दै.‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांनी काढलेल्या मर्मग्राही छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दि. २५ फेब्रुवारी रोजी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतल्या चिरा बाजार येथे असलेल्या श्री बँक्वेट हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते रात्री ९.३० या वेळेत पाहता येईल.
एखाद्या घटनेचे, जाहीर सभेचे विविध माध्यमांत वार्तांकन होत असतेच. पण वर्तमानपत्रांत ती मोठी बातमी वाचण्याआधी वाचक त्या बातमीतला फोटो पाहतात. त्या फोटोतून बातमीचे मर्म समजल्यावर वाचक बातमी वाचायची की नाही, ते ठरवतात. याचा पुरावा देणारी सचिन वैद्य यांची अनेक छायाचित्रे बोलकी छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. यातल्या अनेक छायाचित्रांना पुरस्कारही मिळाले आहेत.
या प्रदर्शनाविषयी माहिती देताना वैद्य म्हणाले, नोकरीला लागल्यावर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी उगवत्या सूर्याकडे पाहून आरवणार्या कोंबड्याचे मी काढलेले पहिले छायाचित्र दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले तेव्हा संपादक संजय राऊत यांनी माझे सर्वप्रथम कौतुक केले. त्यावेळी त्यांनी एक हजार रुपये बक्षीस देऊन म्हटले, सचिन आज तू खूप छान काम केले आहेस. त्या फोटोबद्दल मला बरेच फोन आले. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले. तेव्हापासून आतापर्यंत बरीच फोटोग्राफी केली. अनेक पुरस्कारही मिळाले. यातली काही छायाचित्रे माझी होती हेच लोकांना कळले नव्हते. त्या छायाचित्रासाठी मी घेतलेली मेहनत लोकांना कळावी यासाठी हे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय मी घेतला.
माझी काही छायाचित्रे तुफान गाजली. कोरोना काळ आटोक्यात आल्यानंतर सेंट्रल रेल्वे सुरू झाली, तेव्हा लोकलला खाली झुकून नमस्कार करणार्या एका कर्मचार्याचा फोटो मी काढला होता. तो फोटो सेंट्रल रेल्वेने ट्वीट केला होता. मग हेच छायाचित्र आनंद महेंद्र यांनीही रिट्वीट केले होते. त्या फोटोवर माझे नाव नव्हते म्हणून बर्याचजणांना ते कुणी काढले आहे ते कळले नव्हते. पण ते छायाचित्र व्हॉट्सअप, ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या सगळ्या माध्यमांवर प्रचंड गाजले होते. त्या छायाचित्रामुळे ‘रेडिओ मिरची’कडूनही मला अनेक फोन आले होते. त्यावर दोनदा माझी मुलाखत झाली.
या प्रदर्शनात वैद्य यांनी खूप उंचावरून काढलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभांची छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्याही सभा त्यांनी छायाचित्रित आहेत. यात ६ डिसेंबरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी झालेल्या प्रचंड गर्दीचा फोटो आहे. गानसम्राज्ञी लतादिदींचे काही फोटो आहेत. उद्धवसाहेबांचे सोलो फोटो आहेत. अनिल अंबानी आपल्या गाडीला धक्का मारतानाचा दुर्मिळ फोटो सचिन वैद्य यांनी काढला आहे. दुसर्या एका छायाचित्रात एक माकड आपलीच छबी स्कूटरच्या आरशात न्याहाळतानाचा सचिन वैद्य यांनी काढलेला फोटोही दुर्मिळ आहे. या प्रदर्शनात अशी अनेक छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत.
उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्याबरोबरच दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, खासदार अनिल देसाई, उपसभापती नीलमताई गोर्हे, खासदार अरविंद सावंत, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हेही या प्रदर्शनाला येणार आहेत.
न्यूज फोटोग्राफी अर्थात वर्तमानपत्रांसाठी कॅमेर्यातून बातमी अचूक टिपण्याची कला शिकण्याची इच्छा असलेल्या आणि एक फोटो हजार शब्दांच्या लेखापेक्षा अधिक बोलका असतो, म्हणजे काय, हे समजून घ्यायला या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यायला हवी.