आजोबांनी माझ्या नावावर ५० कोटींची मालमत्ता केली आणि अचानक चार चार मुली माझ्या प्रेमात पडल्या. यातल्या कोणाचं प्रेम खरं आहे, हे कसं ओळखायचं?
– इरफान मुल्ला, सातारा
नीट शोध घ्या… त्या मुलीही आजोबांच्या नाती असायच्या… ५० कोटीच्या आजोबांना फक्त एकच नातू असू शकतो?
डास माणसांना चावतात, रक्त पितात, वर गाणं पण गुणगुणतात… हे जरा ज्यादाच नाही का?
– साबीर खान, गोवंडी
एक मच्छर आदमीला काय बनवते माहीत आहे ना? त्यापेक्षा डास बिचारे काय ज्यादा करतात? ( आता डास आणि मच्छर यांच्यामधला फरक शोधून तुम्ही ज्यादापणा करू नका.)
इन्कम टॅक्सवाले तुमचा पत्ता विचारत होते… सर्व्हे करायचा म्हणत होते, देऊ का त्यांना तुमचा पत्ता?
– राजेश कुलकर्णी, भांडुप
द्या, द्या, माझं घर तरी झाडून होईन फुकटात.
पोलिस मालकाच्या हातातून घराची किल्ली हिसकावून चोराकडे देत आहेत, असं दृश्य तुम्ही इतक्यात कधी पाहिलेलं आहे का? असं झालं तर मालकाने काय करायचं?
– रमण पाटील, गडहिंग्लज
चोराला चोरी कर असं सांगणार्याला हुडकून त्याचा बनेलपणा उघडा नागडा करायचा, घरमालकाने लक्षात ठेवावं, रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही.. (व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीकडून साभार)
आपल्या देशात लोकशाही आहे की हुकूमशाही?
– सावित्री भोसले, पिंपरी, पुणे
खोकेशाही… असं विरोधक बोलतात, मी नाही बाबा…
जगातले सगळे महत्त्वाचे शोध आपल्याकडेच लागले होते. इतरांनी ते चोरून नेले, असं आमचे एक काका रोज मेसेज पाठवून सांगत असतात… त्यांना काय उत्तर देऊ?
– बंडू नागवेकर, पंचवटी, नाशिक
त्यांना म्हणावं, तुमचा शोध लागल्यावर तुम्हाला का नाही चोरून नेला? तुमचा शोध लावणं महत्त्वाचं नव्हतं का? आणि जर नव्हतं महत्वाचं तर तुमचा शोध लावणार्यांनी तुमचा शोध झक मारायला लावला का?
बापाची चप्पल पोराच्या पायाला येऊ लागली की तो मित्र बनतो, असं म्हणतात… मग मुलगी आईची मैत्रीण कधी बनत असेल?
– जलाल तांबोळी, रास्ता पेठ, पुणे
पायातली चप्पल काढते, तेव्हा मुलगी आईची मैत्रीण होते.. यातूनच काय ते समजा, सावध राहा. नंतर म्हणू नका मी सांगितलं नाही.
लग्न करावं की करू नये? लग्नाचा अनुभव तुम्हाला असल्याने तुमच्याकडे विश्वासाने सल्ला विचारते आहे.
– रेश्मा पंडित, रेशीमबाग, नागपूर
लग्न जरूर करावं आणि आल्या घरी सुखाने नांदावं. उगाच त्या घरातली माणसं फोडून ते घर दारावरच्या नेमप्लेटसह आपलंच म्हणू नये, ता.क- हे उत्तर नॉन पॉलिटिकल आहे. तुम्ही रेशीम बागेत राहता म्हणून मी टोमणा मारला असं समजू नका.
पाकिस्तानमध्ये आता लोकांचं जगणं मुश्कील झालं आहे, पेट्रोलपासून दुधापर्यंत सगळे भाव कडाडले आहेत. या देशाच्या उदाहरणातून इतरांनी काय धडा घ्यावा?
– निलेश कारखानीस, नालासोपारा
महागाई नाही वाढलीय, लोकांचं इन्कम कमी झालंय, असं सांगणारे मंत्री आपल्या देशात हवे. तसे नसतील, तर त्यांची हालत पाकिस्तानसारखी होते, असा धडा प्रत्येक देशाने घ्यावा.
बरं मग काय केलंत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी?
– नीता कलगुटकर, ताडदेव, मुंबई
दिवसभर रात्रीची वाट बघत होतो (संस्कृतीरक्षक दिवसा काही करू देत नाहीत).
माझा एक मित्र लग्नासाठी मुलगी पाहायला गेला आणि मुलीच्या आईलाच पसंत करून आला हो… कसं होणार त्याचं?
– व्हिन्सेंट स्वामी, अहमदनगर
का, मुलीच्या आईवर तुमचा डोळा होता का? त्याचं तो बघेल, नाही तर भोगेल, तुम्हाला का टेंशन?
जे देवाकडे काही ना काही सतत मागत असतात ते देवाला आंधळा समजतात का? त्यांच्याकडे काय आहे, काय नाही, ते देवाला माहिती असेलच ना?
– राहुल किराड, पाचगणी
ते बोके असतात, देवाकडे मागताना डोळे बंद करून मागतात. त्यांना वाटतं, आपल्याकडे कोणी बघत नाही. सगळेच त्यांच्याकडे बघत असतात.. पण देव त्यांच्याकडे बघतो की नाही ते मला माहित नाही. कारण मला कोणी ‘बाबा’ म्हणत नाही (माझी मुलंसुद्धा.)