लोकसभेत ४८पैकी ४५ आणि विधानसभेत २८८पैकी २०० जागा जिंकू, ही मेघगर्जना जेव्हा फडणवीस साहेबांनी आपल्या पक्षनेत्यांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर केली, तेव्हा आकाशात ढगांचा गडगडाट झाला आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तिथे माझा मानलेला परममित्र पोक्या जातीने उपस्थित होता. त्याच सुमारास विदर्भात विजांचा कडकडाट आणि पावसासह गारांचा टपटपाट झाला, अशी बातमी आली, तेव्हाच तिथे उपस्थित असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष मिस्टर बावनकुळे म्हणाले, हा तर शुभशकुन आहे.
तेवढ्यात कोणीतरी शिंकलं. तेही इतक्या जोरात की सगळ्यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं.
‘च्यामारी, कोण शिंकलं ते,’ असा आवाज शेलार मामांनी देताच सगळे चिडीचूप झाले.
मात्र फडणवीसांनी आवाज दिला, शेलारमामा, ही माझं विधान सत्य असल्याची शिंक आहे.
त्यावर तावडेंनी प्रतिवाद केला की एक शिंक म्हणजे विघ्न. तीसुद्धा डाव्या बाजूने आल्यामुळे शंभर टक्के विघ्न. समजा उजव्या बाजूने एक शिंक आली तर हे विधान शुभसंकेत म्हणता येईल. जर उजव्या बाजूने दोन शिंका आल्या तर हंड्रेड परसेंट शुभसंकेत. पण तसं झालं नाही. शिंक डाव्या बाजूने आली, त्यामुळे तसं घडणार नाही, हे तावडे साहेब सांगत होते.
ते ऐकल्यावर फडणवीस साहेबांचा पारा चढला. ते म्हणाले, शास्त्र आम्हा पंडितांना जास्त कळतं. खुद्द भागवत साहेबांनी सांगितलं आहे. मी जे बोल्लो त्यावर तुम्ही आपली मतं मांडू शकता. आदरणीय मोदीसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या देशात लोकशाही आणि विचारस्वातंत्र्य आहे. फक्त विरोधकांचा अपवाद करून हे लक्षात असू द्या. निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाचे, पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशा वल्गना कराव्याच लागतात. त्याशिवाय विरोधकांच्या गोटात घबराट पसरत नाही. ही स्ट्रॅटेजी आहे. ती मी मोदीसाहेबांकडून आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडून शिकलोय. त्याचा रिझल्ट मिळतोच. बघाच तुम्ही. शिंदेसाहेबांचा अनुभव मोठा आहे.
– मग ते आत्ता निवडणुकीला उभं राहायचं आदित्य यांचं आव्हान का स्वीकारत नाहीत?…
– मला काय त्यांना आव्हान द्यायचं नाही, पण सहज विचारावंसं वाटलं, प्रकाश दरेकर यांनी घाबरत घाबरत विचारलं.
