मनीषला स्वतःचा सायबर कॅफे सुरू करायचा आहे. बरेच वर्षे त्याच्या ते मनात आहे. त्याने अनेक मोटिवेशनल गुरूंची भाषणं आणि पुस्तकं वाचली आहेत. अशी पुस्तकं वाचली, भाषणं ऐकली की मनीषला स्फुरण चढायचं. मनीष सरसावायचा. आपणही यश मिळवू शकतो, यशस्वी होऊ शकतो, असं त्याला वाटायचं. ठरवलं तर अशक्य काहीच नाही, हे त्याला पटायचं. तो कामाला लागायचा. पण मनीषचा हा उत्साह तात्पुरता असायचा. तो अलीकडे म्हणतो की माझं काही खरं नाही. मी तात्पुरता पेटतो आणि नंतर पुन्हा विझतो. पुन्हा माझं ‘येरे माझ्या मागल्या’ असंच होतं.
अनेक माणसं प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जाताना मनीषने पाहिली आहेत. प्रसिद्ध माणसांची उदाहरणंही त्याला माहिती आहेत. पण मनीषचं असं म्हणणं आहे की ही माणसं वेगळी असतात. मी तेवढा हुशार नाही. मी तेवढा जिद्दी नाही. माझ्यात तेवढा दम नाही. माझ्यात खूप कमतरता आहेत आणि त्या मला चांगल्याच माहिती आहेत. मला ते शक्य नाही असं म्हणून मनीष तिथेच थांबतो. अनेक वर्ष तो तिथेच थांबला आहे.
मनीषची ही अवस्था आहे, परंतु मनीषचा दुसरा एक मित्र निमिष. त्याची मात्र वेगळीच तर्हा आहे. तो म्हणतो मी सिने इंडस्ट्रीमधला बडा हस्ती होणार. मोठा फिल्म डायरेक्टर होणार. प्रत्यक्षात काही करायचं नाही, पण सतत म्हणत राहायचं, मैं सबसे बडा डायरेक्टर बनेगा. मैं नहीं तो कौन बे? असं विचारायचं. आगे आगे देखो, होता है क्या? अपना टाईम आयेगा, असं निमिष म्हणत राहतो. त्याचे मित्र म्हणतात, अरे तू मोठा फिल्म डायरेक्टर होणार म्हणतोस, पण त्या संदर्भात तू काही अभ्यास करताना दिसत नाहीस. तू एखादी शॉर्ट फिल्मही आजवर बनवली नाहीस. निमिष म्हणतो, आपून शॉर्ट वॉट का काम नहीं करेगा… जो करेगा उससे सबके सर में शॉट लगेगा. डोक्याला शॉट म्हणत मित्र त्याचा विषय सोडून देतात.
मनीष म्हणतो की यशस्वी होतात ती माणसे वेगळी असतात. पण तसं काही नसतं. यशस्वी होणारी माणसं आपलं ध्येय सोडत नाहीत, हाच फरक असतो. इतर कोणताही फरक नसतो. मनीष स्वतःला कमी लेखत स्वतःचं नुकसान करून घेतो, तर निमिष स्वतःला ‘जरा जास्तच’ समजून नुकसान करून घेतो. यशस्वी होण्यासाठी टॅलेंट महत्त्वाचे आहेच, पण यशस्वी होण्यासाठी खूप मोठा भाग असतो तो मेहनतीचा, आत्मविश्वासाचा आणि जिद्दीचा. एखादी गोष्ट करायची तर त्याबद्दलची आवड असायला हवी, त्या प्रकारच्या क्षमता आपल्यात असायला हव्यात. त्या गोष्टीसाठी आवश्यक ते कौशल्य मिळवायला हवं. आपलं ध्येय स्पष्ट असेल आणि ते साध्य करण्याचं झपाटलेपण असेल, यशासाठी अविश्रांत झटण्याची तयारी असेल तर ध्येय साध्य होऊ शकतं. परंतु आपण न्यूनगंडाने पछाडलो किंवा आपल्यामध्ये अहंगंड असेल तर मात्र आपण फार काही करू शकणार नाही. मला जे करायचे ते मी करणारच. मी करून दाखवेनच, असं म्हणताना त्याचा आराखडा डोक्यात स्पष्ट असायला हवा. त्याचा ब्ल्यू प्रिंट दिसायला हवा. आपण जो विचार करतो, तो अवाजवी, अवास्तव तर नाही ना? आपण मारतो आहोत त्या हवेतल्या गप्पा तर नाहीत ना, हे थोडं तपासून पाहायला हवं.
