स्वर्गातल्या मेनका, रंभा, उर्वशी यांच्या रूपाची वर्णन फक्त आपण ऐकून आहोत. मेल्यावर स्वर्गातच जाऊ याची गॅरंटी नाही. गेलो तर त्या रुपवती किती जख्ख म्हातार्या झाल्या असतील, याची कल्पना करवत नाही. मात्र परमेश्वराने हिंदी चित्रपटसृष्टीतून या यौवनमस्त मोहिनींचा मुक्तहस्ताने वर्षाव केला आणि खर्या अर्थाने चित्रपटसृष्टी यौवनात आली. बुद्धिमान दिग्दर्शक, लेखक, कवी, संगीतकार, फोटोग्राफर्स, बदलते उत्तम तंत्रज्ञान यांच्या कोंदणात या सौंदर्यवतींना, त्यांच्या रूपाला, अभिनयाला जडविले गेले. सिनेमाचा पडदा या ललनांमुळे रुपेरी झाला.
१९५० सालाच्या अलीकडे पलीकडे देविका राणी, नूरजहाँ, शोभना समर्थ, शांता आपटे, जयश्री शांताराम, नलिनी जयवंत या नायिका प्रकाशात आल्या. त्यानंतर तारकांचा मोठा खजिना बरसला. सुरैया, मधुबाला, संध्या, मीनाकुमारी, नर्गिस, नूतन, निम्मी, शकिला, माला सिन्हा… दक्षिणेतल्या वैजयंतीमाला, वहिदा रहेमान, पद्मिनी, श्रीदेवी, जयाप्रदाही त्यात सामील झाल्या. परवीन बाबी, सायरा बानो, हेमामालिनी, मुमताज, साधना, झीनत आणि शेवटची माधुरी दीक्षित… बाकी नव्या बर्याच आहेत, पण, त्यांचा आम्हा सीनिअर्सना परिचयच नाही. सुरैया सुरेल आवाजाची आणि दिसायला मादक होती. मधुबाला अल्लड, स्वप्नाळू डोळ्यांची खूपच सुंदर परी होती. मीना कुमारी, संध्या शांताराम, नर्गिस, जया, नूतन, वहिदा या सुंदर होत्याच, पण उत्कट अभिनयात कसबी सुद्धा होत्या. वैजयंतीमाला, पद्मिनी, साधना, परवीन बाबी, सायरा बानो, झीनत, मुमताज, माधुरी या देखण्या बाहुल्या होत्या. त्यांना वाटलं तर अभिनय करायच्या. ज्यांनी कोंदणात यांना बसविले ते नामवंत दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती (नूतन : सीमा), मेहबूब खान (नर्गिस : मदर इंडिया), के. आसिफ, (मधुबाला : मोगल-ए-आझम), व्ही. शांताराम (संध्या : झनक झनक पायल बाजे, दो आँखे बारह हाथ, नवरंग इ.) बिमल रॉय (वैजयंतीमाला : मधुमती, नूतन : सुजाता, बंदिनी), बी. आर. चोप्रा (नया दौर, कानून, धूल का फूल), हृषिकेश मुखर्जी (आनंद, चुपके चुपके), महेश भट्ट (सारांश, डॅडी), रमेश सिप्पी (ब्लॉकबस्टर शोले). महत्त्वाचे म्हणजे गेले ५०-६० वर्ष दक्षिणेतील निर्माते व दिग्दर्शकांनी हिंदीतील दिग्दर्शक, नायिका, नायक, संगीतकार यांना घेऊन अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले.
संगीतकारांत नौशाद, सी. रामचंद्र, वसंत देसाई, शंकर-जयकिशन, खय्याम लक्ष्मीकांत-प्यारेलाल आदी. गीतकारांत भरत व्यास, शकील बदायुनी, साहिर लुधियानवी, ग. दि. माडगूळकर, शैलेंद्र… आदी. यात अनेक पटकथाकारांचा बराच मोठा वाटा आहेच. अलीकडची काही यशस्वी नावे म्हणजे गुलजार, सलीम जावेद… पूर्वीची फारशी ज्ञात नाहीत. किंबहुना गेल्या वीस-पंचवीस वर्षे सिनेमा पाहणंच झालं नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये तरुणाईला आवडणार्या सुपरफास्ट सिनेमांचा भडीमार होतो आहे. भावनिक सिनेमा बराचसा मागे पडला आहे.
‘रसरंग’ या साप्ताहिकात मी या चंदेरी जगतावर भरपूर चित्रे काढली आहेत. मराठी प्रादेशिक भाषा असल्यामुळे या झगमगाटी दुनियेपासून जरा अंतरावर राहिली. आर्थिक बजेटात प्रचंड तफावत पडत राहिली. तरीही मराठीत खूप सुंदर सिनेमा गेल्या ६० वर्षात आले. त्यावर पुन्हा कधीतरी. सुलोचनाजी, सीमा देव, जयश्री गडकर, उषा चव्हाण, पद्मा चव्हाण, लीला गांधी, संध्या, हंसा वाडकर, रंजना तर हिंदी व मराठीत ललिता पवार, स्मिता पाटील, सुलोचना, उषा किरण खूप गाजल्या. हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्राने एकेकाळी खूप खळबळ उडवली होती. अनेक नामवंत नायकांचा, दिग्दर्शकांचा पर्दाफाश केला होता.
