कोकणात अलीकडे जाणार्या चाकरमान्यांना फक्त कोकण रेल्वे आणि त्रेतायुगापासून काम सुरू असलेला मुंबई-गोवा महामार्ग हेच प्रवासाचे मार्ग माहिती आहेत. मुंबईतून अलिबागच्या मांडवा बंदराला घेऊन जाणार्या लाँचेस आणि रोरो सेवा हे आणखी दोन प्रकार काहींच्या परिचयाचे. मात्र, तीसेक वर्षांपूर्वीपर्यंत कोकणात जायचे ते बोटीने, असा प्रघात होता. या आठशे ते बाराशे प्रवासीक्षमतेच्या मोठ्या बोटी असायच्या. त्या चालवणार्या कंपन्यांपैकी एक होती मोगल लाइन. या मोगल लाइनने १९७४ साली केलेल्या जाचक भाडेवाढीच्या विरोधात बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे जिवंत कार्टून. एखाद्या सिनेमातलं जिवंत दृश्य पाहावं, तसं वाटतं हे मुखपृष्ठ पाहताना. ते हात, त्यांची क्रूरता स्पष्ट करणारा केसाळपणा, मुठीत पिळला जात असलेला कोकणचा माणूस आणि त्याचं रक्त गोळा करायला भांडं धरलेला दुसरा हात… पाहूनच थरकाप होतो मनाचा आणि व्यंगचित्राच्या कुंचल्याला कडक सलाम ठोकला जातो… आज ही मोगल लाईन दिल्लीच्या तख्तावर विराजमान आहे आणि सर्वसामान्य माणसाला भाववाढीच्या चक्रात पिळून काढते आहे… पण, बरेचसे माठ बाठे अजूनही ‘अच्छे दिन’च्या खोट्या स्वप्नात रममाण असल्याने आपलं चिपाड झालंय हे अजून त्यांच्या लक्षात आलेलं नाही.