मंडळी, मी म्हणजे नेमकं काय आहे, किती आहे, याची आपल्याला योग्य ओळख असणं खूप आवश्यक आहे. आपण स्वतःबद्दल आहोत त्याच्यापेक्षा मोठी कल्पना करत बसणं किंवा आहोत त्यापेक्षा खूप कमी समजत राहणं हे दोन्ही आपलं नुकसान करेल. आपण जे आहोत त्याची वास्तव ओळख असायला हवी. आवश्यक क्षमता, कौशल्य वाढवून आपण यशस्वी व्हायला हवं.
असो. तर मनीष आणि निमिषकडून आपण आता मृदुलाकडे वळू.
मनीष आणि निमिष यांचीच एक मैत्रीण आहे मृदुला. मृदुलासमोर अनेक अडचणी आहेत. तिला आईवडील नाहीत. ती मामाकडे राहते. तिला अधून मधून मामीच्या रोषाला सामोरं जावं लागतं. कटकट सहन करावी लागते. पण आपल्याला आपल्या पायावर उभे राहायचं आहे, शिक्षण संपवून चांगली नोकरी मिळवायची आहे, म्हणून ती परिस्थितीशी जुळवून घेते. परिस्थितीविषयी, सोबतच्या व्यक्तींविषयी तक्रार न करता, नाराज न राहता परिस्थिती सुसह्य कशी होईल, सोबतची माणसं त्रासदायक न होता मदतकारक कशी होतील असं ती पहाते. आपल्या ध्येयाकडे जायचं तर परिस्थितीमधले आपल्या नियंत्रणातील घटक कोणते आणि नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते, हे लक्षात घेतलं पाहिजे. नियंत्रणातल्या घटकांवर अधिक लक्ष देऊन प्रगती करून घेतली पाहिजे. परिस्थिती बदलता येत नाही याबद्दल त्रास करून घेणं नुकसान करू शकतं हे मृदुलाला चांगलंच माहिती आहे.
मृदुलाच्या शेजारी नेने बाई राहतात. त्या फार अस्वस्थ असतात. कारण त्यांच्या सुनबाई त्यांच्या नातवाला सतत जंक फूड देतात. तो हेल्दी असं काहीच खात नाही. जेवतही नाही. नेने बाईंनी अनेकदा सुनेला, मुलांना समजवलं, पण ते लक्ष देत नाहीत. ‘त्याला तेच आवडतं’ म्हणतात. या सततच्या अरबट चरबट खाण्याने तो सतत आजारीही पडत असतो. नेने बाईंना या सगळ्याचा खूप त्रास होतो, पण नेने बाईंचे मिस्टर त्यांना म्हणतात, ‘तू शांत राहा, तू का त्रास करून घेतेस? त्याने काय खावं आणि काय नाही ते त्याचे आईबाबा ठरवणार. आपलं ते ऐकणार नसतील तर मग आपण शांत राहावं. आपण का मानसिक त्रास करून घ्यावा?’ पण नेने बाईंना त्रास होतोच.
खरं तर नेने काकाही हल्ली तसे दुःखी आहेत. त्यांच्या धाकट्या बहिणीला कर्करोग झालाय आणि आता ती शेवटच्या स्टेजला आहे. सुरुवातीला नेने काकांना बहिणीच्या कर्करोगाचा खूप त्रास झाला. पण सगळे प्रयत्न केल्यानंतर आता तिचे प्राण वाचणे शक्य नाही हे सत्य त्यांनी स्वीकारले. ते आता शांत झाले आहेत.
परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत असतो, पण परिस्थिती बदलता येते ही एक चांगली गोष्ट आहे. मनीष, निमिष आणि मृदुला आपापली परिस्थिती बदलू शकतात. पण प्रत्येक वेळी परिस्थिती बदलता येतेच असं नाही. आलेल्या परिस्थितीशी, सोबतच्या माणसांशी जुळवून घ्यावं लागतं. जसं नेने बाईंना जुळवून घ्यावं लागणार आहे. जसं नेने बाईंच्या मिस्टरांना बहिणीविषयीचं दुःख सोसायचं आहे. हे असं जुळवायची वेळ येते तेव्हा आपल्याला खालील ओळी मदतकारक ठरतील.
त्या ओळी अशा…
जे टाळणं अशक्य आहे ते आपण सोसायला हवं. जे बदलणं शक्य आहे ते आपण बदलायला हवं. आपल्याला काय शक्य आहे आणि काय शक्य नाही, हे आपल्याला कळायला हवं. ते कळण्याचं शहाणपण मात्र आपण मिळवायला हवं.