त्याकाळी मी या विषयावर खूप छान चित्रमाला केली होती. अनेक नायिकांची रूपं ओसरल्यावर त्यांची खूप परवड झाली. इतकी की त्यातल्या काही गैरमार्गाला लागल्या. दारिद्र्यात मेल्या. लीला चिटणीस परदेशात बेवारस म्हणून वारल्या. नलिनी जयवंत, परवीन बाबी यांची हीच गत झाली.
अनेक नट्यांचे प्रेमभंग झाले. फ्रस्टेशनात मद्यात अखंड बुडाल्या. देवानंद-सुरैया, दिलीप कुमार-मधुबाला यांचे प्रेम अपयशी ठरले. राज कपूर-नर्गिस ही सुपरहिट जोडी होती. त्या दोघांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते. तसेच गुरुदत्तचे वहिदा रेहमानवर. परंतु गुरुदत्त, राज कपूर विवाहित होते. नर्गिस, वहिदा योग्य वेळी दूर झाल्या. धर्मेंद्र मात्र प्रथम पत्नी असूनसुद्धा हेमामालिनीशी लग्न करून मोकळा झाला. स्मिता पाटीलनेही तेच केले. अलीकडे गाजलेले प्रेमप्रकरण म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा, पण दोघे वेळीच वेगळे झाले. ‘गुमराह’मधील गाणे आहे ना ‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन… उसे एक खूबसूरत मोड देके भूलना अच्छा’… तसंच काहीसं. सलमानला ऐश्वर्या सोडून गेली, पण त्याने स्वतःचा देवदास होऊ दिला नाही. ठाम निर्णयाने अविवाहित राहिला. स्वतःला परफेक्शनिस्ट समजणारा आमीर खान दोन-तीन बायका करूनही वासुगिरी करतोच आहे. अनेक हिरोइन्सबरोबर रोमँटिक रोल करणारा शाहरुख खान बायको गौरी खानचा हात घट्ट धरून आहे. अक्षयकुमार-ट्विंकल, अजय देवगण-काजोल आपापले संसार छान सांभाळून आहेत.
सुरैया रिटायर झाल्यावर खूप उंच अशा लिफ्ट नसलेल्या फ्लॅटमध्ये राहायची. कुणीतरी त्यावरून तिला छेडले असता, ती हसून म्हणाली, ‘मी तरुण असताना माझं सौंदर्य पाहून अनेक छोट्या-मोठ्यांच्या उराची धडकन वाढायची. आता इतक्या वर जिना चढून भेटायला येणार्यांची तीच अवस्था होते.’ माला सिन्हा ही बहुदा पहिली नटी आहे, जिचे बाथरूम फोडून इन्कम टॅक्सवाल्यांनी काळा पैसा बाहेर काढला होता. ‘झनक झनक पायल बाजे’ हा सिनेमा शांतारामबापूंनी पहिल्यांदा वैजयंती मालाला ऑफर केला होता. लो बजेट पिक्चर म्हणून तिने तो नाकारला. मात्र संध्याने अत्यंत देखणी भावुक प्रेयसी होत नृत्याची आतषबाजी करीत ‘झनक झनक’ अजरामर केला. त्याने प्रचंड धंदा व प्रसिद्धी मिळविली. तिने ‘दो आखें बारह हाथ’मध्ये तिने अत्यंत उत्कट अभिनय केला. ‘नवरंग’मध्ये तर तिचे नृत्य आणि तिचा अभिनय हरखून टाकणारा होता. ‘मिर्झा गालिब’मधील सुरैयाची अदाकारी आणि गाणी अत्यंत विलोभनीय होती. सुरैयाचे वैशिष्ट्य म्हणजे ती सतत भरपूर दागिने अंगावर घालूनच मिरवायची. काही काळ ती एकटीच टॉपवर होती.
अमिया चक्रवर्तींच्या ‘सीमा’ या सिनेमात महिला आश्रमातल्या एका असहाय्य तरुणीचा रोल नूतनने केला होता. तिचा उत्कट अभिनय हेलावून टाकणारा होता, तोसुद्धा बलराज सहानीसारख्या बलदंड नटासमोर. ‘बडे झुटे मनमोहना’ हे गाणे गाताना तिने ओठांची इतकी सुंदर मूव्हमेंट केली होती की लतादीदी सुद्धा चकित झाल्या होत्या. नूतनच्या नावावर अनेक सुंदर सिनेमा आहेत. सुजाता, बंदिनी, अनाडी, मिलन, खानदान आणि बरेच. नर्गिसबद्दल तर प्रश्नच नाही. राज कपूरच्या सर्व हिट सिनेमांत ती होती. पण मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’मधील अभिनयाने कळस केला. त्या सिनेमाला अनेक अवार्ड्स मिळाले, तर पाच सहा फिल्मफेअर अवार्ड्सही मिळाले. त्यात बेस्ट अॅक्ट्रेसचे नर्गिसला मिळाले होते.
