महिला दिन साजरा केलात की नाही घरी? की बाहेरच साजरा केलात?
– रसिका मुनेश्वर, अहमदनगर
बायको मुलींनी घराबाहेर साजरा केला. मी घरी होतो. त्यांचा दिन होता.. मी दीन होतो.. जमलंय का? म्हणजे पुढच्या महिला दिनाला भाषणाची सुपारी घ्यायला मोकळा. (कोणी बोलावलं तर…)
संस्कारी लोक दारू हा अंमली पदार्थ आहे म्हणून इतका विरोध करतात आणि मंदिरांच्या बाहेर भांग प्रसाद म्हणून विकतात, होली साजरी करताना तीर्थ प्यायल्यासारखे भांग पिऊन वेडे चाळे करतात. ये क्या माजरा है?
– मोहन पाटील, कळमनुरी
धर्माची नशा कमी पडली की संस्काराची नशा करावी लागते. (पुरोगामीत्वाची नशा झाली की अशी वाक्य सुचतात.)
डीजेचा आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन एक नवरा आपल्याच लग्नात मरण पावला… हे छातीत धडकी भरवणारे आवाज करण्याचं काय खूळ आहे लोकांमध्ये?
– आमीर मिर्झा, सायन
चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची छाती नसणारे दुसरं काय करणार…
प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, पण मला तर पैसे कमावण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. परमेश्वर नको आहे, मग?
– साहिल रावकवी, वांद्रे
नावाच्या आधी प.पू. लावा किंवा नावाऐवजी बापू लावा. लोक तुम्हालाच परमेश्वर बनवतील. मग एवढा पैसा कमवाल की खुद्द परमेश्वरसुद्धा तुम्हाला देवू शकणार नाही.
बायको सोबत असताना तुम्हाला मैत्रीण आठवते की मैत्रीण सोबत असताना बायको आठवते?
– पायल पोफळे, नरसोबाची वाडी
असं का विचारताय ताई? नवर्याचा संशय येतोय की मित्राची शंका येतेय.
मराठी माणसांच्या लग्नात पंगत न बसवता नूडल्स, पाणीपुरी, तवाभाजी असला बेत करून बुफे कशाला ठेवतात?
– सायली साठ्ये, बोरिवली
पंगत बसली की मागचे टांगत उभे रहातात. बुफे असला की सगळे एकाच वेळी इकडे तिकडे पांगत जेवतात.
सावित्रीबाई फुले यांनी कधीकाळी सनातन्यांचा शेणगोळ्यांचा मार खाऊन स्त्रीशिक्षणाचा पाया रचला आणि आजची शिक्षित स्त्री त्याच शिक्षणाचा उपयोग वैभवलक्ष्मी व्रताची पोथी वाचायला करते आहे… काय वाटत असेल सावित्रीमाईंच्या आत्म्याला?
– नाना झटाले, अकोला
सावित्रीमाईंना वाटत असेल.. आपण वैभव सावित्री व्रताची पोथी लिहून शिक्षण कशासाठी घ्यायचं हे सांगायला हवं होत.. तर सावित्रीमाईंबद्दल अक्षरही न वाचनार्या बायांनी ती पोथी तरी वाचली असती आणि शिक्षणाचा सदुपयोग झाला असता.. तोही यदाकदाचीत.
वजन कमी करण्यासाठी लंघन, उपवास, केटो डाएट, इंटरमिटंट फास्टिंग असं सगळं करून झालं, पण वजन घटतच नाही. तुम्ही छान मेन्टेन्ड दिसता. आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा.
– रामप्रकाश गुप्ता, प्रभादेवी
माझ्याशी तुलना करण्यापेक्षा, तुमच्यापेक्षा वजनदार माणसाशी तुलना करा आपोआप स्वत:ला फिट समजायला लागाल. मी माझी तुलना डायरेक्ट खलीशीच करतो.
चित्रपटांत थंडीत, बर्फाळ प्रदेशात डान्स करताना अभिनेता कोट, पँट, बूट अशा फुल ड्रेसमध्ये असतो, तर अभिनेत्री डान्सर मात्र तोकड्या ड्रेसमध्ये डान्स करत असते. तिचे शरीर थंडीप्रूफ असते काय?
– बाळासाहेब श्रीमंत, कोल्हापूर
बाळासाहेब का बाळबोध प्रश्न विचारताय?… बर्फाळ प्रदेशात हिरॉईन पूर्ण कपडे घालून आली, तर तुम्हाला ऊबदार वाटेल का?
संतोषराव, तुम्ही ‘हौस माझी पुरवा’ या नाटकात आजच्या राजकारणावर बेधडक नावं घेऊन भन्नाट शेरेबाजी करता… तुम्हाला भीती नाही वाटत नेत्यांची आणि त्यांच्या गुडघ्यात मेंदू असलेल्या कार्यकर्त्यांची?
– अप्पा सोनार, माझगाव
हो वाटते भीती थोडीशी… आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल ज्या पातळीवर जाऊन बोलतो, त्या पातळीवर जाऊन तू का बोलत नाहीस, असं नेते आणि कार्यकर्ते विचारतील, अशी भीती वाटते.