरी : (चिरकल्यागत नैसर्गिक आवाज काढत) म…माझ्याकडे आहे?
नरुल : तुम्हाला आयुर्वेदाची माहिती आहे की?
सुंदरी : (शांतपणे) नाही, मला हुजुरांच्या नसानसांची माहिती आहे!
शिकस्त : (आश्चर्यमिश्रित धक्क्याने ओरडत) क्काय?
नरुल : (शिकस्तला सावरत) शहजादे सावरा! वडिलांची लफडी मुलांनाच निस्तरावी लागतात, हीच अल्लाहची सजा आहे. (सुंदरीकडे बघत) बोल, सुंदरी काय आहे तुझ्याकडे उपाय?
सुंदरी : (कांदा दाखवत) हा बघा कांदा! ह्याच कांद्याने त्यांची शुद्ध हरपली, आणि आता तोच त्यांना भानावर पण आणेल. (ती कांदा फोडते आणि इकमालांच्या नाकाला लावते. त्यासरशी इकमाल उठून बसतात.)
इकमाल : (झोपेतून उठल्यागत) आपण एवढे जण आमच्या भोवती का जमलात? काय झालंय नेमकं?
नरुल : हुजूर हेच जाणून घेण्यासाठी आम्ही आलोत…
शिकस्त : (नरुलचं बोलणं मध्येच तोडत) अब्बू आप होश में नहीं थे। ऐसा क्या हुआ था आपके साथ? किसीने कुछ…?
इकमाल : (काही आठवल्यागत) याद आया। मैं सो रहा था। एकदमसे मैंने सपनें में देखा, जी मी आता लढाई लढतोय. त्यात पंत मेरे साथ है। मैं उनके कंधे पर सवार हूँ। तभी कुछ बंदे हाथ में मशाल लेके, कुछ तुतारी फूंकते मेरी ओर बढ़ते है। आणि म्हणोन केवळ त्यामुळे आम्ही हारतोय, आमचं सैन्य फस्त होतंय असं दिसू लागतं. चहापन्हाचा ताज, हमारी सुभेदारी सगळं डुबताना दिसतं, आणि तोच…
सुंदरी : (थरथरणार्या हातांनी पाणी देत) पाणी! पाणी घ्या हुजूर! नको त्या आठवणी!
इकमाल : पानी? ऐसी हार के बाद पानी? इस सोचनेही मेरी नींद खाल्लीय. इस विलेक्शन लढाई में अगर हम हार गये तो? आणि म्हणोन इसी विचार से मेरी नींद टूटती हैं। और कर भी क्या सकते हैं हम? (तोच पाण्याचा ग्लास देताना सुंदरीकडून ग्लास पडतो, तो ग्लास पडताना धरण्यासाठी कसरत करताना सुंदरीचा केसांचा विग पडतो.)
इकमाल : (विस्मयचकित होत) पंत? तुम्ही? ह्या वेषात? (सुंदरीच्या वेषात उभे पंत फुलचंद डबीर मान हलवतात.)
पंत : (खालमानेनं नजर चुकवत) होय मीच!
इकमाल : आता कुणाला नादी लावताय पंत? कुठलं घर फोडून कर्ते पुरुष तुमच्या घरात न्यायचे आहे आता? विलेक्शन लढाईचा निकाल स्पष्ट दिसत असताना?
पंत : तुम्ही किमान बेशुद्ध तरी पडू शकता, पण इतक्या दिवस विरोधकांना फितवत, नादी लावत फिरताना आता मला कुणी खुळावतंय का, हे बघावं लागेल ना? किमान घरपडीतून वाचण्यासाठी! नाहीतर ह्या स्पष्ट जाणवणार्या विलेक्शन लढाईच्या निकालानंतर माझंच घर ढासळायचं, आणि त्याखाली येऊन मी कपाळमोक्ष करून घ्यायचो!
इकमाल : आणि म्हणोन ही केवळ स्वप्नंच आहे तोवर ठीक आहे, पण ही खरंच सत्यात आली तर?
(नुसत्या कल्पनेने इकमाल आणि पंत बेशुद्ध होतात.)