– हे बघा, हा फडणवीस तुम्हाला आणि सर्वांना सांगतोय, ते साहेब विकासकामात एवढे बिझी असतात की कोण आपल्याबद्दल काय बोलतोय इथे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसतो. भव्य जाहीर सभेतही समोर खुर्च्या असल्या काय आणि नसल्या काय, त्यांना लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यांना पुढच्या कामाचे वेध लागलेले असतात. आता येणार्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या १६१ जागा होत्याच की. आता हा आपलाच आकडा दोनशेपर्यंत जाईल. त्याशिवाय आपल्या शिंदेगटाच्या एकोणचाळीस की चाळीस त्या मिळतीलच. त्याशिवाय आपले अलाणे-फलाणे मित्रपक्ष तसंच आपल्या विचारांचे अपक्ष शिवाय निवडणुकीपर्यंत आपल्या पक्षात येणारे इतर पक्षांतील आयाराम मिळून हा आकडा खरं तर २८८पर्यंत जायला हवा, इतकी आता आपल्या पक्षाची हवा महाराष्ट्रभर धुळीसारखी पसरली आहे. अर्थात पक्षाच्या फुग्यात हवा भरण्याचं जे देशकार्य मोदीसाहेब करत आहेत, त्यामुळेच आपण इतका पुढचा पल्ला गाठत आहोत. मला तर विरोधी पक्षांची दया येते. आपण विमानाच्या वेगाने चाललो आहोत, तर ते कासवाच्या गतीने. पण लोकशाहीत विरोधी पक्षही टिकला पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी आपल्या जिंकून येणार्या दहा जागा सोडू शकतो. त्या दहा जागांवर निवडून येऊ शकणार नाहीत असे आपल्या पक्षातील हौशी उमेदवार उभे करू. हे सारं त्यांना विश्वासात घेऊन करू. वाटल्यास मिठाईचा अर्धा खोका देण्याची व्यवस्था करू. माझे बाहू आतापासून स्फुरण पावल्यासारखे फुरफुरत आहेत. तुम्ही माझं वाशिमला पोहरादेवी येथील नगारा भवन येथे झालेलं भाषण ऐकलं असणारच. तिथे तर माझा वरचा सूर आवाजाची पट्टी सोडून लागला होता. थेट श्रोत्यांच्या काळजाला हात घालून मी माझी सर्व शक्ती एकटवून बोंबलत… सॉरी बोलत होतो. तुम्हीही आतापासून आपापल्या मतदारसंघात प्रचार सुरू करा. लागणारी हवी तेवढी सामुग्री मी पुरवतो. एकही झोपडपट्टी, एकही टॉवर, एकही चाळ सोडू नका. समाजातील खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत एकही मतदार आपल्या प्रचाराच्या रणधुमाळीतून सुटता कामा नये. हळदीकुंकू समारंभ, स्नेहभोजने म्हणजे भंडारा, लोकनाट्य, ऑर्केस्ट्रा यांसारखे अनेक कार्यक्रम प्रत्येक मतदारसंघात आयोजित करा. तिथे पक्षाचा प्रचार करा. मग भीती बाळगण्याचं कारणच नाही. उपस्थितांना भेटवस्तूही द्या.
– पण तोपर्यंत शिंदे साहेबांचा गट न्यायालयाने अवैध ठरवला तर!… तावडेंनी शंका काढली.
– त्याची काळजी तुम्ही करू नका. ते पाहण्यास मोदीसाहेब समर्थ आहेत. तसं झालं तर सुंठीवाचून खोकला गेला असं फार तर म्हणता येईल. कारण आपल्या हातात काहीही नाही.
– काय म्हणता काय तुम्ही? आत्ता आत्ता तर शिंदेसाहेबांचं कौतुक करत होता आणि आता एकदम त्यांना ‘खोकला’ म्हणता?… मुनगंटीवार चित्कारले.
– हे पाहा, त्यांच्यावाचूनही आपलं काही अडणार नाही. शेवटी त्यांच्या गटाला बरखास्त करून आपल्या पक्षातच प्रवेश करावा लागणार आहे. ते भाजपवासी झाल्यावर त्यांचा वेगळा सवतासुभा मानण्याची गरजच नाही. आपण त्यांच्या पूर्वीच्या मतदारसंघाचे पत्ते कापून मूळ भाजपचे किंवा आपल्याला वाटतील ते आयाराम उभे करू शकतो. त्यामुळे भाजप महाशक्तिमान, महाबलवान पक्ष राज्यात होऊ शकतो. आतापर्यंत शिंदेसाहेबांसह त्यांच्याबरोबर आलेल्या बंडखोरांचं आपण खूप कौतुक केलं. त्यातील काहींना तर महत्त्वाची मंत्रीपदं दिली. आयुष्यात मिळाला नसेल एवढा सन्मान गेल्या चार महिन्यांत दिला. शिंदेसाहेबांना तर मुख्यमंत्रीपदाचा नजराणा दिला. मग मी काय हात हलवीतच बसायचं! येत्या निवडणुकीत बघाच तुम्ही चमत्कार…एवढं बोलल्यावर सभागृहातील वीजच गेली. आणि अपशकुन म्हणत तावडे बाहेर पडले.