मधुबालाला ‘मुघल-ए-आजम’सारखा अजरामर सिनेमा मिळाला आणि तिच्या भावदर्शी, लोभस व उत्कट अभिनयाने त्याचे तिने सोने केले. तिच्या अभिनयापुढे दिलीपकुमारचा अभिनयसुद्धा फिका वाटला. वैजयंतीमालाला अनेक चांगले सिनेमा मिळाले. त्यात ‘मधुमती’, ‘गंगा जमुना’, ‘देवदास’, ‘नागिन’, ‘नया दौर’ आदी. ‘देवदास’मधील चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी तिला सहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर अवार्ड मिळाले होते, परंतु तिने ते नाकारले. नायिकेचे मिळायला हवे होते असे तिचे मत. पारो झालेल्या सुचित्रा सेनपेक्षा तिच्या अभिनयाला जास्त कंगोरे होते हे खरेच. मादकशी, गहिरी मीनाकुमारी तर या मोहमयी दुनियेची खानदानी सम्राज्ञीच होती.
‘बैजू बावरा’, ‘कोहिनूर’, दक्षिणेतला ‘मैं भी लडकी हूं’, ‘मिस मेरी’, ‘यहुदी’, ‘चित्रलेखा’, ‘साहब बीवी और गुलाम’ आणि माईल स्टोन ठरलेला कमाल अमरोहींचा ‘पाकिझा’.. आणि एवढे असूनही वैयक्तिक आयुष्यात ती अभागी ठरली. मदमस्त नृत्यकुशल पद्मिनीला मोजकेच सिनेमा मिळाले. त्यात राज कपूरचा ‘जिस देश में गंगा बहती है’ आणि अजरामर ठरलेला ‘मेरा नाम जोकर’ खूपच गाजला. देव आनंदबरोबरचा ‘अमरदीप’. राजकपूरबरोबर ‘आशिक’ वगैरे.
माला सिन्हा तशी रोमँटिक. तिला खूपच पिक्चर्स मिळाले आणि अभिनयाने तिने त्यांचे सोनेही केले. ‘गुमराह’, ‘धूल का फूल’, ‘उजाला’, ‘बहुरानी’ आणि ‘प्यासा’. पण ‘प्यासा’मध्ये वहिदा रहमान भाव खाऊन गेली. सावळा वर्ण, टपोर डोळे, मोहक लाघवी हसू. त्याचा भरपूर उपयोग ‘प्यासा’च्या शेवटच्या सीन्समध्ये फोटोग्राफरने केला आहे. ‘गाईड’, ‘कागज के फूल’, ‘खामोशी’सारख्या सिनेमांत तिने उत्तम अभिनय केलाय. दुर्दैवाने गुरुदत्त तिच्या प्रेमात वाहवत गेला. गीता दत्तसारखी अत्यंत देखणी, प्रसिद्ध गायिका पत्नी असूनसुद्धा.
नलिनी जयवंत, गीता बाली, निम्मी कामिनी कौशल, नूरजहाँ त्या त्या काळात अत्यंत प्रसिद्ध होत्या. खरे तर हे तारांगण आहे, चांदण्याची किती बरसात करायची? ७०-८०च्या दशकातील अनेक हिरोईन्सनी त्यांचे सिनेमा गाजविले आहेतच. दोन हजार सालच्या अलिकडे हिराईन्सना अभिनयाला संधी देणार्या चांगल्या भूमिका मिळायच्या. किमान पाच-पन्नास सिनेमांपर्यंत त्या टिकायच्या. नंतरचा काळ झपाट्याने बदलत गेला. हिरोइन्स फक्त शोभेपुरत्या वा उत्तानता दाखवण्यापुरत्या वापरल्या जाऊ लागल्या.आणि सोज्वळता, सात्विकता व सकस अभिनय कोसो दूर मागे पडला. ‘कल चमन था… आज एक सेहरा हुवा… देखते देखते ये क्या हुवा..?
याच कालखंडात बी ग्रेड सिनेमाही भरपूर येत. त्यात हिरोईन्सची उत्तेजक, अंगोपांगाची दृश्य खूप असत. रेखा सुरुवातीच्या सिनेमांत भरपूर अंगप्रदर्शन करी. ‘दस्तक’मध्ये रेहाना सुलतान, ‘दोराहा’मध्ये राधा सलुजा, ‘जिस देश मे गंगा बहती है’, ‘मेरा नाम जोकर’मध्ये पद्मिनी. महेश भट्ट यांची तर फॅक्टरीच होती. नवी हिरोईन घेऊन तिच्याकडून हवे तसे कामे करून घ्यायचे. हिरो इम्रान हाश्मी तर ‘चुंबक’च होता. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये मंदाकिनी, तर ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झीनत खूपच अर्धनग्नावस्थेत दिसल्या. अशा सिनेमाविषयावर खूप चित्रे काढली गेली. त्यातलीच काही अनुषंगाने रेखाटलेली आहेत.